अवघा जन्म सार्थ जाहला........... दर दिवाळीत कुठेतरी ट्रिप चा प्लॅन असतो. पण यावेळी काही पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे असे काही प्लांनिंग केले नव्हते. पण दिवाळीच्या आदल्या दिवशी सकाळीच साताऱ्यातून बाहेर पडलो. संगमनेरला गावी जायचा प्लॅन होता. पण बरेच दिवस पुणे नाशिक रोड वरील `भीमाशंकर कडे' हा बोर्ड खुणावत होता. म्हणून आज मग राजगुरूनगरहुन भीमाशंकर रोड पकडला. चासकमान डॅमच्या कडेकडेने ५५ किलोमीटरचा प्रवास छान झाला. नेट वरून `नीलम' हॉटेल बघून ठेवले होते. तिथे पोहोचलो तेंव्हा इंटरनेटवरील फोटो आणि सत्य परिस्थिती यात फारच फरक होता. तसे खोटे काही नव्हते. ५० एकराचा परिसर, ३० रूम, स्विमिन्ग पूल, डाईनिंग हॉल, प्रत्त्येक रूमला सेपरेट सीट-आऊट, इतकेच काय तर अगदी डिस्को थेक पण होता. नव्हते ते फक्त गिर्हाईक. आख्या हॉटेल मध्ये एक रूम गेलेली होती, त्यात एक आजी आजोबा होते आणि त्यांची मुलगी होती. आणि नंतर एक गाडी आली त्यातून ४ फॉरेनर्स आले. साहजिकच सगळेच इंटरनेट वरून फोटो बघून आले होते. मेंटेनन्स अभावी हॉटेलची रया गेली होती. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट पण गिर्हाईक नसल्याने धूळ खात पडली होती...............
थोडासा आराम करून पुढे १५ किलोमीटरवर असलेल्या भीमाशंकर ला गेलो. तिथल्या निसर्ग सौंदर्याबद्दल ऐकून होतो, पण सातारकर असल्याने जे होते त्यात नवलाई नव्हती. साताऱ्यातील अनेक स्पॉट यापेक्षा अनेक पटींनी सुंदर आहेत. आणि रस्ता म्हणजे जवळ जवळ नव्हताच म्हणायला हरकत नाही. आमच्या मनात तशीही धार्मिकता फार नसल्याने स्थल माहात्म्य बघून होणारा आनंदही फार नव्हता. तेंव्हा जाणाऱ्यांनी केवळ देवदर्शन हाच हेतू ठेऊन जावे. रात्री हॉटेलच्या डायनिंग हॉल मध्ये जेवायला आम्ही तिघे म्हणजे मी, वंदना आणि संकेत. बाकी २ रूम वाल्यांनी रुम मधेच जेवण केले. आमच्यासाठी खास खालच्या गावातून चिकन आणून जेवण तयार केलेले होते. गावही असे कि साधी डोकेदुखीची गोळीही मिळणार नाही. हॉटेल मधल्या स्टाफने खास आमच्या तिघांसाठी डिस्को थेक चा हॉल उघडला. नुसता उघडलाच नाही तर सर्व डिस्को लाईट्स, मोठमोठे स्पिकर्स चालू केले. आम्ही आपले १० मिनिटे उभे राहून परत फिरलो. सकाळी लवकर उठून गावाकडे सुटावे असे ठरले. जाताने मंचरला जायचे नि हायवे ने संगमनेरकडे निघायचे असेच ठरवले होते. पण मंचरच्या अलीकडे २० किलोमीटर वर `शिवनेरी-२० कि.मी.' असा बोर्ड दिसला. मंचरला जाण्याऐवजी जुन्नर वरून नारायणगावला जाऊ असे म्हणत गाडी वळवली. जुन्नरला पोहोचे पर्येंत शिवनेरी बघूया असा काही बेत नव्हता कारण १० वाजताच उन्हाचा चटका जाणवत होता. पण आलोच आहोत तर किमान पायथ्यापर्यंत तरी जाऊन येऊया असे म्हणत निघालो आणि जे काही अनुभवले त्याने अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. खरेतर महाराष्ट्रात अनेक गड किल्ले आहेत. अनेकांची अवस्था फार वाईट झालीय. पुरातत्व खाते आपल्या मालकी हक्काचा बोर्ड लावण्याव्य तिरिक्त काहीच करत नाही, आणि इतिहासाचे साक्षीदार असलेले हे गड कोट निसर्गाच्या थपडा झेलत कसे बसे आपले अस्तित्व टिकवून आहेत.
पण `शिवनेरी' यातून वेगळा आहे. किल्ल्याची दर्शनी बाजू जुन्नर शहराच्या विरुद्ध दिशेला आहे, त्यामुळे जंगलातून वळसा घालून गेल्यानंतरच किल्ल्याची तटबंदी दिसू लागते. एक किलोमीटर अलीकडूनच काँक्रीटचा भव्य रस्ता केलाय. गाडी पार्क करून पायऱ्यांकडे वळलो आणि समोर दिसला तो महा दरवाजा. अतिशय सुरेख दगडांमध्ये बांधलेल्या भव्य पायऱ्या, मुख्य दरवाजा, आणि पुढे असेच ५-६ दरवाजे आहेत. हा किल्ला पुरातत्व खात्याने खूप सुंदर केलाय. जुन्या इमारती, रस्ते, बुरुज यांची झालेली पडझड व्यवस्थित डागडुजी करून उभी केलीय. मोकळ्या जागांवर सुंदर बागा उभ्या केल्यात. स्वछता तर डोळ्यात भरणारी, कागदाचा कपटा हि कुठे दिसणार नाही. आम्ही वर वर जात होतो. वरच्या पठारावर अजून या सुधारणा पोहोचायच्या आहेत. तसे रेलिंग, वृक्षरोपण केलंय, पण रस्ते अजून तसेच आहेत. त्या दगडी पायवाटेवरून जावे लागते. अनेक ठिकाणी काळ्या दगडात अनेक तळी खोदलेली आहेत आणि त्यात भरपूर पाणीही आहे...............................
हे सर्व लिहिण्याचा मूळ उद्देश सांगतो. मी अनेक किल्ल्यांवर गेलोय, तसाच हाही एक दुर्लक्षित किल्ला असे मी समजत होतो. शिवाजी राजांचा जन्म इथे झालाय एवढे माहित होते. पण चालत चालत उत्तर बुरुजाकडे असलेल्या आणि अजून चांगले अस्तित्व टिकून असलेल्या इमारतीकडे आम्ही जेंव्हा गेलो तेंव्हा खरोखर अंगावर रोमांच उभे राहिले. ती इमारत होती शिवाजी राजांचे जन्मस्थळ. सोबतच्या एका चित्रात एका मोठ्या भिंतीत जो दरवाजा दिसतोय तो दरवाजा म्हणजे जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या खोलीकडे जाण्याचा मार्ग . या दरवाज्यातून आत एक अजून दरवाजा आहे तो त्या खोलीचा. ती खोली अजूनही आहे तशीच आहे. आत राजांचा एक पुतळा आणि त्यांचा पाळणा आहे. तिथे मस्तक टेकवताने मन भरून आले होते. जिथे आपण स्पर्श करतोय तिथे कदाचित राजांची छोटी छोटी पावले उमटली असतील. तिथल्याच जिन्याने वरच्या मजल्यावर गेल्यावर हवेशीर अशी मोठी जागा आहे, ज्याला आपण सज्जा म्हणू शकतो. छान दगडी कमानी आहेत. तिथेही बाळ राजे दुडू दुडू धावत बागडले असतील. पुन्हा बाहेर आल्यावर त्या टिकून असलेल्या इमारतीच्या आजूबाजूचा परिसर आणि त्यावर पूर्वी उभ्या असणाऱ्या भव्य वाड्याच्या जोत्याच्या खुणा आहेत. मधला चौक तर चांगलाच टिकून आहे. त्या परिसरात फिरताने आपण आतापर्यंत काय मिस करत होतो याबद्दल खंत वाटली. एक दोनदा जुन्नरजवळ जाऊनही किल्ल्यावर का गेलो नव्हतो याची हि खंत वाटली. असाच रोमांच पूर्वक अनुभव मी घेतला होता तो `रायगड' चढलो तेंव्हा, आणि आज पुन्हा एकदा हा अविस्मरणीय आनंद घेत होतो. प्रत्येक मराठी माणसाने किमान एकदा तरी हा शिवनेरी आणि रायगड यांना भेट द्यायलाच हवी. पुणे नाशिक रस्त्यावर नारायणगाव वरून २० किलोमीटर अंतरावरील जुन्नर ला जाता येते. जुन्नर हे शिवनेरीच्या पायथ्याशीच वसले आहे. एकंदरीत छोटीशीच पण मनात कायम ची रुजलेली अशी आमची दिवाळीची ट्रिप मस्त झाली.....................
अनिल दातीर.