रे मानवा,
बघ तरी जरा हा
माझा नजारा...
रंगांची उधळण
गंधांचा दरवळ
पक्ष्यांचा कलरव,
आणि फळांचा मेवा...
बयेचा खोपा
मुंग्यांचं देखणं वारुळ,
मधमाश्यांचं पोळं
आणि शिंप्याचं सुबक
विणलेलं घरटं...
तुझ्यातल्या अहंकाराने
तू बनलायस एक धृतराष्ट्र
करते ढवळाढवळ जरी,
तुझी अविचारी,आत्मकेंद्री वृत्ती
तरीही...
आजही भिजल्या ऋतूला
सलामी देतेय ना इंद्रधनुष्य!
अन् शरदाच्या टिपूर चांदण्यात
उलगडते शशीचे रुपेरी रहस्य!
रोजच होतो सुवर्णसोहळा उगवतीला
आणि जाता जाता तो सहस्ररश्मी,
देऊन जातो हजारो सुवर्णक्षण!!
तू लोटलेल्या विषांनी
जीवनदायिनी शहारल्या,
तुझ्या करामतींनी
त्या व्याकूळ झाल्या।
असंख्य जलचरांचे मृतदेह
टाकून किनार्याला,
त्या बापुड्या शांतपणे
वाहात राहिल्या।
हिरवाईला करुन नेस्तनाबूत,
तू उभारलीस सिमेंटचीच जंगले,
आणि प्लॅस्टिकचे डोंगर।
गिळलेस तू कित्येक अधिवास
अन् झाले कित्येक जीव इन्डेंजर।
तुझ्या कृत्यांचे बुमरँग इफेक्टस्
तुला करतील त्रस्त,
घेईल एक्झिट तेव्हा,
तुझ्यातला धृतराष्ट्र!
अन् तुझे तुलाच कळणार,
तू तर आहेस माझीच
'नॅनोआवृत्ती'!
म्हणशील मग स्वतःला,
तू "एक निसर्गपुत्र"!!
जपशील जीवापाड तू,
परिसंस्था आणि अधिवास
नद्या,सागर आणि वनराई!!
होशील समर्पित पर्यावरणासाठी
आणि मिळवशील जगण्यातला
तू शोधित असलेला,
'शाश्वत आनंद'!!!