रोज सकाळची माझी एकट्याची आणि रविवारी संध्याकाळी वंदना आणि संकेत बरोबरच्या माझ्या भटकंतीला आता खूप वर्षे झालीत. सुरुवातीला मी कुरणेश्वर- खिंडीतल्या गणपतीला जायचो. नंतर एका मित्राने सांगितले म्हणून यवतेश्वरच्या घाटात गेलो आणि घाटाचाच एक भाग बनून गेलो. आठ दहा वर्ष तरी घाटात सकाळी फिरलो असेल. भर पावसातही पावसाच्या धारा अंगावर घेत आणि गुणगुणत मी या घाटात अनेकदा फिरलोय. तसा मी कायमचाच 'एकला चलो रे' या आवडीचा. कुणाबरोबर गप्पा मारत चालण्यापेक्षा निसर्गाशी एकरूप होत त्याचे आवाज ऐकत चालायला मला आवडते. पण ४ वर्षांपूर्वी घर बदलल्याने घाटात जाणे बंद झाले. वर्ष दीड वर्ष स्टेडियमलाही गेलो. इथे खूप माणसे भेटतात हा एक फायदा पण धुळीने मात्र बेजार होतो. मोकळ्या हवेत म्हणून फिरायला जायचं आणि येताने शिंकत यायचं म्हणून मग स्टेडियमही बंद केले आणि म्हसवे, सैदापूर, रानमळा, पानमळा इकडे फिरायला लागलो. हा भाग तर सदाहरित. हिरवीगार शेते, खळखळ वाहणारे पाट पाणी, पक्षांचे आवाज, मोरांचे थवे आणि बरेच काही माझ्या आवडीचे. या फिरतीलाही आता दोन-तीन वर्ष होतील.
या भटकंतीत अनेक प्रकारच्या व्यक्ती भेटतात. घाटात फिरताने समोरून कुणी आले कि 'हरी-ओम' म्हणून केलेलं अभिवादन खूप छान. कुठे 'नमस्ते, चला, गुड मॉर्निंग,...... शब्द वेगवेगळे असले तरी भावना मात्र आनंददायी असतात हे नक्की. अनेकदा आपल्या ध्यानीमनी नसतानेही लोकांनी आपले चालणे नोटीस केलेले असते. एकदा असेच एका कापड दुकानात एक माणूस भेटला. 'साहेब, घाटात रोज फिरायला छान वाटत असेल ना? असे म्हणाला. हो....., तुम्ही पण असता का? ''नाही हो, मी अटाळीचा आहे. रोज सकाळी एसटीतून येताने तुम्ही दिसता'...त्याने एसटीतून मला बघून लक्षात ठेवले होते. मागील वर्षी बोगद्यातील एका टपरीवर काहीतरी घेण्यासाठी थांबलो होतो. ''काय साहेब, आजकाल दिसत नाही फिरायला?' त्याने विचारले. मी आश्चर्यचकित झालो. तो फिरायला येत असेल असेही वाटत नव्हते. आणि त्याने दुकानही अलीकडेच टाकले होते. पण माझे भाव पाहून तोच म्हणाला 'अहो साहेब, या शेजारच्याच घरात मी राहतो. तुम्ही जाता येता पूर्वी नेहमी दिसायचा, आजकाल दिसत नाही''......
दोन वर्षांपूर्वी असाच अरुण टेलर्सच्या दुकानात गेलो होतो. ''या या साहेब, अलभ्य लाभ' असे म्हणत त्यांनी माझे मनापासून स्वागत केले. मला काही लिंक लागेना, मी यांना ओळखतो? माझ्या चेहऱ्यावरील कन्फ्युजन पाहून तेच म्हणले 'साहेब, घाटात फिरायला असता ना? मीही असतो बऱ्याचदा'' मग मला लिंक लागली कि हा चेहरा कुठे पाहिलाय. फिरणाऱ्या अनेक व्यक्ती अशा चेह्ऱ्यानेच माहीत असतात. नावाचा काही संबंध येत नाही. पु.ल. म्हणाले होते तसे 'रोज येणारा पोस्टमन साध्या कपड्यात ओळखणे कठीण' तसे फिरणारे बऱ्याचदा हाप चड्डी, किंवा स्पोर्ट पॅन्ट आणि टी शर्ट अशा रूपात भेटतात, पण तीच व्यक्ती अपटुडेट कपड्यात बाहेर कुठे भेटली तर ओळखणे मुश्किल होते. मला तर लोक खरेच लक्षात राहत नाहीत. अनेकदा लोक भेटतात 'काय, कसे काय, असे बोलून 'चला येतो' म्हणत निघून जातात. पण मला मात्र हे कोण होते ते आठवत नाही. आपण यांना कुठेतरी भेटलोय, एवढी नोंद मात्र मनाच्या कोपऱ्यात असते. असो.
या जशा 'व्यक्ती' भेटतात तशा अनेक 'वल्लीही' भेटतात. काही लोक फिरून येताने बऱ्याचदा कडू लिंबाच्या फांद्या घेऊन येतात.गुढी पाडव्याला ठीक आहे. (तो दिवस तर लिंबाला ओरबाडण्यासाठीच असावा. आपट्याच्या पानांसाठी दसरा म्हणजे जसा हाराकीरीचा दिवस तसा कडुनिंबासाठी पाडवा जीवघेणा) पण बऱ्याचदा या लिंबाच्या पाल्याचे रोज काय करत असतील ही शंका मनात येते. पाडव्याला सुद्धा पुजेपुरती एखादी छोटी फांदी पुरेशी असते पण लोक मात्र कधी नव्हे ते मिळाल्यासारखे जमेल तेवढ्या फांद्या ओरबाडून आणतात. काही लोकांना चालता चालता लिंबाच्या काडीने दात घासायची सवय असते. चांगले आहे पण मग एखादीच लिंबाची काडी मोडून घ्यावी ना, असे न करता चांगली एक फांदी तोडून घेऊन पुढे चालत राहतील आणि मग त्यातून एक मनपसंत काडी निवडून घेऊन बाकीची फांदी टाकून देतील. ती फांदी बहरण्यासाठी त्या झाडाला किती कष्ट पडले असतील? त्यालाही जीव असेल, त्यालाही वेदना होत असतीलच ना? असा विचार का नाही करत. अर्थात सगळेच काही असे असंवेदनशील नसतात. किंबहुना निसर्गवेडेच जास्त असतात.
दुसरा एक प्रकार म्हणजे अनेकदा शाळकरी मुले किंवा तरुण मुलं रमत गमत घाटातून जात येत असतात. हातात दगड उचलून खाली झाडीत फेकत असतात. किंवा रात्रीच्या वेळी घाटातल्या कट्ट्यावर बसून समोर रंगीत पेयाच्या बाटल्या घेऊन मंडळी बसलेली असतात. त्यात एखादा हमखास पेयपान न करता फक्त चकणा चाखणारा असतो. यांच्या बडबडीला वैतागलेला असतो आणि टाईमपास म्हणून हातात दगड घ्यायचा आणि खालच्या झाडीत भिरकवायचा असा उद्योग चालू असतो. पण त्यावेळी असा विचार मनात येत नाही कि आपण फेकलेला दगड कुणाला लागू शकतो. माणसे नसतात खाली पण अनेक झाडांवर पक्षी असतात, माकड ससा, रानकोंबडी असे छोटे मोठे प्राणीही असतात. किडा मुंगी, कृमी कीटकही असतात. त्यांना हे दगड लागत नसतील का हो? एखाद्या झाडावर एखाद्या पक्षाने घरटे केलेले असेल, त्यात अंडी किंवा छोटी पिल्ले असतील. फेकलेल्या दगडाने हे घरटे नष्ट होत असेल. त्या पिल्लांसाठी चारा घेऊन येणारी आई जेंव्हा असे विस्कटलेले घरटे बघत असेल तेंव्हा तिला काय वाटत असेल. कदाचित त्या दगडाने एखादी नुकतीच पालवी फुटलेली एखादी फांदी तुटून पडत असेल, एखादी कळी उमलण्यागोदरच फांदीपासून तोडली जात असेल. त्या पक्षांना, किडा मुंग्यांनाही जगण्याचा अधिकार असतो. झाडे बोलत नसली तरी त्यांनाही जीव असतो, त्यांनाही वेदना होत असतीलच ना? मग का फेकायचे असे दगड?
तिसऱ्या प्रकारच्याही काही वल्ली भेटतात. इकडे म्हसवे, सैदापूर, रानमळा भागात अशा व्यक्ती भेटतात. इकडे बरेचसे ऊस असले तरी इतर अनेक पिकेही असतात. बांधावर फळझाडे असतात. काही लोक जाताने मोकळ्या हाताने जातील पण येताने मात्र एखादी पपई, हरभरा, भुईमूग, ऊस, चिंचा, चिक्कू, कैऱ्या, टोमॅटो, वांगी, मक्याची कणसे असे काहीतरी घेऊन येतील. तो शेतकरी तिथे नसताने त्याच्या शेतातून असे काही घेऊन यायची इच्छाच कशी होते? मी तर याला चोरीच म्हणेन. आणि शेतकरीही याला चोरीच म्हणतात. एकदा एका शेतात काही लोक वांगी आणि टोमॅटो तोडत होते. सवयीने मी बांधावर उभे राहून त्या शेतकऱ्याशी बोललॊ. 'काका, एकदम मस्त आलाय बरं का माल' ...... ''आलाय खरा, पण भाव कुठाय?...... आणि हे फिरस्तेही लै तकलिफ देत्यात, काही बाही उचलून नेत्यात'..... मी एकदम चमकलो. कदाचित त्याला फिरस्ते म्हणजे पालांमध्ये राहणारे, येता जाता मिळेल त्यावर हात मारणारे भुरटे असेही म्हणायचे असेल? पण मला मात्र वाटून गेले कि त्याचा रोख सकाळी फिरणारांवरच होता. आणि असे काही लोक मला दिसतातही. जी गोष्ट दहा वीस रुपये मोजून मंडईत मिळते, आणि तेवढे खर्च करण्याची तुमची ऐपतही असते तर मग विनाकारण त्या शेतातून का आणावे असे काही.
मी या भागात गेली दोन तीन वर्ष फिरतोय, माझे फिरणेही बहुतांशी वेळा मुख्य रस्ते सोडून बांधावरून, शेतातून, वाड्या वस्त्यांवरून असते. मलाही अनेक गोष्टी दिसतात पण मी एकदाही कुणाच्या गवताच्या काडीलाही हात लावलेला नाही. ते माझ्या बुद्धीला पटतच नाही. असो. व्यक्ती तितक्या प्रकृती.
तात्पर्य काय तर, निसर्गात आनंदाने फिरा, पण आपल्या कुठलीही कृतीने जाणते अजाणतेपणी कुणाचे नुकसान होणार नाही, निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अर्थात असे लोक फार थोडे असतात. निसर्गप्रेमीच जास्त असतात. पण मोजक्या काही लोकांमुळे सगळे फिरस्ते बदनाम होतात.
मग काय कधीपासून सकाळी फिरायला सुरु करणार? निसर्ग तुमची वाट पाहतोय......
अनिल दातीर. (९४२०४८७४१०)