"हाय...हँडसम",तन्वी समरच्या खांद्यावर हात ठेऊन मागे बाईकवर बसली.रोज समर तन्वीला बसस्टॉपला घ्यायला यायचा.नंतर दोघेही सोबत बँकेत जात असत.संध्याकाळी परत समरच तन्वीला बसस्टॉपवर सोडायचा.रोजच सोबत येण्याजाण्याने थोडी बँकेत कुजबुज चालायचीच.बऱ्याच वेळा बँकेत स्टाफचे लोक बोलता बोलता दोघांची खिल्लीपण उडऊन टाकत.सर्व काही सुरेख चालु होतं.रंगाचा बेरंग करण्यास कारणीभूत ठरलं ते अमेयचे बँकेतील आगमन.अमेयच्या नोकरीची सुरूवातच होती बँकेतील पण तरीही समरला तो नकोसाच वाटे.तन्वीमात्र अमेयसोबत गप्पा मारत असे.
"राहण्याची सोय झाली का तुझी"
"हो झाली, घेतली एक रूम भाड्याने"
"बरं मग,जेवणाचं कसं"
"मेस लावली आहे"
"कंटाळशील ...मेसचं खाऊन खाऊन.लंचब्रेकमधे आज आमच्यासोबत जेव.बरं वाटेल तुला."
"ठीक आहे.धन्यवाद. नवीन ठीकाणी कोणी आपुलकीने चौकशी केली की बरं वाटतं जरा"
तन्वी अमेयशी बोलुन आपल्या टेबलवर निघून गेली.पण इकडे समरचा मुड ऑफ होऊन गेला.लंचब्रेकमधे तन्वी हटकून अमेयला सोबत जेवायला घेऊन गेली.
"समर,अमेयला मीच बोलवले आज आपल्या टेबलवर जेवायला.बिचारा नवीन आहे."
"हो ना,नवीन लोकांची काळजी घेतलीच पाहीजे"
अमेय पटकन जेवण करून उठून गेला.त्या दोघांमधे त्याची अडचण होत असल्याचे त्याला जाणवले.
"तन्वी,मी तुला स्पष्ट सांगतो मला तुझं अमेयशी बोललेलं बिलकूल आवडत नाही. काय गरज आहे त्या परक्या माणसाशी इतकी जवळीक करण्याची"
"तुझ्या बाबतीत पण मी जर हाच विचार केला असता तर तु माझ्या आयुष्यात आलाच नसता ,नालायक माणसा"
"म्हणजे..."
"गंमत केली मी यार.एखाद्याची चौकशी करणं स्वभाव आहे माझा.येताजाता दोन शब्द गोड बोलण्याने काही वाईट होत नाही. तु चिल कर"
"मी माझा फ्लँट, फोरव्हीलर सगळं आज तुझ्या नावावर करतो.तो अमेय काय देणार आहे तुला?"
"अरे तो का म्हणून मला काही देईल...तुझी जागा वेगळी आहे...त्याची जागा वेगळी आहे.तुझी नि त्याची तुलना का करतोय तु?मी तुझ्या बाईकवर बसते,लपुनछपुन तुझ्यासोबत फीरते...तर अमेय आलाच कुठुन मध्ये?"
"तेच तर म्हणतोय...तु बोलु नकोस त्याच्याशी.विषय संपव."
"काहीतरीच काय..मला नाही जमणार असं वागायला.एकाच ठिकाणी काम करायचे नि काही कारण नसतांना बोलणं बंद करायचं."
"ठीक आहे,निघतो मी",समर टेबलवर टीफीन जोरात आपटून निघून गेला.
संध्याकाळी समरने अवनीला बसस्टॉपवरपण सोडलं नाही.एक आठवडा असाच गेला.आभाळ ढगांनी गच्च भरलेलं असतं.खुप खुप पाऊस पडत असतो नि अचानक कडक ऊन पडावं,पाण्याचा एक थेंबपण दिसू नये.असं झालं तन्वीचं.प्रेमसरीतुन एकदम वाळवंटात!अखेरीस न राहऊन तन्वीच स्वतःहून समरशी बोलायला गेली.समरलापण वाईट वाटतयं हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते.
"टीफीन नाही आणला आज.खाऊगुल्ल्या आहेस तु.दोन दोन तासांत खायला लागतं तुला.आज कसा टीफीन आणला नाहीस?"
"नाही आणला,तुला काय.मी ठरवलयं,मी तुझ्यापासून दुर राहणार आहे.प्लीज तु मला गोड गोड बोलुन परत अडकऊ नकोस."
"तुला मी नको आहे ना ,जाते मी.पण प्लीज असा उदास नको राहु रे.तु खूप छान आहेस.कशाला माझ्यासाठी स्वतःला दुःखी करतोस.तुला नको आहे ना मी,निघते मी."
"तु जा असं म्हणत नाही आहे मी.फक्त तु स्वतंत्र आहेस.माझ्याकडुन तुझ्यावर कोणतंही बंधन नाही. मी विनाकारणच तुझ्यावर हक्क गाजवतो."
"समर मला ना खुप टेन्शन येतं कधीकधी. बँकेची वेळ सांभाळून मी तुला तुझ्या आईसारखं चांगलं कसं काय खाऊ घालु शकेल?"
"मी तुला नोकरीच करू देणार नाही तर..मस्त राणीसारखं रहायचं घरी.माझी गावाकडे भरपूर शेती आहे.मी माझ्या बापाचा एकटा पोरगा.कशाची कमी पडु देणार नाही तुला आयुष्यात."
"ओ बापरे!खुप काही विचार करून ठेवला आहेस तु!बाबांना भेट लवकर ."
"हो गं,पहीले माझ्या छोट्या बहीणीचं लग्न होऊ दे.नंतर आपला नंबर..."
सहा महीने खुप छान गेले.समर आणि तन्वी लव्हलाईफ खुपच एन्जॉय करत होते.प्रेमरंगचं आयुष्य रंगवतो खरं!ज्याने आयुष्यात प्रेम केलं नाही त्याचा जन्म वाया गेला.प्रेम यशस्वी होवो न होवो...पण त्याची चव तर चाखायला हवी.तन्वीच्या या विचारांमुळेच तन्वी समरसोबत इतक्या लवकर जोडली गेली.समरच्या लहान बहीणीचे लग्न ठरले.लग्नासाठी सगळे कुटुंब गावाकडे गेले.समरने स्टेटसला छान भाताच्या शेतीमध्ये खाली बसलेला फोटो लावला.थोड्याच वेळात तन्वीचा फोन आला.
"अरे ये,गवतात बसुन काय करतोस तु?"
"मँडम,गवत नाही आहे ते.भाताची शेती आहे ही.धन्य आहे तुला!"
"परत कधी येतो आहेस?"
"सांगतो नंतर...बरं बाय.आई आली.पकडला जाईल मी"
लग्न होताच दुसऱ्या दिवशी समर बँकेत येऊन ऊभा राहीला.तन्वीच्या खुर्चीच्या मागे येऊन तो उभा होता.तन्वीला समजले नाही.तन्वी फोनवर बोलत होती.तन्वीची मैत्रिण समोरून समरबद्दलच विचारत होती.समर केव्हा येणार आहे,कुठे गेला आहे वगैरे....!समरला अमेय बँकेमधे दिसत नव्हता.समरने चौकशी केली तर समजले की तो दोन दिवस ट्रेनिंगसाठी दिल्लीला गेला आहे.समरला वाटले तन्वी अमेयशीच बोलते आहे.समर रागात स्वतःच्या खुर्चीवर जाऊन बसला.थोड्याच वेळात तो तन्वीला दिसला.समर दिसताच तन्वी फोन ठेऊन त्याच्याजवळ गेली.
"काय रे,केव्हा आलास?कळवलं पण नाही."
"तु अमेयशी बोलत होतीस फोनवर"
"काहीतरीच काय?तो कशाला फोन करेल मला?"
"मग कोण माझी एवढी चौकशी करत होतं फोनवर?"
"वेट अ मिनीट, तु परत संशय घेतो आहेस माझ्यावर."
"हे बघ,तन्वी तु बँकेत सगळ्यांशी बोलतेस.सगळ्यांशी तुझं चँटींग चालतं.फोनवर सतत बोलणं असतं.मी तुला कधी काही बोललो आहे का?"
"मी बँकेत सगळ्यांशी बोलते,चँटींग करते म्हणजे मी काही चीप आहे की काय?समर,तुझ्या डोक्यात फक्त घाण आहे.मला तुझ्याशी एक शब्दपण बोलायचं नाही आहे.लग्नाअगोदरच जर मला घडीघडी तुला स्पष्टीकरण द्यावे लागते आहे तर नंतर आयुष्यभर काय?तु माझ्यावर विश्वासच ठेऊ शकत नाही आहेस तर प्रेम खुप दुरची गोष्ट आहे समर.मला असं वाटतं आपण इथेच थांबुया."
"मी ब्रेकअप करूया असं म्हणतोय का?"
"पण मला तुला पुन्हा पुन्हा उत्तर द्यायची नाही आहेत.आज आपण अमेयवरून दुसऱ्यांदा भांडतोय.मुळात तु आयुष्यात कधीच कुणावरच भरवसा ठेऊ शकत नाहीस समर.सतत संशय करणं हा तुझा स्वभाव आहे...तो कधीच बदलणार नाही.तुझा नि माझा प्रीतीचा खेळ संपला आहे समर.",तन्वी रडत रडत रजा टाकून निघून गेली.
बँकेत सगळ्यांनाच समजलं होतं की दोघांचं भांडण झालयं.समरने भरपूर दिवस "अपने रूठे,पराये रूठे..यार ये रूठेना....रूठे तो खुदाभी रूठे....साथ ये छुटेना..."हे सदाबहार गाणे स्टेटसला लावले.पण तन्वीची पुन्हा समरशी जवळीक करण्याची इच्छा झाली नाही.परत गुंतणं नि परत झुरणं....नकोच तो खेळ!दोन महीन्यांनी तन्वीने बँकेची शाखापण बदलुन घेतली.हळुहळू सगळचं संपलं.दोघेही एकमेकांना खुप मिस करायचे.पण दोघांनीही स्वतःहून एकमेकांना भेटायचा प्रयत्न केला नाही.तन्वीच्या निघून जाण्याने समर एकटा पडला.समरने काही दिवस तन्वीवरच संताप केला.पण हळूहळू समरला आपली चूक समजली.आपण विनाकारणच सतत तिच्यावर अविश्वास दाखवला.तन्वीच्या ज्या सतत हसण्याबोलण्याच्या स्वभावावर समर भाळला होता ,तोच तिचा स्वभाव त्याच्या संशयीत नजरेने त्याला खटकु लागला.आपणच चुकलो...समरला समजून चुकले होते.एका वर्षाने तन्वीचे लग्न झाले.समरनेही घरातल्या लोकांनी सुचवलेल्या मुलीशी विवाह उरकून घेतला.जसा काळ गेला तसे दोघेही आपापल्या संसारात रमून गेले.दहा वर्षांनी भुतकाळ आयुष्यात डोकावतोच तसे समर आणि तन्वी पुन्हा बँकेच्या एकाच शाखेत आले.दोघेही वयाने,अनुभवाने आणि शारीरिक आकारानेपण वाढलेले होते.दोघेही एकमेकांना पाहुन स्तब्धच झाले आणि जिव्हाळ्याने जवळपण आले.
"कशी आहेस?"
"मजेत.आणि तु?"
"जशी तु सोडून गेली होती...तसाच...संशयी."
"काहीतरीच काय!विसरला नाहीस अजून!"
"तु विसरलीस का?सगळं"
"नाही, येते आठवण तुझी कधीतरी. मन भरून येतं.डोळ्यात पाणीपण येतं.असन्वी,बरं झालं तु पुन्हा भेटलीस.मला थँक्यु म्हणायचं होतं तुला मनापासून. तुझ्यामुळे मी माझ्या बायकोवर कधीच अविश्वास दाखवत नाही. ज्या दुर्गुणामुळे तुझ्यासारखा हीरा मी गमवला तो दुर्गुणच मी नष्ट करून टाकला."
"माझ्यामुळे तुला इतका फायदा झाला तरी खुष आहे मी.जाऊ दे.नवीन सुरुवात करायची का...प्रेमाच्या अलीकडील मैत्रिची!"
"नक्कीच, देवाने त्यासाठीच आपल्याला एकमेकांसमोर उभे केले आहे तन्वी"
अर्चना पाटील,
जळगांव