मे महिन्याची सुट्टी म्हणजे मज्जाच असते..रिया एकुलती एक असल्यामुळे तिला ह्या सुट्टीचे खूपच आकर्षण होतं.. कधी एकदाची परिक्षा संपतेय आणि मामाकडे जातेय..असे व्हायचे तिला..आणि अखेर तो दिवस उजाडला..
रियाला 2 मावश्या आणि 2 मामा होते..एक मामा गावीच राहायचा..त्याला 2 मुले होती पप्पू आणि मिनू..रियाची त्यांच्या बरोबर चांगली गट्टी जमायची..तीला जास्त करून मामाच्याच गावाला जायला आवडायचे ते पण कोकणात.. आणि तिची सगळी भावंडे म्हणजे मामाची, मावशीची मुले सगळेजण वर्षातून एकदा तिथेच भेटायची..सगळी बच्चेपार्टी एकत्र जमून जो धिंगाणा घालायची तो विचारायलाच नको..
त्यांची सकाळ खेळापासून सुरू व्हायची.. आणि रात्र भुतांच्या गोष्टींवर..पप्पू कोकणात राहत असल्यामुळे त्याच्याकडे खूप गोष्टींचा साठा असायचा..तो दरवेळेला नवीन नवीन गोष्टी सांगायचा..ते पण रंगवून..सगळ्यांना वाटे की हे सगळं आताच घडतंय..
असाच एकदा तो देवचाराची गोष्ट सांगत होता..सगळे खूप मग्न झालेले ती गोष्ट ऐकण्यात...पप्पू सांगत होता की, "देवचार हा गावाचा राखणदार असतो, तो मध्यरात्री गावाला फेरा मारतो..चुकलेल्याना वाट दाखवतो..त्याच्या येण्या-जाण्याची ठराविक वाट असते..त्या वाटेवर जर कोणी झोपले किंवा काही अडसर असेल..तर तो तीन वेळा वॉर्निंग देतो..आणि मग तरीपण नाही ऐकलं तर त्या व्यक्तीला त्याच्या परीने शिक्षा करतो..त्याला कोणीही अजून प्रत्यक्षात बघितलेले नाही..पण म्हणतात बुवा तो खूप उंच, धिप्पाड असतो, त्याच्या पायात कोल्हापूरी चपला असतात, त्यांचा करकर असा आवाज येतो आणि त्याच्या हातात एक काठी असते त्याला घुंगरू बांधलेले असतात..तो चालताना त्या घुंगारांचा आवाज होतो..ही त्याची आसपास होण्याची लक्षणे.."
पप्पू ला जितकी देवचाराबद्दल माहिती होती..तितकी त्याने दिली..ते पण रंगवून..सगळे आता पुढे काय होईल हे ऐकण्यात उत्सुक होते..तो पुढे बोलू लागला..
"एकदा गावातल्या दगडूच्या घरी त्याचा चुलत भाऊ रामा आणि त्याचा मित्र सखा असे दोघे राहायला आले होते..रामा कायमचा मुंबई स्थायिक असल्यामुळे त्याच गावाकडे कमी येणे-जाणं होत..पण अचानक जमिनीच्या कामामुळे त्याला गावाला यावे लागले होते..जमिनीच्या कामाला वेळ लागत असल्यामुळे त्याला दोन दिवस राहने भाग होते. दगडू खूपच खुश होता..जेवण उरकून तिघेही गप्पा मारत बसले.. दगडू च्या खळ्यातूनच देवचाराची जाण्याची वाट होती..म्हणून शक्यतो रात्रीचे कोणीही खळ्यात झोपत नसे..अगदीच तशी गरज पडलीच तर..तुळशीसमोरची जागा सोडून कोणीपन झोपत असे..त्या रात्री खूप उकाडा असल्यामुळे रामा आणि सख्याने खळ्यातच झोपायचे ठरवले..पण दगडू ने त्यांना ताकीद दिली की, 'ही देवचाराची जाण्याची वाट आहे..तेव्हा जरा जपून, तशी पण घरात खूप जागा आहे तेव्हा तुम्ही घरातच झोपावे..' पण ते दोघे ह्या सगळ्यावर विश्वास ठेवत नसल्यामुळे तिथेच झोपले..दगडू मात्र घरात झोपला..
मध्यरात्रीची वेळ होती..रामा थकल्यामुळे लगेच झोपून गेला..पण काही केल्या सख्याला काही झोप येत नव्हती..त्याला हे पहायचे होते की खरच देवचार असतो का? आणि त्याने ही दगडू कडून बरेच काही ऐकले होते..त्याला आता हे प्रत्यक्ष अनुभवायचे होते..म्हणून तो मुद्दामच वाटेवर झोपला..काही वेळानंतर त्याला कसलातरी आवाज आला..त्याने आजूबाजूला पाहिले पण कोणचं नव्हते..पण त्याला घुंगरांचा आवाज आणि त्याबरोबर कोणतरी त्याच्याकडे चालत येत आहे असा भास झाला..सख्या ची घाबरून बोबडी वळाली.. त्याने जोरजोरात हलवून रामा ला उठवले..पण तो इतका गाढ झोपेत होता की त्याने काही साद च दिली नाही..सख्याने दगडुकडून ऐकले होते की देवचार तीन वेळा वॉर्निंग देतो आणि नाही ऐकले तरच शिक्षा करतो..उगाच विषाची परीक्षा नको..म्हणून सखा स्वतःच वाटेवरून बाजूला झाला..आणि थोड्याच वेळात त्याला असे वाटले कोणीतरी त्याच्या बाजूने गेले..अगदी जवळून..त्याला तो चप्पलचा आणि काठीच्या घुंगुरांचा आवाज स्पष्ट आला..पण अंधार गुडूप असल्यामुळे काहीच दिसले नाही..आणि तो आवाज हळुहळु विरळ होत गेला..सखा चुपचाप झोपून गेला..आणि पुन्हा कधीच देवचाराच्या वाटेवर झोपला नाही..
ही गोष्ट ऐकताना सगळे घरातले वातावरण भीतीमय झालेलं..सगळी मुलं मन लावून गोष्ट ऐकत होती.. पण अचानक गाडीच्या सायरन चा आवाज झाला..सगळी मुलं एकदम दचकली..एकमेकांना बिलगली..घरातल्या मोठ्यांच्या ही गप्पा चाललेल्या त्या ही थांबल्या.. आणि सगळी जण आवाजाच्या दिशेने गेली..मोठी माणसे बॅटरी घेऊन गाडीजवळ गेली..पण गाडीजवळ कोणीच नव्हते.. ड्राइवर काका बाहेरच झोपलेले..ते ही खडबडून उठले.. मांजर आली असेल गाडीकडे..किंवा कुत्रा असेल..असे बोलत सगळ्यांनी उडवाउडवीचे संदर्भ लावले..पण गाडीची चावी तर ड्राइवर काकांच्या शर्ट च्या खिशात होती आणि तो आत खुंटीला टांगलेला होता..मग गाडीजवळ कोण होते??
सगळ्यांनाच प्रश्न पडला..
तेवढ्यात मामा (पप्पूचे वडील) जो आत झोपलेला तो उठून बाहेर आला.. ड्रायव्हर काकांवर ओरडला की, 'वाटेवर गाडी का लावलीस..ती त्याची वाट आहे..आधी बाजूला कर..'
ड्राइवर काकांची हे ऐकल्यावर एकट्याने बाहेर जायची हिम्मतच होत नव्हती. मग मामाने त्याच्याबरोबर जाऊन गाडी बाजूला लावली..
त्या सगळ्या गोंधळात मात्र अचानक रिया च लक्ष घड्याळाकडे गेले..रात्रीचे 2 वाजले होते..
तोच तिला घुंगरचा आवाज ऐकल्याचा भास झाला आणि तो मंद मंद होत गेला..
रिया मनातच पुटपुटली,
बापरे देवचार????????
-- end --