राजवाडे यांनी इतिहासाची साधनें दिली; परंतु त्यांमधून सुसंबध्द असा थोर महाराष्ट्राचा इतिहास निर्माण केला नाही. परंतु असा इतिहास लिहिण्याचें त्यांच्या मनांत कधी कधी येत असावें. एकदां ते म्हणाले 'पेशवाईचा इतिहास लिहिण्याची साधनें सध्यां उपलब्ध आहेत; कोणातरी हुशार पदवीधरानें हें कार्य अंगावर घ्यावें.' शिवाजीचें चरित्र लिहा असें त्यांस कोणी सांगितलें म्हणजे ते म्हणत 'अद्याप भरपूर माहिती हें चरित्र लिहिण्यास उपलब्ध नाही.' राजवाडे हे इतिहासाची साधनें निर्माण करीत व ते अन्य मार्गांकडे वळत. नवीन नवीन ज्ञानक्षेत्रें लोकांच्या दृष्टीस दाखवावयाचीं, नवीन नवीन ज्ञानप्रांतांत स्वत: शिरुन लोकांस 'इकडे या, इकडे पहा केवढें कार्यक्षेत्र आहे' असें सांगावयाचें-अशा प्रकारची त्यांची वृत्ति असे. साधनें निर्माण करून देणें हें मुख्य काम आहे. मग त्यांतून सुंदर इमारत निर्माण करणें तादृश कठीण नाहीं. साधन सामुग्रीच्या जोरावर राजवाडे यांस इतिहास लिहितांच आला नसतां हें म्हणणें अयथार्थ आहे असें आम्हांस वाटतें. राधामाधव विलासचंपूच्या भव्य प्रस्तावनेंत १००-१२५ पानांत शहाजी राजांचा कसा सुंदर व स्फूर्तिप्रद इतिहास त्यांनी लिहिला आहे ! चिंतामणराव वैद्य यांनीं राधामाधव विलासचंपूच्या या प्रस्तावनेच्या परीक्षणांत लिहिलें होतें 'राजवाडे यांच्या हातून मराठयांचा उत्कृष्ट इतिहास लिहिला जावो.' यावरुन राजवाडे इतिहास लिहिण्यास लायक होते असेंच त्यांस वाटलें असावें. गिबनसारख्या इतिहासकारांप्रमाणें त्रिखंड विख्यात इतिहास लेखक त्यांसहि होतां आलें असतें. परंतु पात्रता होती एवढयावरुन ते झालें असें मात्र कोणी म्हणूं नये; तसें होणें त्यांस शक्य होतें हें मात्र खरें. इतिहासलेखकास मन शांत व निर्विकार पाहिजे (Philosophic calm) व तें राजवाडे यांच्या जवळ नव्हतें म्हणून त्यांस गिबनसारखें होतां आलेंच नसतें असें बंगालमधील सुप्रसिध्द इतिहासलेखक जदुनाथ सरकार यांनीं लिहिलें. राजवाडे हे जरा पूर्वग्रह दूषित असंत हें खरें. त्यांची दृष्टी केवळ सरळच नव्हती, कधी सरळहि असे; परंतु जदुनाथ यांस आदर्शभूत वाटणारा गिबन तो तरी पूर्वग्रहांपासून संपूर्णत: अलिप्त होता कां ? गिबनच्या रोमन साम्राज्याच्या इतिहासांतही पूर्वग्रह दूषित दृष्टि अनेक ठिकाणी विद्वानांनी दाखविली आहे. सारांश पूर्व ग्रहांपासून अलिप्त कोणीच नसतो.
राजवाडे यांचें कार्यक्षेत्र एकच नसे, म्हणून त्यांनी इतिहास लिहिला नाही. जगते तर कदाचित लिहितेहि. निरनिराळीं कार्यक्षेत्रें उघडी करणें व समाजाच्या बुध्दिमत्तेला निरनिराळया अंगांनी कामें करण्यास लावणें त्यांचा व्याप व पसारा वाढण्यास वाव देणें हें त्यांचें कार्य होतें. भाषा, व्याकरण, इतिहास, समाजशास्त्र सर्वत्र ते अनिरुध्द संचार करीत, यांतील तात्पर्य हेंच होय. म्हणूनच डॉ.केतकर म्हणतात 'एका क्षेत्राचा अभ्यास करुन तें टाकून दुसरें क्षेत्र घ्यावें ही राजवाडे यांची वृत्ति होती पण ती 'Jack of all trades & master of none' एक ना धड, भाराभर चिंध्या' यासारखीं नव्हती. तर त्या वृत्तीचीं कारणें फार खोल होतीं. त्यांच्याशी गप्पा मारतांना त्यांच्यांत एका गोष्टीची जाणीव दिसे, व ती जाणीव म्हटली म्हणजे आपणच राष्ट्रविकासाच्या भावनेनें कामांत पडलेले पहिले संशोधक आहोंत ही होय.महाराष्ट्राच्या बुध्दीस सर्व प्रकारें चालना देण्यासाठी, त्यांनी अनेक क्षेत्रांत संशोधन स्वत: आपल्या अंगावर घेतलें असावें; आणि ज्या प्रकारच्या संशोधनामध्यें किंवा ज्या विषयामध्यें पारंगतता मिळविली, त्या क्षेत्रांतच कार्य न करतां त्या क्षेत्राचाहि त्याग करावयास त्याचें मन तयार झालें असावें. राजवाडे हे आपल्या आयुष्याकडे इतिहाससंशोधक या नात्यानें पाहात नसून संस्कृति विकास प्रवर्तक (संस्कृतीच्या निरनिराळया अंगांचा विकास करण्याच्या मार्गांत स्वत: जाणारे व लोकांस नेणारे) या नात्यानें पाहात आणि त्यांची खरी किंमत ओळखणा-यानें त्यांच्या आयुष्याचें याच दृष्टीनें अवगमन केलें पाहिजे.' डॉ.केतकर यांचें हें राजवाडयांच्या कार्यासंबंधीचें विवेचन फार महत्वाचें आहे व ही दृष्टि घेऊन आपण राजवाडयांकडे पाहिले म्हणजे त्यांनी गिबनप्रमाणें इतिहास कां लिहिले नाहीत वगैरे प्रश्नांचें मार्मिक उत्तर मिळतें.