काल रात्री असाच निळ्याभोर आकाशात निवांत भटकत होतो. आजूबाजूने तुरळक ढग जात होते, चांदण्या चमकत होत्या, मस्त गार वारा वाहात होता. चालता चालता एके ठिकाणी गडबड उडालेली दिसली. एक भव्य राजवाडा लांबूनच उठून दिसत होता. वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे अनेक रथ त्या राजवाड्याच्या भव्य कमानीतून आत जात होते. एका बाजूला डी.जे. लावला होता आणि त्यावर सैराट चे `झिंग, झिंग, झिंगाट' वाजत होते. मी दबकत दबकत त्या कमानी जवळ गेलो, तेवढ्यात एका रखवालदाराचे लक्ष माझ्याकडे गेले आणि तो माझ्यावर खेकसला `अरे ए लेकाच्या, मध्ये कुठे तडमडलाईस, चाल व्हय बाजूला' असे शब्द कानावर आले. त्याच्या उच्चारावरून हा सातारी दिसतोय असे माझ्या लक्षात आले. मी लगेच पुढे होत त्याला म्हटले ``काय सातारकर''.......... तो तीन ताड उडालाच. इथे स्वर्गात कोण आपल्याला सातारकर म्हणतंय असे म्हणत माझ्याकडे बघायला लागला. मग मी त्याला सांगितले कि मीही सातारकर आहे म्हणून. गडी जाम खुश झाला ना राव. तरी पण संशयाने बघत म्हणाला........`लेका, चांगला जिता जागता दिसतुयास, आन हिथं सर्गात काय करतूय?.............
मी म्हणालो ``काका, ते राहूद्या हो, पण इथं एवढी गडबड कसली चाललीये?........तो म्हणाला ``अरे आता तुमच्याकडं पावसाळा सुरु होणार हाय न्हवं? म्हणून मग सगळ्या ढगांच्या फॅक्टरी मालकांची सभा हाय, सिझन कधी सुरु करायचा म्हणून''.............. मी डोके खाजवत म्हटले `म्हणजे?'............. ``अरे म्हंजी काय पाव्हण्या, असं बघ, तुमच्याकड्चा पावसाळा संपला कि इकडं लगेच ढगांचा सिझन सुरु होतंय, सूर्यदेव आग ओकत मोठं मोठ्या भट्ट्या लावतोय आणि अरबी समुद्रापासून पार तिकडं दुबई पातूर समुद्राचं पाणी गरम व्हाया लागतंय. आणि एक डाव का हे पाणी गरम झालं कि त्याची वाफ व्हतिया, आणि ती वाफ इकडं वर आली कि लगेच सगळे ढगांचे कारखाने सुरु व्हत्यात, आणि ढग बनवायला लागत्यात................. मी आपला विचार करत होतो, तेवढयात काकांनी आजूबाजूला बघत मला हळूच इचारलं ``वाईच, जरा तंबाखू हाय काय?........ ``नाही हो काका, मी नाही खात?............... ``आक्रितच म्हणायचं कि, सातारी म्हणतुयास, अन तंबाखू खात नाही, हात लेका, जनम वाया गेला तुझा''..... असे म्हणत आणि खो खो हसत काकांनी रिकामे हात बार मळल्यासारखे चोळले......... `म्हणजे काका, इथे पण तंबाखू मिळते काय?''.............. `नाही रे, पाव्हण्या, पण तुम्हाकडं खाली कोण गचकला ना, त्याच्या दहाव्याला लोक, त्याच्या आवडीच्या वस्तू ठेवत्यात न्हवं का. त्यात तंबाखूची पुडी हमखास अस्त्तिया. अन लोकही लै बेनवाड, सगळं खाली सोडून येतील, पण तंबाखूची पुडी मात्र हमखास संगती आनत्यात. मग आम्ही अशे इरसाल नग बरोबर हेरतो, आणि पुड्या काढून घेतो'........... असे म्हणत काका मस्त खो खो हसले............
मग मी संभाषणाची गाडी परत रुळावर आणत त्यांना विचारले ``मग काका, ढगांच्या फॅक्टऱ्या सुरु झाल्यावर पुढे काय होते?.............. ``आर, पुढे काय?...... सात-आठ महिने कारखाने चालूच. सगळी गोदामं ढगांनी भरून जात्यात, आन पावसाळा सुरु व्हायच्या येळेला हे ढग तुमच्याकडे पाठिवत्यात.'..............
``असं होय. बरं मग, आत मिटिंग कसली आहे आज?......मी विचारले............ `हेच कि, सिझन कधी सुरु करायचा, यावर?........काका म्हणाले.
मी त्यांना म्हणालो `काका, सोडता का आत? जरा ऐकतो काय म्हणताहेत'......... काका एकदम कावलेच अन म्हणाले `खुळा का काय? माझी नौकरी घालवतुयास काय?....... `अहो काका काळजी कसली करताय? गेली नोकरी तर या साताऱ्यात, ढिगाने फ्लॅट पडून आहेत, देतो एखादा जुगाड करून. हा, येताने फंड आणि ग्रॅच्युटीचे पैसे तेवढे घेऊन या, म्हणजे काम झालंच'................ यावर खो खो हसत काका म्हणाले, `खुळाच हैस, एक डाव मेल्यावर परत जिमनीवर कसा येणार?.............. मग मी म्हटले `नसेल जमत तर भूत होऊन या हो, आमच्या कडे बऱ्याच इमारती, अर्धवट बांधून पडल्यात, कुठंही जागा मिळून जाईल''. मी गमतीने म्हणालो.
काका काही आत सोडायला तयार होईनात, पण मी लैच गुळ लावल्यावर म्हणाले `आता काय, गाववाला म्हणल्यावर तुला न्हाय पण म्हणता येत नाही. मी असं करतो, सगळे आत गेलेत, फक्त इंदर देवाचा रथ तेवढा यायचा हाय, तो आला कि, मी गेट थोडं उघडं ठिवतो, तू हळूच सटक आत. काय?.......... मी तयार झालो.
........... थोड्याच वेळात इंद्र देवाचा तो भव्य रथ त्या गेट मधून आत गेला, आणि त्यामागोमाग मीही हळूच आत सटकलो...................
आतमध्ये भव्य सभागृहात अनेक मोठं मोठे महानुभाव देव मंडळी बसलेली होती. स्टेजवर मध्ये इंद्र, उजव्या हाताला सूर्यदेव आणि डाव्या हाताला वरुण देव बसले होते. नट्टापट्टा केलेल्या अप्सरा सगळयांना चषकांमधून पेय वाटप करत करत होत्या. अनेक जणांच्या जिभा चांगल्याच सैल सुटल्या होत्या. तेंव्हा मी ओळखले कि हे `पेय' कुठल्या प्रकारचं असेल. आपल्यालाही एखादा पेग मिळावा असं वाटलं, पण मन आवरलं.
........... इतक्यात इंद्रदेवांनी सगळ्यांना शांत करत मिटिंग सुरु करायची का? म्हणून विचारणा केली. अनेकांनी हात वर करत, आरडा ओरडा करत, काहींनी खिल्ली उडवत परवानगी दिली. इंद्रदेवांनी सूर्यदेवांना प्रस्तावना करायला सांगितली...........सूर्यदेव म्हणाले `` गेली आठ महिने, आम्ही सगळा आसमंत भाजून काढत, जास्तीत जास्त समुद्र तापवून भरपूर वाफ पाठवली आहे. त्याचा तुम्ही उपयॊग केला असेलच, आता माझी जबाबदारी संपली'.......... यानंतर वरुण देव बोलायला उभे राहिले ....`` सूर्यदेवांच्या कृपेने या वर्षी आपल्याला कच्चा माल भरपूर उपलब्ध झाल्याने सर्व फॅक्टऱ्या मधून ढगांचे भरपूर उत्पादन झाले आहे. सगळे गोडाऊन भरून गेले आहेत. सिझनला जर उशीर केला तर नवीन ढग कुठे साठवायचे हा प्रष्न उभा राहील. म्हणून लवकरात लवकर सिझन सुरु करावा असा मी प्रस्ताव मांडतो'............... त्यावर एक देव कसतरी उभा रहात म्हणालं.........`काही नको, लवकर सुरु करायला, खाली पृथ्वीवर लै लोक माजलेत. जरा भोगू दे आपल्या कर्माची फळं'............. यावर सगळीकडूनच गदारोळ सुरु झाला. कोण काय बोलतंय हेच कळेना झालं, तेवढ्यात कुणीतरी आपट्याच्या पानाचे बोळे करून स्टेजवर फेकले. बऱ्याच गोंधळानंतर सगळे शांत झाले, पुन्हा पेयांचे चषक फिरू लागले. मी मात्र मनात म्हणालो.......... ``आपले संसद भवन, आणि ही इंद्रसभा सारखीच दिसतेय.
मग इंद्रदेव बोलायला उभे राहिले, त्यांनी अगोदर सगळ्या नोंदवलेल्या ऑर्डर आणि तयार माल याचा आढावा घेतला आणि एक जूनच्या आतच सिझन सुरु करायचा निर्णय जाहीर केला. त्यावर एकाने सांगितले कि `भारतीय हवामान खात्याने अगोदरच डिक्लेअर केलंय कि मान्सून ४ दिवस आधीच सुरु होणार म्हणून, आपण जरा त्यांना झटका द्यायला पाहिजे'........... पण इंद्रदेव म्हणाले `असू दे, त्यांचंही कधी थोडे फार खरे ठरू दे, नाही तर त्यांच्या भरवश्यावर कोणीच राहत नाही''........... `आपल्या सगळ्या निरीक्षक टीम ने पुष्पक विमानातून या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवा, सगळीकडे ढग व्यवस्थित पोहोचतात कि नाही, वेळेवर डिलिव्हरी होतेय कि नाही हे नीट बघा'.इंद्रदेव म्हणाले. यावर नियोजन मंत्रीदेव उभे राहून म्हणाले कि ` महाराज, यावेळी आपण `ड्रोन' खरेदी केलेत, त्यातून लक्ष ठेवता येईल'.......... `हे ड्रोन काय असतंय?. इंद्रदेवांनी विचारले........ ``छोटी विमाने म्हणा ना महाराज, यात कुणी बरोबर द्यायची गरज नसते, त्यातला कॅमेरा सगळे फोटो काढून आपल्याकडं पाठवतोय' इंद्रदेव खुश होणार तेवढ्यात दुसरा एक जण म्हणाला `या ड्रोन खरेदीत घोटाळा झालाय, त्याची चौकशी व्हायला पाहिजे'' यावर नियोजन मंत्री म्हणाले कि ``होय महाराज, पृथ्वी तलावरून एक पुढारी मयत होऊन वर आला होता, त्यानेच हा व्यवहार करून दिला. एक लाख सुवर्ण मुद्रांना एक असा व्यवहार झाला होता पण, नंतर आम्ही `फ्लिपकार्ट' वर चौकशी केली तेंव्हा याच ड्रोन ची किंमत ५०००० सुवर्ण मुद्रा आहेत असे कळले. ते पुढाऱ्याचं बेणं मेल्यावर सुद्धा पैसे खायची सवय काही सोडत नाही. आम्ही चौकशी करून त्यांची रवानगी नरकात केली आहे.'
या सगळ्या उहापोहानंतर इंद्रदेवानी `२९ तारखेला केरळात मान्सून ला सुरुवात होईल आणि ७ जून परंत साताऱ्यात पावसाचे आगमन होईल असे जाहीर केले. हे ऐकून मी इतका आनंदी झालो कि, आपण कुठे आहोत याचे भान विसरून गेलो, आणि `हुर्रे' म्हणून ओरडलो. सगळ्यांचे लक्ष माझ्याकडे गेले नि, परिस्थितीचे भान येताच मी पाय लावून पळायला सुरुवात केली. अनेक देवदूत माझ्या मागं लागले.
आणि तेवढ्यात `कडाड-कड' असा विजेचा आवाज आला नि मी झोपेतून जागा झालो. उठून बाल्कनीत आलो, अंधारातही सगळे आभाळ भरून आलेले जाणवत होते, ४-२ थेम्ब पडतही होते. त्यातून छान मातीचा सुगंध येत होता. मी बराच वेळ वाट पाहीली, पण काहीच हालचाल दिसेना. म्ह्णून मग `ही डिलिव्हरी साताऱ्याची नसून दुसरीकडचीच कुठलीतरी ऑर्डर असेल, असे मनाचे समाधान करून घेत पुन्हा बेडकडे वळलो .......................
लेखक : अनिल दातीर, सातारा.