शंकरराव  मोहिते हे हंबीरराव मोहितेंच्या घराण्यातले. त्यांचं मूळ गाव तळबीड साताऱ्याजवळच. तिथे त्यांच्या खूप जमिनी होत्या. काही कुळ-कायद्यात गेल्या, तर काही मोहिते तिथेच राहून त्यांनी त्या जमिनी कसल्या. मोहिते घराण्याला तळबीडमध्ये खूप मान आहे.  मोहित्यांची तरुण पिढी  नोकऱ्यांच्या निमित्तानी, मुलांच्या शिक्षणासाठी अशा काही ना काही कारणांनी मुंबई, पुणे येथे स्थायिक झाले. कालांतरानी जेष्ठ लोकही थकले. त्यांनी जमिनी कसायला दिल्या, काही विकूनही टाकल्या. शंकररावही त्यांच्या नोकरीच्या निमित्तानी मुंबईत स्थायिक झाले. त्यांना दोन मुले मोठा शालक आणि छोटा निलय. मोठा मुलगा इंजिनीअर होऊन अमेरिकेत स्थायिक झाला. निलय मात्र वडिलांसारखा होता. अभ्यासात खूप हुशार. तो ऑटोमोबाईल इंजिनीअर झाला. स्वतःचा व्यवसायही होता. पण तो आपल्या छंदांत रमत असे. त्याला व्यायामाची आवड होती, भटकंतीचीही आवड होती, तो अतिशय चांगला पोहत असे. त्यामुळे त्याला ऑफिस मध्ये अडकून राहणे आवडत नसे. त्याचे ऑफिस त्याची पत्नी रीना सांभाळत असे. तिला त्याच्या लहरी वागण्याची सवय होती. ती कॉलेज पासून त्याची मैत्रीण होती. त्यांच्या लग्नाला २ महिने झाले होते.

निलय चं लग्न ठरल्यापासून शंकररावांच्या  मनात तळबीडला जाऊन स्थायिक व्हायची कल्पना जोर धरू लागली होती. तिथे एखादा वाडा घेऊन रिटायर्ड लाईफ घालवायचा विचार होता. त्यांच्या पत्नीला हि कल्पना फारशी पसंत नव्हती. तरी त्या तयार झाल्या आणि त्याना हवे तेंव्हा त्या मुंबईत जाऊ शकत होत्या. मग झालं शंकररावांचा शोध चालू झाला. त्यांना तळबीडमध्ये जागा मिळाली. तो एक खूप मोठा जुना दगडी वाडा होता. तिथे कित्येक वर्षात कोणीच राहिल नव्हतं. त्यामुळे खूप पडझड झाली होती. शंकररावांकडे पैशाला कमी नव्हती त्यांनी खास मुंबई वरून माणसे बोलावून वाडा राहण्यायोग्य केला. त्यात कितीतरी आधुनिक सोयी करून घेतल्या.   पण त्यांनी वाड्याच्या मूळ बांधकामाला धक्का लावला नव्हता. फक्त फरशा स्लायडिंग  विंडो. गच्ची आधुनिक करून घेतली. जेंव्हा ते वाड्यात आले तेंव्हा त्याची पत्नी खूप खुश झाली. एक दिवस सगळ्या नातेवाईकांना बोलवू असेही त्यांनी सूचित केले. वाडा गावापासून जरा बाहेर असला तरी फार लांब नव्हता गावात सगळ्या सोयी होत्या त्यामुळे इथले आयुष्य फार कठीण जाणार नाही याची खात्री झाली. ते राहायला आल्यापासून निलय तिकडे आला नव्हता. तो त्यांच्या कामात व्यस्त होता.   मग निलय त्याच्या कामातून मोकळा झाल्यावर त्यानी आपल्या गावी जायचं ठरवलं. तसं आई वडिलाना कळवलं. मग एक दिवस अचानक तो येऊन धडकला. इतके दिवस शांत असणारा तो वाडा निलय च्या येण्याने भरल्यासारखा वाटू लागला. आल्या- आल्या तो संपूर्ण वडाभर फिरला. त्याला ती जागा खूपच आवडली. शांत, शुद्ध वातावरण , मुख्य रस्त्यापासून आत असल्यामुळे प्राणी आणि पक्षांचे सोडले तर कुठलेच आवाज नाहीत. वाड्याच्या मागचे दाट हिरवेगार जंगल. सगळंच त्याला खूप आवडलं. निलय त्या वाड्याच्या तळमजल्यावर फिरत असताना जरा मागच्या बाजूला एक लाल दरवाजा दिसला. तो इतर दरांपासून वेगळा आणि जास्त मोठा होता. त्यावर चित्र-विचत्र अशा चेहृऱ्यांची चित्रे होती. त्या दाराला कोणतीही कडी नव्हते म्हणजे तो आतून बंद होता. निलय ला त्या दाराबद्दल उत्सुकता वाटू लागली होती त्यांनी खूप धक्के मारूनही तो दरवाजा तसूभरही हलला नाही. मग जेवताना त्यानी आपल्या वडिलांजवळ दरवाजाचा विषय काढला. ते म्हणाले कि राहायला आल्यापासून त्यांनीही ती खोली उघडण्याचा खूप प्रयत्न केला, त्यानी आणलेल्या कामगारांनीही तो दरवाजा करवतीने कापण्याचा खूप प्रयत्न केला ,परंतु त्यांनाही यश आले नाही. आता निलय च्या मनात या लाल खोलीविषयी कुतूहल जागे झाले. सकाळी उठल्यावर त्यानी वाड्याला बाहेरून फेरी मारली.   त्या लाल खोलीच्या मागील बाजूसही तो गेला पण त्याला एकही खिडकी दिसली नाही ज्यातून तो आत डोकावून बघेल. आता मात्र तो हट्टाला पेटला या खोलीचं रहस्य आपण जाणून घ्यायचंच. त्याशिवाय आपण इकडून जायचं नाही असा निश्चय त्यानी केला. त्याला लागलेलं त्या खोलीचं वेड पाहून त्याची आई वैतागली." घरात इतरही खोल्या आहेत ना? मग तिथे राहा कि, तीच खोली तुला कशाला उघडून हवी आहे ?" त्या म्हणाल्या. बाबाना निलय काही या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय गप्प बसणार नाही हे समजून शांत होते. त्यांनाही या खोलीचं रहस्य जाणून घ्यायचं होतं.

सर्वप्रथम   निलयनी वडिलांकडून त्या एजंट चा पत्ता आणि नंबर घेतला ज्यानी त्यांना हा वाडा दाखवला होता. तो साताऱ्यातला होता. त्याला या वाड्याचा इतिहास फारसा ठाऊक नव्हता. तो वाडा गेली कितीतरी वर्षे म्हणजे त्या एजंट चे वडील असल्यापासून त्यांच्याकडे होता. "त्याचे मूळ मालक कोण ?" असे निलय ने विचारताच त्यानी माहित नसल्याचे सांगितले. कारण वाडा विकून येणारी रक्कम मुंबईतील एका समाजसेवी संस्थेकडे जमा होणार होती. निलयनी त्या संस्थेचा नंबर घेतला व त्यांना फोन केला. त्या संस्थेचे प्रमुख श्री. अविनाश राजे हे स्वतः त्याचाशी फोनवर बोलले. निलय त्यांना चांगले ओळखत होता. त्यांचा मुलगा तुषार आणि तो खूप घट्ट मित्र होते. त्यानी निलय ला सांगितले कि सुमारे १०० वर्षांपूवी या वाड्याचे बक्षीसपत्र बनवले होते. त्यात त्या वड्याचे मालक श्री. मल्हारराव राजेभोसले होते. ते त्या वाड्याचे शेवटचे वारस होते. त्यानी त्यांच्या पश्चात वाडा विकून येणारी रक्कम कोणत्याही समाजसेवी संस्थेला देण्यात यावी असे सुचवले होते. ही जबाबदारी साताऱ्यातील वकील श्री. निवास कडू यांच्याकडे होती. त्यांचे पणजोबा हें राजेभोसलेंचे कारभारी होते. त्यांच्याकडे ते बक्षीसपत्र होते. त्यानी तीन पिढ्या ते सांभाळले होते. हा वाडा विकला जाताच त्यानी मुंबईच्या या संस्थेची निवड करून त्यांना विक्रीची रक्कम दिली. मग निलय नि या कामात तुषार राजेची मदत घ्यायचे ठरवले. तुषार बद्दल एक गोष्ट त्याला माहित होती कि तो सामान्य नव्हता त्याच्यात काहीतरी असामान्य शक्ती होत्या.तुषार हा आधुनिक काळातला साधू होता. त्याच्यातल्या शक्ती त्याच्या लहानपणी त्यांच्याकडे पूजा सांगायला आलेल्या गुरुजींनी ओळखल्या व त्याला हिमालयात त्यांच्या गुरुकडे जाण्यास सांगितले. तुषारच्या घरच्यांनी हे ऐकले नाही. तुषार अभ्यासात खूप हुषार होता. त्यानी इंजिनीरिंग ची डिग्री घेतली तरीही आपल्या आयुष्यात काहीतरी कमी आहे याची जाणीव त्याला सारखी होऊ लागली. कसलातरी ध्यास लागल्यासारखा झाला. आपल्यातल्या वेगळेपणाची जाणीव त्याला फार आधीच झाली होती. कोणावरच्या संकटांची जाणीव त्याला आधीच होत असे. तो ती टाळतही असे. आपली शक्ती परिपूर्ण नाही हे त्याला माहित होते. एका हिमालयातील भेटीदरम्यान त्याची सिद्धनाथांशी गाठ पडली त्यानंतर दोन वर्ष तो त्यांच्या सोबत राहिला त्यांच्या शिष्य बनून आणि अनेक सिद्धी शिकून घेतल्या. आता तो दिल्लीत राहत होता. लोकांत राहून तो त्यांची सेवा करत होता. तो त्याचा फॅमिली व्यवसायही सांभाळत होता. ज्या कोणाला त्याची अतिशय गरज असेल याची जाणीव त्याला होई व तो मदतीला धावून जाई.  मग सर्व विचार करून निलयनी तुषार ला फोन केला. " मग निलय केंव्हा येऊ साताऱ्याला?" असा प्रश्न तुषारनी केला. निलयच्या जागी दुसरे कोणी असते तर त्याला तुषारच्या या मनकवडेपणाचे आश्यर्य वाटले असते पण निलयला तुषारच्या विषयी असे अनेक किस्से ठाऊक होते, तो म्हणाला." अरे खूप तातडीचे असे काही नाही. मी काही दिवस इकडे आहे आणि ती खोली आतून बंद आहे म्हणून उत्सुकता वाटतेय. मुळातच या दारावर फार विचित्र दृश्य रेखाटली आहेत. म्हणजे काही लोक माणसांना आगीत ढकलताना, किंवा उलट लटकावून खालून जाळताना, चाबकाचे फटके मारताना. आई म्हणते ही नरकाची दृश्य आहेत. काल रात्री या दाराला कान लावून ऐकत होतो तेंव्हा मला अनेक लोकांच्या वेदनेने भरलेल्या किंकाळ्या ऐकू आल्या. तसेच या दारावर एका मोठ्या तीन डोकी असलेल्या सापाचे चित्र आहे या सगळ्याचा काहीच अर्थ लागत नव्हता. आज सकाळी रामुकाका आले. रामुकाकांच्या अनेक पिढ्या मोहितेंकडे काम करण्यात गेल्या. त्यांना या दाराबद्दल विचारले तर ते घाबरत म्हणाले," साहेबानी हे घर घ्यायला नको होतं. व्यवहार झाला तेंव्हा मी मुंबईत मुलाकडे होतो नाहीतर मी हा सौदा होऊनच दिला नसता. “ते इतकंच परत परत बोलत राहिले.पुढचं काहीच सांगितलं नाही. त्यांना गावात सोडायला गेलो तेंव्हा इतर लोकांशी बोललो तेंव्हा लोकांचं म्हणणं पडलं कि त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तुझ्याबरोबर राहून मला हे समजलंय कि या जगात अशक्य असं काहीच नसतं आपण प्रत्येक शक्यता स्वीकारायला तयार राहिलं पाहिजे. म्हणून तुला शक्य असल्यास यायची विनंती करतो. सध्या त्या लाल खोलीत मला काही धोका असेल असं वाटत नाही. नक्की ये यार ! काही नसलं तर तुझी एक मस्त पिकनिक होईल  ." तुषार हे सगळं ऐकत होता. त्याला मनातून निलय ला हे सांगावंसं वाटत होतं कि त्या लाल खोलीइतकी धोक्याची जागा या पृथ्वीवर नाही. तरीही त्यानी या गोष्टी मनातच ठेवल्या कारण काहीतरी अर्धवट बोलायचं आणि निलय नको तो धोका पत्करायला जायचा. फक्त त्यानी निलय ला बजावलं कि काही दिवस तुझ्या आई-वडिलांना या घरापासून लांब ठेव

कारण आपण त्या खोलीवर प्रयोग करणार त्याचा त्रास त्यांना व्हायला नको. तो लगेच निघणार होता. निलय नी आई-वडिलांना मुंबई ला पाठवून दिले. जाताना आई कुरकुर करत होती. शंकरराव मात्र चाणाक्ष होते. निलयनी तुषार येणार असे सांगताच गोष्टी वेगळे वळण घेतील हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून  त्यानी मुद्दामच मुंबईतली कामे काढली आणि दोघे निघून गेले.          

तुषार घाईनी निघाला तरी दुसऱ्या दिवशी रात्र झालीच साताऱ्यात पोहोचेपर्यंत. निलय त्याला घ्यायला आला होता. त्यानी वाटेत जेवण केलं. मग ते आपल्या इतर मित्रांबद्दल बोलत राहिले. दोघं शाळेपासून मित्र असल्यामुळे विषयांना कमी नव्हती. तुषार मुद्दामच लाल खोलीचा विषय टाळतोय हे निलयच्या लक्षात आले. तुषारनेही मन सर्व गोष्टीना मोकळं ठेवायचं ठरवलं. कारण पहिल्यांदाच त्याच्या शक्तीने त्याला दाराच्या आत काय आहे हे दाखवलं नव्हतं. म्हणून तो अस्वथ झाला होता. आपली शक्ती या प्रकरणात पुरी पडेल ना ? अशी शंका त्याच्या मनात येत होती.   आपल्यापुढे एक मोठं संकट वाढून ठेवलंय याची मात्र त्याला जाणीव झाली. दोघे वाड्यावर आले तेंव्हा रात्रीचे बारा वाजत आले होते.तुषारला वाड्याच्या आवारात आल्यापासूनच अस्वस्थ वाटत होते. कदाचित आपल्या आयुष्याचा शेवट इथंच तर होणार नाही ना ? अशी भीती मनात दाटून आली. तो मरणाला घाबरत नव्हता पण मरणापेक्षाही वाईट जागी कायमचे अडकून पडायला नको असे त्याला मनापासून वाटत होते.  त्यांनी गुरूंचे स्मरण केले आणि वाड्यात पाय टाकला. इतर वेळी तो अशा पछाडलेल्या जागी गेल्यावर विरुद्ध शक्तीलाही त्याच जाणीव होत असे आणि त्यांच्याकडून त्वरित प्रत्यूत्तर येत असे. या ठिकाणी असे काहीही झाले नाही. याचा अर्थ विरुद्ध शक्तीला त्याची जाणीवच नाही झाली असे नव्हे तर तो त्यांना विशेष महत्वाचा वाटला नसावा. तुषारनी आधी अंघोळ केली. गुरूंच्या फोटोला मनोभावे नमस्कार केला. निलायला त्यानी झोपायला सांगितले होते. मग ठीक बारा वाजता तो त्या दाराजवळ गेला. ते बघताच क्षणी त्याला खात्री पटली कि हे दार जर उघडले तर जगात अनेक वाईट शक्ती प्रवेश करतील. हा दुसऱ्या मितीचा दरवाजा होता. पूर्वीचे लोक याला "नरकद्वार" म्हणत असत. त्यानी काहीच केले नाही. पूर्ण अभ्यास केल्याशिवाय यात पडायचं नाही, जर आपल्या आवाक्याबाहेर असेल तर सरळ निलयला वाडा खाली करायला सांगायचं किंवा आपल्या गुरूंना बोलावून घ्यायचं हे त्यानी ठरवलं. मग तो झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी निलयनी त्याला विचारले," काही कळलं का रे ? ""हे बघ निलय मला तर्क करायला आवडत नाहीत. हे जे काही प्रकरण आहे ज्याची तू कल्पनाही केली नसेल. आधी आपण त्या रामू काकांना भेटू. ते काय म्हणतात ते पाहू." दोघे बाहेर पडले. रामुकाकांच्या छोट्याशा घराजवळ गेले. त्यानी नीलयला ओळखले. मग ते म्हणाले," अहो साहेब कशाला आलात त्या जागेत राहायला लै वंगाळ जागा आहे ती." "वंगाळ म्हणजे काय?" तुषारनी विचारले. "हे पहा तुमच्या शिकलेल्या माणसांचं मला काही कळत नाही. त्या जागी फार फार वाईट गोष्ट आहे. थांबा जरा या गावात महादेवशास्त्री नावाचे एक बामन होते. त्यानी याविषयी लिहिलंय जुने कागूद आहेत थांबा ! मी देतो आणून." मग त्यानी एक नीट राखलेलं बाड आणून दिलं "हे गेल्या पाच पिढ्यांपासून आमच्याकडे हाये. तुम्ही वाचा." तुषार आणि निलय थेट वाड्यावर आले. निलय नि उत्साहानी ते उघडले पण त्याची निराशा झाली कारण ते शुद्ध मोडीत होते. तुषार मोडी शिकला होता. त्यानी ते वाचायला घेतले.  मुळातच त्या माणसाचे अक्षर खूप वळणदार आणि छान असावे पण हे त्यांनी खूप घाबरत लिहिलेले असल्यामुळे अक्षर काही ठिकाणी वेडेवाकडे असावे.

"  इ.स १२००१  मी महादेवशास्त्री,  जेंव्हा महाराजांनी  इतक्या निबिड अरण्यात महाल बांधायचे ठरवले तेंव्हा जरा  नवल वाटले. महाराजांना एकांत वगैरे प्रिय नव्हता. उलट त्यांना प्रजाजनांसोबत राहायला आवडे. गेल्या काही महिन्यात त्यांच्या वृत्तीत फरक पडलेला जाणवतो. ते राजकुंडच्या सफरीवरून आल्यापासून खूप वेळ ते महालात एकटे घालवू लागले आहेत. महाराजांना भटकंतीचा फार शौक आहे. घोडा घेऊन ते निरनिरळ्या प्रदेशांत फिरतात, तेथील नवनवीन वस्तू आणतात. त्यांच्या महालातील एक दालन त्यांनी त्यासाठी खास बनवले आहे. दूरदूरच्या देशातले

लोक खास ते दालन बघण्यासाठी येतात. महाराजही आवडीने त्यांचे आदरतिथ्य करतात. त्यामुळे महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. त्यांच्याकडे निरनिरळ्या प्रकारची सोन्या-चांदीची पात्रे, गालिचे, अलंकार,  मुखवटे एक ना हजारो अनमोल चिजा त्यांच्या संग्रहात होत्या.  महाराज सफरीवरून एखादी अनमोल चीज घेऊन आले कि ते प्रथम मला बोलावत. मी पदाने जरी त्यांचा राजगुरू असलो तरी आमचे नाते मैत्रीचे आहे. ती वस्तू पाहून मी माझे मत व्यक्त करेपर्यंत ते लहान मुलाच्या उत्सुकतेने माझ्याकडे पाहत असत. मी 'उत्तम' अशी खूण करताच ते अतिशय आनंदून जात.

अशातच एक दिवस दुर्वासनाथ आले. प्रथम त्यांचे उग्र रूप पाहून काळजात धडकी भरली. अंगावर शहरे आले , जणू ती येणाऱ्या संकटांची नांदी होती. त्यांनी महाराजांना प्रणाम केला. महाराजांनीही त्यांना आसनावर बसवून त्यांचा यथोचित सन्मान केला. त्यांनी जगप्रवास केला होता. त्यांचे चित्र-विचित्र अनुभव ऐकून दरबारातील सर्वचजण आवक झाले. महाराजांनी तर त्यांचे फार कौतुक केले व अजून काही दिवस राहायची त्यांना विनंती केली. मग झाले महाराज आणि त्यांची एकांतात खलबते होऊ लागली. महाराज मला काही सांगेनासे झाले मग एक दिवस अचानक दुर्वासनाथ निघून गेले. मग काही दिवसांनी महाराजांनी एकट्यानेच राजकुंडच्या सफरीवर जायचे ठरवले. मी आणि राणीसाहेबानी त्यांना खूप समजावले परंतु ते कोणाचेही न ऐकता निघून गेले. सुमारे एक मासानंतर ते आले. त्यांची तब्बेत अतिशय खराब झाली होती. तरीही चेहऱ्यावर एक अवर्णनीय आनंद होता. मग त्यांनी निबिड अरण्यातील एका खास जागी महाल बांधायला घेतला. मी जाऊन जागेची पाहणी करताच ती जागा अतिशय वाईट असल्याचे जाणवलेत्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जाणवत होती..खूप समजावूनही महाराजांनी ऐकले नाही. महाल बनवायला त्यांनी दूर देशातून कारागीर आणले होते. लवकरच महाल तयार झाला. राणीसाहेबांनी तिथे राहण्यास नाखुषी दाखवली. महाराजांनी त्यांना जबरदस्ती केली नाही. उलट युवराजांचा राज्याभिषेक करून राज्याच्या जाबदारीतून मोकळे झाले. ते राहायला जायच्या दिवशी मी महालात गेलो आणि तो प्रचंड रक्तवर्ण दरवाजा आणि त्यावरील चित्रे पाहून हादरलो. महाराज हे काय वाईट करत आहेत? मनात आले. " अजूनही काही सांगणार नाही आहात का ?" मी कळकळीने त्यांना विचारले. यावर ते फक्त डोळे मिचकावून हसले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel