दिलोमे तू अपनी बेताबिया लेकर चल रहे हो, तो जिंदा हो ||
नजरमें अपनी ख्वाबोकी बिजलिया लेकर चल रहे हो, तो जिंदा हो||
हवा के झोंके के जैसे आझाद रहेना सिखो, तो जिंदा हो ||
तुम एक दर्या के जैसा बहेना सिखो, तो जिंदा हो ||
हैरानिया लेकर चल रहे हो, तो जिंदा हो ||
दिलो में अपनी बेताबिया लेकर चल रहे हो, तो जिंदा हो ||
"भूतान" म्हणजे आनंदी लोकांचा देश!!

नव्याच्या शोधात असणा-या प्रत्येक भटकंत्याला आपल्या शेजारीच असलेले हे चिमुकले राष्ट्र आवडणारच नाही तर ते त्याच्या कायमस्वरुपी हृदयांत राहील असे हे सुंदर राष्ट्र आहे.

भारताशेजारी असलेल्या या चिमुकल्या देशात बौध्द धर्माचे अनुयायी आहे व त्या देशाने बौध्द धर्म स्विकारलेला आहे. येथील मंगोलियन वंशाच्या लोकांची भाषा, पोषाख, जीवनपध्दती पूर्णत: वेगळी आहे.

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या डोंगर द-या उंच-उंच पर्वत रांगा, जागोजागी बौध्द मॉनेस्ट्री व स्तूप, विविध पेटींग्ज करणारे कलाप्रेमी नागरिक, व अतिशय शिस्त असलेल्या देशाकडून आपल्या कडील  " सिग्नल तोडणे हा माझा जन्म सिध्द अधिकार आहे " असे समजून वाहने चालविणारी मंडळी भूतानचे पायी चालणारे नागरिक सुध्दा ट्रॅफिक नियम पाळतात हे पाहून नक्कीच आपली मान खाली घालतील, असो.

अशा या निसर्गरम्य भूतानला बाईकने जायचे असे ठरविले. त्याप्रमाणे ग्रुप मध्ये ही चर्चा केली. सुरुवातीला सर्वच जण तयार झाले, नंतर मात्र एक एक जण कमी होत गेला. आता काय करावे? हा प्रश्न निर्माण झाला कारण "भूतान या देशान एकटया व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही." कमीत-कमी दोन व्यक्तीतरी हव्यात असा त्यांचा कायदा आहे, आणि त्या देशात सर्व कायदे पाळले जातात व त्यात पळवाट ही नसते. मग बायकोला भुतानला जाण्यासाठी तयार केले यापूर्वी बाईकवर गोवा वगैरे जावून आल्यामुळे तिला बाईक टुरची सवय होती.

आता अडचण होती बाईक पाठविण्याची, कारण नाशिक हून बाईक चालवत न्यायची म्हटले तर कमीत-कमी आठ ते दहा दिवस सिलीगुडीला पोहचायलाच लागले असते आणि एवढा वेळ नसल्याने सिलिगुडी येथूनच बाईक भाडयाने घ्यायची असे ठरले त्याकरीता नाशिक येथील हायकर क्लबच्या मयुर पुरोहित यांची मदत झाली. मयुर हा बाईकने "लेह-लडाख् टुर्स" दरवर्षी घेवून जात असतो.

दि. 4 डिसेंबरला मुंबई ते बागडोगरा विमान पकडून बागडोगरला व तेथुन सिलिगुडीला पोहचलो. संध्याकाळी 4 ते 4.30 ला बाईक कलेक्ट करण्याकरिता निघालो. पूर्वेकडील प्रदेशात अंधार लवकर पडतो. त्याप्रमाणे संध्याकाळी 5.30 वाजता संपूर्ण अंधार पडला.

आज पासुन बाईक प्रवास सुरु होणार होता. सकाळी आठ वाजता बुलेट सुरु केली. आणि फुंन्टशोलींगच्या दिशेने निघालो. आता फुंन्टशोलींगला जायला दोन रस्ते आहेत. एक रस्ता सेवॉक मार्गे, मात्र हा संपूर्ण जंगलाचा व वळणा-वळणाचा रस्ता तर दुसरा सिलीगुडी-गोहट्टी हायवे. पोलीसाला विचारले तर आम्ही दोघेच असल्याने त्यांनी हायवेने जाण्याचा सल्ला दिला.

सिलीगुडी ते जायगांव, हे भारताचे भुतानच्या हद्दीला लागुन असलेले शेवटचे गाव मध्ये फक्त एक कमान, त्यापलीकडे भुतान मधील फुंन्टशोलींग हे गांव. सिलीगुडी ते फुंन्टशोलीग 150 ते 160 कि.मि. चे अंतर पार करुन दुपारी 12 वाजेपर्यंत फुंन्टशोलिगला पोहचलो.

भुतान या देशाचे वैशिष्टय म्हणजे तेथे आपणांस सर्वात प्रथम आपले व आपल्या वाहनाचे प्रवेश पत्र घ्यावे लागते. फुंन्टशोलींगला दुतावास आहे.

तेथे हे प्रमाणपत्र दुपारी अडीच वाजेपर्यत मिळते. त्याच प्रमाणे वाहनाचे प्रमाणपत्र RTO ऑफीस मधुन घ्यावे लागते. येथील वैशिष्टये म्हणजे भुतान मधील सर्व सरकारी कार्यालये सकाळी नऊ वाजता  सुरु होतात आणि सर्व कर्मचारी नऊ वाजता कार्यालयात उपस्थित असतात.

फुंन्टशोलींगच्या दुतावासातुन थिंपूला जाण्याचा पास काढला. सकाळी थिंपुला जायला निघालो, येथे ही बाब लक्षात ठेवा कि, एकदा पास काढला म्हणजे झाले असे नाही तर वाटेत लागणा-या चौक्यांवर ते पास दाखवून त्यावर संबंधित अधिका-याची स्वाक्षरी व शिक्का घेणे जरुरीचे आहे.

फुंन्टशोलींग ते थिंपू हा अतिशय वळणा-वळणाचा व प्रचंड चढ असलेला घाटाचा रस्ता आहे. आपण आपली बाईक अतिशय काळजीपूर्वक चालवत असतो त्याचवेळी आपल्यालादिसते की, व्हॅन चालविणा-या महिला चालक अतिशय वेगात व सफाईदारपणे त्यांची कार चालवित आहे. या रस्त्यात अतिशय सुंदर असे वळणा-वळणाचे रस्ते, रस्त्याचे दिसणारे निसर्ग सौंदर्य,वाहणारे झरे मन तृप्त करते. फुंन्टशोलींग थिंम्पू अंतर 180 कि. मी. च आहे. मात्र वळणा-वळणाचे रस्ते, रस्त्याला पडलेले खड्डे यामुळे प्रवास लवकर संपत नाही. त्याचप्रमाणे घाटाला कठडे नसल्याने बाईक काळजीपूर्वक चालवावी लागते.

भूतान या देशाला भारतीय सैंन्याचे संरक्षण आहे.रस्त्यात जागोजागी जाणारी इंडियन आर्मीची वाहने, इंडियन आर्मीची चौकी बघुन न कळत आपल्या सैन्यदलाबद्दल कृतज्ञतेचा भाव मनात दाटुन येतो.

तिस-या दिवशी थिंपूहून - पुनाखा या भूतानच्या प्राचिन राजधानीला भेट दयायची ठरविली. मात्र त्या आधी थिंपू येथून परमिट व थिंपू बस स्टँडवर असलेल्या आर.टी.ओ. ऑफीसमधून बाईकचे परमिट काढले.

थिंपू ते पुनाखा हा ही निसर्ग सौंदर्यांने नटलेला रस्ता आहे.वाटेत हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे आपल्या बरोबर असतात.थिंपू ते पुनाखा या रस्त्यावर " डोचुला पास" आहे. भूतानच्या शहीद झालेल्या 108 सैनिकांच्या स्मरणार्थ तेथे "108" छोटे-छोटे स्तूप उभारले आहेत. पुनाखा येथे जुना राजवाडा आहे. जो 1667 साली बांधण्यात आला होता. त्याला आतापर्यंत चारवेळा आग लागली होती. पुनाखा येथील राजवाडा बघण्यासारखा आहे.आताच्या थिंपू या राजधानीपूर्वी पुनाखा  ही भुतानची राजधानी होती.

चवथ्या दिवशी थिंपूतच मुक्काम करुन थिंपूजवळ असलेली "गोल्डन बुध्दाची " मुर्ती बघण्यास गेलो. थिंपूजवळ आठ- दहा किलोमीटर वर एक उंच टेकडीवर ही जवळ-जवळ 119 फुंटांची सोनेरी रंगाची ही "शाक्यमुनी बुध्दमृर्ती " आहे. ज्याचे बांधकाम भुतानचे राजे   जिग्मे सिंग्नेय वांगचुक यांच्या काळात झाले आहे. दि. 25 सप्टेंबर 2015 ला ही मृर्ती स्थापन झाली.

आता भुतानचे आकर्षण असलेले व भुतानला गेले आणि ही मॉनेस्ट्री बघितली नाही तर तुमची भुतान ट्रिप वाया गेली असे समजले जाते, त्या पारो येथील " टायगर नेस्ट " वा " टाक्संग मॉनेस्ट्रीला" आता भेट दयायची होती. थिंपू ते पारो 70 किमी अंतर अतिशय निसर्ग सौदर्याने नटलेला रस्ता वाहणारी नदी आहे. पारो येथे भुतानचे एकमेव एअर पोर्ट आहे. पारो पासून 12 ते 15 किमी अंतरावर एका उंच पर्वतावर "टायगर नेस्टमॉनेस्ट्री आहे. येथे ट्रेकींग करत व घोडयावरुन ही जाता येते. मात्र घोडे वाले संपूर्ण वर नेत नाही हे लक्षात  ठेवावे. जवळ-जवळ 3 ते 4 तासाची ही पाय-या पाय-यांची चढण आहे.

आठव्या शतकात "गुरु पदमसंभव" यांनी येथे रहिवास केला होता. त्यांनीच भूतान मध्ये बौध्द धर्माचा प्रसार केला इ. 1692मध्ये येथे "ग्यालसे तेनझिंन राबग्ये" यांनी येथे मॉनेस्ट्री बांधली. या मॉनेस्ट्रीत जायचे असेल तर रु.500/- चे तिकीट घ्यावे लागते, आणि जर बाहेरुनच मॉनेस्ट्री बघायची असेल तर आपल्या भारतीयांच्या आवडीप्रमाणे आहे."टायगर नेस्ट" मॉनेस्ट्रीच्या पायथ्याशी ब-याच वस्तु विकत मिळतात. आणि पारो येथील मार्केट पेक्षा त्या खूपच स्वस्त मिळतात, त्यामुळे पारोला खरेदी करु असा विचार मनातून काढुन टाकावा.

भूतान मध्ये सर्व प्रजा ही राजाचा अतिशय आदर करते, जागोजागी, हॉटेल्स घरांमध्ये भूतानच्या राजाचे फोटो लावलेले आहेत. भूतानचे वैशिष्टये म्हणजे येथे चो-या होत नाहीत. आम्ही फुंन्टशोलींग, टायगर नेस्ट येथे बुलेटला बॅग, हेल्मेट अडकवून गेलो, परत येईपर्यंत बाईकला असलेले हेल्मेंट, बॅग जशी- तशी होती.

भूतानमध्ये भारतापेक्षा रु. 20 ने पेट्रोलचे दर कमी आहे. तेथील पेट्रोलचा दर रु. 54/- होता. भूतानमध्ये परमिट काढतांना आपल्याला शक्य नसल्यास एजंट लोक आहेत. जे परमिट काढून देतात. आणि त्यांची फी अतिशय माफक म्हणजे रु. 100/- ते रु.200/- घेतात. फसवणुक करणे हे भुतानी नागरिकांच्या रक्तातच नाही. असे अतिशय प्रामाणिक नागरीक आहे. त्याचप्रमाणे भूतान मध्ये चित्र-विचित्र कपडे ते नागरीक कधीही घालत नाही व संस्कृतीचे पालन करतात. भुतानमध्ये भारतीय रुपया चालतो. भारतीय जेवण मिळणारी हॉटेल्स आहेत, मात्र तेथील चव तितकीशी बरोबर नसते.  अशी ही भुतान ट्रिप आम्ही सात दिवसासत पूर्ण केली प्रत्येकाने एकदा तरी भेट दयावी असा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आपला चिमुकला शेजारीस आहे.

लेखकद्वय: अजित मुठे / नेहा मुठे, नाशिक
ईमेल: ajitmuthe@yahoo.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel