भयकथा लिहिणे कठीण गोष्ट आहे. विनोदी लिहिणे किंवा कारुण्यपूर्ण लिहिणे त्यामानाने सोपे, कारण एक चांगला विनोद सर्वानाच विनोदी वाटतो किंवा एखादी दुःखद कथा बहुतेकांच्या हृदयाला स्पर्श करून जाते. पण भयाचे तसे नाही. काही लोकांना सापाची भीती वाटते तर काहींना अंधाराची. काहींना उंचीची भीती वाटते तर काही लोकांना विदूषकाची. प्रत्येकाची भीती वेगळी त्यामुळे कथा लिहिताना सर्वानाच घाबरवेल अश्या कथा लिहिणे खूपच कठीण असते. त्यामुळे भयपट बनवणारे दिग्दर्शक धक्का तंत्र, आवाज, सेपिया टोन अश्या गोष्टी वापरून भय वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण लेखकाला हि माध्यमे उपलब्ध नसतात.
भयकथा ह्या थोड्या पॉर्न प्रमाणे सुद्धा असतात. पॉर्न इंडस्ट्रीत एक नियम आहे, ह्याला रूल ४१ म्हणतात. ह्याचा अर्थ असा कि मानवाने कुठल्याही गोष्टीची कल्पना केली असेल तर त्याला वापरून कुणी तरी पॉर्न बनवले आहे कारण एक प्रकार पहिला कि मन त्याला डी सेन्सिटाईझ होते आणि इतर प्रकार शोधायला "रसिक" जातात. हिमगौरी आणि सात बुटके ह्यांचे पॉर्न चित्रपट आहेत तसेच गॉडझिला चे पॉर्न सुद्धा आहेत. कुणीही काहीही अश्लील ना करता सर्वानी कपडे घालून केलेले सुद्धा पॉर्न चित्रपट आहेत. भयकथांचे असेच आहे. एकदा एखाद्या विशिष्ट प्रकारचा भयपट पहिला कि मग त्याच प्रकारचे चित्रपट आपल्याला घाबरवत नाहीत, मन त्याला डी सेन्सिटाईझ होते त्यामुळे दुसरे प्रकार शोधावे लागतात. ह्यातून भयपटाच्या अनेक श्रेणी निर्माण झाल्या. भुताळी घरे, पछाडणे, भुताळी प्राणी, भुताचा बदला ह्या कथा आम्हाला ठाऊक आहेच पण त्याप्रमाणे स्पेस हॉरर (अवकाश भयपट), कॉस्मिक हॉरर (वैश्विक स्तरावरील भयपट उदा इव्हेंट होरायझोन), वैद्यकीय भय, मॉन्स्ट्रर हॉरर (गॉडझिला), प्रलय भय (२०१२) असे अनेक प्रकार भयकथांचे आहेत. काही कथांत उदाहरणार्थ ऑर्फन सारख्या चित्रपटांत काहीही पारलौकिक नसून सुद्धा भय निर्माण केले जाते.
त्यामुळे ह्या माझ्या मालिकेत मी वाचकांना सरसकट घाबरवण्यापेक्षा विविध प्रकारच्या भयकथा हाताळणार आहे. त्यातील हे पहिले पुष्प "ऋण".
----
परेश ने गाडी तिसऱ्या मजल्यावर २७ नंबरच्या स्पॉट मध्ये पार्क केली आणि तो इमारतीच्या दरवाज्याकडे चालू लागला. आज आपल्याला काय काम करायचे आहे हा तो विचार करत होता पण त्याला आठवले नाही. तो दरवाज्याजवळ येतंच काचेचा तो दरवाजा उघडला आणि त्याने आंत प्रवेश केला. अनेक व्यक्ती ऑफिसचे चांगले फॉर्मल कपडे घालून धावपळ करत होते. कदाचित हि इमारत एके काळी मॉल असावी कारण त्याचे वास्तुशास्त्र अगदी मॉल प्रमाणे होते. पार्किंग इमारत मॉल ला सटकून असते. प्रत्येक मजल्यावरून मॉल मध्ये जायला दरवाजा. मग मॉल सुद्धा एक चौकोनी आकारांत असतो जिथे चारी बाजूना दुकाने तर मध्यभागी फ्री जागा असते आणि तिथे छोटे छोटे स्टोल असतात तसेच. ह्या ऑफिसची रचना अगदी तशीच पण एस्केलेटर नव्हते. होत्या त्या पायऱ्या आणि लिफ्ट. लिफ्ट क्रमांक ३ ने परेश नेहमी पाचव्या मजल्यावर जायचा. आता गाडीचं का नाही थेट पाचव्या मजल्यावर पार्क करायची ?
त्याला सुद्धा परेशचे एक कारण होते. कारण ह्याच वेळी लिफ्ट मध्ये त्याला ती दिसणार होती. परेश लिफ्ट मध्ये घुसला आणि पाठोपाठ ती सुद्धा धावत घुसली. परेशने तिच्यासाठी दरवाजा पकडला आणि तिने सफाईदार इंग्रजीत थँक्स म्हटले. तोंडाला मास्क असल्याने तिचा चेहेरा असा परेशने पहिलाच नव्हता. पण व्यवस्थित थ्रेडींग केलेल्या रेखीव भुवया, आयलॅशेस वरील मस्करा, आणि अत्यंत मेहनतीने वाढवून रंगवलेली नखे पाहून परेशला ती फारच सुंदर वाटायची. तिचा कमनीय बांधा आणि अंगाला चिकटून घातलेली स्किन फिट जीन्स पाहून त्याला मनात एक विचित्र भावना निर्माण होत होती. परेश च्या घरी स्नेहल त्याची पत्नी आणि मुलगा आशिष होता. स्नेहल सौंदर्यात हिच्या जवळपास सुद्धा नसली तरी सकाळी चहा तीच करून द्यायची त्यामुळे लिफ्ट मध्ये ललना कितीही सुंदर वाटली तरी परेशला आपल्या भावना मनातच ठेवणे भाग होते. म्हणून त्याने कधी तिच्याशी ओळख वाढवली नाही. त्याशिवाय ती फारतर २०-२२ वर्षांची असावी. कदाचित कुठल्यातरी ऑफिस मध्ये इंटर्न असावी.
पाचव्या फ्लोर वर लिफ्टच्या बाहेरच एक स्टॊल होता कॉफीचा. ती ललना नेहमी है स्टोल वर जाऊन तिथल्या बरिस्ता ला हॅलो करायची. तो सुद्धा तिच्याप्रमाणेच तरुण, हॅंडसम आंणि अथेलेटिक बांध्याचा सुमारे २५ वर्षांचा युवक होता. ह्या दोघांच्या मध्ये काही चालले आहे हे परेशला कळून चुकले होते. मग लंच च्या वेळी परेश मुद्दाम कॉफी किंवा चहा घ्यायला तिथे गेला असता ती सुद्धा तिथेच असायची आणि त्या युवकाच्या आणि युवतीच्या मध्ये थट्टा मस्करी चालूच असायची. परेशला आपले काम आठवत नसले तरी, किंवा आज घरी जाऊन स्नेहलचे काय काम करायचे आहे किंवा आशिष ची परीक्षा कधी आहे हे त्याला आठवत नसले तरी मागील महिनाभर ह्या ललनेने काय काय कपडे घातले होते, तिच्या परफ्युम चा सुगंध सर्वच त्याला आत्ताचं घडल्याप्रमाणे आठवत होते.
त्या प्रचंड ऑफिसच्या परिसरांत लोक अनेक असले तरी वातावरणात एक खिन्नता होती, एक एकटेपणा होता. गर्दी असली किंवा गर्दी आहे म्हणून तो एकटेपणा जास्तच खायला येत असे पण त्या युवतीच्या अस्तित्वानेच परेशला ऑफिस मध्ये काही तरी जान असल्यासारखे वाटायचे.
पण आजचा दिवस वेगळा होता, आज कॉफी घेताना बरिस्ता खूपच खिन्न होता. ती त्याला काही तरी समजावण्याचा प्रयत्न करत होती, आणि तो अत्यंत स्ट्रेस्ड वाटत होता. "नाही, आता ते शक्य नाही, राहू दे, मला नकोय ते" असे तो काहीतरी अतिशय दुःखद पणे तिला सांगत होता आणि ती सुद्धा अतिशय दुखी वाटत होती. प्रेमी युगुलांत काही बिनसले असे वाटत नव्हते पण काही तरी इतर विषयावरून दोघेही फारच तणावग्रस्त आहेत असे परेशला वाटले. कॉफी घेऊन परेश ऑफिस च्या दिशेने चालू लागला, पण त्याची पावले जड झाली. काय झाले असेल ? मी काही मदत करू शकतो का ? त्याच्या मनात विचार येत होते आणि हे विचार करता करता दिवस कधी संपला त्यालाच समजले नाही. काही समजण्याच्या आतंच त्याची पावले पुन्हा लिफ्ट च्या दिशेने वळली. तो तिसऱ्या मजल्यावर उतरला आणि दरवाजाकडे चालत होते तेंव्हा ती त्याला पुन्हा दिसली. ती तिसऱ्या मजल्यावर काम करायची आणि पहिल्या मजल्यावर कदाचित पब्लिक ट्रान्सपोर्ट ने घरी जात असे. ती लिफ्ट जवळ चालत जातानाच, परेश ने धीर केला.
"एक्स्क्यूज मी" त्याने तिला म्हटले आणि ती थांबली. तिच्या चेहेऱ्यावर मास्क असला तरी ती भांबावलेली वाटत नव्हती. कदाचित लिफ्ट आणि कॉफी शॉप मध्ये ती परेशला पाहत असल्याने तिला ओळख झाली होती. अश्या प्रकारे कुणा युवतीची वाट पहिल्यांदाच परेश ने अडवली होती त्यामुळे त्याला अवघडल्या सारखे वाटत होते. पण त्याने तिला विचारलेच "तुम्हाला वाईट वाटत नसेल तर एक विचारायचे होते." त्याने म्हटले आणि त्याच्या अपेक्षेच्या विरुद्ध तिने समजूतदार स्वरांत "हो ना. विचारा ना ?" असे उत्तर दिले.
"वर जो कॉफी शॉप आहे, तिथे एक मुलगा काम करतो. तुम्ही त्याला चांगले ओळखता का ? " परेश तिला आधी कम्फरटेबल करायचा प्रयत्न करत होता. "एस. त्याचे नाव विराट आहे. काय झाले ? " तिने म्हटले.
"आय एम व्हेरी सॉरी टू प्राय, पण मी दररोज त्याच्याकडे कॉफी घेतो आणि तुम्ही सुद्धा तिथे असता. पण आज तो विलक्षण चिंताग्रस्त वाटत होता. मी इतका चिंताग्रस्त त्याला कधीही पहिला नाही, तुम्हाला ठाऊक आहे का ? आणि बाय द वे तुम्हा दोघांची जोडी छान दिसते."
ती थोडी लाजली आणि तिच्या गोऱ्या कपाळावर गुलाबी रंग पसरला आणि परेश ची धडधड सुद्धा वाढली.
"खरे तर माझीच चूक झाली. विराट एक squash खेळाडू आहे. सध्या राज्य पातळीवरील टूर्नामेंट सुरु आहे. त्याने ती जिंकली तर तो पुढील वर्षी ऑलिम्पिक मध्ये जाऊ शकतो. पण त्याच्या पातळीवरील खेळासाठी अत्याधुनिक साधने पाहिजेत जी आम्ही दोघांनी खूप मेहनत करून घेतली होती. १ लाख रुपयांचे डोनेक्स रॅकेट आम्ही घेतले होते आणि तो फार चांगला खेळत सुद्धा होता. हे रॅकेट खास मागवावे लागते आणि त्यासाठी किमान २ आठवडे तरी लागतात. पण काल हे रॅकेट अपघाताने मोडले. खरे तर माझ्याच हातातून मोडले. मी माझी सोन्याची चेन आणि सर्व सेविंग्स देऊन नवीन रॅकेट घेतले सुद्धा असते, पण मॅच ४ दिवसांनी आहे आणि इतक्या लवकर रॅकेट मिळणे अवघड आहे. मी सर्व स्पोर्ट्स शॉप मध्ये फोन केला, इतर खेळाडूंना फोन केला पण ह्याच मॉडेल चे रॅकेट म्हणजे डोनेक्स ४५९९ कुठेच नाही. विराटला आता दुसरे रॅकेट घेऊन खेळावे लागेल, आणि तो कदाचित जिंकेल सुद्धा पण तो हरला तर मात्र कदाचित रॅकेट नसल्यानेच तर नाही ना, म्हणून मला आयुष्यभर चटका लागत राहील"
तिने पाणावलेल्या डोळ्यांनी सर्व काही परेशला सांगितले. ती आपल्याशी मनमोकळॆपणाने बोलली हेच पाहून परेशला खूप खूप आनंद झाला पण तिचे दुःख पाहून त्याला सुद्धा वाईट वाटले.
"एक अजब गोष्ट आहे." परेश ने विस्फारून डोळे मोठे करून तिला म्हटले.
"काय ती ? " ती.
"मला हा प्रश्न तुम्हाला विचारावासा का वाटला हेच मुळी आश्चर्य आहे . कारण तुमची माझी ओळख नाही किंवा तुमचे किंवा विराट चे दुःख मला इतके मनाला का लागावे ह्याला सुद्धा कारण नाही, पण दैव म्हणून नक्कीच काही असेल. कारण मी सुद्धा दर शनिवारी squash खेळतो आणि तुमचा विश्वास बसणार नाही पण मी सुद्धा तेच महागडे डोनेक्स ४५९९ वाले जड रॅकेट वापरतो आणि तेच रॅकेट माझ्या गाडीच्या ट्रँक मध्ये पडून आहे" परेश ने धडाधड सांगितले. खरे तर ह्या योगायोगावर त्याचा अजिबात म्हणजे अजिबात विश्वास बसत नव्हता पण सत्य होते.
"नो वे" ती युवती आता साशंक पणे म्हणाली. कदाचित परेश आता रॅकेट देण्याचे निमित्त करून तिला आपल्या गाडीजवळ घेऊन जाईल अशी भीती तिच्या मनात असावी. कारण हा योगायोग फरक हा विलक्षण होता. परेश सुद्धा तिची भीत समजला.
"एक काम करा, तुम्ही इथेच थांबा. मी गाडीतून रॅकेट घेऊनच इथे येतो मग तुमचा विश्वास बसेल. ५ मिनिटे लागतील" असे म्हणून तिचे उत्तर न ऐकताच परेश लगबगीने स्पॉट २७ कडे गेला, दुरूनच त्याने चावी "पीक पीक" केली आणि ट्रँक ओपन होऊन वर गेली. आंत रॅकेट त्याने ठेवले होते, "शीट!" रॅकेट कुठे होते ? ट्रँक मधेय रॅकेट नव्हतेच. हिला वाटेल मी खोटे बोललो. स्नेहल ला सांगितले होते गाडीत रॅकेट ठेवायला ? विसरली कि काय ? परेश च्या मनात अचानक विचार आणि गिल्ट पसरले. मन उद्विग्न झाले. आता परत जाऊन तिला काय सांगायचे ? ती काय म्हणणार ? ती थांबली तरी आहे का ? त्याने नजर गाडीवरून उठवून ऑफिस च्या दरवाज्याकडे पाहिले, काचेच्या दरवाज्यांतून तिचा बांधा त्याला दुरून दिसत होता पण अचानक डोळ्यापुढे अंधेरी आली, डोळ्यापुढील चित्र गायब झाले .....
परेश आता गाडींत होता, मॉल मध्ये २७ नंबरच्या स्पॉट मध्ये गाडी लावली होती आणि स्नेहल मागचं सीटवर भरलेली शॉपिंग बेग्स ठेवत होती आणि आशिष सुद्धा मोबाईल घेऊन बसला होता. "खूप शॉपिंग केलीस कि काय ? " परेश ने स्नेहल ला विचारले. "अरे हो ना " तिने म्हटले. ती गाडीत बसली आणि तिने बेल्ट लावला. "अग तूला मी स्पोर्ट्स शॉप मधून मी ऑर्डर केलेले रॅकेट आणायला सांगितले होते ना ?" त्याने स्नेहल ला विचारले. "ओह शीट ! मी विसरले रे. तू जाऊन आण ना आता प्लिज, मी खूप थकले आहे. आशिष ने मला इतके फिरवले."
"अग मी सुद्धा ऑफिस मधून ट्राफिक मधून गाडी चालवत आलोय ना ? पुन्हा मला गाडीतून बाहेर यायचे नाही आहे, तू रॅकेट आणशील म्हणून मी इतका उतावीळ होऊन इथे आलो होतो. तुलाच ते जाऊन आणावे लागेल". परेश ने तिला दटावून सांगितले.
"ओके बाबा. चल आशिष तू सुद्धा ये माझ्याबरोबर. " तिने पुन्हा आशिषला बाहेर काढले आणि ती लगबग पून्हा मॉल मध्ये घुसली. मॉल च्या पार्किंग इमारतीत फिरणाऱ्या गाड्यांचा आवाज घुमत होता, प्रत्येक टर्न वर टायर्स घासण्याचा तो विशिष्ट आवाज येत होता. कशाला ह्या पार्किंग जागेंत लोक इतक्या वेगाने गाडी चालवतात देव जाणे. परेश ने मनाशी विचार केला.
इतक्यांत त्याला दुरून स्नेहल आणि आशिष येताना दिसले, तिच्या हातांत स्पोर्ट्स स्टोर ची बॅग होती. म्हणजे ते महागडे खास रॅकेट आले होते, आता दाखवतो सर्वाना मी जिम मध्ये. परेश ने विचार केला.
गाडी रिवर्स मध्ये घेऊन त्यांच्या दिशेने जाताच होता आणि स्नेहल आणि आशिष दरवाजातून बाहेर येऊन उभी राहिली. इतक्यांत मोठ्ठा आवाज झाला, काही किंचाळ्या आणि एक गाडीचा कण्ट्रोल जाऊन दोघं तिघांना उडवीत गाडी प्रचंड वेगाने येऊन स्नेहल आणि आशिष ला आदळली. काही क्षणातच, परेश चे त्रिकोणी सुंदर कुटुंब एक टिम्ब झाले. आणि डोळ्यापुढे जे काही घडले ते त्याचा मेंदू प्रोसेस करण्याआधीच छातीत एक कळ उठली आणि डोळ्यापुढे अंधार आला.
परेश ने डोळे पुन्हा उघडले तेंव्हा तो आता त्याच मॉल मध्ये होता. पण आता ते ऑफिस होते, आता ह्या ऑफिस मध्ये आपण काय काम करतो हे आपल्याला का आठवत नव्हते हे त्याला समजले. बारकाईने पहिले असता नक्की ह्या इमारतीत कोण काय काम करतो हे सुद्धा त्याला स्पष्ट ठाऊक नव्हते. ह्या बिलिंग मध्ये मी शेकडो वेळा आलो आहो असे वाटत असले तरी त्याला काही आठवत नव्हते, घरी स्नेहल वाट पाहत आहे का? आशिष अभ्यास करत आहे का ? ऑफिस मधून घरी जाण्याचा रस्ता कुठला ? तो आठवण्याचा प्रयत्न करत होता.
पण त्याला दोनच गोष्टी आठवत होत्या, स्नेहल आणि आशिषचा अपघात, आणि त्याच्याकडून रॅकेट ची अपेक्षा बाळगून त्याची वाट पाहणारी ती ललना. मरण्याच्या एक क्षण अगोदर मी परेशला रॅकेट देईन आणि तो किती खुश होईल असा विचार स्नेहल करत होती का ? तिचा तो विचार परेश साठी एक ऋण बनून राहिला होता का ? जो क्षण जगून परेश ला ते ऋण फेडायचे होते का ? मी पुन्हा हा क्षण जगेन ? ह्या पुढे काय ? परेश च्या मनात विचार येत होते पण त्याचे मन पुन्हा भरकटले, ह्यावेळी डोळ्यापुढे अंधेरी आली नाही पण इतर सर्व काही एका पांढऱ्या धुरांत बदलत धूसर होत आहे असे वाटले. मग काही क्षण तो अवकाशांत तरंगत होता. मग काहीच नाहीसे झाले.
--
ह्या कथेंत मी मृत्यू नि त्यानंतरचे जीवन हे वापरून कथा लिहिली आहे. ह्या कथेत मृत व्यक्तीला आपण मेलो आहोत हे ठाऊक नाही, मेल्यानंतर माणसाच्या स्मृती धूसर होतात, काळ आणि वेळेच्या संकल्पना बदलतात आणि त्यामुळे आपण मेलो आहोत हे लवकर लक्षांत येत नाही. हे कथानक घेऊन श्यामलन ह्यांनी सिक्स्थ सेन्स हा जबरदस्त भयपट बनवला होता. हि कथा सुद्धा मी त्याच स्पिरिट मध्ये लिहिली आहे.