दोघे अंकायामधून बाहेर आले.
“ इथे तर काहीच दिसत नाहीये.” प्रोफेसर म्हणाला.
“आपण इथे कसे आलो? ते सुद्धा इतक्या कमी वेळात?” पूजाने विचारले.
“ हो..! मी त्या विशालच्या डोक्याच्या मदतीने मदर रडारचा सिग्नल शोधायला सांगितला होता. पण मध्येच ते डोकं वितळून गेलं त्यामुळे आपण अचूक ठिकाणी पोचलो नाही. पण बहुतेक मदर रडार इथेच असेल आसपास... काहीतरी मोठ्ठ... लोखंडी... टॉवरसारख..”
मागेच DAKC होते तिथला CDMA चा मोठा बंद टॉवर पूजाच्या नजरेस पडला आणि तिने त्याला दाखवला. त्याने चटकन त्याचे षटकोनी डिव्हाईस बाहेर काढले आणि फोटो काढला. तो चटकन अंकाया मध्ये चढला. त्याने तिलाही बोलावून घेतले.
ते दोघे अंकायाच्या आतमध्ये चढले. प्रोफेसरने षटकोनी डिव्हाइसवर eon1100 या मोबाइलद्वारे काढलेला फोटो त्याने अंकायाला लेझर स्टायलस मार्फत पाठवला. अंकायाच्या फोटो डिटेक्शन जीओ टॅगिंग टेक्नोलॉजीचा वापर करुन त्याने त्या CDMA टॉवरचे एक्झॅक्ट कोऑर्डिनेट शोधून काढले.
" पण CDMA फोन तर मुंबईत चालू नाहीतच. सर्व्हिसेस बंद झाल्या आहेत 4G सुरु झाल्यापासून" पूजाने सांगितले.
अंकाया : “प्लास्टिकॉन ग्रहावरचे प्राणी पॉलीमोरॉन्स आजही CDMA टेक्नोलॉजीचा वापर कम्युनिकेशनसाठी करतात. त्यामुळे पृथ्वीवर आल्यावर त्यांच्या मदर रडारने CDMA सिग्नल्स सगळ्यात स्ट्राँग असलेली जागा शोधून काढली. DAKC मध्ये पूर्वी स्ट्राँग असलेल्या CDMA सिग्नल्सचे ट्रेसेस त्यांना सापडले आणि त्यांनी जवळच असलेला टाटा इंडिकॉमचा टॉवर पण टेकओव्हर केलाय."
प्रोफेसर: “ओके अंकाया, ट्रान्सफर!”
अशी कमांड प्रोफेसरने अंकायाला दिली. अंकाया पुन्हा थरथरू लागला. काही क्षणातच अंकांया डी.ए.के.सी. मधल्या बंद असलेल्या सी.डी.एम.ए. टॉवरजवळ पोहोचला. काही दिवसांपूर्वी मुंब्रा शिळ रोडवर दिसलेले पॉलीमोरॉन्सचे स्पेसशिप आता त्या सी.डी.एम.ए. टॉवरजवळ उभे होते. त्यांनी अंकाया काही अंतरावर उभी केली होती तिकडून ते लपून पाहत होते. अंकाया कॅमोफ्लॉज मोडमध्ये होता. त्यामुळे पॉलीमरॉन्सला दिसला नाही. आता पुढे जे दृश्य प्रोफेसरने पाहिले यावर प्रोफेसरचा विश्वासच बसला नाही. पॉलिमोरॉनच्या स्पेसशिपमधून एक छोटीशी सायलो म्हणजे कोठारासारखी दिसणारी टाकी बाहेर आली. त्यानंतर त्या स्पेसशिपमधल्या मदर रडारने त्या सायलोवर एक वितळलेल्या प्लास्टिकचा फवारा उडवला आणि पाहता-पाहता सायलोचा आकार प्रचंड वाढत गेला. इतका मोठा झाला की संपूर्ण भारतातील प्लास्टिक ती सायलो एकत्र सामावून घेईल. थोड्याच वेळात मदर रडारने एक प्लास्टिक बीम सोडून ती सायलो अॅक्टिव्हेट केली. सायलो अॅक्टिव्हेट होताच आकाशात अचानकपणे अंधार दाटून आला आणि विजा कडाडू लागल्या. आकाशात ढगांमुळे निर्माण होणारी संपूर्ण वीज सी.डी.एम.ए. टॉवरद्वारे खेचली गेली. आता सायलोमधला प्रचंड मोठा व्हॅक्यूम पम्प अॅक्टिव्हेट झाला आणि ती सायलो आता जगातील संपूर्ण प्लास्टिक खेचून घेऊ लागली. जणू काही प्लास्टिकचे वादळ उठले होते. प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे डबे जे कचऱ्यात फेकले होते ते सर्वप्रथम ओढले जाऊ लागले आणि पाहता-पाहता आजूबाजूच्या परिसरातला सगळा प्लास्टिकचा कचरा या सायलो मध्ये लुप्त झाला.
हा सर्व प्रकार बघून आता न्यूज चॅनेलच्या गाड्या, न्यूज चॅनलचे हेलिकॉप्टर्स येऊन प्रसंगाची पाहणी करू लागले आणि ही सर्व गोष्ट टीव्हीवर लाइव्ह टेलिकास्ट करू लागले.
"आता तुम्ही पाहू शकता डी.ए.के.सी. मधला हा टॉवर आहे. त्याच्यावर अचानक वीज पडली आहे आणि बाजूला एक प्रचंड मोठी सायलो इथे तयार करण्यात आली आहे आणि त्या सायलो मध्ये आपल्या देशातला, आपल्या शहरातला संपू्र्ण प्लास्टिकचा कचरा खेचला जातोय. हे प्रोजेक्ट निश्चितच प्रॉमिसिंग आहे कारण शहरातला संपू्र्ण प्लास्टिकचा कचरा एका क्षणात या सायलोद्वारे नष्ट केला गेला आहे. कदाचित सरकारनं हे प्रोजेक्ट गुप्तपणे तयार केले असावे ज्याद्वारे शहरातला संपू्र्ण कचरा या सायलोमध्ये एकत्र साठविला जाऊन त्याचा नंतर निचरा करता येईल. हे निश्चितच कौतुकास्पद पाऊल आहे सरकारचं...! अशासारखी प्रोजेक्ट आणखी ठिकाणी तयार व्हायला हवीत."
काही वेळातच मदर रडारने त्या सायलोला डिअॅक्टिव्हेट केले आणि वादळ शांत झाले. संपूर्ण देशात एक आनंदाची लहर उठली. सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेचा हा एक भाग असावा असे सर्वांना वाटले. प्लास्टिकचा कचरा नव्या मुंबईतून जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाला होता. सरकारसह सर्व लोकांना ही एक प्रेरणादायी गोष्ट वाटत होती. अनेक देशांतील नेते भारताचे कौतुक करू लागले होते. पूजासुद्धा खुश झाली होती. पण प्रोफेसर मात्र खूप विचारात पडला होता.