तें पत्र पाहून या उभयतां वाचकांस किती आनंद झाला असेल हें वाचकच कल्पनेनें जाणोत. पानपतच्या लढाईतील एका प्रमुख योध्द्याचें हस्तलिखित पत्र पाहून किती आश्चर्य व धन्यता त्यांस वाटली असेल ! सर्व दप्तर चाळून महत्वाचे कागद त्यांनी बाजूस काढले. याच सुमारास प्रो.आबासाहेब काथवटे वाईस गेले होते. त्यांस ही वार्ता या उभयतांनी हर्षभराने निवेदन केली. ते सर्व कागद समक्ष पाहून ते महत्वाचे कागद रा.ब.साने किंवा विसुभाऊ राजवाडे यांजकडे पाठविण्याची त्यांनी शिफारस केली. आबासाहेब पुण्यास गेले व त्यांनी ती वार्ता राजवाडे यांस सांगितली; व मग काय ! त्या निरलस व साक्षेपी पुरुषाने एक क्षणही वायां दवडला नाही. पानिपतच्या लढाई संबंधीची पत्रें-केवढा मोठा लाभ असें त्यांस झालें. त्याच रात्री राजवाडे पुण्याहून वांईस जाण्यास निघाले व जाऊन तें दप्तर पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. कांहीएक विश्रांति न घेतां एकसारखे सर्व कागद अथ पासून इतिपर्यंत वाचावयाचे, या प्रमाणे त्यांनी काम केलें. श्रमाची त्यांस पर्वा नसे. श्रमांसाठीच तर त्यांनी शरीर तयार केलें होतें. दोन महिन्यांत सर्व दप्तर तपासून इतिहासासंबंधी सर्व कागद घेऊन ते पुण्यास रवाना झाले. तेथें श्रीविठ्ठल छापखान्यांत ते कागदपत्र छापण्यास सुरवात झाली. परंतु दुर्दैवाने हा श्रीविठ्ठल छापखाना जळून गेला. हा विठ्ठल छापखाना फडके वाडयांत होता. भाषांतर मासिकाचें सर्व संपादित कार्य खाक झालें. याच सुमारास त्यांची भार्या पण मरण पावली. संसाराचा पाश तुटला व राष्ट्रप्रपंच सुधारावयास हा महापुरुष तयार झाला.
पानिपतच्या लढाईसंबंधाचे सर्व कागद घेऊन ते वाईस आले. पुन्हां सर्व बालबोधीत लिहून त्याचा ते अभ्यास करूं लागले. त्या पत्रांशी त्यांची तन्मयता पूर्णपणें झालेली होती. त्यांस खाण्यापिण्याची सुध्दां आठवण नसे. पानिपतच्या प्रचंड रणसंग्रहाची साग्र सुसंगत हकिगत जमविण्यांत ते दंग झाले. सर्व कार्य कारण भाव त्यांनी जमविले. रात्री, दिवसा, पहाटे, सायंकाळी ज्या ज्या वेळी पहावें, त्या त्या वेळीं राजवाडे त्या दप्तराचा अभ्यास करीत आहेत असेंच दिसे. झोंपबीप सर्व चट पळून गेलें. काम करित करितां जरा दमलें असें वाटलें म्हणजे तेथेच डोकें टेंकून १०।१५ मिनिटें झोंपावयाचे; परंतु फिरुन जागे होऊन कागदपत्र वाचूं लागावयाचे. विठ्ठलाच्या ध्यानानें तुकोबादिकांची तहान भूक जशी हरपे तसेंच या महापुरुषाचें झालें. केवळ जगण्याकरितां म्हणूनच पोटांत ते चार घांस कोंबीत व अगदी डोळे उघडत नाहीसे झाले म्हणजेच डोकें टेंकीत. यावेळचीच आम्ही एक आख्यायिका आमच्या लहानपणी ऐकिली होती. त्यांस कोणी तरी म्हणाले 'अहो, असे अश्रांत काम करून लौकर मरुन जाल' त्यावर ते संतापून म्हणाले 'काम करुन मनुष्य मरत नाही; आळसानें लौकर मरतो; माझ्या आधी तुम्हांस मीच पोंचवीन ! !' राजवाडे यांनी असा हा नीट अभ्यास करून आपला हा पहिला खंड प्रसिध्द केला. त्यांची या खंडास १२७ पानांची द्वादश प्रकरणात्मक अद्वितीय प्रस्तावना आहे. १८८८ पासूनच त्यांनी या मराठयांच्या इतिहासाच्या अभ्यासास पध्दतशीर आरंभ केला होता. या १० वर्षांच्या श्रमाचें फळ म्हणजे ही प्रस्तावना होय.
मोदवृत्त छापखान्यांत हा प्रथम खंड प्रसिध्द झाला. ह्या खंडाने थोर इतिहासतत्वविवेचक म्हणून राजवाडयांची सर्वत्र कीर्ति झाली. सर्वजण ही प्रस्तावना पाहून दिपून गेले.