श्रीमध्वमुनीश्वरांचे चरित्रविषयक कोणतेही तत्कालीन लिखाण उपलब्ध नसल्याने त्यांचे विश्वसनीय चरित्र लिहिणे कठीण आहे. म्हणून त्यांच्याच कवितेतून निष्पन्न होणारी माहिती व विश्वसनीय वृद्ध गृहस्थांकडून मिळालेली तोंडी माहिती आणि काही जुनी टांचणे यांच्या आधारे त्यांचा परिचय करून देणे प्राप्त आहे. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या सर्व माहितीचा उपयोग करून व साधकबाधक प्रमाणांनिशी चर्चा करून सविस्तर चरित्र लिहिण्याचे हे स्थळही नव्हे हे येथे लक्षात ठेविले पाहिजे.
श्रीमध्वमुनीश्वर हे नाशिकचे राहणार. त्यांचे मूळचे नांव त्रिंबक, वडिलांचे नांव नारायणाचार्य व मातोश्रींचे नांव द्वारावतीबाई. नारायणाचार्य हे देशस्थ, ऋग्वेदी माध्वसांप्रदायी कट्टे वैष्णव; तथापि त्यांनी पुत्रप्राप्तीस्तव त्र्यंबकेश्वरीं अनुष्ठान केले व त्र्यंबकाच्या प्रसादाने पुत्र झाला म्हणून त्याचे नांव त्रिंबक ठेवले. वडिलांनी त्रिंबकाकडून द्विजोचित अध्ययन पूर्ण करून घेतले.
सुशिक्षणसहज ब्रह्मज्ञानाची लालसा तृप्त करण्यासाठी योग्य गुरूची निवड त्रिंबकास होईना म्हणून त्याने सप्तशृंगीस जाऊन श्रीजगदम्बेपुढे तपाचरण आरंभिले. जगदंबेनें दृष्टान्त दिला की माझ्या प्रदक्षिणेच्या मार्गात जो तुला प्रथम भेटेल तोच तुझा गुरु जाण. आशेप्रमाणे प्रदक्षिणा करतांना त्रिंबकास श्रीशुकाचार्यांनी व्याघ्ररूपाने प्रथम दर्शन दिले. त्रिंबकानें जगदंबेचे स्मरण करून वाघापुढे साष्टांग नमस्कार घातला व वर उठून पाहातो तो प्रत्यक्ष श्रीशुकाचार्यांची मूर्ति समोर उभी. त्रिंबकाने अनन्यभावे महाराजांस शरण जाऊन उपदेश देण्या विषयी प्रार्थना केली व महाराजांनीही भूमिका योग्य जाणून गुरुमंत्र दिला. त्रिंबकाने उल्हसित चित्ताने प्रदक्षिणा पुरी केली व जगदंबेचे दर्शन घेऊन तो घरीं प्राप्त झाला. पुत्रवियोगाने दुःखित झालेली मातापितर अत्यानंदित झाली व त्यांनी लवकरच त्रिंयकाचा विवाह उरकून टाकला.
सद्गुरु कृपा झाल्याबरोबर त्रिंबकाची वृत्ति बदलली. विशिष्ट सांप्रदायाचा किंवा देवतांचा अभिमान जाऊन त्यास सर्व विश्वच ब्रह्ममय झाले; परंतु सामान्य जनांस त्याचे काय ? त्रिंबकाचे स्वच्छंद वर्तन न साहून वैष्णवांनीं मध्वाचार्यास मुद्दाम नाशिक क्षेत्रीं आणविले व त्रिंबकास शिक्षा करण्यासाठी त्यांजसमोर उभे केले. त्यासमयीं झालेल्या प्रश्नोत्तरांवरून त्रिंबकाची योग्यता स्वामीस कळून आली व त्यांनी त्याचा सत्कार करून 'मध्वमुनीश्वर' म्हणून त्यास नमस्कार केला.
त्रिंबकाची कीर्ति लवकरच सप्तशृंगीच्या शंकराचार्याच्या कानांवर गेली व तेही त्रिंबकाच्या भेटीस आले. मध्वमुनींची योग्यता पाहून आचार्यास फार संतोष झाला व त्यांनी त्यास वरदपरात्पर' म्हणून गौरविले. लोकांनाही आतां मध्वमुनींची वास्तविक योग्यता कळून येऊन त्यांजविषयी आदर उत्पन्न झाला.

 काही दिवसांनी मध्वमुनीश्वर तीर्थाटनास निघाले. प्रथमच भृगु ऋषींच्या आश्रमाकडे हल्लींचे भगूर येथे जाऊन श्रीगजाननाचे स्तवन केले. गजाननाने प्रसन्न होऊन वरप्रसाद दिला की, तुम्ही आजपासून कवित्वरूपाने ईशस्तवन करीत जावे. तेव्हापासून मध्वमुनी कवित्व करूं लागले.
तेथून मध्वनाथांची स्वारी त्र्यंबकेश्वर, जेजुरी, शेषाद्रि, रामेश्वर, काशी, गया, परळी, पुणतांबें, कोपरगांव, नेवासे, प्रवरासंगम इत्यादि अनेक ठिकाणी जाऊन पारनेरास येऊन पोहोचली. तेथे शिवलिंग गुप्त होते त्याची स्थापना करून प्रसिद्धी केली व यात्रा पुरी करून ते नाशकास परत आले.
मध्वनाथांनी आयुष्यात उदंड तीर्थाटन केले. एकदा त्यांचा मुक्काम औरंगाबादेत असतांना अमृतरायांनी भोंदू वगैरे म्हणून त्यांची निर्भर्त्सना केली. मध्वनाथांनी शांतपणाने सर्व ऐकून घेतले व नंतर अमृतरायाची चांगली कानउघाडणी केली. अमृतरायास अनुताप होऊन ते मध्वमुनीश्वरांस शरण गेले व त्यांनीही त्यांस उपदेश देऊन योग्य मार्ग दाखविला.
औरंगाबादेस असतांना नाथांनी जासुदपुरातील आडांतून एक महादेवाची मूर्ति प्रगट करून तिची स्थापना केली. त्या वेळी शंकरासंनिधच गंगा असावी असे वाटून त्यांनी गंगा तेथे आणण्याविषयी शंकराची प्रार्थना केली. त्यावर शंकरांनी सांगितले की यवनांच्या वस्तीमुळे येथे अनंत पापे होतात म्हणून गंगा येथे येणे शक्य नाही. तथापि तुझी इच्छा राजसदन क्षेत्री पुरी होईल.

मध्वमुनींचे समकालीन निपटनिरंजन नांवाचे सत्पुरुष औरंगाबादेस बेगम पुऱ्यापलीकडील अरण्यांत राहात असत. त्यांच्या आश्रमी मध्वमुनींनी ज्ञानेश्वरी सांगितली व ती निपटनिरंजन, मानपुरीबुवा, सुभानशाहा व शाहनूर हमवी ही मंडळीही तत्कालीन सत्पुरुषांपैकींच होती यांनी श्रवण केली.
औरंगाबादेहून मध्वमुनी शेंदुरवाड़ म्हणजे राजसदन क्षेत्र येथे गेले. तेथे स्वयंभू श्रीगजाननाचे दर्शन घेऊन जवळच नदीतीरी असलेल्या अश्वत्थ वृक्षाखाली त्यांनी आश्रम केला व अतःपर तेथेंच कालक्रमणा करण्याचे ठरविले. तो वृक्ष अद्याप विद्यमान असून आश्रमाच्या जागी त्यांच्या शिष्यांनी प्रचंड मठ बांधिला आहे.
श्रीगजाननासमोरच भागीरथी नांवाचे कुंड आहे. औरंगाबादेस शंकरांनी सांगितल्याप्रमाणे राजसदन क्षेत्री असलेली गंगा ती हीच असें मध्वनाथांनी लोकांस सांगितले. परंतु लोक त्यांची चेष्टा करूं लागले. एकदां गांवांतील एका गृहस्थाचा मुलगा त्या तीर्थात बुडून मृत्यु पावला तेव्हां त्याने तें शव मध्वनाथापुढे टाकून नाथांची व श्रीगंगेची निर्भत्सना केली तेव्हां नाथांनी गंगेची स्तुति करून स्वहस्ते भागीरथींतील पाणी त्या शवावर शिंपडून मुलास जिवंत केले व अशा त-हेने लोकांचा मध्वनाथांच्या सांगण्यावर विश्वास बसला.
पुढे शेंदुरवाद्याहून मध्वमुनी वेरुळास गेले. तेथून दौलताबादेस जाऊन जनार्दनस्वामीची व मानपुरीचुवाची गांठ घेऊन ते टोकीस आले. तेथें कालिकेची मूर्ति भूमीतून काढून तिची स्थापना केली व मोठा उत्सव केला. नंतर तेथून निघून ते शेंदुरवाद्यास परत आले.
मध्वनाथाचा पंढरपुरच्या वारीस जाण्याचा नित्य नेम असे. परंतु वृद्धापकाळ झाल्यावर प्रवासाची दगदग त्यांस असह्य झाली. तथापि पांडुरंगदर्शनची तळमळ कमी झाली नव्हती. अगदीच नाइलाज झाल्यावर मध्वनाथांनी पांडुरंगास पत्र पाठविलें व दर्शन देण्याविषयीं करुणा भाकिली. तेव्हां मध्वनाथासाठी श्रीपांडुरंग शेंदुरवाद्यास उद्धव भटजींच्या घराच्या भिंतीत आले. तेथून मध्वनाथांनी पांडुरंगास बाहेर काढून मूर्तीची स्थापना केली. त्या दिवशी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी बुधवार असून रोहिणी नक्षत्र होते. मूर्ति सांपडल्यावर मध्वनाथांनी पांच दिवस मोठा उत्सव केला, व तेव्हांपासून दरसाल ते हा उत्सव मोठ्या प्रमाणावर करीत असत. उत्सवास पैठणचे एकनाथ, दैठणचे निंबराज इत्यादि सत्पुरुषांचे वंशज व तत्कालीन संतमहंत उपस्थित असत व अद्यापिही त्यांचे वंशज उत्सवास हजर राहून आपापली कामगिरी पार पाडीत आहेत.
बरेच वय झालेले पाहून मध्वमुनीश्वरांनी आपला अवतार संपविण्याचा विचार केला व त्याप्रमाणे शिष्यमंडळींस कळविले. शिष्यमंडळीस कोणास पूजेची भूर्ति, कोणास ज्ञानेश्वरी याप्रमाणे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे प्रसाद देऊन अमृतरायाजीस कीर्तन करण्यास आज्ञा दिली. कीर्तनांत रामनामाचा गजर चालू असतां मध्वमुनीश्वरांनी नश्वर देहाचा त्याग केला व आत्मस्वरूपांत ते मिळून गेले.
ही गोष्ट शके १६५३ मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या संध्याकाळी घडली. दुसऱ्या दिवशी शिष्यभंडळीने मध्वनार्थास समाधि दिली व समाधीपुढे अमृतरायांनी कीर्तन केले. मध्वनाथांस सत्यनाथ नावाचा एक मुलगा होता. तो व नाथांचे कुटुंब या दोघांचाही काल नाथांच्या हयातीतच झाला होता.

मध्वमुनीश्वरांच्या शिष्यवर्गात अमृतराय, भोजराज, लक्ष्मणराव आदिकरून मोठमोठे लोक होते. त्यांनी मध्वमुनीश्वरांनी सुरू केलेले उत्सव चालू ठेवण्या करितां पेशवे व निजाम सरकाराकडून पुष्कळ उत्पन्न मिळविले. ते बहुतेक सर्व उत्सव त्यांचे सांप्रदायिक शिष्य सध्यांचे श्रीमंत श्रीनाथरावसाहेब जहागिरदार मु.औरंगाबाद यांचे घराणे आज तागायत करीत आले आहे.
मध्वमुनीश्वर स्वतः उत्तम कीर्तन करीत असत. त्यांनी अनेक देवस्थानांचा महिमा प्रगट केला व पुष्कळ उत्सव चालू केले. अमृतरायांनी वर्णन केल्याप्रमाणे ते परमहंस कोटींतील होते. संतमंडळींत त्याचप्रमाणे विद्वानमंडळीत त्यांची मोठी मान्यता होती. कवि म्हणून त्यांची योग्यता मोठी आहे. त्यांच्याच कवितेवरून त्यांचे अध्ययन दांडगें, बुद्धि विशाल, निरीक्षण मार्मिक व प्रतिपादन निर्भीड असल्याचे स्पष्ट दिसून येते.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel