सेनेची मुलुख मैदान तोफ आणि राज्यसभेचे खासदार श्री संजय राऊत यांनी नुकतेच एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर जागतिक आरोग्य संघटना, डॉक्टर आणि कंपाऊडर याबाबत मुक्ताफळे उधळली असून यामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड नाराजी, संताप आणि क्षोभ पसरलेला आहे. इतक्या जबाबदार व्यक्तीने आरोग्या सारख्या महत्त्वाच्या विषयाबाबत जे अकलेचे तारे तोडले आहे ते पाहता हे दिव्यज्ञान नक्की कोणता सामना करुन आणि कोणत्या वृक्षाखाली ध्यान करुन मिळाले असावे याबाबत जनमानसात प्रचंड उत्सुकता आहे.
सध्या देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असतांना डॉक्टरांबाबत राऊत यांनी केलेले विधान अत्यंत दुर्देवी आहे. त्यांचे बेजबाबदार विधान वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा अपमान आणि हिरमोड करणारे आहे.
खरेतर देशात कोरोना महामारीचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्राला बसला असून यात कित्येक डॉक्टरांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे, कित्येक डॉक्टरांची कुटुंबे यामुळे उध्वस्त झालेली आहेत. तरीपण अशा बिकट प्रसंगी आजही डॉक्टर्स आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र रुग्णसेवा बजावत आहेत. कित्येकांना तर महिनोन्महिने आप्तस्वकीयांचे दर्शन सुद्धा होत नाही अशा पार्श्र्वभूमीवर राऊत यांनी डॉक्टरांबाबत सहानुभूती पुर्वक विधान करणे अपेक्षित होते.
मात्र स्वत:चे गोडवे गाताना राऊतांची गाडी अनावश्यक पणे डॉक्टरांवर घसरली आणि सगळे ताळतंत्र सोडत डब्ल्युएचो ला काय कळते? डब्ल्यूएचओवर इकडून तिकडून गोळा केलेली माणसे असतात, मी कधीही डॉक्टर कडून औषधे घेत नाही, कंपाऊंडरला जास्त माहिती असते अशी उलटसुलट विधाने करून आपला कोतेपणा दाखवला आहे. खरेतर हा गरज सरो आणि वैद्य मरो चा प्रकार आहे.
अगदी काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया झाली होती. ती नेमकी डॉक्टरांनी केली की कंपाऊंडरनी केली हे त्यांनी स्पष्ट केले असते तर त्यांच्या विधानाला नक्कीच बळकटी आली असती. मात्र यात खरेखोटे काय आहे हे ओळखण्याइतपत जनता दुधखुळी नाही. जिथे थेट जागतिक आरोग्य संघटनेचीच राऊतांनी खिल्ली उडविली तिथे डॉक्टर पामरांची काय बिशाद असणार? तसेही डॉक्टरांवर हल्ल्यांच्या घटना कमी होत नसतांना त्यांनी असे शाब्दिक हल्ले करणे अनुचित आहेत.
वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर, नर्स, कंपाऊंडर, फार्मासिस्ट यांचे आपापल्या परीने योगदान असते. राऊतांना कोणाकडून इलाज करून घ्यायचा आहे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्र्न आहे मात्र त्यासाठी डॉक्टरांची मानहानी करणे चुकीचे आहे. अशा प्रकारे बेताल विधाने करून ते नक्की काय सिध्द करू पाहतात ते कळायला मार्ग नाही. स्वत:चे किंवा स्वकियांचे महत्त्व वाढविण्याच्या किंवा गोडवे गाण्याच्या नादात त्यांनी डॉक्टरांची नाहक निंदानालस्ती करणे योग्य ठरत नाही. अर्थातच याप्रकरणी विविध वैद्यकीय संघटनांनी निषेध करत आपला रोष प्रकट केला आहे.
याप्रसंगी आणखी एक खेदजनक बाब म्हणजे राऊतांचे बेताल वक्तव्य सुरू असतांना तिथे जमलेल्या वृत्तवाहिनीच्या पत्रकार आणि प्रतिनिधींनी त्यांच्या वक्तव्याला खिदळून दाद दिली. किती हा दुर्देवी विलास, याला कुठल्या पातळीवरील पत्रकारिता म्हणावे हा प्रश्नच पडतो. एखादा व्यक्ती मग तो कोणीही असो, कितीही मोठा असो अशावेळी उपस्थित पत्रकार आणि प्रतिनिधींचे एकूण वर्तन अजिबात शोभनीय नव्हते. त्यांचे वक्तव्य खोडून काढण्याची हिंमत एकही जण का दाखवू शकला नाही याचे नवल वाटते.
याप्रकरणी संजय राऊत यांच्याएवढेच वृत्तवाहिनीचे वर्तनसुद्धा बेजबाबदारपणाचे होते. त्यांच्या ताळतंत्र सुटलेल्या विधानाला तिथच्या तिथे सत्य परिस्थितीचे झणझणीत अंजन घातले असते तर ते पत्रकारीतेचे आदर्श उदाहरण ठरले असते. मात्र बोटचेप्यांकडून आणि लाळघोट्यांकडून अशा अपेक्षा करणे चुकीचे आहे. अर्थातच आपल्या वक्तव्याबाबत राऊत डॉक्टरांची माफी मागतील किंवा दिलगिरी व्यक्त करतील याची शक्यता कमीच आहे. मात्र डॉक्टरांचा उल्लेख करतांना आपण पातळी सोडली हे त्यांच्या आज ना उद्या ध्यानात येईलच. तरीपण त्यांची याप्रसंगी एकंदरीत वर्तणुक पाहता दाजिबा, गावात होईल शोभा हे वागणं बरं नव्हं असे म्हणावेसे वाटते.
दि १७ ऑगस्ट २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com