दुपारी तीन वाजता आम्ही वाडीच्या गाडीत बसलेलो होतो. आमच्या रूमपासून थेट अर्जुनवाडला जाण्यासाठी वाहन नव्हते. त्यामुळे आम्हाला पहिला आमच्या विश्रामबागमधून मिरजेला जाणारी अॉटो पकडावी लागली. तिथून आम्ही मिरज एसटी स्टँडवर पोचलो. तिथून नरसोबाच्या वाडीला जाणारी बस पकडली. अल्फा मला दरम्यानच्या प्रवासात या प्रकरणाबद्दल त्याने मनात बांधलेले प्राथमिक अंदाज बोलून दाखवेल, अशी माझी अपेक्षा होती. पण सबंध प्रवासात त्याने आजीबाईंच्या कोड्याविषयी चकार शब्दही काढला नाही. त्याऐवजी त्याने तो वेळ या हिवाळ्यातली थंडी गेल्यावर्षीपेक्षा कशी जास्त होती आणि त्याचे उन्हाळ्याच्या उष्णतेवर कसे परिणाम होतील याबद्दल काहीतरी भाकिते करण्यात घालवला. साडेतीनच्या सुमारास आम्ही अर्जुनवाड नावाच्या त्या छोट्या खेडेवजा वाडीत उतरलो. त्या गावाला वेगळे असे बसस्थानक नव्हते. नरसोबाच्या वाडीकडे जाणारा रस्ता त्या गावातून जात होता. तेथे मध्ये एका ठिकाणी बस थांबत होती. अल्फाने पाटीलबाईंनी चिठ्ठीवर खरडून दिलेला पत्ता मोठ्याने वाचला,
"'चावरे मळा, शेवटची गल्ली. पांढऱ्या रंगाचे घर. ' " तो म्हणाला, " कोणालातरी विचारावे लागेल. "
आम्ही तेथे कट्ट्यावर बिडीकाडी घेऊन गप्पा ठोकत बसलेल्या म्हाताऱ्यांच्या कळपातल्या एकाला तो पत्ता विचारला. त्याने दाखविलेल्या दिशेने आम्ही चालू लागलो. फारच छोटी वस्ती होती ती. रस्ते अरुंद आणि खाचखळग्यांनी भरलेले होते. रस्ते कसले, पायवाटाच होत्या त्या. आम्ही लोकांना विचारत विचारत अखेर चावरे मळ्यात येऊन पोहोचलो. त्या वाडीच्या शेवटालाच होता तो भाग. चालत चालत त्या वाटेच्या शेवटी आम्हाला दोन पांढरी घरे दिसली- एक उजव्या बाजूला होते आणि एक डाव्या बाजूला.
"अरेच्चा! इथे तर दोन पांढरी घरे आहेत. यातले आपल्या आजींचे घर कोणते? " मी गोंधळून म्हणालो. घराच्या गेटवर नावाची पाटी नव्हती.
"हे आहे आपल्याला हवे असलेले घर. " डाव्या बाजूच्या घराकडे बोट दाखवित अल्फा म्हणाला, " उजवीकडचे घर अगदीच टापटीप आणि स्वच्छ दिसतंय. बागेतल्या झाडांची व्यवस्थित काळजी घेतली गेली आहे. शोभेची झाडे आलिकडेच कापून त्यांना आकार दिला गेला आहे. एवढं साफसफाईचं काम एकटी म्हातारी बाई नाही करू शकत. त्याउलट डावीकडचे घर जुनाट, दुर्लक्षित वाटतंय. आवारातील झाडे सुकलेली आहेत. भिंतींवरचा रंग उडालेला आहे. हेच आपल्या आजीबाईंचे घर आहे. चल. "
करकरणारं गेट ढकलून आम्ही आत शिरलो. गेटच्या उजव्या बाजूला तारेचे कुंपण होते. डाव्या बाजूला पाण्याअभावी सुकून पिवळ्या पडलेल्या गवताचा बगीचा होता. त्याच्या भोवतीने शोभेच्या झाडांचे सुकलेले अवशेष होते. गवतावर पालापाचोळा पसरला होता. समोर पांढऱ्या रंगाचे (पण त्यावर बरेच हिरवट पिवळट डाग पडलेले) घर उभे होते. घरासमोरील जागा तेवढी झाडून स्वच्छ ठेवलेली होती. घराच्या उजव्या बाजुने मागे जाण्यासाठी चिंचोळा रस्ता होता. आम्ही दारापाशी आलो. घरासमोरील पॅसेजला लोखंडी दरवाजा होता आणि लोखंडी ग्रीलने तो पॅसेज बंदिस्त केला होता. आतमध्ये अजून एक दरवाजा होता, जो लाकडी होता. मी लोखंडी दाराची कडी वाजवली(घराला बेल नव्हतीच). सुरुवातीला काहीच प्रत्युत्तर आले नाही.
"थोडंसं जोरात वाजव. " अल्फा म्हणाला. मी जोर लावून कडी वाजवली. आतून पावलांचा आवाज आला. लाकडी दार उघडले गेले आणि आतून काठी टेकत आजीबाई बाहेर आल्या.
"आले आले. " त्यांनी लोखंडी दार उघडले, " माफ करा बरं का. जरा डोळा लागला होता. या आत. "
आम्ही आत प्रवेश केला.
तसे ऐसपैस होते ते घर. पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचे बांधकाम असावे. हॉलमध्ये सोफा होता. त्यावरील बसकणींच्या कडांमधून कापूस बाहेर येत होता. त्यासमोर चहाचे कप वगैरे ठेवण्यासाठी असलेलं छोटं टेबल होतं. समोर जुनापुराणा टिव्ही होता. घरात तसं मोजकंच सामान होतं.
"चहा करू का रे पोरांनो? " आजींनी आपुलकीने विचारले. आम्ही एवढ्या लांबून त्यांच्या घरी आलो, हीच त्यांना खूप मोठी गोष्ट वाटली असावी.
"चहा नंतर घेऊच. पण पाटीलबाई, त्याआधी मला तुमचे चहा बनविण्याचे ठिकाण पहायचे आहे. " इकडेतिकडे न पाहता अल्फाने थेट स्वयंपाकघराचाच रस्ता धरला. आम्ही स्वयंपाकघरात आलो.
ते सर्वसाधारण स्वयंपाकघरापेक्षा लहान असे होते. समोर शेगडीचा कट्टा होता. त्याला लागूनच डाव्या बाजूला देवघर होते. उजव्या बाजूच्या भिंतीमध्ये खिडकी होती आणि त्याच्या बाजूला भांडी ठेवण्यासाठी कप्पे केलेले होते. अल्फाची शोधक नजर संपूर्ण खोलीवरून फिरू लागली. त्याने भिंती चाचपून पाहिल्या. जमिनीची तपासणी केली. फरशा वगैरे उचकटून निघतात का ते पाहिलं. बाजूच्या खिडक्यांवरील पडदे ओढले. खिडकीची नीट तपासणी केली. तिचे दरवाजे बंद करून बळेच उघडता येते का, ते पाहिले. मग खिडकी उघडली. खिडकीच्या आतल्या बाजूने लोखंडी गज असल्यामुळे खिडकी उघडली तरीही बाहेरच्या माणसाला आत येणे शक्य नव्हते. अल्फाने ते गजही चौकटीतून निघतायत का, ते पाहिलं. पण तेही निघाले नाहीत. मग पुन्हा त्याने आजुबाजुला पाहिले. त्या स्वयंपाकघराच्या कोपर्यात अजून एक छोटीशी खिडकी होती. व्हेंटीलेशन आणि उजेड येण्यासाठी ती खिडकी केलेली असावी. अल्फा त्या खिडकीकडे वळला.
"ती खिडकी काय वापरत नाही बाई मी. " आजींनी त्या खिडकीकडे पाहून सांगितले, " उगाच मागच्या शेतातली धूळ सगळी घरात येते. "
अल्फाने काळजीपूर्वक त्या खिडकीचे निरिक्षण केले. त्याच्या पद्धतीने वेगवेगळ्या अंगांनी तपासून पाहिले.
"ही खिडकी तुम्ही वापरत नाही. " तो म्हणाला, " पण आपले भूतमहाशय मात्र वापरतात!! "
"म्हणजे?? " आजीबाईंचे चष्म्यामागचे डोळे विस्फारले गेले. अल्फाने खिडकीच्या दिशेने बोट दाखविले.
"एक- या खिडकीची कडी खराब झाली आहे. त्यामुळे ही खिडकी बाहेरूनसुद्धा उघडता येते. दोन - याचे जे गज आहेत ते संख्येने जेमतेम तीन आहेत आणि तेही खुपच सैल झालेत. थोडासा प्रयत्न केला, तर ते एका बाजूला सरकवून काढता येतात. आणि तीन - ही खिडकी उघडझाप करण्याचे उद्योग अलिकडेच कोणीतरी केले आहेत हे सरळसरळ दिसतंय. पहा ना. "
मी आणि आजी वाकून पाहू लागलो.
"खिडकीच्या पायथ्याशी आणि दोन्ही बाजूला मध्यभागी धूळ झटकली गेली आहे. बाजूच्या चौकटीवरची धूळ आहे तशीच आहे. याचा अर्थ बाजूला पकडून कोणीतरी आत उडी मारलेली आहे. गज सरकवून बाहेर काढल्याने चौकटीवर ओरखडेदेखील पडले आहेत. ते ओरखडे नीट पहा. ते छिद्रापासून बाहेरच्या बाजूने गेलेले आहेत. याचा अर्थ ते गज बाहेरूनच कोणीतरी काढलेले आहेत. शिवाय बाहेरून उडी मारून न चढण्याएवढीही खिडकीची उंची नाहीये. त्यामुळे आपल्या पाहुण्यांनी क्षणात अदृश्य होण्यासाठी या खिडकीचा वापर केलेला आहे. "
"होय होय. बरोबर म्हणतोयस तू. " आजींनी जोराने मान डोलावली.
"तुम्ही त्या रात्री जेव्हा पाहिले, की स्वयंपाकघरात कोणीच नाहीये, तेव्हा तुम्ही या खिडकीकडे नीट लक्ष दिले होते का? " अल्फाने विचारले.
"नाही बाई. "
"हं.. घुसखोर तिथूनच बाहेर उतरला असणार. "
"पण मला म्हणायचंय, की आजीबाईंच्या घरी रात्री अपरात्री घुसून कोण आणि काय मिळविण्याचा प्रयत्न करतंय? तेही एक नाही तर सलग तीन रात्री? " मी माझ्या मनात घोळत असलेली शंका बोलून दाखवली. अल्फाने त्याच्या हनुवटीखाली असलेली छोटीशी दाढी कुरवाळत विचार केला.
"थोडासा शोध घेतला, तर तेही आपल्याला कळून जाईल, असं मला वाटतं. " तो म्हणाला, " त्याआधी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचेत पाटीलबाई. मला सांगा, तुमच्या पतींकडे एखादी अनमोल वस्तू होती का? एखादी किंमती वस्तू, जिच्याबद्दल फार कोणाला माहिती नाही आणि जी तुमच्या घरात दडवता येईल अशी?"
आजींनी थोडा विचार केला.
"मला असं नाही वाटत." त्या म्हणाल्या, "मी जेवढं माझ्या नवऱ्याला ओळखते, त्यावरून तरी असं मला वाटत नाही, की त्यांच्याकडे कोणती मौल्यवान वस्तू असावी. आणि त्यांचं आणि माझं नातं खूपच घनिष्ठ होतं. शेवटपर्यंत आमचं चांगलं पटलं. अशी कोणतीही गोष्ट नाही जी ते मला सांगायचे नाहीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून तरी आमच्या घरी अशी काही वस्तू असल्याचा उल्लेख कधी झाला नाही. "
"बरं. " अल्फा म्हणाला, " तुम्हाला असं कधी वाटलं का, की ते घराच्या विशिष्ट एखाद्या भागात जास्त वेळ जा-ये करतायत? "
"नाही बाई. "
"तुम्हाला असं कधी वाटलं का, की ते कधीतरी एकदमच चिंताग्रस्त दिसू लागले आहेत किंवा एकटे एकटे रहायला लागले आहेत? " अल्फा.
"नाही. "
"मरण्याआधी त्यांनी तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न केला होता का? "
"नाही. असं काही झालं नाही. "
"अच्छा. आता थोडं स्पष्टच विचारतो. "अल्फा डोळे बारीक करीत म्हणाला, " तुम्हाला असं वाटतं का, की तुमचे पती एखाद्या गैरव्यवहारात गुंतलेले होते ? त्यांचं कुणाकडे जास्त येणंजाणं होतं का? किंवा कुणाचं तुमच्या घरी येणंजाणं होतं? त्यांच्या वागण्यातून कधी असं जाणवलं का, की ते सर्वांपासून लपवून काहीतरी करतायत?"
"काहीतरीच काय बोलतोस रे!! माझे धनी म्हणजे एक सज्जन माणूस होता. कोणत्याही प्रकारच्या वाईट कामांमध्ये त्यांचा सहभाग असणं शक्यच नाही. माझ्यावर विश्वास बसत नसेल, तर गावातल्या कुणालापण जाऊन विचार. उलट वाईट मार्गावर असलेल्या लोकांना त्यांनी योग्य दिशा दाखवली. ते असलं उलटसुलट काहीच करू शकत नाहीत. "
"बरं बरं. आतापुरतं इतकं बास आहे. प्रभू, आता आपल्याला थोडे हातपाय हलवायचे आहेत. म्हणजे, शब्दशः हातपाय हलवायचे आहेत. चल माझ्यासोबत बाहेर. पाटीलबाई, आम्ही आता थोडी तपासणी करतो. "
आम्ही बाहेर मोकळ्या हवेत आलो. सूर्य अस्ताला निघाला होता. त्याची तांबूस किरणे घरासमोरच्या शुष्क बगीचावर पसरली होती. वाळून पिवळ्या पडलेल्या झाडाच्या पानांचा रंग अधिकच गडद झाला होता. मी अल्फाकडे पाहिले. त्याच्या शांत चेहऱ्याकडे पाहून मला रहावले नाही.
"अरे मित्रा, काहीतरी उलगडून बोल!! तुझे विचार कुठल्या दिशेने धावतायत, हे मला थोडं तरी सांगशील का? " मी म्हणालो. अल्फा हसला..
"होय. सध्या माझ्या मनातलं या प्रकरणाबाबतचं चित्र तुझ्यासमोर उघडायला काहीच हरकत नाही. " तो म्हणाला, " पण माझ्या एकूण तपासाच्या दिशेवरून तूही काही अंदाज बांधले असशीलच की.. "
"अं.. हो. साधारण माझ्या अंदाजाप्रमाणे पाटीलआजींच्या मृत नवऱ्याने घरात काही धनदौलत लपवून ठेवली असावी, असाच संशय तुला येतोय ना? याची कुणालातरी कुणकुण लागली असावी आणि तो असं लपूनछपून येऊन ती संपत्ती लंपास करण्याचा प्रयत्न करत असावा, बरोबर ना? " माझ्या बुद्धीची झेप इथपर्यंतच होती.
"तू कॉलेज टॉपर का आहेस याची कधीकधी प्रचीतीच तू देतोस बघ प्रभू. माझी तर्काची पद्धत तू इतक्या लवकर आत्मसात करशील, अशी माझी अपेक्षा नव्हती. " अल्फाने चक्क स्तुतीचे शब्द काढले. (शक्यतो तो माझी निरीक्षणशक्ती कशी कमकुवत आहे, यावरून टोमणे मारायचा), " होय, सध्या तरी मी याच तर्काच्या आधारावर तपासणी करतोय. ते भूत, जादूटोणा वगैरे आपण पहिल्यांदाच बाजूला ठेवू. पाटीलबाई जेव्हा त्यांची कहाणी सांगत होत्या, त्यावेळी मला असं वाटत होतं, की त्यांचं घर हडप करण्यासाठी कोणीतरी त्यांना भीती दाखवून पळवून लावण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे करण्यासाठी कोणी तीन वर्षे का थांबेल? तो जो कोणी आहे त्याने त्यांचे पती गेल्यानंतर लगेचच हे सगळे उद्योग केले असते. शिवाय पाटीलबाईंनी सांगितले आहेच, की त्यांच्या घरावर हक्क सांगणारं कोणी नाहीये. त्यामुळे हा मार्ग बंद झाला. मग आणखी काय कारण असेल, ज्यामुळे रात्री - अपरात्री एखाद्याने त्यांच्या घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला? साहजिकच पाटलांच्या घरात असे काहीतरी मौल्यवान ठेवलेले आहे, ज्याचा पाटीलबाईंना पत्ताच नाहीये. पण आपल्या घुसखोराला मात्र हे ठाऊक आहे. आजींच्या माहितीपलीकडे पाटलांचे काही व्यवहार असावेत, ज्यातून आलेला पैसा किंवा जी काही मौल्यवान संपत्ती असेल, ती त्यांनी घरातच कुठेतरी दडवून ठेवली असेल. याची माहिती त्यांच्याखेरीज ज्या कोणाला आहे, तोच हे सगळे उद्योग करत असणार. "
"पण तरीही आपला पहिला प्रश्न उरतोच." मी विचार करत म्हणालो.
"तो तीन वर्षे का थांबला? " अल्फाने माझ्या मनातला प्रश्न उपस्थित केला, " हं. मलाही हेच कोडे उलगडत नाहीये. शिवाय अजूनही काही धागे आहेत, जे नीटपणे जुळून येत नाहीयेत. आता पहा ना. समज एक घर आहे, जिथे भरपूर संपत्ती दडवून ठेवलेली आहे. ती तुला हस्तगत करायची आहे. त्या घरात एक अधू म्हातारीशिवाय दुसरे कोणीही रहात नाही. अशा वेळी तू काय करशील? सरळ एका रात्री तू येशील, म्हातारीला बंदूकीचा धाक दाखवून डांबून ठेवशील आणि संपूर्ण घरभर शोधाशोध करून तुला हवे ते घेऊन जाशील. पण आपला घुसखोर भलताच गांधीवादी दिसतोय. आजींच्या नकळत ही सर्व शोधाशोध करण्याचे कारण काय? "
असा विचार मी केलाच नव्हता.
"हो. हेही विचित्रच आहे नाही का? " मी म्हणालो, " तो घुसखोर आजींचा जवळचा नातेवाईक किंवा हितचिंतक असावा, असं तर नाही ना? "
"शाबास प्रभू. माझ्या विचारांच्या हातात हात धरणारे विचार कोणी मांडले, तर मला फार आनंद होतो. " अल्फा खुष होऊन म्हणाला, " सध्या तरी ती एकच शक्यता दिसतेय. पण हे सगळं एवढ्यावरच संपत नाही. आज सकाळी तू कॉलेजला गेल्यानंतर मी मिरज पोलीस ठाण्यात गेलो होतो. तिथे मी परशुराम पाटील यांच्या नावावर काही गुन्हे दाखल झाले होते का, याची चौकशी केली. पण त्यांचं नाव कुठे आढळलं नाही. शिवाय इथे अर्जुनवाडला एक छोटं पोलीस ठाणं आहे तिथे आम्ही फोन लावला होता. त्यांना 'परशुराम पाटलांच्या नावावरचे गुन्हे' ' अशी विचारणा करता पहिला तर ते हसलेच. 'परशुराम पाटील म्हणजे वाडीतला सर्वात सज्जन माणूस होता ' अशा शब्दांत त्यांनी आम्हाला त्यांची ख्याती ऐकवली. गुन्हे तर लांबचीच गोष्ट. मग अशा एका सर्वसामान्य माणसाकडे कुठून येणार एवढी संपत्ती?? या सगळ्याचा एकत्रित विचार करता, आपण पकडलेला रस्ता बरोबर आहे की नाही, याबद्दल मी साशंक आहे. पण हरकत नाही. ते लवकरच स्पष्ट होईल. सध्या आपण एक काम करू. हे घर आणि त्याच्या आजूबाजूचे आवार याचा कानाकोपरा तपासून पाहू. कोणीतरी इतकी जोखीम पत्करून शोध घेतंय, याचा अर्थ काहीतरी इथे दडवून ठेवलेलं असणारच आहे. एकदा का ते आपल्याला मिळालं, की मग सगळं काही अगदी सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट होईल. "
मी लगेचच त्याला संमती दर्शविली. आम्ही घराच्या मागच्या बाजूने शोध घेण्यास सुरुवात केली. पाटलांच्या या जुनाटशा घरात इतकं काय दडलेलं असावं? पैशांची बंडलं असलेली बॅग? दागिन्यांची पेटी? गुप्त कागदपत्रे?? माझी उत्सुकता क्षणोक्षणी ताणली जात होती. आम्ही बाहेरचा सगळा परिसर धुंडाळला. पण कुठेच काही दडवले असल्याचे निशाण मिळाले नाही.
"घुसखोराने फारच काळजीपूर्वक हा भाग तपासलेला आहे. " अल्फा म्हणाला, " इथल्या खुणाच सांगताहेत. आपल्याला जसे इथे काही मिळाले नाहीये, तसेच त्यालाही मिळाले नसणार. नाहीतर त्याने त्याचा मोर्चा घराकडे वळवलाच नसता. "
"घरात खरेच काही सापडण्याची शक्यता आहे का? " मी विचारले. पण अल्फाच्या चेहऱ्यावर मघाशी स्वयंपाकघरात शिरताना जितका आत्मविश्वास दिसत होता, तितका आत्ता माझा प्रश्न ऐकून दिसला नाही. काहीच न बोलता तो घराच्या दिशेने वळला आणि मीही त्याच्या मागे चालू लागलो. घरामध्ये अर्थातच आम्ही स्वयंपाकघराची तपासणी पहिल्यांदा केली. मग हॉल. मग आजीबाईंची खोली. अडगळीची खोली. वरचा माळ. टॉयलेट बाथरूम. घराची इंच न इंच जागा तपासली. पण आमच्या हाती काहीही लागले नाही. आता मात्र अल्फादेखील गोंधळात पडला होता. मी त्याच्या चेहऱ्यावर असे भाव पहिल्यांदाच पहात होतो.
"हे कसे शक्य आहे पण.. " तो पुटपुटला, " काहीतरी असलंच पाहिजे इथे, ज्यासाठी तो घरात घुसतोय.. "
"असं नसेल ना, की तो जे काही शोधत होता, ते त्याला मिळालं आणि तो ते काल रात्रीच घेऊन गेला? " मी शंका उपस्थित केली.
"तसं असेल तर किमान आपल्याला ते गुप्त ठिकाण तरी मिळायला हवं होतं. तिथे काहीतरी हलवाहलव केल्याचे निशाण मिळायला हवे होते. पण तसं तर काहीच दिसत नाहीये. " अल्फा म्हणाला, " खरंतर आपल्याकडे फारच कमी माहिती आहे. त्यामुळे आपण काहीच ठोसपणे सांगू शकत नाही.
मलाही आता काहीच समजेनासं झालं होतं.
"मला वाटतंय की मी या प्रकरणात आतापर्यंत फारच उथळ विचार करून निष्कर्ष काढलेले आहेत. " अल्फा म्हणाला. त्याच्या आवाजात निराशेची छटा स्पष्ट दिसत होती.
"ठिकाय. काही हरकत नाही. " तो इकडेतिकडे पाहत म्हणाला, " सध्या तरी आपण दोन गोष्टी करायला हव्यात असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे, आजची रात्र आपल्याला इथंच काढायची आहे. याचे कारण म्हणजे, आज रात्रीही घुसखोराने काहीतरी हालचाल करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला आपण रंगेहाथ पकडू शकू. आणि शिवाय, पाटीलबाईंना रात्री या घरात एकटेच सोडून जाणे मला पर्याप्त वाटत नाही. "
त्याने माझ्या सहमतीसाठी माझ्याकडे रोखून पाहिले.
"मंजूर. " मी विनातक्रार सहमती दर्शवली. ते ऐकून त्याचा चेहरा जरा उजळला.
"गुड. " तो म्हणाला, " आणि दुसरी गोष्ट म्हणजे, मला आता थोडा एकांत हवाय. मी थोडं बाहेर वाडीत फिरुन येतो. या प्रकरणाचा मला पुन्हा एकदा अगदी सुरुवातीपासून विचार करावा लागणार आहे, असं दिसतंय. तू इथंच आजींसोबत इथेच थांब. आणि थोडं सतर्क रहा. मी येतोच तास-दोन तासांत. "
"ओके. " मी घड्याळात पाहिले. साडेसात वाजत आले होते. बाहेर बराच अंधार पडला होता. हळूहळू वातावरणात थंडी पडू लागली होती. आम्ही बाहेरच्या खोलीत आलो. आजीबाई हॉलमधल्या देवदेवतांच्या जुन्यापुराण्या फोटोंसमोर दिवे ओवाळत होत्या.
"पाटीलबाई, आजची रात्र आम्ही दोघे इथंच मुक्काम ठोकणार आहोत. तुमची काही हरकत नाही ना?? " अल्फाने विचारले.
"काय सांगता!! देवच पावला म्हणायचा बाई.. माझ्या मनातही अगदी हेच होते. ते तुम्हाला कसे बोलून दाखवावे, हेच मला कळत नव्हते. तुम्हा पोरांना इथे रहायला आवडेल की नाही, असं मला वाटत होतं. पण मी आणखी एक रात्रसुद्धा इथे एकटी राहू इच्छित नाही. तुम्ही मोकळेपणाने रहा इथे. या घराला आपलंच घर समजा. " आम्ही त्यांच्या सोबतीला थांबणार, हे ऐकून आजींचा जीव भांड्यात पडला.
"मी येतो. "अल्फा निरोप घेत म्हणाला, " तुझ्याकडे हेडफोन्स आहेत का प्रभू? "
अल्फा त्याच्या मनातील खळबळ शांत करायला गाणी ऐकायचा, हे मला ठाऊक होतं. पण दुर्दैवाने माझ्याकडे हेडफोन्स नव्हते. मी नकारार्थी मान डोलावली. अल्फाने एक सुस्कारा सोडला आणि तो बाहेर पडला. मी व्हरांड्यात उभा राहून अंधारात चालणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो.