मुंबई स्थित प्रत्येक कोकणी माणसाची गणेश चतुर्थीची लगबग सुरु होते ती म्हणजे अगदी चार ते पाच महिन्यापूर्वी पासून. ऑफिस मध्ये सुट्टीच्या प्लॅन पासून, मग त्यात प्लॅन नुसार खूप धावपळ करून तिकिट मिळवायची. त्या नंतर डोळ्यासमोर दिसणार गणपती सजावटीच स्वप्न, मग त्या नुसार किश्याची काटकसर करत खरेदी करायची हे सगळं करताना पण एक विलक्षण आनंद आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत असतो. मग तो दिवस उजाडतो ज्याची आपण वर्षभर वाट पाहत असतो. गणपतीला गावी जायचा. डोळ्या समोर असंख्य स्वप्न, चेहऱ्यावर एक वेगळच तेज, सोबत स्वर्ग सौंदर्य लाभलेल्या कोकणच्या निसर्गाचा विलक्षण अनुभव, जणू भासे मजला हेच स्वर्ग असे.
अश्याच एका मुंबई ते माझ्या गावी जातानाचा अनुभव जो मी कधीच विसरू शकत नाही.
गणेश चतुर्थी चालू झाली होती. अथक विनंती नंतर ऑफिसमधून शेवटच्या पाच दिवसाची सुट्टी मिळाली. सुरुवातीला सुट्टी न मिळाल्यामुळे गौरी दिवशी आमच्या घरी मोठा उत्सव असतो. म्हणून मी त्याच दिवशी गावी जायचं ठरवलं, मुंबईत आल्या नंतरच माझं पाहिलंच वर्ष होत.
तस गावी जायचं अचानकच ठरल्यामुळे हातात तिकीट नव्हती, बहिणीने कोकण रेल्वेची तात्काळ तिकीट काढायचं म्हटलं पण तेव्हा निवसर स्टेशन वर दरड कोसळल्यामुळे ट्रेन पण बंद होत्या आणि आदल्या दिवशी रात्री कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई गोवा महामार्ग बंद होता. त्यामुळे आता गावी जायच कस? हाच मोठा पेच समोर उभा राहीला होता आणि मुंबईतील पाहिलंच वर्ष असल्यामुळे खूप दिवसांनी गावी जायला मिळेल या मुळे थोडं भावनिक आणि उत्साही पण व्हायला झालं होत.
इतक्यातच एक मार्ग सापडला भावोजींच्या मित्राच्या ओळखीचा पारिजात गाडी वरती एक ड्राइव्हर निघाला. त्याला फोन करून कशी बशी एक केबिनची शीट मिळवली आणि चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसू लागला. झालं. एकदाच माझं मन शांत झालं.
संध्याकाळी आम्ही गाडीत बसलो. इतक्यात हळूच एका प्रवाश्याने विचारले,
"वो गाडी खायच्या मार्गे काढतलास"
ड्राइव्हर ने उत्तर दिले पुणे एक्सप्रेस रोड व्हाया कोल्हापूर.
तशी मला फिरायची आवड असल्यामुळे जरा बर पण वाटलं. पुणे एक्सप्रेस-वे चे नाव खूप ऐकलेलं तेव्हा. आता प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार याचा उत्साह पण मनात होता.
थोड्याच वेळात प्रवास सुरु झाला. रात्री गाडी जेवायला थांबली थोडं फार नास्ता केल्यानंतर परत प्रवास चालू झाला. केबिनमध्ये असल्यामुळे रात्र भर झोप तर नव्हतीच लागत. पण त्याच इतकं काही वाटलं नव्हतं कारण पहिल्यांदाच एक्सप्रेसवेचा अनुभव ही खूप मजेशीर होता आणि सोबत मुसळधार पडणारा पाऊस!
जसा जसा प्रवास पुढे जात होता तस ड्रायव्हर, क्लीनर, मी माझ्या सोबत असलेले केबिन मधले सहप्रवासी आमच्या खूप गप्पा रंगत होत्या आणि त्यात गावच्या ओढीने नीट झोप पण लागत नव्हती. कधी एकदा आपलं गाव येत अस झालेलं!!
पुढे सुमारे सकाळी ३ च्या सुमारास आम्ही कोल्हापुरात प्रवेश केला. रस्त्यावरच्या पिवळ्या मंद दिव्यांच्या प्रकाशात श्री शाहू महाराजांची कोल्हापूर नगरी अगदी सोनेरी दिसत होती. इतक्यातच ड्राइवरने गाडी थांबवली. म्हणून समोर लक्ष गेला तर रेनकोट घातलेले दोन पोलीस उभे होते. रिमझिम पाऊस तर आम्ही निघाल्या पासून चालूच होता. त्यातूनच त्या सोनेरी उजेडातून थोडं पुढे येऊन ते म्हणाले.
"पाऊसामुळे पुढे रस्ता बंद आहे"
तुम्हाला पुढे जाता येणार नाही. ड्राइवर ने १० मिनिट दुसऱ्या ड्राइवरशी चर्चा करून गाडी परत मागे घेऊन दुसऱ्या मार्गावर घेतली. परत एक ते दीड तास च्या प्रवास नंतर समोर काही गाड्या थांबलेल्या दिसू लागल्या आणि आमची गाडी पुन्हा थांबली. आमच्या गाडीच्या आधीच ३/४ कोकणात जाणाऱ्या गाड्या पुढे थांबल्या होत्या. काही पोलीस पण होते तिकडे.आम्ही केबिनमधेच बसलेलो असल्यामुळे समोर अंधुक प्रकाशात सार धुरकट चित्र दिसत होत. पण नक्की काय झालं हे मात्र समजत नव्हतं.
इतक्यात त्यातला एक पोलीस म्हणाला, "पुढे ५०० मीटर वर असलेल्या नदीला पूर आला आहे आणि पाणी ब्रीज वरून वाहत आहे, म्हणून हा रस्ता बंद केला आहे"
दहा पंधरा मिनिटं सीटवरच स्तब्ध झालेला ड्राइवर गाडीतून खाली उतरला आणि दुसऱ्या गाड्यांच्या ड्राइवरशी चर्च्या करू लागला. माझ्या सह इतर प्रवासीही थोडे घाबरले, कुजबुज चालू झाली, काही प्रवाश्याच्या घरी तर सकाळी सत्यनारायण पूजा पण होती.
काही प्रवासी तर, "काय रे देवा ह्या चांगल्या कार्याक जाताव आणि ह्या काय मधी आणून ठेवलं " असे काहीसे कुजबूजु लागले. सुमारे १५/२० मिनिटांच्या चर्चेनंतर असं समजलं की जोपर्यंत नदीचं पाणी कमी होत नाही तो पर्यंत तिकडेच राहावं लागणार आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे पाणी कधी पर्यंत ओसरेल हे कोणीही सांगू शकत नव्हतं.
खरचं एका क्षणात सर्वांचा चेहरा उतरला, माझ्या सह सर्व प्रवाशी एकदम घाबरून गेलो आणि कुणी पावसाला शिव्या देत होत, तर कुणी गणपती बाप्पाला साकडं घालत होत. असं करता करता सकाळचे ६.०० वाजले पण पूर काही कमी होत नव्हता आणि पाऊस ही!
त्याच वेळी कोकणात जाणारी गिरोबा ट्रॅव्हल्सची एक गाडी तिकडे आली आणि त्या वेळी मूळचे फोंडा घोणसरी गावचे श्री. राणे म्हणून एक अत्यंत हुशार आणि अनुभवी ड्राइवर त्या गाडीवर ड्राइवर म्हणून होते. एकंदर सर्व परिस्थिती लक्ष्यात येताच त्या राणेंनी सर्व गाडी चालकांना एकत्र बोलावून असं सुचवलं की मला इथली थोडी फार माहिती आहे, काही पर्यायी मार्गही माहीत आहेत. त्यामुळे मी माझी गाडी घेऊन पुढे निघतो तुम्ही सावकाश एक एक करून माझ्या मागे या.
सर्वांच्या सहमतीने आमचा प्रवास पुन्हा चालू झाला. माझ्या सोबत बसलेला एक कुडाळचा मुलगा होता एवढा सगळ्या प्रवासात आमची बऱ्यापैकी ओळख झाली होती. पुढे अंधुक प्रकश्यात छोट्या छोट्या गल्लीतून वाट काढणारी गिरोबा गाडी आणि मागे आम्ही आणि आमच्या मागे ४/५ गाड्या. सगळं अगदी थ्रिलर वाटत होत आणि नंतर नंतर मज्जाही येत होती. हे सगळं संपल्या नंतर आम्ही फोंडा घाटात आलो आणि मग तो फोंडा घाटाचा रस्ता आणि पाऊस आजूबाजूला छोटे छोटे धबधबे, हिरवीगार झाडे, डोंगरातून वाहणारे धुके सगळं अगदी मनमोहून टाकणार होत.
पण खूप परिश्रम नंतरच्या या सुखावर परत एकदा विरजण पडलं. फोंडा बाजारपेठेत आल्यावर आमच्या गाडीचा टायर पंचर झाला. पण तेवढा गोष्टीने मूड न बिघडू देता, आम्ही सर्व प्रवाशी चहा आणि नाश्त्याचा उपभोग घेतला. उशीर झाल्यामुळे आणि सगळीकडे रस्त्यांची बोंबाबोंब असल्यामुळे घरचे ही चिंतेत होते. त्यांचे ही फोन यायला चालू झाले होते . पण आता चिंतेच काही ही कारण नाही आम्ही जेमतेम 1/2 तासात पोहचतोय अस सांगून त्यांना धीर देत होतो. कारण आता आम्ही जवळ जवळ पोहोचलोच होत आणि दुसरा टायर बसवून झाल्यावर परत आमचा प्रवास चालू झाला आणि मजल दरमजल करत ११.५० ला मी घरी पोहचलो. हा प्रवास आयुष्यभर लक्ष्यात राहील माझ्या!!
लेखक: अमित प्रभाकर चाळके
ईमेल: amitchalk@gmail.com