मधुकर एमबीए झाला व त्याला मुंबईच्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली .आतापर्यंतचे त्याचे सर्व शिक्षण पुण्याला झाले होते .त्याने एका चांगल्या कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट बुक केला .त्याचे आईवडील कोकणात राहत असत .त्याला सांगितल्या प्रमाणे सहा महिन्यात फ्लॅट ताब्यात मिळाला .मुली सांगून यायला सुरुवात झाली.लग्नही झाले. संसार नव्या फ्लॅटमध्ये सुरू झाला .एवढय़ात त्याला परदेशात जाण्याची संधी मिळाली. कंपनीतर्फे ट्रेनिंगसाठी दोन महिने परदेशात राहावे लागणार होते .त्याची बायको उच्च शिक्षित होती.तीही स्वतःसाठी नोकरी पाहात होती .तिला अजून नोकरी मिळाली नव्हती .हल्ली साध्या बीएला नोकरी मिळणे कठीणच होते .दोन महिने एकटीनेच फ्लॅटमध्ये राहणे कठीण होते .तिचे माहेर औरंगाबादला होते .मधुकरने तिला तू एक औरंगाबादला जाऊन राहा किवा कोकणात माझ्या आईवडिलांकडे जाऊन राहा असा पर्याय सुचविला .
लग्न झाल्यावर ती कोकणात सासरी गेली होती .तिला घर परिसर एकूणच कोकण खूप आवडले होते .तिने कोकणात आपल्या घरी जाऊन राहायचे ठरविले .मधुकरला व तिच्या सासू सासऱ्यांना खूप आनंद झाला. मधुकरने तिला घरी आणून सोडले .तिथे चार दिवस आई वडिलांजवळ राहिला आणि नंतर सुधाला (बायकोला) तिथे सोडून तो अमेरिकेला ट्रेनिंगसाठी गेला.पहिले काही दिवस तिचे आनंदात गेले.नंतर तिला करमत नाहीसे झाले .घर संपन्न होते .घरात टीव्ही, नेट, सर्व काही होते .वेळ जाण्यासाठी इतकी साधने असताना हिरमुसले होण्याचे काहीच कारण नव्हते.परंतु सुधाचा स्वभाव थोडा निराळा होता .सुधाला माणसांची आवड होती .कोकणात अगोदर माणसे आणि नंतर मनासारखी माणसे भेटणे कठीण होते .तिला गप्पा मारण्याची प्रथमपासून खूप आवड होती. कोकणात गावातील घरे एकमेकांपासून दूर होती .त्यातही तिच्या वयाचे तिचे आकडे जुळतील असे कोणी नव्हते.मधुकर येईपर्यंत महिना दीड महिना कसा काढावा असा तिला प्रश्न पडला .
तिचे घर देवळापासून जवळ होते.एक दिवस ती फिरता फिरता सहज देवळात गेली होती .जुन्या पद्धतीचे हेमाडपंती देऊळ तिला खूपच आवडले.देवळाला लागून काही गुरवांची घरे होती .देव व देवीचे देऊळ शेजारी शेजारी होते.देवाची पूजा गावातील जोशी करीत असत .तर देवीची पूजा आलटून पालटून निरनिराळ्या गुरुवांकडे असे.ती देवळात बसलेली असताना समोरून एक बऱ्यापैकी देखणी लग्न झालेली तिच्याच वयाची मुलगी देवळात आली.एकमेकांशी बोलताना तिला त्या नवीन मैत्रिणीचा स्वभाव खूपच आवडला.ती जवळच्याच गुरववाड्यातील होती .ती व तिचा नवरा मुंबईला राहात असत .काही दिवसांसाठी ती गावाला आली होती .दोघांचीही मैत्री चांगली जुळली.गावाला समुद्र होता. दोघीही बरोबर समुद्रावर फिरायला जात असत .मैत्रिणीचे नाव वत्सला होते. वत्सलेला दिवस गेलेले होते .सुधाची वत्सला बरोबर असलेली मैत्री मधुकरच्या आई वडिलांना गैर वाटली नाही.
वत्सला गप्पिष्ट होती .तिच्या बोलण्यात नेहमी भुताखेतांच्या गोष्टी गमती चुटके अनुभव येत असत.सुधा गोष्टी ऐकताना त्यात रमून जात असे.भुतांचे प्रकार, कोणते भूत कोणत्या झाडांवर असते ,केव्हा कुठून जावू नये, कारण ते धोक्याचे असते.कोणते धोके संभवतात .भूत मानेवर बसण्याचा केव्हा संभव असतो.एखाद्याला भुताने धरले तर मग काय काय होते? भुताने ज्या माणसाला धरलेले असेल त्याला भुताचे झाड असे म्हणतात .अशा झाडांकडून भूत काय काय गमती करून घेते . काही काही भुते किती चिवट असतात.झाडाला सोडण्यासाठी ती काय काय मागतात .त्यातच एखादवेळी एखाद्या झाडाचा म्हणजे माणसाचा मृत्यू कसा होतो.अशा गोष्टी ती सुधाला सांगत असे.युद्धस्य कथा रम्य: त्याप्रमाणे भुताच्या गोष्टी ऐकायला वाचायला चांगल्या वाटतात.बऱ्याच व्यक्ती अशा गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात .त्या फारशा गंभीरपणे घेत नाहीत .तर काही व्यक्ती अशा गोष्टींना भार संसर्गशील असतात .काही माणसांजवळ रोगप्रतिकारक शक्ती भरपूर असते त्याना सहसा संसर्गजन्य रोग होत नाहीत.तर काहींना चटकन संसर्ग होतो .भुतांचेही तसेच आहे काही संसर्गजन्य असतात तर काहींमध्ये प्रतिकारशक्ती भरपूर असते.
सुधा संसर्गशील होती. वत्सलाने सहज गमतीने सांगितलेल्या गोष्टी ती गंभीरपणे घेत असे.सहज रस्त्याने जाताना तिला या झाडावर कोणते भूत असेल, त्या झाडावर कोणते भूत असेल,असे विचार सारखे डोक्यात येत असत.ज्याची भीती वाटते त्याबद्दल एक आकर्षणही असते .त्यामुळे ती वत्सलाला अशा निरनिराळया गोष्टी सांगण्यास उद्युक्त करीत असे .वत्सला जवळ अश्या गोष्टींचा न संपणारा साठा होता .सुधाच्या मनावर या सर्वांचा गंभीर परिणाम नकळत होत होता.ती रात्री झोपल्यावर तिला भुताची स्वप्ने पडू लागली . आपल्या छातीवर कुणीतरी येऊन बसले आहे .धूर रूपाने हळूहळू कुणीतरी आपल्यामध्ये शिरत आहे .अापण जंगलात एकटे हिंडत आहोत .अकस्मात अक्राळविक्राळ विचित्र चेहऱ्याचे कुणीतरी आपल्यासमोर उभे राहते .कुणीतरी आपल्या पायांना धरून जसे धुणे पाथरीवर आपटावे त्याप्रमाणे आपटत आहे.अशी चित्रविचित्र स्वप्ने तिला पडू लागली .आणि ती घाबरून झोपेतून उठू लागली .केव्हा केव्हा ती इतकी संकटात सापडे चारी बाजूंनी भुते तिला धरून नाचू लागत.तिची बोबडी वळे.तोंडातून शब्द फुटत नसे .स्वप्नामध्ये प्रत्येक मनुष्याची एक सेल्फ प्रोटेक्टिंग सिस्टिम असते .या मूलभूत स्वसंरक्षण पद्धतीमुळे मनुष्य भितीच्या कडेलोटाच्या वेळी आपोआप स्वप्नातून जागा होतो.ती स्वसंरक्षण पद्धती सुधाच्या बाबतीत लवकर काम करीत नसे.त्यामुळे ती स्वप्नात खूप वेळ त्रास सहन केल्यानंतर गुदमरुन गुदमरून घाबरून घाबरून जागी होत असे.
या सर्वांचा सुधाच्या तब्येतीवर हळूहळू वाईट परिणाम होऊ लागला. तिला नीट झोप लागेना.तिचे जेवण कमी झाले.सूनबाईला काय होत आहे ते तिच्या सासू सासऱ्यांना लक्षात येईना.डॉक्टर वगैरे आणून तिची तब्बेत पाहण्यात आली .डॉक्टरना काही दोष आढळला नाही .त्यांनी काही इंजेक्शने व टॉनिक्स लिहून दिली .सुधाला तिच्या आई वडिलांकडे औरंगाबादला पोचवावे असे मधुकरच्या आई वडिलांना वाटू लागले. इथे सुधाला काही झाले तर त्याची जबाबदारी आपल्यावर येईल अशी भीती त्यांना वाटू लागली .त्याच वेळेला सुधाचे आईवडील चारी धाम यात्रेला गेले होते .त्यामुळे सुधाला तिकडेही पाठविता येणे शक्य नव्हते .काही कारणाने मधुकरचे येणेही एक महिना लांबले.
तिची मैत्रीण वत्सला हिचा सर्पदंश झाल्यामुळे तेवढ्यात मृत्यू आला .त्याचा गंभीर परिणाम सुधाच्या मनावर झाला .आता भुतांच्या ऐवजी वत्सला तिच्या स्वप्नात येऊ लागली .वसुधा बहुधा मृत्यूनंतर भूत झाली असे सुधाच्या मनाने घेतले .ती आता आपल्याला सोडत नाही .ती आपल्याला आता घेऊन जाणार असे तिच्या मनाने घेतले.आणि ती जास्त जास्त खंगू लागली .
एवढ्यात मधुकर अमेरिकेहून परत आला.सुधाला घेऊन तो मुंबईला आला .तिथे चांगल्या डॉक्टरला त्याने तिची तब्येत दाखविली .जे खेड्यातील डॉक्टरांनी सांगितले होते तेच शहरातील डॉक्टरांनी काही बऱ्याच चाचण्यानंतर सांगितले .खेडेगावातील वातावरणातून शहरात आल्यावर मधुकरच्या सहवासात तिच्या मनावरील दडपण कितीतरी कमी झाले होते.वत्सला स्वप्नात येईनाशी झाली .स्वप्नात येणारी भुतावळ थांबली.एकूण सर्व व्यवस्थित होत आहे असे वाटू लागले .तिची प्रकृती खूपच सुधारली .मधुकरने सुटकेचा सुस्कारा सोडला .तिला मध्येच केव्हातरी भीती वाटे. केव्हातरी कसलीतरी विचित्र स्वप्ने पडत.घाबरून किंवा ओरडून जागी झाल्यावर किंवा जागी केल्यावर तिला मधुकरच्या कुशीमध्ये आश्वस्त वाटे.मुंबईला आल्याला थांबलेली स्वप्ने पुन्हा डोके वर काढू लागली .डॉक्टरांनी हवा पालट करण्यास सांगितले .पंधरा दिवसांची रजा काढून मधुकर सुधाला घेऊन दार्जिलिंगला गेला.
तिथल्या नवीन वातावरणामध्ये मधुकरच्या सहवासात स्वच्छ शुद्ध वातावरणात थंड हवेमध्ये सुधाच्या मनातील सर्व विचार किल्मिषे जळमटे दूर झाली .तिची स्वप्ने थांबली .प्रकृती हळूहळू ,हळूहळू का, भराभर सुधारली .ती पुन्हा पहिल्यासारखी सतेज आनंदी दिसू लागली .पंधरा दिवसानी दोघेही आनंदाने मुंबईच्या विमानतळावर उतरले.घरी आल्यावर एक दोन महिने स्वप्नाशिवाय आनंदात गेले.नंतर सुधाला आपल्याला दिवस गेले असावेत असा संशय आला. तिला भूक तर लागे परंतु जेवण पुढ्यात घेतल्यावर जात नसे.मधुकर पुन्हा काळजीत पडला .डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी आनंदाची बातमी सांगितली .ती बातमी ऐकून सुधाला विशेष आनंद झालेला दिसला नाही .
तिला वत्सलाने सांगितलेली भुताची एक गोष्ट आठवली.दोन मैत्रिणी असतात .त्यातील एक दुर्दैवाने मरते. मेलेली संसाराच्या तिच्या इच्छा अपुऱ्या राहिल्यामुळे भूत होते .नंतर ती आपल्या मैत्रिणीच्या शरीरात शिरते.तिच्या मार्फत आपल्या इच्छा पुऱ्या करून घेत असते .वत्सला तर आपल्या शरीरात शिरलेली नाही ना अशी शंका सुधाला आली. नंतर तिला वत्सलाने सांगितलेली आणखी एक गोष्ट आठवली .अशा मेलेल्या भूत झालेल्या मैत्रिणीला आपल्या मैत्रिणीचे संसार सुख बघवत नाही.ती मैत्रीण दिवस गेलेली असताना मृत्यू पावलेली असते .त्यामुळे ती तिच्या मैत्रिणीला मूल होऊ देत नाही .दिवस राहिले की तिचा गर्भपात होतो.वगैरे वगैरे .
त्याच रात्री सुधाच्या स्वप्नात वत्सला आली .मला मुलाचे सुख मिळाले नाही मी अगोदरच मृत्यू पावले .तुलाही मी मुलांचे सुख होऊ देणार नाही .असे तिने ठामपणे सांगितले .सुधा दचकून स्वप्नातून जागी झाली.
*आणि तिला आपला गर्भपात झालेला आढळून आला*
(क्रमशः)
प्रभाकर पटवर्धन