एक बडा प्रवासी आहे हे निदान महाराष्ट्रीय ना वाचकांस नव्याने सांगण्याची जबर नाही असे म्हणण्यास हरकत नाही असे मला वाटते. मंगो पार्क, हबोल्ट, स्वेन हेडिन, शरत्चंद्र दास यांच्यासारख्या प्रवाशांच्या मालिकेत माझें नांव थोडक्याच दिवसांत झळकू लागेल यांत शंका नाही, कारण मी आपल्या प्रवासवर्णनांचा संग्रह छापवून काढणार आहे, व त्याची प्रस्तावना एका अभिप्रायलोलुप प्रोफेसरां कडून लिहून घेणार आहे. तीत ते माझें नांव वरील धाडसी प्रवाशांच्या यादीत गोवतीलच आणि जर त्यांनी ते कोंबले नाही तर मी आपल्या पुस्तकाच्या जाहिरातींत तरी आपले नांव त्यांच्या बरोबरीने पुढे ढकलीन.
माझी लांबलांबच्या प्रवासांची वर्णने वाचकांच्या नजरेस वारं वार आली आहेतच. पुण्याहून मोरया गोसावी यांच्या उत्सवाकरितां चिंचवडापर्यंत रेल्वेने मी केलेला दहा मैलांचा लांबलचक प्रवास. चिंचवड स्टेशनापासून छकड्याने गांचापर्यंत केलेला दीड मैलान्त त्रासदायक प्रवास व तेथील ब्राह्मणभोजनांत वाढलेले पदार्थाचे चटकदार वर्णन ही वाचकांच्या ध्यानांतून प्रीव्हि नसतील अशी माझी खात्री आहे. हडपसरची गिरणी पास करितां केलेला दौरा, राजयोगी नारायणबोवांच्या दर्शनाक रिता केलेली केडगांवची सफर, कााची लेणी व टाटावस पहाण्याकरिता केलेली लोणावळ्याची सहल असे एकाहून एक लांबलांब आणि दुष्कर प्रवास करून आणि त्यांची वर्णन लिहून मी पूर्वीच वाचकांस थक्क करून सोडले; परंतु पुढे मला वाटले असले आगगाडीतले प्रवास कोणीहि करील; पायगाडीचे अगर पूर्वीच्या काळच्या प्रमाणे बैलगाडांचे प्रवास करावे. ह्मणून मी
आळंदी, देहू, सिंहगड, पुरंदर, बनेश्वर आणि जुन्नर या ठिकाणचे प्रवास केले. दुपारचे जेवण टळो, एकाद्या वेळचा चहा टळो, डोक्यावरील सन् हटला न जुमानतां ऊन्ह लागो, वेळप्रसंगी साय कलवरून हापटी खाण्याचा प्रसंग येवो किंवा पायगाडीच्या धावेला भोंक पडो-कोणतेंहि संकट येवो, त्यास न जुमानतां वसिसि कोसांचा प्रवास करण्यास हा पठ्या कधीहि डगमगला नाही. असे दुर्धर प्रसंग प्रत्यक्ष कोलंबसावर तरी आले असतील काय ? कोलंबसाच्या सायकलच्या धावेला भोंक पडून त्याला हाल सोसावे लागल्याचे कोणी ऐकिलें आहे काय ?
कित्येक वेळा असे होते की, मी दिलेल्या प्रवासवर्णनांतील हकीकती इतरांनी लिहिलेल्या वर्णनांशी हुबेहूब जुळतात, - परंतु त्यास हरकत नाही. वाचकांस एकाच ठिकाणची पर्णने पुन्हांपुन्हां वाचल्याने ती स्थळे विशेष चत होतात; त्याचप्रमाणे एका लेखकाच्या हातून जर वर्णनां काही भाग नजरचुकीने गॅझेटियरमधून उतरून घेण्याचे तर दुस-या लेखकाच्या कडून ती उणीव भरून निघते;
शिवाय एखाद्या ठिकाणी एका प्रवाशाने कोणत्या जिनसांचा फराळ केला व दुसऱ्या प्रवाशाने कोणत्यांचा केला हे वाचून वाचकांना त्या ठिकाणी कोणत्या ऋतूंत कोणत्या जिनसा मिळतात याचे ज्ञान होते. शिवाय हा प्रकार शिष्टसंमतहि आहे हे दिल्ली आग्रा, काशी, प्रयाग, गया, काश्मीर, कैलास, रामेश्वर, विजापूर, गोवा या ठिकाणांचे प्रवास अनेक शिष्ट जनांच्या हातून लिहिलेले निरनिराळ्याच काय पण त्याच त्याच मासिकांतून वारंवार दृष्टो त्पत्तीस येतात यावरून कोणाच्याहि लक्ष्यांत येईल.
परंतु आम्हां प्रवासवर्णनकारांना प्रवासवर्णनांचे चर्वितचर्वण करूनहि समाधान होत नाहीं; महाराष्ट्रातील लोकांपैकी बहुतेकांनी पाहिलेल्या स्थळांचे वर्णनहि आम्ही पुष्कळदां करतो. याचे कारण फारसे लंगडें नाहीं; पर्वती, मांजरी फार्म, बाबुलनाथाचे देऊळ, नाशिक, पंढरपूर ही ठिकाणे जरी वारंवार पाहण्यात येणारी असली तरी त्यांची वर्णने वाचतांना त्यांच्या पुनर्दर्शनाचा भास होतो व आपण एकादी गोष्ट पाहिली नसली किंवा ती आपल्या लक्ष्यांत आली नसली तर ती समजते. वर्णनकाराने जर गॅझेटियर किंवा गाईड टु....वरून माहिती लिहिलेली असली तर थोडी ऐतिहासिक माहितीहि मिळते; परंतु असा योग क्वचितच येतो.
वरील प्रस्तावनेवरून बहुतेक महाराष्ट्रीयांच्या नेहमी नजरेस पडणाऱ्या मुंबईसारख्या मध्यवर्ती ठिकाणचे वर्णन मी कां देत आहे हे वाचकांच्या लक्ष्यांत आलंच असेल.
मी पुण्यास कॉलेजांत शिकत असतां दोन तीन वर्षे प्रीहि यस क्लासांत घालविल्यावर सुदैवाने प्रिलिमिनरी परिक्षेत पास झालों व मला युनिव्हर्सिटीच्या परिक्षेस बसण्याची परवानगी प्रिन्सिपालसाहेबांनी दिली. यापूर्वी मुंबई पाहिली नसल्यामुळे मला फारच आनंद झाला; कारण “ मुंबई हे सर्व हिंदुस्थानचें नाकेंच काय पण नाक आहे " हे मी पांच हजार वेळां ' करमणुकीं 'त वाचले होते. माझे वडील मला केवळ चैनीसाठी मुंबईस धाडण्यास कबूल नव्हते. जावयाचे असेल तर परिक्षेसाठी जा, उगीच तुला चैन करण्यास तेथे धाडण्याकरितां माझे पैसे वर आले नाहीत, असे ते म्हणत असत. आईच्या मनांतून मला पाठविण्याचे पुष्कळ होते, परंतु आमचे बाबा म्हणजे जमदग्नीचा अवतार; त्यांच्यापुढे तिच्या इच्छेची मात्रा चालेना, ह्मणून मला आपल्या उत्सुकतेची वाफ पोटांतल्या पोटांत साठवून ठेवावी लागली, ती परीक्षेकरितां मुंबईस जाण्याचे ठरल्यावर ताडकन बाहेर पडली व मी हिंदुस्थानचे नाके नव्हे तर नाकच अस मुंबई शहर, पृथ्वीतील उत्तम बंदरांपैकी एक बंदर आणि जगांतील एक भर भराटीची व्यापारी पेट पाहणार ह्मणून मला फार आनंद वाढू लागला.
चार अगर अधिक विद्यार्थी शिक्षणविषयक दौऱ्यावर चालले असतां रेल्वे कंपनी त्यांस सवलत देते. ह्मणून मी व आणखी तीन विद्यार्थी यांनी या सवलतीचा फार्म कॉलेजांतील क्लार्कसाहेबां जवळ मागितला. त्या वेळी क्लार्कसाहेब अंमळ गर्दीत असल्यामुळे व आम्ही विद्यार्थी त्यांस कस्पटासमान वाटत असल्यामुळे आम्हांस फार्म मिळण्यास बराच वेळ लागला. असो; सरतेशेवटीं फार्म तर मिळाला. त्यावर आम्ही आपली नांवे भरली व प्रिन्सिपालाकडून त्यावर सही घेतली. सही घेतल्यावर आम्ही आपल्या आधु निक अश्वांवर आरूढ होऊन घरी गेलो. आमच्या कॉलेजपासून घरी जातांना आम्हांस बाटेंत कोणकोणती घरे लागली, आमच्या पैकी एक ( तो मीच होय असें हळूच कंसांत सांगून ठेवतों ) वाटेंत सायकलवरून कसा " खाली आला" व दुसरा एकजण कसा " आपटला," वाटेंतील रसाच्या गु-हाळांत आम्ही किती रस प्यालों व किती भजी खाल्ली इत्यादि महत्त्वाच्या गोष्टींचें टांचण मी “ माझी आपल्या कॉलेजपासून घरापर्यंतची दुचाकी वरील चक्कर” या लेखांत केले आहे. गरजूंनी पहावे. ( दोन आण्याची तिकिटे पाठविणारांस फुकट.)
आम्ही सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी पुण्याहून निघ णाऱ्या पॅसेंजरने जाण्याचे ठरविले, तथापि आमचा मित्र लंबोदर त्या ट्रेनाने निघण्यास कबूल होईना. तो म्हणू लागला, " आपली बोवा त्या वेळी निघण्याने जेवण्याची अडचण होईल. दहादहाच्या गाडीने निघायचे झणजे सव्वा नऊला तरी गांवांतून तांग्याने निघावे लागेल. अर्थात् साडे आठला जेवावें लागून पुनः दुपारी भूक लागेल.” सारांश आपले लोक असल्या त-हेच्या बारीक सारीक अडचणींसाठी अडून बसतात, त्यामुळे त्यांच्या हातून मोठमोठ्या पाश्चात्य प्रवाशांच्या सारखे किंवा माझ्यासारखे प्रवास होत नाहीत; असो. लंबोदराच्या हट्टामुळे आम्हांस दहा-दहाच्या गाडीचा बेत रद्द करून अकरा - पन्नासच्या पॅसेंजरने निघण्याचा वेत करावा लागला. निघण्याच्या दिवशी सकाळी सहा वाजता घड्याळाच्या गजराने आपल्या कर्णकटु आवाजाने जागे केलें, नंतर मी मुख मार्जनादि प्रातर्विधी आटोपले. माझ्या कॅर्बालिक टुथपावडरच्या डबीतील-टुथपावडर संपली असल्यामुळे मी राखोंडीनेच तोंड धुतलें ! नंतर ताई स्टोव्हपाशी बसून ती पेटविण्याचा यत्न करीत होती परंतु निपलमध्ये सुई घालतां घालतां ती काटकन मोडली. त्याबद्दल बाबा रागें भरतील असा धाक वाटून तिने गोरेमोरें तोंड केले. परंतु मी स्टोव्ह नीट करून आणण्याचे कबूल करून चुलीवर चहाचे आधण ठेवण्यास तिला सांगितले. यावरून मी कोणत्याहि प्रसंगी अडून बसत नाही आणि संकटांतून पार पडण्यासाठी ईश्वरावर संकट घातल्याशिवाय कसे मार्ग शोधून काढतों हे कोणाच्याहि ध्यानात येईल.
चहा पिणे झाल्यावर हातांत पुस्तक घेऊन ते वाचीत वाचीत आंघोळीचे पाणी तापण्याची वाट पहात होतो. वेळ फार खर्च होऊ नये म्हणून साबण न लावतां लौकर लौकर आंघोळ केली व जेवणाची तयारी होईपर्यंत अभ्यास केला. साडेनऊ वाजतां आईने जेवावयास हांक मारली. जेवावयास भात, भाकरी, वरण हे रोजचे पदार्थ असून गोवारीच्या शेंगांची भाजी, पापड व आंब्याचे गाडे लोणचे हे पदार्थ वाढले होते; गवारी मला आवडत नसल्यामुळे तिला मी बोट लाविले नाही, परंतु लोणच्यावर मात्र यथेच्छ ताव मारून सबंद बरणी खलास करून टाकली. तीन चतकोर भाकरी खाल्ली. जेवून उठल्यावर आंचवलों व बाबांच्या ट्रंकेतील त्यांचे कपडे काढून टाकून तीत मी आपले तीन शर्ट, दोन कोट व पुस्तके हे सामान ठेवलें व धोतररुमाल वळकटीत बांधली. इतक्यांत लंबोदर तांगा घेऊन आला व मला हाका मारूं लागला. मी तांगेवाल्याला आपले सामान न्यावयास सांगून आईला, बाबांना, नमस्कार करण्यासाठी गेलो. आईने देवांच्या पायां पडण्यास सांगितले. माझ्या पायांत बूट असल्यामुळे ते काढावे लागतील या भीतीने कांकू करू लागलो. पण बाबांनी दरडावून सांगतांच बूट काढून देवांस नमस्कार केला आणि आईने हातावर घातलेलें दही चाटीत चाटीत लंबोदरापाशी तांग्यांत जाऊन बसलों व तांगा चालू झाला.
या तोग्याचा नंबर ३७३ असून याची घोडी काळसर तांबड्या रंगाची होती. तांगेवाल्यास नांव विचारता त्याने गणपत कोंडीबा असे सांगितले. तांगेवाला अंमळ म्हातारा असून बराच गमत्या होता. तांग्याचा टप काळा असून सांगाड्यास पिंगट रंग दिला होता. घंटा नसल्यामुळे गणपत कोंडीबास वाटेने ओरडावे लागत होते. आम्ही स्टेशनावर पोचल्यावर एक मुसलमान ( दाढीवरून तसे वाटले ) हमाल आमच्या तांग्याजवळ आला. व त्याने " रावसाब ओझं हाये ? ” असे विचारले. मी म्हटलें, " तुमारा नंबर कितना हाय ? ” “ नंबर एकोणीस ह्यो बगा, " असें म्हणून त्याने आपला नंबर दाखविला आणि सामान घेऊन गेला. इतक्यांत माझे दुसरे दोन मित्र-श्रीयुत भोपळे आणि पडवळ--हे ३०१ नंबरच्या पांढऱ्या घोड्याच्या तांग्यांतून आले. नंतर आम्ही सर्वजण एका डब्यांत चांगलीशी जागा पाहून बसलो. आमन्या कंपार्टमेंटांत दहा माणसें बसल्यावर दोन मावळे " दादा, आम्हाला वाईच बसू द्या खडकीच्या ठेसनापौतर " असे म्हणून आंत घुसू लागले, परंतु आम्ही त्यांस वरील पाटी दाखवून ते ऐकेनात तेव्हां गाडीस बोलावून त्याजकडून दुसऱ्या एका कंपार्टमेंटांत चौदा माणसें बसली होती त्यांत घुसविले. ही गोष्ट येथें सांगण्याचं कारण एवढेच की, आपल्या देशांत अजून उतारूंच्या हक्कांची जाणीव सामान्य जनतेस झाली नाही. तथापि सर्व लोक आमची हकीकत वाचून अशीच आपली दाद लावून घेतील अशी आशा आहे व सांगितलेल्या आमच्या धैर्याच्या कृत्याचे वर्णन वाचून वाचक आमची पाठ थोपटतील यात शंका नाही.
गाडीची वेळ अकरा-पन्नालची असूनहि इंडियन रेग्युलॅरिटी प्रमाणे चालू होण्यास अकरा-त्रेसष्ट (१२-३ ) वाजले. आमच्या कंपार्टमेंटांत आम्हां चौघां विद्यार्थ्याशिवाय इतर चार पुरुषं व दोन स्त्रिया होत्या. खडकीचे स्टेशन आल्यावर दोनतीन पठाण आंत दुसले. उठल्या सुटल्या आपल्या हक्कांकडे लक्ष द्याव याचे व बांधवांस त्रास भोगू द्यावयाचा अशी आमची वृत्ति नल ल्याने त्यांस आम्ही बसू दिले. पण लौकरच तळेगांवच्या स्टेशनावर बहुतेक गर्दी नाहीशी होऊन आम्हांला चांगली जागा मिळाली. लोणावळ्याचे स्टेशन घाटमाथ्यावर आहे. तेथे ट्रेनीस दोन एंजिने जोडतात. रिव्हर्सिंगच्या स्टेशनावरून फारच उत्तम देखावा दृष्टीस पडतो. रिव्हर्सिंगच्या स्टेशनवर कोंकणी बायकांनी द्रोणांतून करवंदे आणि तोरणे विकावयास आणली होती. मला तोरणे आवडत नसल्यामुळे करवंदेंच घेतली आणि आम्ही सर्वांनी त्यांजवर यथेच्छ ताव मारला.
आम्हांला अपरिचित अशा एका करवंदी वर्णाच्या पुरुषाने चार आण्यांची करवंदें विकत घेतली व कोंकणी बायांस म्हटले, “ माम्यांनो, आजपासून तुम्ही द्रोणांत करवंदें विकायला आणू नका. वाट्यांतून आणीत जा बरं !" त्याचप्रमाणे कर्जतच्या स्टेशनावर चहा आणि पाव यांचा आम्ही चांगलाच समाचार घेतला. कर्जतनंतर एक दोन स्टेशने गेल्यावर नेरळ नांवाचे स्टेशन लागले. या स्टेशनावर ट्रामगाडयांपेक्षा लहान असे आगगाडीचे डबे दिसले, स्टेशनावरील एका पार्शी गृहस्थास विचारतां समजले की, पुण्यास जी ट्राम्बे होणार आहे तिच्या गाड्या येथे तयार होत आहेत. सारांश लौकरच पुण्यास ट्राम होणार तर ! नेरळच्या स्टेशनाजवळ उंच डोंगरावर लोहगडचा किल्ला दिसत होता. हा किल्ला पाहून ज्या ठिकाणी पेशवाईतील राजकीय कैदी ठेवण्यात येत असत तोच हा किल्ला असें मनांत येऊन पूर्वीच्या वैभवाची आठवण होऊन माझें अंतःकरण भरून आले, आणि जरा मळमळू लागले.
गाडी सुरु झाल्यावर श्रीयुत सुदामराव भोपळे यांनी आपले नांव सार्थ करण्याकरितां भोपळ्याचे थालिपीठ आणि फोडांचे खमंग पोहे आणले होते, ते खाण्याकरितां आपला फराळाचा डबा उघडला. मग आम्ही चौधे व मघांचा पार्शी गृहस्थ आमच्याच कंपार्टमेंटांत वसला होता, त्या सर्वजणांनी लांडग्याप्रमाणे त्या डब्यावर तुटून पडून आतील पदार्थांचा फन्ना उडविला. थालिपीठ फार गोड होते पण पोहे अतिशय तिखट असल्याने आम्हांस फार तहान लागली. आन्हीं पार्शी मित्रास, पाणी कोठे मिळेल ? असे विचारले, तेव्हां तो म्हणाला, " आता तुम्हाला पाणी मुंबईस गेल्यावगर माझा मुंबईचा प्रवास. मिलणार नाही." आम्ही म्हटले, " बाटेंत कल्याणास मिळणार नाहीं काय ? "
“छः ! कल्याणने लाक तो दाँतले खारट पाणी पितात. तें तुम्हांला आवडणार नाही. तुम्ही आतां कल्याणास गेल्यावर चाय पिऊन तहान मारून घ्या. मुंबईस गेल्यावर पाणी प्या."
नेरळ स्टेशनच्या पलीकडे एक स्टेशन जाऊन बदलापूर स्टेशन लागते. पूर्वी कल्याण जंक्शन नसून बदलापूर जंक्शन होते; तेथे गाड्या बदलाव्या लागत म्हणून त्यास बदलापूर नांव पडले, पुढे रेलवे कंपनीने उतारूंस ज्यास्त लांब जावें लागून आपल्या खिशांत ज्यास्त पैसे पडावे म्हणून बदलापूर जंक्शन मोडून कल्याण जंक्शन केले. पहिल्याचें नांव मात्र कायमचे बद लापूर राहिले. काप गेले पण भोंके राहिली अशी जी आपल्यांत म्हण आहे तिचेच हे उदाहरण. कल्याणास गाडी पोचल्यावर लोणावळ्यास जोडलेले दुसरे एंजिन सोडतात. ( घाट कर्जतेस संपत असतांहि कल्याणपर्यंत एंजिन का आणतात व कोळशाचा नि कारण खर्च कां करितात हे समजत नाही. रेल्वे कंपनी आमचा लेख वाचून कर्जतेस एंजिन सोडील अशी आशा आहे. *)
(* या लेखाची प्रथमावृत्ति वाचून कंपनीने कर्जत येथे मोठे एंजिनशेड बांधून तेथेच दुसरी घाटएंजिने जोडणे व सोडणेचे काम सुरू केले आहे; आमच्या लेखाचा असा उपयोग झालेला पाहून आम्हांस फार आनंद वाटतो. )
रामदासस्वामींचे शिष्य कल्याण यांच्या वरूनच या गांवाचे नांव कल्याण पडले असावे, याबद्दल लौकरच इतिहाससंशोधक मंडळीपुढे मी निबंध वाचणार आहे. पण तेथले पाणी खारट असल्यामुळे आम्ही दोन दोन पैसे देऊन ( कल्याणास पैशाला दिडकी म्हणतात ) चहा विकत घेतला. पार्शी मित्रानेहि चहा घेतला पण तो गाडी सुरू होण्यापूर्वी संडासांत गेला. चहावाल्याने त्याचे पैसे भांडण करून आमच्याजवळून घेतले. गाडी सुरू होतांच तो संडासांतून आला व " अरे ! चहाचे पैसे द्यायचे राह्यले ! " असें म्हणाला. आम्ही दिले आहेत असे ऐकून त्याने आपला खिसा चांचपला, व रुपाया काढून आम्हांला " मोड आहे का ? ” असें विचारले. पण रुपयाची मोड आमच्याजवळ नसल्यामुळे आम्ही
" सावकास द्या पैसे" असे म्हटले.
तो म्हणाला, “ थँक यू ! " ( मी तुमचा आभारी आहे ). मी म्हणालों, “ नो मेन्शन प्लीज !" ( कस्चें कस्चें ! ) ____ कल्याणच्या पलीकडे एकदोन स्टेशने गेल्यावर मुंबरा नांवाचें स्टेशन लागले. लंबोदराने हा मुंबई शहरचा उंबरा असल्याने यास मुंबरा नांव पडले असावे असे सुचविले. नंतर एक लहानशी घाटी लागली. हीत दोन बोगदे आहेत. या बोगद्यांचे काम पाहून फार आश्चर्य वाटलें व शंभर वर्षांपूर्वीच्या आमच्या पूर्वजांना असल्या बोगद्यांची व भरवांव चालणाऱ्या आगगाडीची कल्पना तरी आली असेल काय ? आम्ही पांच तासांत केलेला प्रवास त्यांस पांच दिवसांत तरी करता येत असेल काय ? असे विचार मनात येऊन आम्ही या सुधारणेच्या विसाव्या शतकांत जगत आहों याबद्दल धन्यता वाटून पूर्वजांची फार कींव वाढू लागली.
ठाणे हे एका जिल्ह्याचे मुख्य ठाणे असल्यामुळे त्यास ठाणे असें नांव पडले. ठाण्याजवळ माझी दृष्टि मैलाच्या दगडाकडे गेली,
माझा मुंबईचा प्रवास. त्यावर २१ मैलांचा आंकडा पाहून मी लंबोदरास म्हटले, " काय रे लंबोदर ! आपण पुण्याहून २१ च मैल आलों ? " लंबोदराने ते मैलाचे दगड मुंबईपासून चढते लावले आहेत असे सांगितल्या मुळे मी म्हणालो, “ का बुवा ? आमची गाडी पुण्याहून सुटली असून दगड मुंबईहून कां लावले आहेत ?" या प्रश्नास आमच्या पार्शी मित्राने सांगितले की, मुंबई अजून किती लांब राहिली तें दाखविण्याकरितां हे दगड लावले आहेत. आणखी काही स्टेशने गेल्यावर शीव स्टेशन लागले. येथून जवळच शिवाचे देवस्थान होते म्हणून यास शिव म्हणतात. या स्टेशनास हिंदु लोकांच्या देवाचें नांव दिल्यामुळे मुसलमान लोकांनी रागावून तक्रार केली, तेव्हां पली कडील एका स्टेशनास मशीद असें नांव देऊन कंपनीने त्यांचे समाधान केले. तेव्हां पारशी रागावले त्यांस उगे करण्यासाठी, ठाण्याजवळ पारसीक नांवाचे स्टेशन, व सरतेशेवटी खिस्ती रागावले व त्यांच्यासाठी सॅन्टा क्रूज स्टेशन उघडले. मशीदच्या पलीकडील स्टेशन बोरीबंदर हे फारच प्रचंड व सर्व हिंदुस्तानांत सुंदर स्टेशन आहे. यास अनेक प्लॅटफॉर्म असून आंत विजेचे दिवे व पंखे आहेत,
या स्टेशनावर आम्हांस सलाम करून आमचा पारशी मित्र गेला आणि आम्ही१३७४नंबरची तांबड्या घोड्याची व्हिक्टोरिया ठरवू लागलो. आम्हांस सरदारगृहांत जावयाचे होते. व्हिक्टोरिया वाला म्हणाला, “ एक रुपया पडेगा, रावसाब.” पडवळ म्हणाले, " एक रुपया नाहीं मिलेगा, आठ आणे लेव.” अशा त-हेने बरीच घासाघीस झाल्यावर दहा आण्यांस गाडी ठरली व हमालाचे पैसे चुकवून आम्ही निघालों. त्यानंतर काय झाले ते सांगण्यास आतां सवड नाही, कारण भाजीला जाण्याची वेळ झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईचे वर्णन मी देणार होतो पण आमच्या गांवच्या लायब्ररींतील मुंबईवर्णनाचे पुस्तक गहाळ झाल्यामुळे ते आतां देणे शक्य नाहीं; शिवाय वाचकांपैकी बहुतेकांनी मुंबई पाहिलीच असेल आणि ज्यांनी पाहिली नसेल त्यांची प्रत्यक्ष पहाण्याची उत्सु कता वर्णन वाचल्याने कमी होईल म्हणून पुढेहि कधी ते देण्याचा विचार नाही.