साहित्यशोधक या नात्यानें राजवाडे यांनी जें केलें, तें फार लोकोदर आहे यांत वाद नाही; परंतु ज्ञानकोशकार म्हणतात, 'राजवाडयांची भाषाशास्त्रविषयक कामगिरी लक्षांत घेतली तर तीपुढें अनेक मोठमोठया अभ्यासकांचे प्रयत्न फिके पडतील. राजवाडयांच्या अनेक कामगि-यांपैकी सर्वांत अधिक मोठी कोणती हें ठरवून राजवाडयांचे वर्णन करावयाचें झालें तर त्यांस भाषाशास्त्रज्ञ म्हणावें लागेल आणि त्यांची गणना अत्यंत मोठया वैय्याकरणांत करावी लागेल. हेमचंद्र आणि वररुचि यांचे प्रयत्न राजवाडयांच्या प्रयत्नांच्या दृष्टीने कांहीच नाहीत. इतिहासाचार्य किंवा इतिहाससंशोधक हें नांव राजवाडयांस देण्यांत आपण त्यांच्या कार्याचें अज्ञान दाखवूं. त्यांच्या बौध्दिक कार्यानें गुरुलघुत्व माझ्यामतें १ भाषाशास्त्र हा, २ वैय्याकरण, ३ शब्द संग्राहक व ४ इतिहास संशोधक या अनुक्रमानें आहे.'

ज्ञानकोशकारांनी केलेलें हें गुरुलघुत्व कोणाहि विचारवंत माणसास पटण्यासारखेंच आहे. राजवाडे यांची बुध्दि स्वभावत:च संशोधन प्रवण. इतिहासाच्या संशोधनानें त्यांची ही बुध्दि कमावली जाऊन विशाल व प्रगल्भ   झाली. इतिहाससंशोधक क्षेत्रांत दुसरे गडी उतरलेले पाहून राजवाडे हे इतिहास संशोधनाचें संकुचित काम संपवून शब्दांची परंपरा व इतिहास हे शोधण्याकडे वळले. अफाट अशा वाणीच्या क्षेत्रांत त्यांची बुध्दि संचार करूं लागली.

आपल्याकडे मराठीकडे प्रसिध्द भाषाशास्त्रही म्हणून प्रथम भांडारकर डोळयांसमोर येतात. त्यांची १८७७ मध्यें संस्कृत प्राकृतसंबंधी अत्यंत विद्वत्ताप्रचुर अशी व्याख्यानें झाली. निरनिराळे विभक्तिप्रत्यय यांच्या उत्पत्ति संबंधी यांत पुष्कळ संशोधन आहे. भाषाशास्त्राचा मराठीत हा पहिला भर भक्कम पाया राजाराम शास्त्री या पुरुषाने घातला. या विद्वान् व नवमत पुरस्कारक पुरुषानें भाषेसंबंधीं अनेक लेख लिहिले. विशेषत: वेदांतील निरनिराळया शब्दाचे अर्थ करण्यासंबंधीचे यांचे इंग्रजी व मराठी लेख आहेत. महादेव मोरेश्वर कुंटे हेही प्रसिध्द व्युत्पन्न. राजवाडे यांनी भांडारकरांपासून शिलालेख शोधन आणि भाषाशास्त्र ही घेतली. कुंटयांपासून पुराण वस्तुनिरीक्षण, तुलनात्मक अभ्यास, संस्कृतबद्दलची आवड वगैरे गोष्टी उचलल्या. जुन्याकडे नव्या दृष्टीनें पाहणें, पुराणांतील भाकड कथांचे अवगुंठन काढून आंतील ऐतिहासिक सत्य संशोधणें व आपली मतें स्पष्टपणें व निर्भीडपणें मांडणें हें राजाराम शास्त्री भागवतांचे काम राजवाडे यांनी उचललें. भाषेसंबंधीचे सर्व विचार व प्रमेयें, आठव्या खंडाची प्रस्तावना, ज्ञानेश्वरी, तिचा नववा अध्याय व व्यकरण, सुगंत विचार व तिगंत विचार, गुणवृध्दि, कारप्रत्यय, संस्कृत भाषेचा उलगडा, राधामाधवविलासचंपू या ग्रंथांत प्रसिध्द झालेली आहेत. भाषाशास्त्रांत अनेक महत्वाच्या गोष्टीचा अंतर्भाव होतो; ध्वनिप्रक्रिया, वर्णप्रक्रिया, प्रत्यय चिकित्सा, अर्थप्रक्रिया, प्रयोगक्रिया वगैरे गोष्टीचा भाषाशास्त्रांत अभ्यास केला जातो. ध्वनिप्रक्रियांचें कांही विवेचन संस्कृत भाषेचा उलगडा व वृध्दाचा निबंध यांत त्यांनी केले आहे. यासंबंधी जास्त विवेचन व विवरण ते जो नवीन धातुपाठ तयार करीत होते, त्यांत येणार होतें. 'आचार्य पाणिनीनें वृध्दिरादैव् असें सूत्र बांधून वृध्दीचा चमत्कार फक्त नमूद केला पण त्याची उपपत्ति राहिली. इ, इ, उ, ऋ यांचे आ, ऐ, औ आ इत्यादि उच्चार होण्याची कारणपरंपरा, उच्चार करितांना मुखांतील स्नायूंच्या होणा-या हालचाली, स्वरोच्चाराच्या ऐतिहासिक स्वरुपासंबंधीची अनुमानें इत्यादि मुद्यांचा विचार 'वृध्दी' या निबंधांत करुन त्यांनी प्रक्रिया विशद केली आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel