डॉक्टर हिरेमठ आणि रशीदा ह्यांचे आगमन हेमलकसा भागांतील गांवात सरकारी सर्किट हॉऊस मध्ये झाले. सोबत एक ड्रायवर म्हणून सध्या वेशांतील पोलीस जाधव सुद्धा होता. निम्मित होते मेडिकल कॅम्प चे. महाराष्ट्रांतील इतर भागांतील अनेक डॉक्टर्स इथे समाज सेवेसाठी आले होते. ह्या मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने गायब झालेल्या अजेंट्स ची चौकशी करणे हे रशिदाचे काम होते.
हिरेमठ ह्यांनी सर्किट हाऊस मध्ये आराम केला आणि सकाळी सकाळी ते मॉर्निंग वॉक ला बाहेर गेले. जाधव थकून अजून झोपलेला असल्याने त्यांनी त्याला उठवले नाही. रशिदाला सुद्धा उठावणे त्यांना योग्य वाटले नाही. गडचिरोली भाग आणि त्यांत हेमलकसा भाग अत्यंत दुर्गम आणि मागासलेला म्हणून त्यांना ठाऊक होताच पण त्या शिवाय नक्षलवादी लोक सुद्धा इथे वावरत होते. पण बाबा आमटेंच्या परिस स्पर्शाने पवित्र झालेला असा हा भाग होता. बाबा आमटेंनी हेमलकसा सारख्या भागांत इतका मोठा प्रकल्प कसा उभारला असेल हा विचार डॉक्टर हिरेमठ करत होते.
एका चहाच्या टपरीवर स्टोव्ह वर एक म्हातारी चहा करत होती बाईकवाले दोन तीन लोक इथे चहा पित होते. डॉक्टरनी सुद्धा चहा मागवला. डॉक्टरचे कपडे आणि बोलणे ह्यावरून ते बाहेर गावांतून आले होते हे त्यांच्या लक्षांत आले असावेच. एक तरुण मुलगा त्यांच्या जवळ आला. "मी सखाराम सातपुते" इथे सरकारी शाळेंत शिक्षण म्हणून आलोय, तुम्ही मेडिकल कैम्प वाले डॉक्टर आहेत असे वाटते?" त्याने हसत हसत डॉक्टरांना प्रश्न केला. डॉक्टरांनी सुद्धा होकार दिला.
डॉक्टरांनी काही प्रश्न विचारायलाच अवकाश कि सखाराम आणि इतर लोकांनी डॉक्टरांना सर्व माहिती आधीच दिली. गांवांत कुठे कुठे काय चाललेय, कसले रोग होत आहेत, कुठे कुणाची पोरगी कुणाबरोबर पळून गेली इत्यादी इत्यादी. डॉक्टरांचे बरेच मनोरंजन झाले पण एक विलक्षण गोष्ट त्यांच्या ध्यानात आली ती म्हणजे, फॉरेस्ट रेंज मधून आधी जे आदिवासी लोक बाहेर येत होते त्यांचे येणे हल्ली बरेच कमी झाले होते. त्यामुळे मध, अस्वलांचे केस इत्यादी अनेक प्रकारचे व्यापार बऱ्यापैकी ठप्प झाले होते. कुणाच्या मते ह्याचे कारण नक्षलवादी होते तर कुणाच्या मते पोलिसांचे भय.