राजवाडे हे केवळ संग्रहाकच नाहीत तर या संगृहीत साधनापासून किती महत्वाची माहिती मिळते व त्यापासून कसे महत्वाचे सिध्दांत स्थापन करतां येतात हें ते दाखवून देत. राजवाडे हे अर्थ शोधनाच्या शास्त्रांत प्रवीण झाले होते. समुद्रांत बुडया मारुन मोती आणणा-या पाणबुडयांप्रमाणें ते कागदपत्राच्या आगरांतून तत्व मौक्तिकें काढण्यांत तरबेज झाले होते. जें पत्र इतरांस क्षुल्लक वाटे, त्याच पत्रांतून नाना प्रकारची अभिनच माहिती राजवाडयांची बुध्दि उकलून दाखवी. त्यांच्या बुध्दीजवळ मुकीपत्रें हृद्वतें बोलूं लागत. ३५० पानांचे २२ खंड कागदपत्रांनी भरलेले त्यांनी छापले व त्या खंडांस मार्मिक व अभ्यासनीय अशा उद्बोधक प्रस्तावना लिहिल्या. जी पत्रें त्या त्या खंडांतून छापली असत त्या पत्रांशीच त्या प्रस्तावनांचा संबंध असे असें नाही; तर कधी कधी इतिहास शास्त्रासंबंधी नाना प्रकारचें विवेचन या प्रस्तावनांतून येईल. इतिहास शास्त्राची व्याप्ति या शास्त्राचें महत्व, या शास्त्राचा उद्भव वगैरे संबंधी उद्बोधक विवेचन त्यांच्या तत्त्व प्रचूर लेखणीतून येई.
राजवाडे यांनी केवळ जुने कागद उजेडांत आणलें आहेत एवढेंच त्यांचे कार्य नाही. तर त्या पत्रांतून निरनिराळया काळाचा व निरनिराळया अंगांचा महाराष्ट्रीय इतिहास त्यांनी बनविला आहे. मानवी विचार व प्रगति, भाषाशास्त्र व मराठी भाषेची उत्पत्ति, सामाजिक व राजकीय भारतीय जीवनाचें स्वरूप, महाराष्ट्राच्या वसाहत कालाचें विवेचन वगैरे गोष्टींवर त्यांनी आपल्या लेखांनी अद्भुत प्रकाश पाडला आहे. नवीन अभ्यासानें त्यांच्या सिध्दांतांपैकी कांही असत्य व भ्रामक ठरतील-तरीपण त्यांच्या लेखाच्या अभ्यासानें अभ्यासूस नि:संशय महत्वाची मदत होईल.
राजवाडे यांची व्यापक दृष्टि वेद काळापासून तों पेशवाईच्या अंतापर्यंत सारखीच स्वैर विहार करी. त्यांच्या लेखांतील त्यांची सर्वतोगामी विद्वत्ता व व्यापक गाढी बुध्दि पाहिली म्हणजे आपण चकित होतों, भांबावून जातों. कागदपत्र, ताम्रपट, शिलालेख वगैरे सर्व साधनांच्या साहाय्यानें ते इतिहास संशोधनास चालना देत. त्यांची बुध्दि कुशाग्र होती. पायाळू माणसास भूमिगत द्रव्य कोठें आहे हें जसें समजतें त्याप्रमाणे त्यांच्या बुध्दीस अचूक तत्त्वसंग्रह सांपडे. त्यांची तीक्ष्ण बुध्दि, निरतिशय कार्यश्रध्दा. निरुपम स्वार्थत्याग यांस महाराष्ट्रांत तोड नाही. सुखनिरपेक्षता व विलासविन्मुखता, मानापमानाची बेफिकिरी या सर्व गुणसमुच्चयामुळें राजवाडयांची कृतज्ञताबुध्दीनें महाराष्ट्रानें सदैव पूजा केली पाहिजे. ते ज्ञानसेवक होते; विद्येचे एकनिष्ट उपासक होते. आयुष्यांत ज्ञानप्रसार व विचार-प्रसार याशिवाय दुसरें कार्यच त्यांस नव्हतें. 'जोरदारपणा' या एका शब्दांत त्यांचें वर्णन करणें शक्य आहे. त्यांचें मन जोरदार होतें; शरीर जोरदार होतें, त्यांची मतें जोरदार होती; त्यांचे सिध्दांत जोरदार असत; कागदपत्रांचे अर्थ उत्कृष्ट त-हेंने ते जसे फोड करून दाखवीत, त्याप्रमाणेंच जर ते अचूक मार्गदर्शक झाले असते, तर हिंदुस्थानांतील ऐतिहासिक ज्ञानक्षेत्रांत ते अद्वितीय मानले गेले असते.'
एका समव्यवसायी थोर विद्वानानें राजवाडे यांची केलेली ही स्तुति यथार्थ आहे. स्तुति करणा-या पुरुषाच्याहि मनाचा निर्मळपणा पाहून समाधान वाटतें. नाहीतर समव्यवसायी लोक पुष्कळ वेळां मत्सरग्रस्त असतात; प्रांजलपणाचा त्यांच्याठायी अभाव दृष्टीस पडतो. तसें सरदेसाई यांच्या बाबतींत झालें नाही ही आनंदाची गोष्ट आहे.