सदानंद हा गर्भश्रीमंत होता .त्याचे वय सुमारे तीस वर्षे असावे .वाईन फॅक्टरी त्यांच्या आजोबांनी सुरू केली होती .त्यांनी जमिनी खरेदी करून द्राक्षांच्या बागाही लावल्या होत्या .हळूहळू पैसा साठत गेला .त्याच्या वडिलांनी त्यामध्ये आणखी भर घातली .सुवर्ण चमचा तोंडात घेऊन जन्माला आला ही म्हण त्याच्या बाबतीत खरी होती .लहानपणापासून जे मागेल ते मिळाल्यामुळे नकार ऐकण्याची त्याला सवयच राहिली नाही .एकुलता एक मुलगा लहानपणापासून पैशात लोळत असल्यामुळे पैशामुळे येणारा माज त्याला चढतच गेला .पैशांमुळे या जगात वाटेल ते खरेदी करता येते असा त्याचा समज झाला होता .असतील शिते तर जमतील भुते या म्हणी प्रमाणे अनेक मित्र त्याच्या भोवती जमा झाले होते .महागड्या मोटरसायकल्स मोटारी त्याच्याकडे होत्या .शाळासुद्धा इंग्लिश मीडियम व खूप खर्चिक अशी होती .तिथे केवळ श्रीमंतांचीच मुले येत असत .सदानंद त्या श्रीमंतात सुद्धा श्रीमंत होता.यथावकाश शाळेमधून तो कॉलेजमध्ये दाखल झाला .त्याचे वडील त्याला तो मागेल त्या वस्तू व मागेल तितके पैसे खर्च करण्यासाठी देत असत .नाही हा शब्द ऐकण्याची त्याला सवयच नव्हती. केव्हातरी जर नाही हा शब्द ऐकावा लागला तर वाटेल तितके पैसे खर्च करून त्याचे रूपांतर होकारामध्ये करण्याची त्याला सवय लागली होती.

नेहरू उद्यानाला लागूनच त्याची पाच मजली इमारत होती.दोन मजल्यांवर ऑफिस होते तर दोन मजल्यावर स्वतः सदानंद व त्याचे कुटुंबीय राहात असत .समोरूनच गेलेल्या रस्त्याच्या टोकाला एक लहानसा बंगला होता. सदानंदच्या मानाने ते खूपच गरीब होते.त्यांची मुलगी कमला व सदानंद हे जवळजवळ सारख्याच वयाचे होते. अगदी लहान असताना म्हणजे सुमारे चार पाच वर्षांपर्यंत त्यांची चांगली मैत्री होती .पुढे कमला मराठी मीडियममध्ये गेली व सदानंद इंग्लिश मिडियममध्ये. हळूहळू सदानंदला आपण किती श्रीमंत आहोत हे लक्षात येऊ लागले. गची बाधा झाली.आणि त्यांचे संबंध मैत्री दुरावली .केव्हा रस्त्यात भेट झाली तर हाय हॅलो करण्यापुरतेच संबंध राहिले .

यथावकाश ज्या कॉलेजमध्ये सदानंदने अॅडमिशन घेतली त्याच कॉलेजमध्ये कमलाही आली. सदानंद दोन वर्षे पुढे होता. कमलाचे रूपांतर आता एका सुंदर तरुणीमध्ये झाले होते. सदानंद हळूहळू कमलाकडे आकर्षित होत होता .सदानंदचा मी म्हणेन ते मला त्या त्या वेळी मिळालेच पाहिजे हा स्वभाव ,पैशाच्या जोरावर या जगात काहीही घडविता मिळविता येते हा त्याचा दृष्टिकोन,तिच्या हळूहळू लक्षात आला. सदानंदाचा स्वभाव पूर्वीच्या बादशहा सारखा होता .खूष झाले तर काय वाटेल ते देतील आणि बिथरले नाखुष झाले तर डोकेही उडवतील .सदानंदाचा हा माजोरी व लहरी स्वभाव कमलाला मुळीच पसंत नव्हता. सदानंद आपल्याकडे आकर्षित झाला आहे हे स्वाभाविक स्त्री चातुर्याने तिच्या लक्षात आले.त्याच्या बरोबर फिरायला जाणे सिनेमाला जाणे इ. ती शक्यतो टाळत असे .त्याला टाळण्याच्या प्रवृत्तीमुळे तो आणखी जास्त तिच्याकडे आकर्षित होत होता .पैशांच्या जोरावर काय वाटेल ते करता येते अशी सदानंदची समजूत असल्यामुळे आपण तिला मागणी घालताच आपल्या वैभवाला ती आकर्षित होईल आणि होकार देईल अशी त्यांची समजूत होती .त्यामुळे सदानंद तिला गृहीत धरून चालला होता .

दोघांचेही कॉलेज पूर्ण झाले.कमला एक दिवस आपणहून आपल्या गळ्यात पडेल याची सदानंदला खात्री वाटत होती .आपले वडिलही त्याला नाही म्हणणार नाहीत याची त्याला खात्री होती .कमला एका शाळेमध्ये नोकरीला लागली .दोन भाऊ दोन बहिणी आई वडील आजी असे ते एक मध्यमवर्गीय कुटुंब होते .सदानंदने आपल्या धंद्यांमध्ये लक्ष घालण्याला सुरुवात केली होती .दिवस असेच चालले होते .

पैशाच्या जोरावर वाटेल ते मिळविता येते या त्याच्या बादशाही समजुतीला तडे जाणार होते .एक दिवस कुणी स्वामी येणार होते .त्यांचे एका सभागृहात प्रवचन होते .गावातील प्रतिष्ठित म्हणून यालाही निमंत्रण होते.तिथे गेल्यावर आपल्याला स्वाभाविक स्टेजवर मानाने बसवतील अशी त्याची कल्पना होती .त्याने कार्यक्रमासाठी व इतर कामांसाठी म्हणून घसघशीत दहा हजार रुपयांची देणगी दिली होती .तिथे गेल्यावर व प्रवेशपत्रिका दाखल्यावरही त्यांच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही . सन्मानाने स्टेजवर बसवणे तर दूरच परंतु सभागृहात खुर्चीपर्यंत बसविण्यासाठीही कुणी आला नाही .पूज्य स्वामी त्यांचे भक्त कार्यकर्ते यांचाच स्टेजवर राबता होता .तो रागारागाने तसाच सभागृहातून उठून निघून आला .पैशाच्या जोरावर सर्वत्र मान मिळतोच असे नाही असा त्याला पहिला धडा मिळाला .

एका राजकीय पुढार्‍याचे भाषण होते.हा पक्षाला वाटेल तेवढी देणगी देण्याला समर्थ व उत्सुकही होता .परंतु ते पुढारी फारच आचार शुचिता पाळणारे व तत्त्वनिष्ठ असल्यामुळे तिथेही त्याला कुणी विचारले नाही .हा त्याला दुसरा दणका होता .पैशाच्या जोरावर काहीही मिळविता येते या त्याच्या समजुतीला पुन: तडा गेला .

एका विद्वान पंडितांचे कुठल्यातरी गहन विषयावर व्याख्यान होते .तिथेही हा गेला असता त्याला सामान्य वागणूक मिळाली.कोट्याधीश म्हणून याला ओळखूनही कुणी विशेष महत्त्व दिले नाही . 

भोंदू साधू आणि लाचार विद्वान व राजकीय पुढारी जरी पैशाला दैवत मानत असले तरी खरे साधू विद्वान आणि तत्त्वनिष्ठ राजकीय पुढारी पैशाला महत्त्व देत नाहीत हे त्याच्या पूर्णपणे लक्षात आले .तो पैसा सर्वस्व समजत होता .पैशाची ताकद जरी अफाट असली तरी त्याच्या पुढेही मुळीच न वाकणारे नमणारे लोक असतात हे त्याला तोपर्यंत माहीत नव्हते .

त्याचे वडील अकस्मात आजारी पडले .हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्यावर तो वाटेल तेवढा पैसा खर्च करण्याला तयार होता.त्याने पाण्यासारखा पैसा खर्च केलाही परंतु दुर्दैवाने काही उपयोग झाला नाही .उत्कृष्ट वैद्यकीय उपचार होऊनही त्याचे वडील पंधरा दिवसांनी निवर्तले.पैशाने उत्कृष्ट वैद्यकीय सेवा खरेदी करता येईल परंतु प्राण खरेदी करता येणार नाही हे त्यांच्या लक्षात आले.

त्याला आपले मित्र सच्चे मित्र आहेत असे वाटत होते .वडिलांच्या आजारपणात कुणीही फिरकला नाही .हॉस्पिटलचे तणावपूर्ण वातावरण औषधांचा विशिष्ट उग्र वास याला आवडत नव्हता तसा तो त्यांनाही आवडत नव्हता .अर्थात तो कुणालाच आवडत नाही . परत प्रसंग पडल्यावर सर्वजण मदतीसाठी धावून येतात.दिलदार मित्रानी यावे अशी अपेक्षा होती .परंतु वडिलांच्या मृत्यूपर्यंत कुणीही फिरकले नाही .ते पैसा मित्र होते सच्चे मित्र नव्हते हे त्याच्या लक्षात आले.वडिलांच्या मृत्यूनंतर मित्रांचा ओघ पुन्हा सुरू झाला. याने हॉटेलिंग क्लब मौजमजा यावर त्यांच्यासाठी पैसा खर्च करणे सोडून दिले .हा पैसे खर्च करीत नाही असे पाहिल्यावर मित्र येईनासे झाले.दाणे नाहीत असे म्हटल्यावर पक्षी उडून जावे तसे सर्व मित्र निघून गेले .आपण पैशाच्या धुंदीत खरे मित्र जोडू शकलो नाही हे त्यांच्या लक्षात आले .

वडिलांचे आजारपण व मृत्यू यामुळे सदानंद अगदी मोडून केला .त्याला आपल्याला कोणाचा तरी आधार हवा असे उत्कटतेने वाटू लागले.घरात आई होती. तो काही अगदी एकटा नव्हता.अर्थातच नोकर चाकर खूप होते. धंद्याची सर्व जबाबदारी आता त्याच्यावर पडली होती. त्याला कमलाची आठवण झाली.वडिलांच्या आजारपणामुळे बरेच दिवस त्यांची भेट झाली नव्हती .तो कमलावर प्रेम करीत होता.तिने पुढाकार घ्यावा असे त्याला वाटत होते .आपण प्रपोज केले कि ती लगेच होकार देईल असा त्याचा विश्वास होता.आपल्या इथे पैशांमध्ये ती लोळेल त्यामुळे ती नाकारणे शक्यच नाही असे त्याला वाटत होते.कॉलेजमध्ये तशा मुली त्यांच्या मागे असतच व तोही काही कमी नव्हता.परंतु ती प्रकरणे पुढे गेली नव्हती किंवा त्याने लग्नापर्यंत जाऊ दिली नव्हती.

त्याने फोन करून तिला भेटायचे आहे म्हणून सांगितले .एका बागेमध्ये दोघांची भेट झाली. मागणी घालतानाही ती मान्य करणारच, अापण तिच्यावर उपकार करीत आहोत,असा त्यांचा आव होता . तिला त्याचा उद्दामपणा , पैशांसाठी दुसऱ्याचा सहज अपमान करण्याची सवय , पैशाच्या जोरावर वाटते ते मिळालेच पाहिजे हा त्याचा हट्ट, माहीत असल्यामुळे तिने नम्रपणे नकार दिला .अशा नकाराची त्याला मुळीच अपेक्षा नव्हती. आपल्याजवळ किती पैसा आहे अापण तुला व तुझ्या कुटुंबीयांना कसे सुखात ठेवू वगैरे सांगून पैशाचा रुबाब मारण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु त्यामुळे ती आणखीच दुरावली.तरीही त्याने शेवटचा प्रयत्न म्हणून जर तुझे मत काही कारणाने फिरले तर मला गुलाबाचे फूल पाठव मी त्याचा आनंदाने स्वीकार करील असे सांगितले .त्यावर तिने लहानपणी मी तुझे एक खेळणे पळविले होते. त्यात चॉकलेट्स होती मला ते खेळणे चॉकलेटसह परत करायचे आहे असे सांगितले .त्यावर तो निराश होऊन परत फिरला .आता तर तो पूर्णपणे मोडून गेला होता .पैसा त्याला काही गोष्टी देऊ शकतो परंतु सर्व काही पैशाने मिळत नाही हे त्यांच्या लक्षात आले .

असाच निराश होत्साता दोन चार दिवसांनी केव्हा तरी काम संपल्यावर बागेत फिरत असताना त्याला बागेत एक तरुण जोडपे बसलेले दिसले .मुलगा अठरा वर्षांचा व मुलगी जेमतेम सोळा वर्षांची असावी .त्याने सहज त्यांची चौकशी केली .त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे .त्यांची जात वेगवेगळी आहे .दूरवरच्या खेड्यातून ती येथे पळून आली आहेत .त्यांना त्यांच्या घरातून विरोध आहे. त्यांच्या जीवालाही धोका आहे.वगैरे गोष्टी त्यांनी विश्वासाने त्याला सांगितल्या .त्या युगुलाला कुणाजवळ तरी आपले मन मोकळे करायचे होते .तुम्ही कुठे उतरला आहे असे विचारता ते कुठेच उतरलेले नाही असे कळले.बागेत असे थांबणे धोक्याचे आहे तुम्ही कुठेतरी आसरा घेतला पाहिजे असे त्याने सांगितले .त्यांच्या खिशात फारसे पैसे नव्हते.उद्या एखाद्या मंदिरात ते लग्न लावणार होते त्यासाठी त्यांना पैसा पाहिजे होता .लग्नाशिवाय त्यांना खोली मिळत नव्हती .हॉटेलमध्ये राहणे फार खर्चिक होते.त्यामुळे ती दोघे ती रात्र बागेतच काढणार होती.त्याने त्यांना इथे असे थांबणे धोक्याचे आहे असे सांगितले .प्रथम त्याने त्यांना आपल्या घरी बोलाविले परंतु त्यांना धोका वाटल्यामुळे त्यांनी नम्र नकार दिला . पोलीस किंवा गुंड दोघांकडूनही धोका संभवतो असे सांगितले.ती दोघे घरी यायला तयार नाहीत असे पाहिल्यावर त्यांना त्याने काही पैसे देऊ केले .या पैशांमध्ये तुम्ही आजची रात्र हॉटेलमध्ये काढू शकाल .शिवाय उद्या मंदिरात तुमचे लग्नही होऊ शकेल असे त्याने सुचविले.

त्याच्याकडून पैसे घेणेही त्यांना योग्य वाटत नव्हते.कदाचित यामध्येही त्याचा काही डाव असावा असा त्यांना संशय आला असावा.पैशांच्या जोरावर इथेही आपण काही करू शकत नाही असे त्यांच्या लक्षात आले .

त्या दोघांना तिथे तसेच सोडून जाणे त्याला बरे वाटेना.त्या दोघांना निश्चित धोका पोचेल असे त्याला वाटत होते .त्याच्या पूर्वीच्या स्वभावानुसार नकार दिल्यावर रागाने तो निघून गेला असता .त्याला नकार ऐकण्याची सवय नव्हती .परंतु अनुभवाने आता तो आमूलाग्र बदलला होता .त्याने त्याच्या पुढे आणखी एक योजना ठेवली.इथून जवळच रस्त्याच्या टोकाला माझी एक मैत्रीण राहते .दोन भाऊ दोन बहिणी आई वडील सर्व तिच्याजवळच आहेत.मुलीने तिच्याकडे राहावे व त्या मुलाने आपल्या घरी यावे असे त्याने सुचविले.दुसर्‍या दिवशी त्यांचे लग्न लावून देण्याची व त्याला आपल्या ऑफिसमध्ये नोकरी देण्याचीही तयारी त्याने दर्शविली .या योजनेला त्या युगुलाने संमती दर्शविली .त्या दोघांना घेऊन तो कमलाकडे आपल्या मैत्रिणीकडे गेला.फोन करून त्याने तिला बाहेर बोलावून घेतले.तिला त्याने सर्व हकीगत व ती बागेत राहिल्यास वाटणारा धोका सांगून त्या मुलीला त्यांच्याकडे रात्रीपुरता आश्रय देण्याची विनंती केली . आज्ञा हुकूम याऐवजी त्याचा स्वर विनंतीचा होता .त्याच्या बोलण्या चालण्यातून तो सर्वस्वी बदललेला आहे असे तिच्या लक्षात आले.आज्ञा हुकूम पैशांची मग्रुरी मी म्हणतो ते झालेच पाहिजे अशा हट्टा ऐवजी विनंती,त्या प्रेमी युगुलाबद्दल वाटणारी काळजी, निदान त्यांचे तरी प्रेम सफल होऊ दे अशी प्रामाणिक इच्छा, कमलाने त्याच्या प्रेमाला दिलेल्या नकाराबद्दल दुःख,तिने नकार देऊनही त्याचे पुन्हा तिच्याकडे येणे ,तिच्यावर त्यांने दाखविलेला विश्वास,अशा असंख्य गोष्टी कमलाच्या लक्षात आल्या .तिने आनंदाने त्या मुलीला आपल्याकडे ठेवून घेते म्हणून सांगितले .एवढेच नव्हे तर उद्या मंदिरात त्यांचे लग्न लावून देण्यासाठी तुला मदत करील म्हणूनही सांगितले .आपली विनंती तिने मान्य केल्याचे पाहून त्याला आनंद झाला .त्या मुलीला घेऊन आत घरात जाताना तिने सदानंदला दोन मिनिट थांबण्यासाठी सांगितले .थोड्याच वेळात ती एक छोटासा बॉक्स घेऊन आली .तो बॉक्स सदानंदच्या हातात देऊन ती म्हणाली "मी लहानपणी तुझ्या हातातून हिसकावून घेतलेला हा बॉक्स तुला परत करीत आहे .घरी गेल्यावर उघडून बघ तुला त्यात तुझे खेळणे मिळेल ".

सदानंद तिचा निरोप घेऊन त्या मुलाबरोबर घाईघाईने घरी आला . आपल्या इमारतीत शिरत असताना त्याने वळून पाहिले तर कमला तिथेच उभी राहून त्याच्याकडे पाहात होती .आपल्या खोलीत गेल्यावर त्याने ती बॉक्स उघडून बघितली . 

त्यात एक टवटवीत गुलाबाचे फूल होते 

२८/१२/२०१८©प्रभाकर पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel