आपल्या कर्णमधुर आणि भावनापूर्ण गीतांनी मराठी रसिकांना मोहून टाकणारे एक मराठी संगीतकार म्हणजे श्रीनिवास खळे. त्यांना सर्वजण प्रेमाने ' खळे काका ' असे म्हणत असत. खळे काकांचा जन्म 30 एप्रिल 1926 ला गुजरात मध्ये बडोदा येथे झाला. बडोद्यातील सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात त्यांचे संगीत विषयाचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढे हुसेन खाँ, फैयाज हुसेन खाँ, यांसारख्या दिग्गज व्यक्तींकडून त्यांना संगीताचे धडे मिळत गेले.

खळे काकांनी काही वर्षे बडोदा आकाशवाणी मध्ये संगीतकार म्हणून नोकरी केली. त्यानंतर ते मुंबईत आले पण त्यांना कुठे काम मिळत नव्हते. एका मित्राच्या मदतीने त्यांची रहायची सोय झाली. काही काळानंतर त्यांची के. दत्ता या संगीतकाराशी ओळख झाली. त्यांनी के. दत्ता यांच्याबरोबर सहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली. याच काळात त्यांच्याकडे काही चित्रपटांना संगीत देण्याची संधी चालून आली. परंतु काही कारणाने ते चित्रपट पूर्ण होऊ शकले नाहीत, आणि खळे काकांची एवढी मेहनत वाया गेली. त्याचे त्यांना फारच दुःख झाले. सर्व सोडून देऊन दुसरी नोकरी शोधावी असे त्यांना वाटू लागले. याकाळात त्यांची बायको त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, त्यांना धीर दिला.

या सर्व गोष्टींनंतर श्रीनिवास खळे हे नाव सर्वांसमोर आले ते 1952 साली. त्यांची अाशा भोसले यांच्या आवाजातील "गोरी गोरी पान" आणि "एका तळ्यात होती" ही दोन सुरेख गाणी त्या वर्षी प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाली. या दोन गाण्यांमुळे त्यांना फार प्रसिद्धी मिळाली आणि  संगीतकार म्हणून मान्यताही प्राप्त झाली. त्यांचे "जय जय महाराष्ट्र माझा" हे गीतही लोकप्रिय आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांच्या संगीत पाणीग्रहण या नाटकाला त्यांनी संगीत दिले आहे.

1968 पासून त्यांनी एचएमव्ही मध्ये संगीतकार म्हणून नोकरी केली. त्यांनी संगीत दिलेली भीमसेन जोशी, लता मंगेशकर, सुरेश वाडकर यांच्या आवाजातील अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. भरपूर पैसा मिळावा म्हणून काम करणे त्यांच्या रक्तातच नव्हते, ज्या कामातून आपणाला आनंद मिळतो ते काम सतत करत राहणे त्यांना फार आवडायचे, त्यामुळे त्यांनी फारच थोड्या चित्रपटांना संगीत दिलेले समजते. त्यांनी चित्रपटाला दिलेली काही प्रसिद्ध गीतं म्हणजे या चिमण्यांनो परत फिरा रे, चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी, सांग मला रे सांग मला, इ.

खळे काकांनी फारशा चित्रपटांना संगीत दिलं नाही हे खरं असलं तरीसुद्धा भावगीतं आणि भक्तिगीतं यावर मात्र त्यांचा हातखंडा होता. सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, वसंतराव देशपांडे, सुमन कल्याणपूर, माणिक वर्मा, शंकर महादेवन यांसारख्या दिग्गज गायकांच्या आवाजात त्यांची गाणी प्रसिद्ध आहेत.

त्यांच्या या संगीत क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 1993 साली 'लता मंगेशकर पुरस्कार', 'बालगंधर्व पुरस्कार', 2006 साली 'जीवन गौरव पुरस्कार', 2007 साली 'संगीतरत्न पुरस्कार' आणि 2010 साली ' पद्मभूषण पुरस्कार.'

अखेर 2 सप्टेंबर 2011 साली संगीत क्षेत्रातील हा हिरा हरपला; परंतु त्यांच्या संगीत रूपाने ते आजही सर्वांमध्ये आहेत.

~ अनुश्री केळकर.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel