परवा हैदराबादची बी.ए.आय. ची मीटिंग संपवून परत येताने, वेळ होता म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील `नळदुर्ग' किल्ल्याला भेट दिली. मी, विजय देवी, सचिन देशमुख, मंगेश जाधव, रामदास जगताप आणि सुहास शिंदे. सर्वांनीच या किल्ल्याला पसंतीची पावती दिली. हा भव्य किल्ला १२५ एकर मध्ये वसलेला आहे. इतिहास पाहता, किल्ल्याची निर्मिती १३ व्या शतकातील असली, तरी सध्याही टिकून असलेली हि मजबूत दगडी तटबंदी १५५८ साली बांधलेली आहे. आजूबाजूला पाण्याचा भव्य साठा आहे. हा किल्ला आदिलशाही, निजामशाही यांच्याशी संबंधित आहे. शिवाजी महाराजांचा येथे वावर नव्हता.
.................. मूळ लिहिण्याचा उद्देश म्हणजे, हा किल्ला सध्या पर्यटनासाठी सुशोभित करण्याचे काम एका खाजगी कंपनीला दिलेले आहे. १३०० कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. हि कंपनी किल्ल्यात सुंदर रस्ते तयार करतेय, मोठी झाडे आणि फुलझाडे लावतेय, त्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी काही तळी बांधून घेतलीयेत. पक्षमेकडील नदीवर बंधारा घालून वेगवेगळी तळी निर्माण केलीत. त्यात बोटिंग आणि इतर वॉटर गेम्स करतील बहुतेक. त्याच बरोबर पर्यटकांसाठी आकर्षण म्हणून काही ऍडव्हेंचर्स गेम्सची पण उभारणी चालू आहे. जसे रोप क्लाइम्बिंग, स्काय वॉकिंग. म्हणजे पर्यटक त्या निमित्ताने किल्लाही बघायला येतील आणि त्यांची करमणूक पण होईल. किल्ला फिरून बघण्यासाठी इलेकट्रीक बॅटरी कारची सोय केली आहे..............
मला हे काम नक्कीच आवडले. आपल्याकडील अनेक किल्यांची अवस्था अतिशय दारुण आहे, इतिहासाच्या त्या पाऊलखुणा निसर्गाच्या थपडा झेलत हळू हळू विनाशाकडे झुकत आहेत. हे सर्व किल्ले सध्या पुरातत्व विभागाकडे असतात, आणि त्यासाठी शासकीय निधीही दिलेला असतो, पण तो इतका तुटपुंजा असतोय कि त्याचा उपयोग या वास्तूंच्या संरक्षणाऐवजी पगार देण्यातच खर्च होतोय. आणि किल्ल्यांची डागडुजी बिल्कुलही होताने दिसत नाही.
................... तर असे किल्ले पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी खाजगी कंपन्यांना दिले आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून या किल्ल्यांची डागडुजी आणि निगा राखण्याचे बंधन घातले तर हा ऐतेहासिक ठेवा यापुढेही जिवंत राहील नाहीतर कालांतराने हे सर्व संपलेले असेल. आताच अनेक किल्ले दुर्लक्षित आहेत. पडझड झालेले बुरुज हे ऐतेहासिक ठेवा असले तरी ते बघायला येणाऱ्यांची संख्या कमी कमी होतेय.
..................... साताऱ्याचा विचार केला तर अजिंक्यताऱ्याची तटबंदी चांगली आहे, पण वरचा मोकळा भाग हा तसेच पडून आहे. त्या भागात खाजगी तत्वावर जर असे काही पर्यटंकासाठी आकर्षण निर्माण केले तर पर्यटकांचा ओघ वाढेल. तसेही कास / ठोसेघर साठी पर्यटक येतातच, त्यांना अजिंक्यतारा हे अजून एक आकर्षण निर्माण होईल. किल्ला फिरण्यासाठी इलेक्ट्रिक बॅटरी वाहने ठेवली तर तेही एक आकर्षण असेल. येथे येणाऱ्या पर्यटंकासाठी चांगल्या वर्तनाची नियमावली लावली तर किल्ल्याचे पावित्र्यही अबाधित राहील आणि स्वच्छता व संवर्धन सुद्धा होईल, आणि अजून काही पिढ्या या ऐतेहासिक वारशाचा आनंद घेऊ शकतील........
अनिल दातीर