येरवाळीच महादू गावात आला. गावात चांगलीच गजबज दिसत होती. हिवाळ्याचे दिवस असल्याने सकाळच्या कोवळ्या उन्हात बरं वाटत होतं. पंचायतीच्या कट्ट्यावर, पारावार बरीचशी मंडळी गप्पा छाटत बसली होती. कमानीजवळच्या विठ्ठलच्या पानटपरीसमोरच्या बाकड्यावर नुकती मिसरूड फुटलेली दोन तीन कार्टी बसली होती. त्यांच्यात हसणं खिदळणं चाललं होतं. बाजारतळाच्या बाजूला असलेल्या निवृत्ती आणि गंगाराम न्हाव्यांच्या पत्र्याच्या खोक्यांसमोरही चारदोन माणसं रेंगाळत होती. गंगाराम न्हाव्याच्या हातातल्या वस्तऱ्यापेक्षाही त्याच्या तोंडाची टकळी जोरात चालली होती. गावातली न्हाव्याची दुकानं म्हणजे चालती बोलती आकाशवाणी केंद्रच जणू. अक्ख्या गावाचा हालहवाल जागेवर बसून कळत होता. हातात सायकल धरून महादू आजूबाजूचे निरीक्षण करत रेंगाळत चालला होता. मारुतीच्या देवळाम्होरं जाऊन त्यानं देवाला नमस्कार केला अन पुन्हा मागे वळून येत चार-दोन ओळखीच्या लोकांना रामराम करत, ख्याली खुशालीचे दोन शब्द बोलत महादू आपल्या दोस्ताच्या म्हणजे गणपत टेलरच्या दुकानाकड आला. त्याला बाहेर सायकल लावताने पाहताच गणपत टेलर आनंदाने म्हणाला 'ये रे म्हादबा, आज बरा येळ मिळालाय तुला?

'आल्तु आपलं, वाईच जरा काम हुतं' असे म्हणत महादू, टेलर समोरच्या स्टुलावर येऊन बसला.

'कोणाकडं तंबाट्याच बेणं मिळल का रं, उंदरांनी पार खाऊन टाकलं मागच्या सालाच' महादूनं गणपतला इचारलं.

गणपत टेलरनं बसल्या जागेवरूनच तंबाखूची लांब पिचकारी मारली. बाहेर डोकावून शेजारच्या अंकुश हॉटेलवाल्याला बोटानेच दोन चहा आणायची ऑर्डर दिली अन पुन्हा जागेवर बसत म्हणाला,

'हिथं कोणाकडे घेण्याऐवजी संगनमेरला जा ना लेका. इस्टॅण्डच्या पाठीमागे शेतकी संघाचं बेश्ट दुकान निघालंय, तिथं सगळं मिळतय, अगदी खात्रीशीर' गणपतने सविस्तर माहिती दिली.

'वा रे बहाद्दर, चाराण्याची कोंबडी अन बाराण्याचा मसाला, हे बाकी बेस हाय सांगणं तुझं' खळाळून हसत महादू म्हणाला. तेवढ्यात अंकुशने चहा आणला. गरम गरम चहाचा घोट घेत टेलर म्हणाला 'बास का मर्दा, एवढं पैशाचं गठूळ काय नुसतं पुरून ठिवायचंय व्हय घरात!, कर जरा खर्च' गणपतला महादूच्या आर्थिक परिस्थितीची सगळीच माहिती होती.

'नवराबायको रोज मरमर कष्ट करतायसा, पैका भी मिळतुया त मग केली जरा हौसमौज तर काय बिघडल व्हय' टेलरच्या या बोलण्यावर महादू इचारात पडला. चार इकडच्या तिकडच्या गोष्टी करून महादू गणपत टेलरला 'जातु म्या मळ्याकडं' असं म्हणत बाहेर पडला. त्याची सायकल मळ्याच्या दिशेने निघाली अन सायकलच्या चाकाबरोबरच डोक्यातही विचारचक्र सुरु झालं. थोड्यावेळातच त्याला टेलरचा मुद्दा पटला अन 'झालं तर झाला खर्च, पण संगनमेरला जायाचच' असं मनाला बजावत तो सायकल चालवू लागला. मनातील विचाराने त्याला अजून उभारी आली अन सायकलच्या पँडलवरचा रेटाही वाढला.

..............वस्ती जवळ आली. धुरपती वट्टयावरच दळण पाखडत बसली होती. महादूनं सायकल पडवीत लावली. घरातून एक पाण्याचा तांब्या भरून घेतला, एक खळखळून चूळ भरली अन पाणी पीत धुरपतीजवळ मांडी घालून बसला. धुरपतीने एकवार त्याच्याकडं बघितलं अन म्हणली 'मिळालं का वं बेणं?

'न्हाई मिळालं पर मिळलं, त्यासाठी संगनमेरी जाया पाहिजे' महादू म्हणाला तसा तिचा हात थांबला.

'काय म्हंतायसा धनी, एवढुसं बेणं आणायला पार संगनमीर? काय खूळ लागलया का काय!' लटक्या रागाने अन प्रेमाने खुदखुदत धुरपतीने इचारलं. महादू जरा सावरून बसला अन म्हणाला 'मी काय म्हंतु धुर्पा, जाऊ कि आपण दोघं पण संगनमेरी. बेणं पण आणू अन येऊ जरा फिरून. तुला शनिमा पण दावतो, येऊ आपली जीवाची मंबई करून' असं म्हणल्यावर मात्र धुरपतीला हसूच आवरेना. तोंडावर पदर धरून हसत ती म्हणाली

'आता मात्र तुमच्यावरून एखांदी कोंबडी बिम्बडि ववळून टाकाय पाहिजे, येतायेता काय लागीर झालंय का काय तुम्हास्नी'

'आपुन दोघं रोज मरमर कष्ट करतुया, पैका भी बरा मिळतुया त मग केली वाईच हौसमौज तर काय बिघडल व्हय'

गणपत टेलरचं हे वाक्यं महादुने फेकलं अन धुरपतीला पण वाटलं खरंच किती महिने झालं आपण कुठं गेलो नाही. मागच्या साली यशोदेच्या पोराच्या लग्नाला वडगावला गेलो होतो तेवढंच. तिलाही जाऊशी वाटलं .

'मग खरंच जायाचं म्हंतायसा? आवं पर आपल्या ह्या द्वाडांचं काय करायचं? त्यान्ला चारापाणी पाह्यला नको? धुरपतीने मुद्दा काढला.

'तू नकु काळजी करू, मी हणम्याला सांगतो दिसभर वस्तीवर राह्याला' महादुने अगोदरच मनात योजलेला पर्याय सांगितला.

'त्ये पेताड हणम्या, पिऊन पडल कुठं अन जनावर बसतील वरडत दिसभर' तिने शंका काढली.

'आगं नाही गं, रिकामा असतूय तव्हा पितंय कधीमधी, पण काम मातुर चोख करतंय.' असं म्हणत तटशीरी महादू उठला अन 'आलोच जाऊन' म्हणत चालायला लागला.

'आवो, कुठं चाल्लईसा?. अचानक त्याला निघालेला पाहून धुरपतीने त्याला विचारलं

'अगं काल शिरपत आण्णा म्हणत हुतं, खत पसरायला हणम्याला बलावलंय म्हणून. आला आसल तर लगीच त्याला सांगून येतो' असं म्हणत महादू बांधाबांधाने वरती निघाला. चार पाच शेतं सोडून महादूच्याच भावकीतल्या शिरपत अण्णांची बारखटी होती. महादू तिथे पोचला तर शिरपत आण्णा खताची बैलगाडी खाली करत होते, त्यांची बायको अन सून कांदे निंदित व्हत्या अन हणम्या खालच्या बाजूला फावडीने खताचे ढीग पसरवत होता. महादूला पाहून आण्णांनी गाडी थांबवली अन म्हणले 'काय रं म्हादबा, आज काय काम काढलंस इकडं?

'ते आपलं हणम्याकडं जरा काम हुतं. उद्या जरा संगनमेरी जायचा हाय, म्हणून म्हटलं हणम्या दिसभर वस्तीवर राहील. तेच त्याला सांगाया आलुय' एवढं बोलून तो हणम्याकडं जाऊ लागला.

पण अण्णांनी त्याला अडवत इचारलं 'एकदम संगनमेरी, अन धुरपी हाय ना घरी, का जोडीनं जायाचं हाय?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel