या फोटोत जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर पहिल्या रांगेत टक्सेगी विद्यापीठातील सहप्राध्यापकां बरोबर आहेत.हा फोटो सन १९०२ मध्ये फ्रँन्सिस बेंजामीन जॉनस्टोन यांनी घेतला आहे. सन १८९६ मध्ये टस्केगी विद्यापीठाचे पहिले मुख्याध्यापक आणि अध्यक्ष बुकर टी. वॉशिंग्टन यांनी कार्व्हर यांना महाविद्यालयाच्या शेतकी विभागाचे प्रमुख होण्यासाठी आमंत्रित केले होते. कार्व्हर यांनी तेथे ४७ वर्ष अध्यापन केले होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये कार्व्हर यांनी शेतकी विभागाला संशोधन केंद्र बनवण्यात मोठा हातभार दिला आहे. त्या कालखंडात विदयापिठाचे मुख्याद्यापक दोन वेळा बदलले. त्यांच्या बरोबरीने कार्व्हरनी हि कामगिरी पार केली. त्यांनी हंगामी पिके किंवा पिकांची फेर पद्धती ज्यामध्ये जमीनिचा कस टिकुन रहावा यासाठी एकाच जमिनीत आलटूनपालटून वेग वेगळ्या पिकंची पेरणी करण्याचे तंत्रज्ञान सांगितले. त्यांनी शेतकर्यांना कापसा व्यतिरिक्त इतर अनेक नगदी पिकांची माहिती दिली. यामुळे मोठ्याप्रमाणात कापुस लावगवडी साठी वापरलेल्या जमिनीचा पोत सुधारतो. शेती क्षेत्रातील रसायनशास्त्रामधील संशोधनाची कार्व्हर यांनी सुरुवात केली होती. कार्व्हर यांनी कृष्णवर्णीय विदयार्थ्यांच्या पिढ्यांच्या पिढ्या शिक्षीत केल्या. या शिक्षणाचा वापर करुन कृष्णवर्णीय किमान आपला उदरनिर्वाह करु शकतील अशी प्रांजळ भावना कार्व्हर यांच्या मनात होती. जे त्यांना उपभोगता आलं नाही ते इतर कृष्णवर्णीयांनी उपभोगावं आणि समाधानाने आपलं आयुष्य व्यतित करावं ही भुमिका या मागे होती.
टस्केगी मध्ये असताना त्यांनी त्या काळाच्या पुढे जाउन "मोबाईल क्लासरुम" म्हणजेच चालते फिरते प्रशिक्षण वर्ग याची संकल्पना आणली. त्यांनी आपल्या गाडीला "जेसप वॅगन" असे नाव दिले होते. न्यु यॉर्क शहरातील एक मोठे भांडवलदार आणि दारशूर इसम मॉरिस केचम जेसप यांनी कार्व्हरच्या या स्तुत्य उपक्रमासाठी पैश्यांची मदत केली होती म्हणुन कार्व्हर यांनी या गाडीचे नाव "जेसप वॅगन" असे ठेवले होते. टस्केगी विद्यापीठात अध्यापन आणि संशोधनाचे काम करावे म्हणुन तत्कालीन मुख्याध्यापक वॉशिंग्टन यांनी कार्व्हर यांना इतर प्राध्यापकांच्या सरासरी पगारापेक्षा जास्त पगार देऊ केला. शिवाय जेंव्हा दोन अविवाहित प्राध्यापकांनी एकाच खोलीत रहाण्याचा नियम होता तेंव्हा कार्व्हरना राहण्या आणि वापराकरता दोन खोल्या देण्यात आल्या होत्या. या दोन्ही सवलतींवर इतर काही सहप्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली होती.कार्व्हर यांनी आपली विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी ही श्वेतवर्णीयांच्या महाविद्यालयातुन मिळवली असल्याने, काही सहप्राध्यापक कार्व्हरना गर्विष्ठ समजायचे.
कार्व्हरच्या अनेक कामांपैकी सर्वात महत्वाचे काम म्हणजेच कृषी प्रयोगक्षेत्रातील शेतातील प्रयोगांची पहाणी करणे आणि व्यवस्था बघणे.त्यांना संस्थेच्या उत्पन्नासाठी शेती उत्पादनांचे उत्पादन व विक्री यांचे व्यवस्थापन करावे लागायचे.परंतु ह्या सगळ्याचा मेळ नीट न बसवु शकल्याने, कार्व्हर एक वाईट व्यवस्थापक ठरले. सन १९०० मध्ये या सगळ्या कसरती करुन थकलेल्या कार्व्हर यांनी त्यांना करावी लागणारी लिखापढी आणि कागदपत्र यांची तक्रार केली. सन १९०४ मध्ये संस्थेच्या एका समितीने असे सांगितले की कुक्कटपालन विभागातुन होणार्या उत्पन्नाविषयी कार्व्हर यांचे अहवाल अतिशयोक्तीपूर्ण आहेत. या विषयावर तत्कालीन मुख्याध्यापक वॉशिंग्टन यांनी कार्व्हर यांना या प्रकरणाबद्दल समोरासमोर भेटून यावर प्रकाश पाडण्यास सांगितला. तेंव्हा कार्व्हर यांनी एक पत्र लिहिले होते. त्याचा मजकुर असा होता, " खोटारडा आणि फसवणुक कराणारा असा जर माझ्यावर शिक्कामोर्तब झाला असेल, तर मात्र हे मला मान्य नाही. तुमच्या समितीला जर वाटत असेल की मी जाणुनबुजुन खोटे बोललो आहे किंवा या फसवणुकीला जबाबदार आहे तर हे राजिनामापत्र मी तुम्हाला सादर करु ईच्छितो." मुख्याध्यापक वॉशिंग्टन यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या ५ वर्षात कार्व्हर यांनी असे अनेक वेळा राजिनामापत्र देउन धमकावले होते. त्याची कारणे ही वेगवेगळी होती. कार्व्हर यांनी नापसंती दाखवुनही समितीने त्याच विषयावर मुद्दाम काहीतरी प्रशिक्षणार्थ कार्यक्रम ठेवले असतील, किंवा त्यांच्या आवडी विरुद्ध इतर प्रशिक्षण केंद्र कार्व्हर यांना चालवायला सांगणे अशा अनेक कितीतरी बाबींनी नाराज होउन कार्व्हर यांनी राजिनामे दिले होते पण, दरवेळी मुख्याध्यापक वॉशिंग्टन यांनी सांभाळुन घेतले होते.