अण्णासाहेब: एक कला-तपस्वी

अण्णा एक अतिशय सामान्य व्यक्तिमत्व. पण त्यांच्यात असलेल्या कला गुणांनी त्यांना असामान्य घडविले. कलागुण पण एक, दोन, तीन, नाही तर अनेक आणि तेही विविध क्षेत्रातील कला, संगीत, नाटक, कथा, शिल्प, मूर्ती, चित्रकला, छायाचित्र, प्रवास, सिनेमा अश्या अनेक कलांमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. अण्णांचा जन्म 1931 साली विदर्भातील एका तालुक्याच्या ठिकाणी झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या गांवी पुर्ण केले आणि उच्च शिक्षण नागपुर येथे पुर्ण केले. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम एक कलाशिक्षक म्हणुन आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्यांनी कलाक्षेत्रातील सर्वात्तम पदवी जी.डी.आर्ट प्राप्त केली होती.त्या काळी महाराष्टृतुन व्दितीय क्रंमाक मिळविला होता.

अण्णांची कोटुंबीक परिस्थीती इतर सर्व सामान्य कुटुंबाप्रमाणेच होती. त्यांचे वडील विश्वनाथपंत हे त्या परिसरातील सुप्रसिध्द किर्तनकार होते. त्यावेळेसचे किर्तनकार हे अव्यावसायिक होते. मनात ईश्वराप्रती अमाप श्रध्दाभाव आणि किर्तनाच्या माध्यामातुन लोकप्रबोधन, जनजागृती ऐवढ्याच काय तो या थोर पुरूषांचा जीवन जगण्याचा उद्देश. अण्णावंरसुध्दा त्यांच्या वडिलांच्या किर्तनाचे संस्कार लहानपणापासुनच झालेले होते. अण्णांनी ते लहान असतांना आपल्या वडिलांसोबत किर्तनाला जात असत, असे अनेकदा सागांयचे. आपल्या वडिलांबद्दल असलेला अभिमान, ह्या गोष्टी सागंताना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवायचा.

बालपण आंनदात जात होते. सर्व काही सुरळीत सुरू होते. शालेय, माध्यमिक, उच्च माध्यमिक असे शिक्षणाचे टप्पे पार करत करत अण्णा उच्च शिक्षणासाठी नागपूर येथे मार्गस्थ झाले आणि तशातच एक दुर्दैवी घटना घडली. अण्णाची आई पाठीशी दोन भावंडाना सोडून स्वर्गवासी झाली होती. अण्णांनी वडीलांना घर चालविण्यास हातभार लाऊन, घर सांभाळुन, आपले व आपल्या लहान भावांचे शिक्षण पुर्ण केले. त्यांनी आपले शिक्षण नागपुर येथे पुर्ण केले आणि आपल्या गावी येऊन गावातीलच एका खासगी शिक्षण संस्थेमध्ये नोकरीला सुरूवात केली. आता त्याची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली होती. त्यांचा इतर कलाक्षेत्रातसुध्दा सहजच वावर सुरू झाला होता.  

कर्ता मुलगा नोकरीला लागल्यानंतर जे प्रत्येकाच्या घरात घडत तेच अण्णाच्या घरात घडले. अण्णांना विवाह करण्यासंदर्भात विचारणा होऊ लागली आणि रितीभातीप्रमाणेच त्यांना उपवर मुंलीची स्थळे येऊ लागली. अश्यातच अमळनेर येथील एक सुसंकृत कुंटुबातील एक स्थळ अण्णांना चालुन आले. अण्णा आपल्या घरातील काही जेष्ठ मंडळीसह अमळनेर येथे गेले. अमळनेर येथील एक साधारण कुटुंब, त्या कुंटुंबात सप्तकन्या होत्या. मोठया मुंलीची यथायोग्य लग्न पार पडलेली होती. यमुना नावाच्या मुलीसंदर्भात अण्णांना हे स्थळ सुचविण्यात आले होते.  यमुनाताई या दिसायला सर्वसामान्य मुलीप्रमाणेच होत्या, पंरतु मनमिळाऊ होत्या. स्वयंपाकात, घरकामात सुगरण होत्या. मुला-मुलींचा दाखविण्याचा कार्यक्रम पार पडला. अण्णांना यमुनाताईं प्रथमदर्शनीच पंसत पडल्या होत्या. अर्थात त्या काळात मुलींच्या पंसतीला मान नव्हता, अगदीच असे म्हण्यापेक्षा मुलींची पंसती विचारण्याची पध्दत वगैरे नव्हती. यमुनाताईनी पण या स्थळाला आंनदाने होकार दिला होता. या सर्वात एक मजेशीर प्रंसग घडला होता. अण्णांना मध्यस्थांनी अजुन एक प्रस्ताव दिला आणि तो होता यमुनाताईंच्याच लहान बहिणीचा. त्या दिसायला यमुनाताईपेक्षा उजव्या होत्या, म्हणजे अतिशय सुंदर, घारे डोळे असलेल्या. पण अण्णांनी तो प्रस्ताव साफ नाकारला. अण्णांनी यमुनाताईंच्या भावनांचा  विचार केला होता. एकदा दिलेला शब्द म्हणजे शब्द, असे त्यांचे धोरण होते. म्हणुन त्यांनी हा निर्णय घेतला. कालातंराने विवाह पार पडला. यमुनाताई आपल्या सुखी संसाराची स्वप्न घेऊन अण्णांच्या घरी आल्या. त्यांनी प्रसन्न मनाने घराच्या उंबरठ्यावरील माप ओलंडले. अण्णा, सासरे, दिर असलेल्या पुरूष मंडळीच्या साम्राज्यात यमुनाताईंचा एक स्त्री म्हणून पहिला प्रवेश झालेला होता, असे म्हणतात की स्त्री शिवाय घराला घरपण मिळत नाही. खरच होते ते कारण अण्णांच्या घराला यमुनाताईंमुळेच पूर्णत्व प्रात झाले होते. अण्णांनी आता घराची संपूर्ण जबाबदारी यमुनाताईंवर सोपवली होती आणि यमुनाताईसुध्दा ती समर्थपणे साभांळत होत्या.

अण्णा आपली नोकरी साभांळुन कोंटुबीक आणि सामाजीक जबाबदारीसुध्दा पार पाडत होते. एकदा असाच एक प्रंसग घडला अण्णा घरी परत येत असतांना नदिकाठी एक खाटीक एका गाईला ओढत ओढत घेऊन जातांना अण्णांनी पहिला. गाय जिवाच्या आकांताने ओरडत होती. अण्णांना त्या खाटीकाच्या एकदंरीत वागण्यावरून, त्याच्या पुढच्या कार्यक्रमाचा त्यांना अंदाज आला असावा, म्हणून अण्णांनी त्या खाटीकांस त्या गाईची विक्री किंमत विचारली आणि क्षणांचाही विलंब न लावता त्यास ती देऊ केली आणि ती गौमाता त्यांच्या घराच्या वाडयात नेऊन बांधण्यास सांगितली होती. पुढे जाऊन ती गाय त्यांच्या परिवारासाठी कामधेनूच  ठरली. अण्णाकडे थोडी शेतीही होती. गाईप्रमाणेच आणखी काही प्राणीमित्र अण्णाकडे कोंटुबिक सदस्याप्रमाणे कायमस्वरूपी वास्तव्यास आले होते. त्यात प्रामुख्याने 2 कुत्रे, 2/3 मांजरी आणि माकडे येऊन जाऊन पाहुणे होते.

अण्णांनी आपल्या शाळेत एक नविन पध्दत सुरू केली. गणेश उत्सवात ते स्वतः आपल्या हाताने गणपतीची मुर्ती आणि देखावे बनवत असत, दरवर्षी त्या परिसरातील लोकांना अण्णा या वर्षी कोणता देखावा बनवणार आहेत? याची उत्सकता असायची. त्यांनी विविध प्रकारचे गणेश मूर्ती आणि देखावे बनविले होते. कधी अष्टविनायक, कधी ऐलिफंटा केव्हस्, तरी कधी प्रतापगडचा देखावा अश्या अनेक प्रकारच्या देखाव्यांचे अण्णांनी आपल्या गावातील शाळेत सजावट निर्माण केली होती.

अण्णांचा परिवार हळुहळू वाढत होता नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडत होत्या, अश्यातच अण्णांना त्यांच्या काही मित्रांनी त्यांच्यात असलेला फोटोग्राफी या गुणालासुध्दा वाव मिळावा म्हणुन त्यांना फोटोग्राफी स्टुडियो सुरू करण्यासंदर्भात सल्ला दिला. अण्णानी तो ऐकला. अण्णांनी 1952 ला आपल्या राहत्या घरातच एक छोटा स्टुडियो सुरू केला. बघता बघता त्याला छान प्रतिसाद मिळाला आणि पुढे जाऊन त्या छोट्या स्डुडियोरूपी रोपट्यांचे मोठ्या वटवृक्षांमध्ये रूपांतर झाले. अण्णांच्या या स्डुडियोला आजपर्यंत कधीही प्रिंट पब्लिसिटीची गरज पडली नाही. अण्णांचा आजुबाजुच्या परिसरात असलेला दाडंगा जनसंपर्क आणि त्यातच शिक्षकी पेशा असल्याने त्यांना त्याच्या ह्या संपर्काची खुपच मदत झाली. पुढे जाऊन अण्णांना या व्यवसायात त्यांचे जेष्ठ चिरंजीवाची मदत झाली. त्यांना सर्वजण दादा असे म्हणयाचे. दादांनीसुध्दा शिक्षण घेत असतांनाचा हा व्यवसाय आपल्या कौशल्यबळावर आणि मेहनतीनी पुढे वाढवला. आता अण्णांची तिसरी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे. लवकरच हा स्डुडियो त्याच्या वयाची सत्तरीला पोहचणार आहे.

अण्णाचा सामाजीक आणि कोंटुबिक सहभागसुध्दा उत्तम होता. अण्णाच्या पाठीशी आपल्या काकांच्या लग्नापासुन तर भावांचे, मुलांमुलीच्या ते इतर जवळच्या आणि मित्रमंडळीच्या, त्यांच्या मुलांमुलीच्या लग्न जुळविण्याचा अनुभव पाठीशी होता. त्याच्या पुर्ण कार्यकालात 52 पेक्षाही जास्त यशस्वी लग्न जुळवण्यांचा मान त्यांना मिळाला होता. त्यातील काही लग्नामध्ये त्याना अपयशसुध्दा आले. दोन्ही पक्षांकडुन मानहानीसुध्दा स्विकारावी लागली. पंरतु कुठेही खचून न जाता त्यांनी आपले समाजकार्य तसेच सुरू ठेवले. अण्णांना आणि यमुनाताईंना सहा अपत्य होती. तीन मुंले आणि तीन मुली...यांच्यासह लहान भाऊ आणि त्यांचा परिवार या सर्वांना सोबत घेऊन अण्णांनी संपूर्णपरिवार संघटीत ठेवला होता. अण्णांचे घरातील प्रत्येक सदस्याच्या प्रगतीवर बारीक लक्ष असायचे. प्रत्येक जण आपआपल्या कुवतीनुसार अण्णाच्या मदतीने, आपआपली प्रगती करत होते. अण्णा नेहमी म्हणायचे मी तर पुढे जाणाराच आणि तुम्हालाही पुढे नेणार.

अण्णांना त्याकाळी एक उत्तम संथी चालुन आली होती त्यांना मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द निर्माता, दिग्दर्शक शांतारामबापू यांच्या चित्रपट संस्थेमध्ये, मुबंई येथे कलादिग्दर्शक म्हणुन प्रस्ताव आला होता. पंरतु मागे ऐवढा मोठा परिवार, अनेक जबाबदाऱ्या या सर्वांचा विचार करून त्यांनी हा प्रस्ताव नम्रपणे नाकारला. अण्णा आहे त्या परिस्थितीत दिवाळी, गणेशउत्सव, नवरात्र आणि महालक्ष्मी असे सर्व सण आंनदात साजरे करत असत. त्याच्याकडे महालक्ष्मी या सणांचे खुप महत्त्व होते. पिढ्यां पिढ्या चालत आलेल्या गौरी गणपतीच्या मुर्ती कालांरूप त्यांना आवश्यक ती रंगरंगोटी करून उत्साहात आणि आनंदात हा उत्सव सहपरिवार साजरा करीत असत. अण्णांकडे येणा-रा जाणा-रांचा ब-रापैकी राबता होता. सकाळी किंवा सध्याकाळाच्या जेवणाला पाहुणे, एकदा दुसरा नातेवाईक, पाहुणा, मित्र हा पंगतीला असायचाच. यमुनाताई साक्षात अन्नपूर्णा असल्याने कधीही, कोणीही अचानक वाढल्याने किंवा कमी झाल्याने यमुनाताईंच्या नियोजनांवर कुठलाई परिणाम होत नसे. भोजनार्थी असलेली व्यक्ती ही तृप्त होऊनच पानावरून उठायची. अण्णांनी आपल्या आयुष्यात पैश्यापेक्षा माणूसकीला जास्त महत्त्व दिले. पैश्याला त्यांच्या जीवनात गौण स्थान होते. त्यांची खरी संम्पती ही त्यांनी आयुष्यात कमवलेली माणसे, ही त्यांनी कमवलेल्या संपत्ती पेक्षा नेहमीच जास्त होती.

अण्णा RSS चे स्वयंसेवक होते. ते नियमीत शाखेत जात असत. अण्णा आपल्या गावांत होणाऱ्या सांस्कृतिक आणि साहित्यक संमेलनात हिरीरीने भाग घेत असत. आपल्या गावात मोठ मोठे व्यक्ते आणि साहित्यकांना आणण्यात सिहांचा वाटा होता. अण्णा बाबासाहेब पुरंदरे, सु.ग. शेवडे, बाबा महाराज सातारकार अश्या अनेक दिग्गंजाना आपल्या गावात प्रवचनासाठी बोलवत असत. या सर्व ज्येष्ठांच्या प्रभावाने प्रेरित होऊन अण्णांनी स्वतः कथाकथनास सुरूवात केली. ते आपल्या शाळेत विद्यार्थींना अनेक विषयांवरील कथा मनोरंजक पध्दतीने सांगत असत की विद्यार्थींसुध्दा त्या कथा तल्लीनतेने ऐकत असत. त्यामध्ये पौरणिक कथा, विज्ञान कथा, रहस्यकथा, थरारक आणि स्वातंत्रविरांच्या कथा असे अनेक प्रकारचे विषय घेऊन ते कथा सांगत होते. पुढे जाऊन अण्णांनी प्रवचनमाला सुरू केली. त्यांना प्रवचनासाठी अनेक ठिकांणाहुन आमत्रंण येत असत.  अण्णा विविध विषय घेऊन उत्तमरित्या प्रवचन करीत असत. त्यांचे आवडते विषय रामायण, महाभारत. शिवचरित्र, शंभुचरित्र होते. या विषयांवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. रामाणयाविषयी बोलतांना त्यांनी एका प्रवचनमालेत रामाच्यापुर्वी होऊन गेलेल्या 9 पिढ्यांवरती सलग 9 दिवस प्रवचन दिले होते. त्यांच्या श्रोत्यांमध्ये आबालवृध्दांपासुन, महिलावर्ग, तरूण, सुशिक्षीत, अशिक्षीतसुध्दा असायचे. प्रवचन करतांनासुध्दा त्यांची योग्य पध्दतीने तयारी करूनच ते श्रोत्यांसमोर जात असत. त्याना नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजी मध्येसुध्दा खुप रस होता. ऑडिओ कॅसेट, व्हि.डी.यो कॅसेट, व्हि.डी.ओ. कॅमेरा, कॅम्पुटर हे सर्व शिकण्याचा त्यांचा उत्साह हा एखादा हुशार विद्यार्थीइतकाच असायचा. त्यांनी आपल्या सेवानिवृतीनंतर संस्कृत हा विषय शिकण्यासाठी घेतला होता आणि एखाद्या शालेय विद्यार्थीप्रमाणे ते त्याचा अभ्यास करत असत.

अण्णांची चित्रकला या विषयावरती मास्टरी होती. ते फक्त उपलब्ध असलेल्या माहितीवरून म्हणजे त्या व्यक्तीच्या बाह्यवर्णनावरून उत्तम चित्र रेखांटुन त्यात समर्पक रंगसंगती देऊन उत्तम कलाकृती बनवत असत. त्यांनी औरंगाबाद येथील एका संस्थेत शिवपुत्र संभाजीराजे यांचे एक पुर्णाकृती पेटींग हे त्यांच्यासंदर्भात विविध चरित्र्यातुन, पुस्तकातुंन माहिती मिळवुन फक्त वर्णन आणि माहितीच्या आधांराने संभाजी राजाचे भव्य चित्र रेखाटले. आपणा सर्वांच्या निर्दशानात ही गोष्ट आली असेल की शिवाजी महारांजाचे अनेक चित्र उपलब्ध आहेत. त्या प्रमाणात संभाजी महारांची उपलब्ध नाहीत.

अण्णांना प्रवासांची प्रंचड आवड होती. व्यवसाय आणि नोकरीच्या निमीत्त्याने त्यांनी विविध ठिकाणी प्रवास केलाच, पण परिवारसह सुध्दा अनेक ऐतिहासीक आणि प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्यात. प्रवासात ते नेहमी आपल्यासोबत एक छोटा कॅमेरा जवळ ठेवत असत. त्या कॅमे-रांतुन ते ऐतिहासीक स्थळांचे, निर्सगांचे, नद्यांचे, समुंद्र, प्राणी, वेगवेगळया प्रदेशातील लोक आणि त्यांचे राहणीमान, जीवन यांचे असंख्य क्षण ते टिपुन ठेवत असत. ते प्रवासावरून आले की मग ते प्रवास वर्णन इतके अप्रतिम करायचे की ऐकणाऱ्याला प्रत्यक्ष त्या स्थळांला भेट दिल्यांचा अनुभव येत असे.

अण्णांनी त्याकाळी एक खास प्रोजेक्टर मागवुन घेतले होते आणि त्यावर ते स्लाईड शोच्या माध्यमातुन आपले प्रवासचित्र हे सर्व परिवाराला दाखवत असत आणि ते पहात असतांना, प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यांवरील आंनद बघुन त्यांना अतिशय आंनद होत असे. अण्णा परिवारासाठीसुध्दा प्रवासाची आखणी करायचे. ते नेहमी सांगत की आपल्या परिवाराला घेऊन वर्षांतुन दोन वेळेस तरी प्रवास करावा. घरात वर्षभर सतत काम करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा थोडा बदल आणि निवांतपणा मिळतो आणि एक नवीन ऊर्जा मिळते. अश्याच एका पारिवारीक सहलीला ते यमुनाताई, मोठी मुलगी जावई, लहान मुलगी आणि नातंवासह कोकण दर्शनाला गेलेत. त्यांचे उत्तम नियोजन असल्यांने ते प्रवासाची तीन महिने आधीपासुन तयारी करत असत. रेल्वे तिकीट आरक्षण, राहण्याच्या ठिकाणाची आणि आरक्षणाची व्यवस्था आणि हे सर्व पक्त पत्रव्यवहारांने, आजसारखी भ्रमणध्वनी आणि त्याच्या माध्यामांतुन सर्वत्र आरक्षण करण्याची व्यवस्था त्याकाळी नव्हती. तरी त्यांचे सर्व लक्ष हे व्यवस्थीत नियोजन आणि नियोजनाप्रमाणेच सर्व कार्य पार पाडण्याकडे असायचे. ही सहल त्यांनी 11 दिवसांठी आयोजीत केली होती. त्यात चिपळुन पासुंन सुरूवात करून परशुराम, डेहराडुन, गुहागर, रत्नागिरी, गणपती पुळे, पन्हाळगड, कोल्हापुर आणि पुणे असा प्रवास आखला होता. सर्व परिवार या प्रवासाच्या कल्पनेनीच खुप आंनदीत झाला होता आणि अपेक्षेप्रमाणेच सर्वांना ही सहल खुपच आवडली. हा प्रवास संपवुन सर्व परिवार आपल्या गावी परतला होता. यमुनाताई अण्णा सर्वजण खुप आनंदात होते, पंरतु कोणास ठाऊक होते की ही कोंटुबीक सहल यमुनाताईंची आपल्या परिवारासह आयुष्यातील शेवटची सहल ठरेल. या प्रवासावरून परतल्यानंतर काही दिवसांतच यमुनाताईंचे दुःखद निधन झाले. अण्णांच्या दोन मुंलीचे आणि मोठ्या मुलांचे लग्न झालेले होते. जावई, मुली, मुल, नांत- नाती असा भरलेला परिवार सोडून यमुनाताई स्वर्गवासी झाल्या होत्या. अण्णांना त्या प्रंसगात सर्वांचे अश्रु पुसतांना पाहीले पंरतु आपले स्वतःचे अश्रु त्यांनी आपल्या मनातच गोठवुन ठेवले होते. पंरतु गोठवलेलेच अश्रु ते!नतंर एकांतात वितळणाराच. कणखर माणसांनासुध्दा मन असत.  रात्री एकांतात त्यांनी आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली होती.

अण्णांच्या आयुष्यातील सर्वच्च आंनदाचा क्षण म्हणजे त्यांनी थाटामाटात पार पाडलेला आपल्या लहान मुलीचा भव्य असा विवाह सोहळा. मनासारखा कर्तृत्ववान, सर्वगुणसंपन्न जावई मिळाल्याने अण्णा फारच खुष होते. या मुलीचे लग्न करणे ही म्हणजे त्यांच्या जिवनातील अंतिम जबाबदारी पार पाडणे होते आणि त्यांना ती जबाबदारी कुठलीही कमतरता न ठेवता आणि आनंदाने पार पाडायची होती, त्यासाठीच त्यांनी ही तयारी सुरू केली होती. भव्यदिव्य विवाहस्थळ, उत्तम सनई चौघडा, वरातीसाठी स्वंतत्र बॅड, खाद्य पदार्थांची रेलचेल आणि प्रथमच त्यांच्या परिवारात विवाह सोहळयाचे व्हि.डी.ओ.ने होणारे चलचित्रीकरण, फोटोग्राफी. हजारो लोकांना दिलेले आंमत्रण. घरात सर्वांना आवडीचे घेतलेले कपडलत्ते, विवाहाची नियोजनबध्द आखणी. लहांनापासुन मोठ्यापर्यंत वाटुन दिलेल्या जबाबदा-रा, त्यांचा मित्र परिवार, मुलांचे मित्र, विद्यार्थी स्वयंसेवक या सर्वांचे पाठीशी असलेले भक्कम मनुष्यबळ आणि पैसा.सर्व, सर्व काही होते अण्णांकडे या विवाह सोहळासाठी, नव्हत्या त्या फक्त यमुनाताई. त्यांच्यासह पुजेला बसुन कन्यादान करण्यासाठी.अश्या प्रंसगात, अण्णाच आई आणि वडील अश्या दुहेरी भुमीकेत, मुलीच्या या लग्न प्रक्रियेत सहभागी झाले होते.पंरतु अण्णांनी मोठ्या मनाने लग्नविधी आणि पुजेचा हा मान आपल्या जेष्ठ मुलाला आणि सुनेला दिला होता आणि स्वतःला लग्नाच्या कामात गुंतवुन घेतले. संपुर्ण लग्नात पक्त एकदाच त्यांना मुलीचे सुलग्न लावत असतांना गहिवरतांना बघीतले. बिदाईच्या वेळेस सुध्दा त्यांनी स्वतःला सावरून मुलीला धीर देतांना पाहीले. या विवाह सोहळ्याचा आंनद आणि समाधान अण्णांच्या चेहऱ्यावर अनेक दिवस झळकत होते.

सूर्योदय झाला म्हणजे सूर्यास्त हा होणारच. हेच सृष्टीचक्र आहे. हाच निसर्ग नियम आहे. अण्णा तरी याला अपवाद कसे बरे ठरणार. आपल्या सेवानिवृतीनंतरचा तब्बल 12 वर्षाचा काळ त्यांनी आपल्या आवडीनुसार व्यतित केला. देवपुजा, अभ्यास, संगित, आप्तेष्टांच्या अधुन मधुन भेटीगाठी घेणे. ते नेहमी सर्वांना असे सांगायचे की मी अगदी त्या खुंटीला टांगलेल्या कंदिलाप्रमाणे आहे. ज्याला त्या कंदिलाची गरज भासेल त्यानी तो न्हावा आणि आपले काम झाले की परत त्याच जागेवर आणुन ठेवावा म्हणजे तोच कंदिल इतर गरजवंताना वेळीच मिळेल. उगाच कोणच्या संसारात आपली लुडबुड न करता पक्त एक वेळेस जेवण, कारण ते ब-रांच बर्षांपासुन रात्रीचे जेवण घेत नव्हते आणि तीन वेळेस कॉफी ऐवढ्या माफक अपेक्षेने आपले उर्वरीत जिवन जगण्याची त्यांची इच्छा होती. खुप उमेदीने सुरू केलेला फोटोग्राफीचा व्यवसाय त्यांनी आपल्या मोठ्या मुलांवरती सोपवला होता. त्यांच्या तिसऱ्या पिढीने देखील व्यवसायात हळुवार प्रवेश केला होता. एक प्रकारची स्वेच्छा निवृत्तीच त्यांनी संसारातून घेतली होती. नियती ही कोणलाही सोडत नाही तुम्ही ह्या जन्मात कितीही चांगले काम करा, मुला मुलींसाठी झिजा, मागच्या जन्माचा हिशोब म्हणा की भोग म्हणा ते या जन्मात भोगावेच लागतात. त्यांच्या शेवट्च्या दिवसांमध्ये त्यांना असे काही बरे वाईट अनुभव आलेच. पंरतु आपली आपल्याच लोकांसाठी झिजण्याची वृती त्यांनी कायम ठेवली आणि शेवट्याच्या क्षणांपर्यंत मुलांना मदत करत राहीले. हे जग सोडतांना मुलांवर कर्जांचा एक रुपयाही न ठेवता. आपली संपत्ती, संस्कार, नावाची ओळख, कर्तृव, आदर्श आणि पुण्याई पुढ्यच्या पिढीसाठी ठेऊन गेलेत. तो दिवस होता 12 मार्च 2002 सायंकाळी 7:15 मिनिटांनी त्यांनी आपला प्राण सोडला.

माझ्यासमोर त्यांचा देह चितेवरती ठेवण्यात आलेला होता. मला शेवटपर्यंत एक भाबडी आशा होती की अण्णा उठून बसतील. मी सारख्या त्यांच्या श्वासांवरीत लक्ष ठेऊन होतो की केव्हा ते श्वासोश्वासांला सुरूवात करतील आणि मी अख्खा जगाला ओरडून, ओरडून सांगेल की अण्णा परत आले, अण्णा परत आले. पण अखेर अण्णांच्या मुलाने जड अःतंकरणाने चितेला अग्नी दिला आणि माझ्या सर्व आशा, अपेक्षा अण्णासह चितेमध्ये राखेत रूपांतरीत झालेल्या होत्या. एका योगपुरूषाचा, एका तपस्वीचा अस्त झालेला होता.

लेखक: किरण दहिवदकर
ईमेल: kirand.personal@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel