ैचारिक वैराग्य  

इथे नमूद केलेल्या शिर्षकाचा अर्थ जागतिक पातळीवर  तसा खुपच गहन आहे. जी मानसे सदैव विचारांच्या सागरात यथेच्छ विहार करत असतात त्यांच्या द्रुष्टीने इथे दिलेल्या शिर्षकाचा अर्थ आणि माझ्या सारख्या एका अति सामान्य माणसाने स्वतःच्या पद्धतीने लावलेला अर्थ; हा हा हा...... पहा काय गंमत आहे साधारण इथे लिहित असताना सुद्धा मी म्हणालो की “लावलेला अर्थ”, सहसा सामान्य माणसाला अर्थ जाणून घेण्या पेक्षा अर्थ लावण्याची खुप आवड असते, बरं असो, पन आधी नमुद केलेल्या दोन वैचारिक द्रुष्ट्या अलिप्त असलेल्या व्यक्तींमधे मी दुसर्या प्रकारात मोडतो, म्हनुन मी माझ्या नुसार तुमच्या समोर  ह्या शिर्षकाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आहे.

वैचारिक म्हणजे विचारांशी निगडीत अन वैराग्य म्हणजे संसारचा, मोह मायेचा त्याग करून साधना करणं असा सरळसरळ अर्थ आहे, अतिशय साध्या भाषेत सांगायचे झाले तर वैराग्य म्हणजे “अलगपना”, समान अर्थी शब्द म्हणाल तर एकटेपणा असाच होतो नाही का.  तसेच दोनही शब्द एकत्रित करता माझ्या वैयक्तिक मता नुसार लावलेला वैचारिक वैराग्याचा अर्थ म्हणजे विचारांच्या तंद्रीत स्वीकारलेला एकटेपणा.

पन एकटेपणा हा शब्द एवढ्या सहजतेने बोलने हे देखील स्वतःला आव्हान दिल्या सारख आहे. ह्या शब्दाची व्यापक्ता तेव्हा वाढते जेव्हा आपन एकटेपणा ऐवजी वैराग्य ह्या शब्दावर जोर देतो. वैराग्य त्याविषयीची जनसामान्यांची मत म्हणजे काही तरी विलक्षण असतात, जरका तुम्ही चुकूनही हा शब्द बोललात तर समोरून आवाज नक्कीच येणार, “कायरे काय बोलतोय तू वैराग्य बिराग्य, येडा-बिडा झाला की काय,  आता सन्यासी होतो काय”, ही गोष्ट साहजिक आहे म्हणा, काही लोकांना आपन हे पटवून नाही देऊ शकत अन आपन त्यांना हे पटवून द्याव ह्या मताचा मी अजिबात नाही.

इतर वेळी सदानकदा भावनाकल्लोळात जसा माठातल्या पाण्यात पानी प्यायचा तांब्या बुचकळत रहातो नेहमी वेगवेगळ्या हाताने, असाच प्रवास असतो आपला, प्रत्येकाची तहान भागवता भागवता चहू बाजूने मार खाणारा. ह्याच भावनाकल्लोळातून बाहेर पडून स्वतःचा मुक्त विचार करायला भेटतोना त्यालाच वैचारिक वैराग्याचा एक भाग म्हणता येईल.

आपल्या जन्मा पासून आपल्याला एक जानीव नक्की होते ती म्हणजे आपल्या बरोबर नेहमी कुणी न कुणातरी असत. अगदी प्रत्येक जन आई, वडील, भाऊ-बहीन, इतर नातेवाईक अगदी अनोळखी लोक सुद्धा अशी जाणीव करून देतात की आम्ही नेहमी तूझ्या आजूबाजूला आहोत  तू एकटा नाहीयेस. भावनाशून्य जगातल्या तर्कशुद्ध माणसिकतेचा प्रत्येय देणारा प्रत्येक ईसम ह्या ना त्या कारणाने आपल्या वैराग्याचा जनू निष्ठूरपणाने गळा घोटत असल्याची जाणीव मला अशा वेळी झाल्याखेरीज रहात नाही.

वैचारिक वैराग्य ही माझ्या सारख्या एकलकोंड्या माणसा साठी जणू एक पर्वणीच, महा-सागरातून वाहनारा एक छोटासा झरा,स्वतःला स्वतः विषयी विचार करायची एक सुवर्ण संधी, मी किती खोल आहे हे जाणून घेण्याची वेळ म्हणजे वैचारिक वैराग्य. अथांग आकाशात टीम टीमनारे अनन्त तारे, त्यातील अगदी लख्ख प्रकाशीत तारा जो डोळे दीपवून टाकिल, काही अशा प्रकारे की काही काळ डोळ्यासमोर अंधारी येइल.

आपल्या आयुष्यात एकाकीपणा तिन वेळी अनुभवायला मिळतो, पहीला जन्माला येताना, दूसरी देवाघरी जाताना अन तिसरी मधल्या काळात , हा मधल्या काळातला एकाकीपणा राखून ठेवलेला असतो.

पण आधीच सांगितल्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला इतके लोक जमा झालेले असतात की ते आपन एकटे नाहीत हे क्षणा क्षणाला पटवून देतात. अशा परिस्थितीत वैचारिक वैराग्य अनुभवायला मिळने अत्यंत कठीण पण मग ह्याची ओढ असनार्याने तेवढ्याच जिद्दीने कार्यरत राहण्याची विशेषता एखाद्या झाडावर ज्याप्रमाणे भेरूड तक धरून बसत त्या प्रमाणे टीकून राहण्याची फार गरज आहे, जेणेकरून कालांतराने हळूहळू का होईना पण वाढ होत राहील. अन जशी संधी मिळाली तसा वैचारिक वैराग्याचाअनुभव घ्यायला मिळेल.

स्वतःच्याच मनात अंतरात कसे अन कीती प्रकारचे विचार दडून ठेवलेले आहेत, सर्वाची इथमभूत माहिती काढण्याचा प्रयत्न नक्की केला पाहीजे. विचारांच वैराग्य म्हणजे माझ्यातला मी आहे, भल्या मोठ्या सागरातला एक छोटासा मासा. कुठेही फिरा सारा समुद्रच माझा आहे ह्या भावनेन. विचार सागराविषयीची माझी संकल्पना काहीशी अशी आहे की, ह्या अद्वीतीय अन किनाराहीन सागराचा मी अतिशय छेटासा मासा आहे, पण तरीही हा भव सागर सर्वस्वी माझाच आहे, ह्या सागरातील सर्व काही शंख,शिंपले,माती-रेती, अनु-रेणु अगदी पाण्यासह सर्व काही माझे आहे. एवढीसगळी माझी संपत्ती जर मीच अनुभवायची नाही तर जगायच तरी कशाला अन कस. ह्यातला एक विलक्षण भाग किंवा सारांश पहा, माझ्या समुद्राच पाणी फक्त मलाच गोड लागत अन पचवताही येत, इतरांना मात्र ते खारट लागेल अन पाचन अतिशय अवघड, अशक्य अस मला संबोधता नाही येणार ह्या ठिकाणी.

मग ह्या वैचारिक वैराग्यातून मिळणार्या अपार संपत्तीचा लाभ घेण्याचा यत्किंचितही प्रयत्न स्वतःकडूनच न होणे ही अतिशय हीण गोष्ट आहे असे मला वारंवार वाटत रहाते. ह्या संपत्तीच्या लाभासाठी इतरांवर अवलंबून राहाताच येऊ शकत नाही  अन अशा आकांक्षानी जर मार्गक्रमण केले तर वैचारिक वैराग्याचा निव्वळ अट्टाहास केल्याची जाणीव आपल्याला होते. मी माझ्या अंतरिम सुखासाठी आणि आत्मिय आनंदासाठी हा वेगळेपणा, एकाकीपणा नक्कीच जोपासून ठेवीन. पण वैचारिक वैराग्य सांभाळने वाटतं तितकं सोप्प नाही , वैचारिक वैराग्य जोपासन्या साठी वैराग्याला विचारांच ग्रहण लागण्याची खुप गरज आहे. ज्या वेळी सुर्य अथवा चंद्राला ग्रहण लागत तेव्हा जणू काही ते बुडतच आहेत की काय असा भास आपल्याला होतो, पण ग्रहणातला त्यांच्यामधील शांतपणा अन एकांतपणा अशा काही पद्धतीने असतो की आपल्यावर सुद्धा त्याचा तोच परिणाम दिसून येतो. वैचारिक वैराग्याला ग्रहणाची गरज आहे हे मला वाटायचं कारण म्हणजे, वैचारिक वैराग्य ही अशी गोष्ट आहे की तीचा अनुभव फक्त तोच घेउ शकतो जो त्याच्यातून जातो, इतर कुणाला सहजासहजी मिळत नाही अगदी तसच जस ग्रहणाच्या प्रक्रियेत होत. म्हणून अशा प्रक्रियेतून ज्या विचारांची निर्मिती होते साहजिक आहे असे विचार सरळसरळ कुणाच्या लक्षात येणार नाही. आपण जितक समोरच्या माणसाच्या नजरेत अंधुक होऊ तेव्हा समजायच की आपल ग्रहण वाढत चाललंय अन ही गोष्ट माझ्या बाबतीत जेव्हा होइल तो क्षण माझ्यासाठी परमउच्च आनंदाचा असेल. ह्या आनंदाच्या क्षणाची वाट पाहताना    मला अंतरमणा पासून अस वाटतं की,

“विचारांना माझ्या ग्रहण अशा प्रकारच लागाव की, माझ्या विचार समुद्रात मीच लहान माश्या प्रमाणे, माझ्याच विचारांचा शोध घेत, अगदी अंधारलेल्या खोली पर्यंत जाऊन, विचारांचा प्रकाश शोधून काढावा, आणि त्याच प्रकाशाच्या मार्गाने मार्गस्थ होऊन आयुष्याचा सुंदर क्षण “वैराग्य” जपून जपून वापरत आयष्याचा अंत निमुटपणे सांभाळावा”.

शैलेश आवारी

2020

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel