साताऱ्याला निसर्गाने भरभरून दान दिलंय. अगदी आजूबाजूच्या सात-आठ जिल्यांमध्येही जे सृष्टिवैभव नाही ते साताऱ्यात मोठ्या प्रमाणात आहे. सह्याद्रीच्या राकट डोंगर दऱ्या, काळ्या कातळाचे उंच गिरिशिखरे, घनदाट हिरवीगार जंगले, भरपूर पाणीसाठे आणि यामुळेच असणारे मुबलक वन्यप्राणीजीवन, विविध पक्षांचे थवे आणि अजूनही बरंच काही साताऱ्यात विशेषतः पश्चिम भागात भरपूर आहे. पावसाळ्यात तर सातारा शहर आणि आजूबाजूचा परिसर तापोळा, बामणोली, कोयनानगर, म्हणजे निसर्गाचा मुक्त अविष्कार दाखवत घडी घडी निरनिराळ्या रूपात समोर येत असतो. पावसाची संततधार, गर्द धुक्याची शाल, ढगांचा अगदी जमिनीलगत वावर, आणि डोंगररांगामधून जाणारे वळणावळणाचे रस्ते. मार्व्हलस! हेच सगळे एन्जॉय करायला सातारकरांबरॊबरच,पुणे-मुंबई आणि इतर शहरांतूनही अनेक पर्यटक इथे हजेरी लावत असतात. बऱ्याचदा हे चांगलं कि वाईट हेच कळेनासे होते. कधी कधी वाटतं साताऱ्याकडे निसर्गाने दिलेले हे सर्व एवढं प्रचंड भांडवल आहे, त्याचाच योग्य वापर करून पर्यटनातून साताऱ्याचा विकास झाला पाहिजे. पण कधी कधी वाटतं नको तो शहरी बकालपणा, प्रदूषण, कचरा, ट्राफिक जाम. आपल्या साताऱ्याचे हे अबोध निसर्ग सौंदर्य असच निर्भेळ, शांत, निवांत, प्रदूषणमुक्त राहावं. असो. माझ्या वाटण्या न वाटण्याने फार फरक पडेल असं नाही. जे व्हायचं ते होणार आहेच. पण होणार असेल तर ते बकाल, बेताल न होता सिस्टिमॅटिक, वेल प्लॅन्ड, निसर्गाशी समतोल साधून सुधारणा झाल्या तर भविष्याच्या दृष्टीने उत्तमच.
या निसर्ग दर्शनाबरोबरच अजून एका गोष्टीसाठी अनेकांची पावले साताऱ्याकडे वळतात ते म्हणजे `ट्रेकिंग'
सातारा जिल्ह्यातील वासोटा, नागेश्वर, चकदेव, पर्बत असे काही ट्रेकिंग साठी योग्य स्पॉट आहेत. आम्ही पूर्वी वासोटा-नागेश्वर केलंय. म्हणून मग यावर्षी `चकदेव ट्रेक' करायचं ठरवलं. शनिवारी दुपारीच आम्ही बिल्डर्स असोसिएशनचे २३ मेम्बर्स बामणोलीकडे रवाना झालो. सहाजण दुसऱ्यादिवसशी सकाळी जॉईन झाले. आमच्या प्रकाश मुजुमदारांनी बामणोलीचे पांडुरंग गोरे (९४२३३ २८८८२) यांच्या बरोबरीने या ट्रेकची व्यवस्थित आखणी केली होती. बामणोलीतून डावीकडे दोन-अडीच किलोमीटरवरील पावशे गावच्या एका शेतामध्ये, शिवसागर (कोयना) जलाशयाच्या काठावर टेन्ट लावून आमची राहायची व्यवस्था केली होती. असं तळ्याकाठी टेन्ट टाकून राहणे हाही एक नक्की अनुभव घ्यावा असा प्रकार आहे. हे काही हॉटेल नव्हे. त्यामुळे टॉयलेट, अंघोळ, लाईट, रेंज अशा काही बाबतीत जरा असुविधा होऊ शकतात. शेतातच पांडुरंग आणि त्यांच्या साथीदारांनी दगडाच्या चुली करून खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. संध्याकाळी सहाच्या दरम्यान आम्ही पोहोचलो. सूर्य आपल्या अस्ताकडे निघालेला होता. सॅक बाजूला टाकत सर्वानी आपापले मोबाईल काढले आणि पुढचा अर्धा तास हळूहळू अस्तंगत होणाऱ्या त्या तेजोनिधीच्या विविध छटा अनेकांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त झाल्या. त्यातच हाती आलेल्या गरमागरम कोऱ्या चहाने त्या सूर्यास्ताची रंगत अजूनच वाढली.
काही टेंटमध्ये तीन तर काहींमध्ये चार जणांची झोपायची सोय होती. बाकी सर्व वावर मोकळ्या शेतात टाकलेल्या जाजमांवर. व्हेज-नॉनव्हेज चुलीवरचे जेवण, स्नॅक्स, पत्ते, गप्पा-गोष्टी, म्युझिक सिस्टीमवर लागलेल्या गाण्यांवर डान्स करत सगळेजण हळूहळू निद्राधीन झाले. मला तर त्या शांत वातावरणात कुठलाही आवाज नकोसा वाटत होता. पण एवढा मोठा ग्रुप एकत्र आला कि प्रत्येकाच्या एन्जॉयमेंटच्या कल्पना वेगवेगळ्या असतातच. एकंदरीत ती संध्याकाळ छान आनंदात संपली.
सकाळी बरेचजण लवकरच उठले. तिथे काही अंघोळीची वगैरे सोय नाही. थंडीमुळे पाण्यात जाऊन अंघोळ करणेही शक्य नव्हते. त्यामुळे अंघोळीला सुट्टी देत सर्वांनी आपापले आवरले. गरम गरम चहा घेतला आणि आलेल्या बोटींमध्ये जाऊन बसलो. बामणोलीचे फॉरेस्ट ऑफिस आठ नंतर उघडते. आम्हाला लांब जायचे असल्याने प्रकाशने इथेच बोटी बोलावल्या होत्या. त्याची रीतसर परवानगी घेतली होती. त्यामुळे पुन्हा बामणोलीत जाण्याचा फेराही वाचला. बोटीत बसण्याअगोदर आम्हाला सर्वांना दुपारच्या जेवणासाठी डबे तयार करून दिले होते. जवळच्या बॅगा गाडीतच ठेऊन फक्त जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, गॉगल, टोपी, इतर काही आवश्यक साहित्य घेऊन आम्ही बोटीत चढलो होतो. ट्रेकिंगला जाताने कमीतकमी साहित्य बरोबर घ्यावं म्हणजे मग चढ़ताने सोयीस्कर होते. एका बोटीत १४ आणि दुसऱ्या बोटीत १५ असे आम्ही २९ लोक चकदेव कडे निघालो होतो. आमचा प्रवास पश्चिमेकडे होत होता. थोड्याच वेळात पूवेकडून सूर्योदय होऊ लागला आणि ते नयन मनोहर दृश्य बघून सर्वजण आनंदित झाले. शांत जलाशय, आजूबाजूचे उंच डोंगर कडे, हिरवीगार जंगले आणि त्या डोंगरांच्या घळीतून होणारा बोटीचा प्रवास. अप्रतिम अनुभूती. बोटीचा थक-थक आवाज आणि इंजिन ऑईलचा वास या दोन गोष्टी जराशा त्रासदायक. पण काहीवेळाने याचीही सवय होऊन जाते आणि तो आवाज ऐकू येईनासा होतो.
काहीवेळाने दोन्ही बोटी एकमेकींच्या अगदी जवळ आल्या आणि पांडुरंगाने एका दोरीने त्या चालणाऱ्या बोटी एकत्र बांधून टाकल्या. चालू बोटीतच आम्हाला उप्पीटचा नाश्ता आणि चहा मिळाला. कुठल्याही पदार्थाची चव ही आजूबाजूच्या वातावरणाशी निगडित असावी. तो छानसा नाश्ता झाल्यानंतर काही
वेळाने बोट जरा किनाऱ्यावर लागली. प्रवास लांबचा असल्याने नैसर्गिक विधीसाठी थांबणे गरजेचे होतेच. प्रवास पुढे चालू झाला. काहीवेळाने किनाऱ्यावरून एक माणूस आम्हाला हात करून थांबवत होता. ड्रायव्हरने इंजिन बंद करून ऐकले. तो एक फॉरेस्ट गार्ड होता आणि त्यालाही तिकडेच ड्युटीवर जायचे होते. त्याला घेण्याकरता बोट किनाऱ्याकडे गेली. एक छोटेसे गाव किंवा वाडी होती ती. घरं तशी लहान लहान, जर्जर झालेली पण तरीसुद्धा गावामध्ये एक बऱ्यापैकी टोलेजंग मंदिर. दुसऱ्या बाजूलाही थाडेसे उंचावर असेच एक छोटे गाव दिसत होते. तिथेही एक मोठे मंदिर दिसत होते. महाराष्ट्रातील अनेक खेडी अशी असतील कि गाव छोटेसे, सुविधा काही नाहीत. पण गावाच्या वेशीवर एखाद्या आमदार-खासदार फंडातून उभारलेली मोठी कमान आणि वर्गणी काढून बांधलेले भव्य मंदिर हमखास असतील. असो श्रद्धेचा प्रश्न आहे त्यामुळे यावर काही भाष्य करायला नको. कमानीसाठी मात्र कुठल्याही पुढाऱ्याने यापुढे निधी न देता तो गावाच्या विकास कामासाठी द्यावा हे मात्र माझे प्रामाणिक मत.
दोन-अडीच तासाच्या जलप्रवासानंतर बोटी किनाऱ्यावर लागल्या. कांदाटी खोऱ्याचा हा भाग. सर्व बाजूनी उंच डोंगर कडे, दाट जंगले आणि मध्ये कोयनेचे पसरलेले पाणी. बोटीतून उतरून आम्ही मार्गस्थ झालो. पांडुरंगाने आम्हाला कुठल्या बाजूने जायचे, काय काळजी घ्यायची, जाणाऱ्या ठिकाणाची थोडक्यात माहिती दिली. तो आणि त्याचा जोडीदारही आमच्याच बरोबर असणार होते. त्या जंगलातच `शिंदी' गाव लागले. चाळीस पन्नास घरांचे ते गाव. त्या गावातून एक रस्ता पूर्वेकडे तापोळ्याला आणि पश्चिमेकडे कोकणात जातो. (बामणोलीवरून पुढे तेटलीला जायचे, गाडी बोटीत चढवून पलीकडच्या गावात जायचे आणि तेथून रघुवीर घाटातून खाली कोकणातील मुंबई-गोवा हायवेवरील भरणे नाक्याला (खेड) पोहोचायचे असा एक रूट आहे.)
या शिंदी गावाजवळच आम्हाला फॉरेस्ट ऑफिसर आणि त्यांचा एक असिस्टंट भेटले. त्यांनी सर्वांच्या बॅगा चेक करून काही आक्षेपाहार्य वस्तू बरोबर नेत नाहीत याची खात्री करून घेऊन आम्हाला रीतसर परवानगी दिली. तिथून खरा चकदेव ट्रेक सुरु झाला. डोंगर चढाई तशी बरीच आहे. इथे रस्ता किंवा पायऱ्या नाहीत. पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्याने तयार झालेली घळ आणि जाऊन येऊन त्यातूनच तयार झालेली खडबडीत पाऊलवाट. काहीठिकाणी मात्र जरा अवघड चढण आहेत. एक-दोन ठिकाणी कड्याच्या अगदी बाजूने जावे लागते. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंच कडा. चुकून पाय घसरला तर कपाळमोक्ष. आता ठीक पण पावसाळ्यात इथून लोक कसे जात असतील हे आश्चर्यच आहे. तासाभराची चढण संपल्यानंतर जरा सपाट भाग आला. आमच्याबरोबर काही जरा स्थूल व्यक्तीही होत्या. पण त्यांनीही नेटाने हा टप्पा पार केला होता. पुन्हा जरा दाट झाडीतून जात असलेली चढण लागली अन पुन्हा जरा सपाटी असा प्रवास करत आम्ही या चकदेवला पोहोचलो.
`चकदेव' हे या गावाचे नाव आहे. सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सीमेवरील हे गाव. या उंच डोंगरावर शहरी पणापासून दूर असलेले हे २०-२५ घरांचे गाव. इथे लोक का राहत असतील हा प्रश्न नक्कीच पडेल. तशी सरकारी कृपेने इथे लाईट पोहोचली आहे. बाकी गावाला एक लांबचा वळसा घालून तापोळ्याकडून येणारा एक घाट रस्ता आहे. पण वाहन येईल असा नसावा. जमेल तिथे सपाट भाग मिळेल तिथे असणारे शेतीचे पट्टे. राजगिरा, नाचणी, वरई अशी पिकं इथं घेतली जातात. गावाबाहेर एक पांडव कालीन `श्री.शैल्य चौकेश्वर' शिवमंदिर आहे. या मंदिराचा परिसर हाच सर्व ट्रेकरसाठी आश्रयस्थान. थकले भागलेले जीव त्या गार फरशीवर आडवे होत विसावा घेतात. तसं म्हणलं तर ठरवलेले ठिकाण तेच होते पण हा ट्रेक इथेच पूर्ण होत नाही. इथून पुढे पश्चिमेच्या कड्याच्या बाजूला कोकणात उतरण्यासाठी लोखंडी शिड्या केलेल्या आहेत. तिथे भेट देणे हाही या प्रवासातील रोमहर्षक क्षण आहे. चकदेव पासून पुढे दीड-दोन किलोमीटर अंतर घळीतून, चढ उत्तर करत पार केले कि हा कडा दिसतो. तिथून खाली डोकावले कि खालचे डोंगर बरेच खाली आहेत. महाबळेश्वराच्या ऑर्थर सीट पॉईँवरून खाली उतरायचे म्हटले तर कसे वाटेल तसाच हा भाग. आजूबाजूचे कातरल्यासारखे वाटणारे डोंगर कडेही अगदी तसेच. हा टप्पा पार करण्यासाठी इथे तीन लोखंडी शिड्या लावल्या आहेत. कोकणातील खेड कडून येणारे ट्रेकर्स या शिड्या चढून वर चकदेवला येतात. आपल्याकडून जाणारे एक अनुभव म्हणून या शिड्या उतरून परत वर चढून येतात. जरासा भीतीदायक प्रकार आहे हा. अंगात धाडस असायला पाहिजे. तसे फार भयानक नाही पण चुकून हात किंवा पाय सटकला तर काय असं मनात वाटणं ....हाच या शिड्यांवरचा रोमहर्षक क्षण. आम्ही यातील एक शिडी उतरून परत चढून आलो. आमच्यातील तिघेजण मात्र त्या तीनही शिड्यांचा अनुभव घेऊन आले. रस्त्यात आम्हाला खेड वरून आलेला १०-१२ जणांचा ग्रुप दिसला. तसाच आमच्या मागून साताऱ्यातूनच आलेला ३७ जणांचा एक ग्रुप भेटला. या ग्रुपमध्ये काही महिला आणि मुलंही होती.
शिड्यांचा अनुभव घेऊन आम्ही सर्वजण पुन्हा त्या मंदिरात आलो. आमच्याबरोबर दोन कुत्री अगदी शिंदी गावापासून बरोबरच वर आली होती. जातानेही त्यातील एक अगदी आम्ही बोटीत बसेपर्यंत आमच्याच बरोबर होते. एव्हाना सर्वांना भुका लागल्या होत्या. मंदिराच्या छान, थंडगार, हवेशीर आवारात बसत सर्वांनी आपल्याबरोबरील डबे काढले. पांडुरंग दादांनी त्या डब्यात पोळ्या, मटकीची भाजी, सुकी डाळ असं छान जेवण दिलं होतं. एक गावकरी आमच्या बरोबर गप्पा मारत होता. नंतर त्याने घरी जाऊन ताकाच्या दोन किटल्या भरून आणल्या. त्या वातावरणात त्या ताकाची चव अप्रतिम लागली. त्याला त्या ताकाचे पैसेही कोणीतरी देऊन टाकले होते. मंदिराच्या बाहेर काही चौथरे आणि त्यावर तुळशी वृन्दावनासारखी बांधीव कट्टे होते. अगोदर ते कुठल्यातरी देवांचे असावेत असे वाटले. पण त्यावर लिहिलेल्या दगडांवर वाचले तेंव्हा कळले कि ते त्याच गावातील देवाघरी गेलेल्या लोकांच्या स्मृतिप्रीतीर्थ केलेली बांधकामे आहेत.
त्या हवेशीर जागेत अनेकांचा डोळा लागला होता. पण परत सगळा डोंगर उतरून जायचा होता. त्यामुळे मग फार न रेंगाळता आम्ही सर्वजण परत निघालो. चढ़ताने काही ठिकाणी विशेष अवघड वाटले नसले तरी उतरताने अनेकांचे गुढगे घाईला येतात. दोन-तीन जणांना थोडासा त्रास झाला पण फार काही गडबड न होता आम्ही बोटिंजवळ परत पोहोचलो होतो. एकंदरीत सहा किलोमीटर जायचे आणि यायचे असे मिळून १२ किलोमीटरचा हा ट्रेक झाला होता. सातारा ते बामणोली ४५ किलोमीटर. तिथून अडीच तासाचा बोटीचा प्रवास तीस-पस्तीस किलोमीटर. एकूण जाऊनयेऊन सातारा ते चकदेव ८०-९० किलोमीटरचा प्रवास.
वर चढायला दोन-अडीच तास लागले असले तरी उतरायला मात्र एक तासापेक्षाही कमी वेळ लागला. काहीजणांना दीड तास लागला. पुन्हा बोटीचा प्रवास सुरु झाला. अनेकजणांनीं डोळे मिटून घेत डुलक्या घ्यायला सुरुवात केली होती. हा परतीचा प्रवास मात्र फारच कंटाळवाणा होतो. आमच्या गाड्या लावलेले ठिकाण येता येत नव्हते. दुरून जसे ठिकाण दिसू लागले तसे सर्वांना हायसे वाटले. जलाशयातून वासोट्यावरून येणाऱ्या काही बोटी पास झाल्या होत्या. आमच्या टेन्ट जवळ पोहोचून सर्वांनी आपापल्या बॅगा गाड्यांमध्ये टाकल्या आणि परत साताऱ्याला आलो. अशाप्रकारे हा साहसपूर्ण आनंददायी `चकदेव' ट्रेक पूर्ण झाला आणि माझ्या भटकंतीत अजून एका सोनेरी पानाची भर पडली. भेटूच पुन्हा अशाच एखाद्या भटकंतीनंतर ....................
अनिल दातीर