असा हा धगधगीत ज्ञानवैराग्याचा तेज:पुंज पुतळा महाराष्ट्रास मोठया भाग्यानें मिळाला. प्रो.भानु म्हणतात 'राजवाडे यांनी समर्थ ही पदवी पुन्हां नव्यानें भूषविली.' प्रो.पोतदार म्हणतात.
'पुरतें कोणाकडे पाहेना । पुतें कोणाशी बोलेना
पुरतें एकें स्थळी राहीना । उठोनि जातो । ।
जातें स्थळ सांगेना । सांगितलें तरी तेथें जायेना
आपुली स्थिति अनुमाना । येवोंच नेदी । ।
ही नि:स्पृहाची समर्थांनी सांगितलेली शिकवणुक राजवाडे यांच्या चरित्रांत पदोपदी प्रत्ययास येई. परंतु 'सगट लोकांचा जिव्हाळा । मोडूंच नये' हा उत्तरार्ध समर्थांनी : नि:स्पृह राहूनही जसा गिरविला तसा राजवाडे यांस गिरवितां न आल्यामुळें 'बहुतांचें मनोगत' त्यांस हाती घेतां आलें नाही; 'महंतीची कला पूर्णपणें त्यांस साधली नाही.' देशकार्य करावयास, इतके परकी सत्तेनें गांजले आहेत, तरी लोक तयार होत नाहीत म्हणून हा महापुरुष सारखा धुमसत असें. त्यांच्या सर्व कार्यांत देशाभिमानाचें सोनेरी सूत्र कसें ओतप्रोत भरलेलें आहे हें मागील एका प्रकरणांत दाखविलें आहे. त्यांचा देशाभिमान पराकाष्ठेचा होता. देशाभिमानास कमीपणा आणणारें एकहि कृत्य त्यांनी केलें नाही. आचार, विचार व उच्चार तिहीनीं ते देशभक्त होते. आमरण स्वदेशीचें व्रत त्यांनी पाळलें. कधीही या व्रताचा त्यांनी परित्याग केला नाहीं. २५। २६ वर्षांचे असतां पत्नी वारली, तेव्हां 'पुरुष अगर स्त्री- यांस दुस-यांदा लग्न करण्यास हक्क नाहीं- शेष भागीदारानें संन्यस्तवृत्तीनें देशसेवा वा देवसेवा शक्त्यनुसार करुन शेष आयुष्य घालवावें' हे धीरोदात्त उद्गार त्यांनी काढले व प्रपंचांच्या भानगडीत कदापि पडले नाहीत; व सर्वजन्म देशाची निरनिराळया मार्गांनी सेवा करण्यांत घालविला. देशाकरितां सर्वस्वाचा त्यांनी होम केला होता. देशहितास विघातक अशा सर्व वस्तूंशी त्यांनी असहकार केला होता. महात्मा गांधीच्या संबंधानें राजवाडे आदरयुक्त बोलत व म्हणत 'असहकार हाच उपाय राष्ट्राच्या तरणोपायास आहे' हा असहकार त्यांनी जन्मभर चालविला. चिंतामण गणेश कर्वे विद्यासेवकांत लिहितात 'राजवाडयांच्या इतकी कडकडीत देशसेवा दुस-या कोणी केल्याचे माहीत नाही. देशाकरितां फकिरी जर कोणी घेतली असेल तर ती राजवाडयांनीच. गत महाराष्ट्रवीरांचा त्यांना किती अभिमान होता हें ते रोज स्नानसंध्येनंतर पितृतर्पणप्रसंगी शिवाजी व थोरले माधवराव यांना उदक देत यावरुन सिध्द होईल. खरा नि:स्वार्थ व नि:स्पृहपणा पाहावयाचा असेल तो राजवाडयांच्याच ठिकाणी दिसेल. इतर देशभक्त नि:स्वार्थीपणाच्या निरनिराळया पायरीवर सोयीनें उभे राहलेले आढळतील. या निर्भेळ नि:स्वार्थामुळेंच त्यांच्यांत विक्षिप्तपणा दिसून येई; व तो क्षम्यहि होई. एकंदरीत आजपर्यंतच्या इंग्रजी अमदानीत राजवाडयांसारखा पुरुष झाला नाहीं हें खास'