माझे फिरणे झाले असले तरी वंदना, संकेत यांची भटकंती बाकी होतीच. आम्हाला तिघांनाही रविवारी निसर्ग सानिध्यात फेरफटका मारून आल्याशिवाय जमतच नाही. दुपारी ३.३० ला परत बाहेर पडलो. बरेच दिवसात पाटेश्वर ला जायचे मनात होते. 'पाटेश्वर' हे खरे तर एक देवस्थान, पण आम्ही काही आवर्जून देवस्थानाला भेट देणाऱ्यातले नाही. पण तिथला निसर्ग आणि प्राचीन वास्तुकला बघण्यात आम्हाला नक्कीच इंटरेस्ट होता. सातारा ऍडिशनल एम.आय.डी.सी. तुन कारंडवाडी देगाव हा रस्ता जातो त्याच्या पुढेच हा पाटेश्वरचा डोंगर आहे. देगाव मधून उजवीकडे वळून काही अंतर गेल्यावर हा पाटेश्वर दिसू लागतो. हे एक दुर्लक्षित देवस्थान असल्याने इथला रस्ता फारच खराब आहे. घाटात तर रस्ता इतका लहान आहे कि समोरून दुसरी गाडी आली तर पास होणे फार अवघड. एका बाजूला कठडा नसलेली दरी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर. पण सुदैवाने ट्राफिक फार नाही. तरी पण श्रावणात आणि महाशिवरात्रीला इथे नक्कीच गर्दी होत असणार. तेंव्हा काय होत असेल हे पाटेश्वरच जाणे.
अर्ध्या डोंगरापर्यंत गाडी जाते. पुढे पायी जावे लागते. थोडेसे ट्रेकिंग. आम्ही पाटेश्वरला पोहोचलो. तिथे एक पुराण कालीन शिवमंदिर आहे. तिथे कुठे काही लिहिलेले नसल्याने हे मंदिर कधीचे हे कळायचा काही मार्ग नाही, पण एकंदरीत स्थिती बघता किमान १५०-२०० वर्षांपूर्वीचे बांधकामं असावीत. कोरीव काळ्याभोर दगडातील मंदिर, नंदी, आणि दीपमाळा अप्रतिम वास्तुशास्त्राचा नमुना ठरावा अशा आहेत. अलीकडे एक मोठी बांधीव बारव. माहुली, कोटेश्वर, यवतेश्वर, परळी येथील मंदिरे आहेत तशीच हि सर्व बांधकाम आहेत . खूप वर्षांपासून इथे एक मठ आहे. तेथील लोक इथली पूजा अर्चना करतात. २०-२२ वर्षांपूर्वी मी, शिशा, शैल्या, विन्या, पंड्या, देवा या मठात गेलो होतो, त्यावेळची गोष्ट आठवतेय. आम्ही बाहेर ओट्टयावर बसलो होतो. अनेक खारी आजूबाजूला फिरत होत्या. खार हि तशी एकदम लाजरी बुजरी. पण इथल्या खारुताई आरामात आमच्या भोवती फिरत होत्या. मी सहज एका खारीसमोर हाताची ओंजळ केली. खारुताईला वाटले काही तरी खायला देतोय. ती अगदी माझ्या हातावर लटकली आणि रिकामी ओंजळ बघून रागाने मला कडकडून चावली. अगदी एका सेकंदात तिने माझ्या बोटाच्या नखातून आरपार छिद्र करत चावा घेतला होता. इवल्याशा खारीच्या दातात एवढी ताकत असते हे अनुभव आल्यानंतर कळले. असो.
'पाटेश्वर' हे फक्त या मंदिरासाठीच प्रसिद्ध नसून आजूबाजूला दगडामध्ये कोरलेली शेकडो शिवलिंग (पिंडी) आहेत. मठाच्या पूर्व बाजूस दगडामध्ये कोरलेल्या ४ गुहा आहेत. मी पूर्वी गेलो होतो तेंव्हा त्या मूळ स्वरूपात होत्या पण आता त्यांना बाहेरून दगडी बांधकाम करून कमानी केल्या आहेत. पण आत गेल्यानंतर मात्र त्या कोरीव गुहा आहेत हे लगेच लक्षात येते. त्यातून ओघळणाऱ्या पाण्यातील क्षारांपासून चांगल्या रचना तयार झाल्या आहेत. या गुहांमधये अगदी मुठी एवढ्या पिंडी पासून चांगल्या १२-१५ फुटापर्यंत मोठ्या पिंडी आहेत. अनेक न ओळखू येणाऱ्या देवांच्या किंवा माणसांच्या कोरीव/ घडीव मूर्ती आहेत. एक माणसाचा चेहरा असलेला नंदी किंवा तत्सम प्राण्याची मूर्ती आहे. पण दुर्लक्षित असल्याने अनेक मूर्तींची तोंडे किंवा हात तोडून टाकलेल्या अवस्थेत आहेत. पुरातत्व खात्याच्या माहितीत हि गोष्ट नसावी. अर्थात असती तरी बोर्ड लावण्यापलीकडे त्यांनी काही केले नसतेच म्हणा. अजूनही पूर्वेला काही छोटी मंदिरे दिसत होती पण उशीर झाल्याने तिकडे गेलो नाही. इथे निवांत फिरायचे म्हणजे ४-५ तास पाहिजेत. मंदिराच्या आसपास गर्द जंगल असल्याने दिवसाही अंधारलेले वाटते. त्यामुळे आम्ही जरा लवकरच परत फिरलो. घाट उतरून घरी पोहोचतो अंधार झालेला होता. पुन्हा एक रविवार निसर्ग सानिध्यात सत्कारणी लागल्याचे नक्कीच समाधान होते ......
अनिल दातीर