संध्याकाळचं जेवण झालं तसं मी अंथरून पांघरुणाची वळकटी काखेत मारली अन खळवाडीकडं झोपायला निघालो. १९७७-७८ चा काळ असेल. आमच्या गणोरे गावात नुकतीच लाईट आली होती. रस्त्याकडेला पंचायतीनं लायटीच्या खांबांवर बारके पिवळे बल्ब लावले होते. त्याचा मिणमिणता पिवळसर प्रकाश खांबाच्या अवती भवती पडायचा. गावात लाईट आली असली तरी अजून आमच्या घरात काही आलेली नव्हती. तशी गावात दोनचार मोजकी घरं सोडली तर कोणाच्याच घरात लाईट नव्हती. कायमचं दारिद्र्य असलेल्या शेतकरी कुटुंबाना ही लाईटची चैन परवडणारी नव्हती. आणि तसं कोणाचं लायटीवाचून आडतही नव्हतं. दिवस मावळायच्या आतच बाया चूल पेटवून स्वयंपाक करून ठेवायच्या अन अंधार पडता पडताच जेवणं होऊन जायची. प्रत्येक घरात रॉकेलचे कंदील अन पत्र्याच्या त्रिशंकू आकाराच्या चिमण्या असायच्या. काचेला तडा जाऊ ना देता कंदिलाची काच फडक्यानं स्वच्छ पुसून ठेवणे हा आमचा रोजचा उद्योग असायचा. राकेलची कायम वानवा असायची, म्हणून मग लवकरात लवकर आवरून कंदील, चिमण्या विझवून टाकायच्या. एखादा कंदील अगदी बारीक वात करून रातभर जळत असायचा.
मी वळकटी काखेत मारून मागच्या गल्लीतून बाहेर पडलो. आमच्या घराच्या बरोबर समोर एकनाथचं घर. आम्ही त्याला नाथ्या म्हणायचो. त्याच्या खालच्या बाजूला दोन घरं सोडून दग्या म्हणजे दगडू राहायचा अन वरच्या बाजूला सुताराचा नेण्या म्हणजे ज्ञानेश्वर. तसा मी, दगू अन नाथ्या तिघे कायम बरोबर असायचो, लहानपणापासून एका वर्गात. नेण्या शाळेत आमच्या मागं होता पण शाळा सुटल्यावर सुद्धा बऱ्याचदा आमच्या मागं मागं असायचा. मी बाहेर पडलो तेवढ्यात दगूही वट्टयावर आला. त्याच्या काखेतही वळकटी होतीच.
'ए नाथ्या, आवरलं का नाही? असं मी आवाज देताच 'आलो रे अन्या' असे म्हणत नाथ्या बाहेर आला. नेण्यालाही दोन-तीन हाका मारल्या पण त्याचा काही आवाज येईना. 'जाऊंदे, येईल मागून' असं नाथ्या म्हणाला अन आम्ही तिघं निघालो. कोपऱ्यावर वळायच्या आतच 'ये, आरे मला येउद्या ना' असं म्हणत वळकटी सांभाळत नेण्या पळत आला अन आम्ही चौघं गप्पा मारत खळवाडीकडं निघालो.
खळवाडी म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा आणि तिच्या शेजारचं शाळेच्याच मालकीचं मोकळं माळरान. झेडपीची ही रिकामी सपाट अन मुरमाड जागा असल्याने अनेक शेतकरी इथं सुगीनंतर खळं करीत. एकाची बाजरी मळून झाली का त्याच खळ्यावर दुसरा कोणीतरी बाजरीच्या कणसांची रास आणून ओती. गावातील बरीचशी घरं धाब्याची, पावसाळ्यात गळणारी. त्यामुळे पावसाळयातच तर हमखास अन उत्तर वेळीही आमच्यासारखी बरीचशी पोरं रात्रीची झोपायला म्हणून या खळवाडीवर असलेल्या मराठी शाळेच्या पडवीत यायची. त्यातल्या मोठ्या पॊरांपैकी एखादयाच लगीन झालं कि तो हळहळू बंद व्हायचा. मग त्याच्या वरून गप्पांना ऊत यायचा. बाकी म्हातारी कोतारी मंडळी मारुतीच्या देवळात अन देवळाबाहेरच्या पारावार झोपायला असायची. शाळेच्या पडवीत किंवा आजूबाजूला लाईट नव्हती. एखाद दुसरा पोरगा कंदील घेऊन यायचा पण अंथरून टाकून झालं कि तोही विझवून टाकायचा. पण सगळ्यानांच सवय होती. त्यामुळे अंधारातही आपल्या आपल्या ठरलेल्या जागा बरोबर सापडायच्या. बहुतांशी जणांचं अंथरून पांघरून म्हणजे दोन-तीन बारदानाची पोती जोडून केलेली वाकळ, त्यावर असलीच तर एखादी फाटकी सतरंजी अन वरून पांघरायला आईच्या जुन्या नऊवारी लुगडयांची किंवा बापाच्या धोतराची उबदार गोधडी असायची. झोप लागेपर्यंत बऱ्याच पोरांच्या टिंगल टवाळी, चेष्टा मस्करी करत गप्पा चालू असायच्या. गावातली बितंबातमी या गप्पांमधून कळायची. गप्पा मारता मारताच कधी गाढ झोप लागून जायची कळायची पण नाही. रोज रात्री झोपायला खळवाडीकडं जायची जशी आमची सवय तशीच दुसरी एक सवय म्हणजे बहुतांशी जणांची सकाळची अंघोळ कायम नदीवर असायची. सकाळी लवकर उठून घरी गेलो कि वळकटी बाजूला टाकायची. दोरीवरची अंडरपँट, टॉवेल खांद्यावर टाकायचा अन भाजलेल्या तंबाखूची किंवा शेणाच्या जळलेल्या गवरीच्या राखेची मिश्री घासत सुतारनेटावरून नदी गाठायची. देवठाणला धरण होण्याच्या अगोदर गावाशेजारून जाणारी आढळा नदी क्वचित उन्हाळ्याचे काही दिवस सोडले तर कायम वाहत असायची. उन्हाळ्यात वाहतं पाणी कमी झालं तरी खोल खडकांमधले मोठे डोह पाण्याने तुडुंब भरलेले असायचे. त्यामुळे बऱ्याच जणांची अंघोळ ही नदीवरच असायची. गावातल्या बाया-बापड्या सुद्धा सकाळी सकाळी धुणं धुवायला अन पाणी भरून न्यायला नदीवर असायच्या. तांब्या पितळेचे मोठ मोठे हांडे नदीकाठच्या पोयट्यानं अन नारळाच्या शेंडीनं घासून धुऊन लख्ख करणं हा अनेक बायांच्या आवडीचा कार्यक्रम असायचा. त्यांच्याही गप्पा याच वेळेत रंगायच्या. घरात वापरायचे अन प्यायचे सहा-सात हांडे पाणी डोक्यावर वाहून नेऊन रांजणात भरून ठेवणे हे त्यांचं रोजचं मोठं काम असायचं. डोक्यावर भरलेले हांडे घेऊन मारुतीच्या देवळामागची चढण चढत घर गाठायचं म्हणजे अवघड काम. गम्मत म्हणजे गनोऱ्यातल्या बायांना एवढ्या लांबून पाणी भरायला लागतंय म्हणून गावातल्या पोरांना लग्नासाठी पोरी द्यायला पंचक्रोशीतले काही लोकं नकार द्यायचे. खाली जळकीच्या बाजूला बायकांच्या धुणीभांडी करण्याची जागा असायची. आजूबाजूचे सगळे खडक धुऊन वाळत घातलेल्या रंगी-बेरंगी कपड्यांनी रांगोळ्या काढल्यासारखे दिसायचे. तिथून थोडं वरच्या बाजूला नळीच्या खडकाळ भागात आमची पोहायची जागा असायची. पाण्यात बुडालेल्या खडकांमधील तयार झालेल्या नैसर्गिक खोल घळीमुळे या भागाला नळी म्हणायचे. श्वास रोखून धरत बुडी मारून या नळीतून पलीकडं जाणं हा आमचा आवडता पण थरारक खेळ होता. या अढळेच्या कृपेने गावातील सर्वच पोरासोरांना लहानपणा पासूनच चांगलं पोहता यायचं. पण गावाला नदी असली तरी गावसपाटीपासून खोल असल्याने तिच्या आजूबाजूचा मोजका परिसर सोडला तर आमचा सगळा पट्टा दुष्काळी. पाऊस बरा झाला तर येणारे बाजरीचे पीक आणि त्यातच टाकलेल्या मठ, मूग, हुलगा, चवळी, तूर, अशी कडधान्य हीच वर्षभराची पोटापाण्याची सोय. याच बाजरीच्या शेतात वाळकांचे वेल सुद्धा असायचे. सुपारीच्या आकाराची ही वाळकं कापून, मिठाच्या पाण्यात शिजवून वाळवून ठेवली जायची. जेवणाच्या वेळेला तापल्या तव्यावर थोडीशी तेलाची धार टाकून खरपूस भाजलेली ही वाळकांची शेरनी तोंडी लावायला लई भारी. असेच तव्यावर खमंग भाजलेले शिळ्या बाजरीच्या भाकरीचे कोरके खिशात टाकून खेळता खेळता कुरुम कुरूम आवाज करत खाणे हाच आमचा रोजचा खाऊ.
आजही आम्ही चौघं नेहमीच्या सवयीने खळवाडीवर पोहोचलो. दुसऱ्या दिवशी पौर्णिमा असल्याने चंद्राची भरपूर लाईट पडली होती. त्यामुळे बऱ्याच पोरांना झोपा येत नव्हत्या. प्रत्येकाच्या आपल्या शेजारपाजाऱ्यांशी गप्पांनाही त्या चांदण्याचा रंग चढला होता.
आमच्याही काहीबाही गप्पा चालल्या होत्याच. तेवढ्यात नाथ्या म्हणाला
'अन्या, उद्या सटीची जत्राय डोंगरगावला, जायचं का आपुन' त्याचं बोलणं ऐकून आम्हा चौघांनाही हुरूप आला.
'कांताबाई सातारकरचा तमाशा हाये, जाऊ आपण बघायला' नाथ्या पुन्हा म्हणाला.
'हा, कांताबाईचा तमाशा लै जोरात हाये म्हणत्यात. जाऊच आपण' दगूनही नाथ्याच्या सुरात सूर मिसळला.
'पण तिकीटाला पैसे रे, मला काय घरून मिळणार नाहीत' मी म्हणालो. तशी जायची इच्छा मलाही होतीच.
'आरं, जत्राय सटीची, गाववाल्यांनी वर्गणी काढून फुकटात ठेवलाय तमाशा, कशाला पैशे लागत्यात' नाथ्यानं खुलासा केला. पैशाच्या बाबतीत आम्ही सगळेच सारखे होतो. आईबापाची कायमची गरिबी. त्यातून तमाशा बघायला आम्हाला कोण पैसे देणार? मला दर गुरुवारी मात्र आठवणीनं दहा पैसे मिळायचे. दादाभाऊच्या हाटेलातून दहा पैशाची भेळ घेऊन ती मस्त आनंद घेत खाणे हीच आमची आठवडाभरातली चैन असायची.
'च्यायला, फुकटंफाकट हाये तर जाऊच सगळे' असे म्हणत मीही आपली तयारी दाखवली. नेण्याचा काही प्रश्नच नव्हता. आम्ही निघालो कि आमच्यामागं येणं त्याच्या सवयीचं झालं होतं.
'उद्या सांचं सगळ्यांनी जरा लवकरच जेऊन या, अन घरी कळून देऊ नका. नाहीतर इथंच आपला तमाशा व्हायचा' असं म्हणत मी झोपेची आराधना करू लागलो. पण डोळ्यासमोर तमाशा आत्ताच दिसू लागला होता. तमाशाच्या गप्पा मारत मारतच कधीतरी झोप लागून गेली.
दुसऱ्या दिवशी शाळेत जाताने, मधल्या सुट्टीत आमच्या गप्पा तमाशाभोवतीच फिरत होत्या. त्याकाळी कांताबाई सातारकर, विठाभाऊ मांग नारायणगावकर, काळ-बाळू, चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडिक पुणेकर, दादू-मारुती इंदुरीकर असे काही निवडक तमाशे महाराष्ट्रात गाजत होते.
शाळा सुटली. घरी गेलो. शाळेचे कपडे काढून ठेऊन त्यातल्यात्यात बिन ठिगळांची चड्डी घातली. वरून एक लांब बाह्यांचा सदरा घातला, कंदील पेटवून ठेवले. तोपर्यंत बाई (म्हणजे माझी आई) स्वयंपाकाला लागली होती.
'बाई मला अगुदर जेवायला वाढ, लै भूक लागलीय' मी चुलीजवळ जात म्हणलो.
'आता रं द्वाडा, रोजचं तर खा खा म्हणून धपाटा द्याया लागतोय, अन आज सोताच भाकरी मागतोय' असं म्हणत बाईने चुलीत जाळ वाढवला. पहिली भाकरी टोपल्यात पडल्याबरोबर मी ताटात कुस्करून घेतली अन त्यावर शेंगदाण्याचं झिर्क ओतून घेत जेवायला सुरुवात केली. भाकरी थापता थापता बाई माझ्याकडं कौतुक मिश्रित आश्चर्यानं पाहत होती. मी पटापट जेवलो. अन लगेच वळकटी काखेत मारून बाहेर पडलो. बाई पाठीमागून हाक मारत काहीतरी सांगत होती, पण ऐकलंच नाही असं दाखवत मी गल्लीत आलो. रोज हाका मारायला लागायच्या पण आज नाथ्या, दग्या अन नेण्या वळकट्या घेऊन हजर होती. अंधार पडला होता. आम्ही खळवाडीकडं गेलो अन आपापल्या जागेवर वळकट्या ठेऊन लगेच माघारी फिरलो. परत आमच्या गल्लीतून न जाता मधल्या गल्लीतून खाली कुंभार आळीच्या दगडी फरशीवरून देवीच्या देवळाकडं आलो. देवळाला वळसा घालून पुढच्या पान्धीतून डोंगरगावच्या रस्त्याला लागलो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर शेराची झाडं होती. त्या अंधारातून एकमेकांच्या संगतीने आम्ही पुढं पुढं जात होतो. रस्त्यात बिड्या ओढत जाणारे तीन म्हातारे दिसले. त्यांच्याजवळून जाताने एकाने हटकलंच.
'काय रे पोराहो, कुठं निघालाय एवढ्या राच्च' त्यावर आम्ही जरा चपापलो. काय उत्तर द्यायचं आता. तसं त्यातलं आमच्या कोण वळखीचं दिसत नव्हतं पण काय भरोसा त्यातलं कोणी आम्हाला वळखीत आसल. पण आमचा हा तिढा दुसऱ्या म्हाताऱ्याने सोडवला.
'म्हाद्या, तुला कळना व्हय, आरं तमाशा हाय डोंगरगावाला' जात असतील पोरं. कायरे पोरांनो? असं त्याने विचारलं पण तोपर्यंत आम्ही धूम पुढे पळालो होतो. पान्धी संपून खळईचा चढ चढून गेल्यावर सपाट भाग आला. आता चंद्रही वर आल्याने त्याचा प्रकाश सगळीकडं पसरला होता. आणि आमच्या कानावर जत्रेतल्या दुकानांचे निरनिराळे आवाज पडू लागले. तमाशाच्या भोंग्याचा आवाजही येत होता. तो ऐकून आम्हाला लैच हुरूप आला अन आम्ही जवळ जवळ पळतच सुटलो. सपाटी संपून उतारावरून खाली गेल्यावर आढळा नदी लागली. आम्ही सरळ नदीत शिरलो. उन्हाळ्यामुळं पाणी कमी झाल्याने आमच्या गुडघ्यापर्यंतच पाणी लागत होतं. नदी ओलांडून आम्ही थोड्या उंचावरच्या डोंगरगावाकडे निघालो. 'सटी-सातमाय' चं देऊळ डोंगरावर असलं तरी जत्रा गावातच भरत होती. आम्ही जत्रेतून जात होतो. अनेक खेळण्यांची दुकानं सजलेली होती. मिठाईच्या दुकानातून गरम गरम जिलेबी तळल्याचा वास येत होता. त्या वासानं तोंडाला पाणी सुटत होतं. पण आमच्या चौघांच्याही खिशात एक पैसाही नव्हता. म्हणून मग नाकानेच जिलेबीचा आस्वाद घेत आम्ही जत्रा ओलांडून पलीकडच्या शेताकडे गेलो. मोकळ्या शेतात तमाशा उभा राहिला होता. फुकट असल्याने कणात आणि तंबू दिसत नव्हता. पण भलं मोठं स्टेज उभारलेलं होतं. नुकतीच गण-गौळण सुरु झाली होती. बरेच लोक आधीच येऊन बसले होते. आम्ही एका कडेनं पण जमेल तसे आत घुसत घुसत स्टेजच्या बरंच जवळ जाऊन बसलो. नंतर रंगबाजी सुरु झाली. अनंत पांगारकर अन मारुती कांबळे या जोडगोळीने लोकांना खूप हसवले. लगेचच कांताबाई सातारकर स्वतः स्टेजवर आल्या अन सर्व लोकांना नमस्कार करत त्यांनी गणेशवंदना सुरु केली. स्टेजच्या बरोबर समोर सात-आठ तरुण पोरं बसली होती. आल्यापासून त्यांचा दंगा चालला होता. त्यांच्या बोलण्यावरून ती बरीच पिलेली आहेत हे लोकांना कळत होतं. आजूबाजूचे लोक कुजबुजत होते त्यावरून कळलं कि ते काही डोंगरगावचे नव्हते. दुसऱ्याच गावावरून आलेले होते. कांताबाई सातारकरांची गणेशवंदना चालू असतानेही ती पोरं खिदळत 'लावणी म्हणा, लावणी' असे ओरडत होते. गाणं संपवून कांताबाई आत गेल्या अन १०-१२ बायका-मुलींचा ताफा स्टेजवर आला. त्यांचं नाचणं अन गाणं सुरु झालं तशी त्या पोरांपैकी दोन-तीन जण उठून उभे राहून नाचायला लागले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना गप्प बसवले पण ती पोरं लोकांवरच डाफरत होती. दर गाण्याला त्यांचा हाच खेळ सुरु होता. शेवटी गावचे सरपंच दामू अण्णा स्टेजवर चढले आणि त्यांनी माइकवरून सगळ्यांना शांतपणे कार्यक्रम पाहण्याची विनंती केली. त्या पोरांनाही उभं राहून नाचू नका म्हणत जरा दमात घेतलं.
तमाशा परत सुरु झाला. एक लावणी शांततेत पार पडली. त्यानंतर आलेल्या मुलीने 'खेळताना रंग बाई होळीचा-होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा' ही जराशी भडक लावणी सुरु केली. अन ती पोरं परत चेकाळली, आता तर चार-पाच जण उभे राहून नाचायला लागले. खाली बसलेलेही अचकट विचकट बोलत होते. ते पाहून मात्र कडेला उभे असलेल्या शिरपत पाटलाचं टाळकं सरकलं.
'यांच्या आयच्या झान्जा हाणल्या त्यांच्यायला' अशी अस्सल शिवी हासडत पाटील आत घुसले. त्यांच्या मागं गावातलीही पाच पंचवीस पोरं घुसली. काय होतंय हे कळायच्या आत पाटलांनी त्या पोरांपैकी एकाच्या सणकून कानसुलात ठेऊन दिली. पाटलांमागे आलेली पोरंही त्या साथ-आठ जणांवर तुटून पडली. ती पोरंही माघार न घेता हात चालवत होती. त्यातली काहीजण जीव वाचवत गर्दीत घुसली. त्यांच्यामागे त्यांना ठोकणारेही घुसले. सगळे लोक उठून उभे राहिले. नेमकं काय झालंय तेही अनेकांना कळले नव्हते. पण काहीतरी मोठा ऱ्हाडा झालाय याचा अंदाज आला होता. लोक वाट फुटेल तिकडं पळत होते. कोण व्हलपटून पडत होतं, त्याच्या अंगावरून उड्या मारत लोक पळत होते. सगळीकडं नुसता हलकल्लोळ माजला होता. तमाशा बंद पडला होता. कांताबाई सातारकर स्टेजवर येऊन माइकवरून लोकांना शांत करण्याच्या प्रयत्नात होत्या. पण अर्धवट माहितीने अन नाना कुशंकांनी भयभीत झालेले लोक सैरावैरा पळत होते. बंदोबस्तासाठी आलेले दोन पोलीस कुठे लपून बसले होते, त्यांचा काय कोणाला पत्ता नव्हता. आम्हीही घाबरून पळत पळत एका वस्तीवरच्या सपरात जाऊन लपलो होतो. आमच्याबरोबर अजून काही लोक तिथे येऊन लपले होते. ती पेताड पोरं सायखिंडीच्या बाजूने पळत गेली होती. त्यांच्या मागावरही गावातली अनेक पोरं पळत गेली होती. त्यांचा आरडा-ओरडा लांबून ऐकू येत होता.
एव्हाना स्टेजसमोरचं पटांगण बरंचसं मोकळं झालं होतं. शे-पन्नास लोक मात्र परत तमाशा सुरु होईल या आशेवर परत खाली बसले होते. काही पेताड पोरांमुळे अक्ख्या कार्यक्रमाची वाट लागली होती. तमाशा कलावंत हताश झाले होते. गावातली शानिसूरती माणसं नाराज झाली होती. तेवढ्यात सायखिंडीच्या बाजूने परत गलका वाढला. गावातल्या पोंरांनी त्या पळणाऱ्या पेताडांपैकी दोन-तीन जणांना धरले होते. आणि लाथा बुक्क्यांनी तुडवतच गावाकडं आणत होते. जत्राही सगळी विस्कटली होती.
आम्ही थोडावेळ वाट पाहिली. पण हे प्रकरण काही शांत होण्यासारखे वाटत नव्हते. नाही म्हणलं तरी आम्हीही शाळकरी पोरं, चांगलेच घाबरलो होतो. आईबापाला कळलं तर घरी पुन्हा मार पडायचा.
'नाथ्या, दग्या, नेण्या चला जाऊया आपुन घरी, बास झाला तमाशा' असं म्हणत मी उठलो. ते तिघंही उठले. गावात परत त्या राह्ड्यात जाण्यापेक्षा आम्ही गावा बाहेरच्या रस्त्याने पळत पळतच नदी गाठली. नदी ओलांडून आल्यावर मात्र आम्ही जरा निवांत झालो. काळजातली धडधडही कमी झाली. झालेल्या प्रकाराबद्दल गप्पा मारत आम्ही गनोऱ्याची वाट धरली. आमच्या मनातल्या तमाशा पाहण्याच्या इच्छेचा मात्र चक्काचूर झाला होता.............
अनिल दातीर
(सातारा)
(ता.क. या कथेतील स्थल-काल आणि बहुतांशी पात्रं खरी आहेत. भांडणाचा प्रसंग हा काल्पनिक असला तरी थोड्याफार फरकाने अशा घटना अनेक गावात/ तमाशात घडलेल्या असतील.)