(एक काल्पनिक परंतु संभाव्य गोष्ट )

वन खात्याने आत रस्ते खेळविले आहेत .चेकपोस्टवरून जाताना आपण किती दिवस आत राहणार आहोत याची नोंद करावी लागते .नोंद केल्याच्या तिप्पट दिवसाहून जास्त काळ झाल्यावर जो मनुष्य आला नाही त्याचा तपास वनखात्यामार्फत   केला जातो .तिप्पट दिवसाहून जास्त अशी अट ठेवण्याचे कारण की आत गेलेला मनुष्य दोन दिवस राहलो असे  समजत असतो परंतु प्रत्यक्षात तो दुप्पट किंवा तिप्पट काळ आत राहिलेला असतो.आत गेलेला मनुष्य काळाचे भान हरवतो .त्यांच्यासाठी काळ  हळू चालतो किंवा मध्येच केव्हातरी बंद पडलेला असतो.साधारणपणे जितके दिवस मनुष्य आत राहणार असतो त्याच्या तिपटीपेक्षा कमी वेळात तो बाहेर येतो . असा आजपर्यंतचा अनुभव आहे .त्याला मात्र आपण जितके दिवस आत राहणार अशी नोंद केली तितकेच दिवस राहलो असे प्रामाणिकपणे वाटत असते.आत जाताना प्रत्येकाने तो जितके दिवस राहणार असेल त्याच्या तिप्पट दिवस पुरेल इतका शिधा  घेतलेला आहे की नाही याची तपासणी केली जाते.आत गेलेल्याचे किती दिवस हरवतील किंवा किती दिवस हळू चालतील सांगता येणार नाही.त्या त्या व्यक्तीवर व इतर परिस्थितीवर ते अवलंबून असते .हल्ली प्रत्येक व्यक्तीला एक बटना सारखे यंत्र दिले जाते.त्या यंत्रामुळे चेकपोस्टवरील मनुष्याला आत गेलेला मनुष्य कुठे आहे ते सतत समजत राहते.  तो बाहेर न आल्यास तो असेल तिथे जाऊन त्याला घेऊन येता येते .

तर आम्ही चौघे जण वनखात्याच्या चेकपोस्टवर नोंदणी करून, आम्ही दोन दिवस राहणार असल्याचे सांगून, त्याच्या तिप्पट शिधा घेतला आहे याची त्यांना खात्री करून देऊन,त्यांचे ते विशिष्ट यंत्र  कपड्यांवर अडकवून अरण्यात शिरलो.

त्या अरण्यात भयाण शांतता होती .नेहमी कुठच्याही अरण्यात गेल्यावर काही ना काही निरनिराळ्या प्रकारचे आवाज ऐकायला येत असतात.मोरांचा केकारव ,कोकिळेचे कुहुकुहु गुंजन, कावळ्याची काव काव, टिटवीचा टिटिर टिटिर,किंवा आणखी कोणा पक्षाचे गायन ओरडणे ऐकू येतअसते.वानर माकडेहि जंगलात सामान्यतः असतातच .त्यांचे खेकसणे किंवा नर वानराचा हुप हुप असा आवाज ऐकू येत असतो.  कोल्हेकुई वाघाची डरकाळी अशासारखे अनेक असंख्य आवाज येत असतात .  या जंगलात अशा प्रकारचे कोणतेही आवाज येत नाहीत .रानात रात्री रातकिड्यांचे आवाज येत असतात .येथे तेही येत नाहीत .चितळ हरीण सांबर यांचे आवाज कोल्हेकुई कसलेही आवाज येथे नसतात . येथे सरपटणारे प्राणीही नाहीत .सर्वत्र भयाण स्मशान शांतता पसरलेली असते .त्यामुळेच हे जंगल भारलेले आहे .येथे भुताचे वास्तव्य आहे.येथे काही तरी अमानवी शक्ती वास करीत असाव्यात अशी समज पसरलेली असावी .येथे कुणीही प्राणी राहात का नाही हेही एक गूढच आहे.

येथे सर्वत्र पुष्कळ  निर्झर  आहेत .त्यांचे पाणी मधुर आहे .त्या पाण्यामध्ये असे काहीतरी असावे की ज्यामुळे आपण काळाचे भान हरवतो .आत येणारे पर्यटक आपल्याबरोबर पाणी  जरूर आणतात .परंतू या जंगलात तहान भरपूर लागते .निर्झर भरपूर आहेत त्यांचे पाणी चविष्ट आहे. ते पाणी प्यायला हरकत नाही .असे माहीत असल्यामुळे कुणीही आपल्याजवळ पाण्याचा जास्त साठा ठेवीत नाही .या पाण्यामध्ये काहीतरी जादू किंवा मोहिनी असावी असे मला वाटते.

या जंगलांमध्ये  कुणीही प्राणी रहात का नाही हे सांगणे मोठे कठीण आहे .आम्ही दोन दिवसांसाठी म्हणून येथे आलो होतो. आमच्या मताप्रमाणे आम्ही दोन रात्री तीन दिवस  राहलो.परंतु सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षात आम्ही येथे पाच रात्री रहालो. याचे स्पष्टीकरण देता येणे अशक्य आहे.पाणी प्यायल्यामुळे कदाचित काही मोहिनी, भ्रम, निर्माण  होत असेल.त्यामुळे काळाचे भान कदाचित  हरवले जात असेल.एखादा ज्यावेळी बेशुद्धावस्थेत असतो त्यावेळी त्याला आपण किती काळ बेशुद्ध होतो हे माहीत नसते.ज्यावेळी एखादे मादक द्रव्य मनुष्य घेतो त्यावेळी त्याचे काळाचे भान हरवते.हे सर्व सहज समजण्यासारखे आहे .

जर तेथील वनस्पती काही विशेष प्रकारचे गंध सोडीत असतील तर त्यामुळेही नशा येणे शक्य आहे .

परंतु घडय़ाळ मोबाईल यासारख्या वस्तू बरोबर वेळ दाखवीत असल्याच पाहिजेत .त्यांचेही काळाचे भान का हरवते हे सांगणे मोठे कठीण आहे .असे सांगितले जाते की जर आपण प्रकाशाच्या वेगाने जाऊ तर काळ स्तब्ध होईल.अशा वेळी घड्याळ तीच वेळ दाखवील.

थोडक्यात या जंगलात काळाचे भान का हरवते ते सांगणे अशक्य आहे.कदाचित आणखी एक संभाव्य स्पष्टीकरण देता येईल .नशेमध्ये आपणच घड्याळाचे काटे मागे फिरवितो. मोबाइलही तसाच अॅडजस्ट करतो .काहीही असो गोंधळाचे वातावरण आहे एवढे नक्की .

या विशिष्ट नशेमध्ये कदाचित गटातील लोक एकमेकांवर हल्ला करीत असतील आणि त्यांचे त्यांनाच कळत नसेल .किंवा ते नशेमध्ये वेडेवाकडे झुडपातून धावत असतील, आपटत असतील,पडत असतील ,त्याशिवाय होणाऱ्या जखमांचे ओरखड्यांचे स्पष्टीकरण देता येणार नाही .(यक्ष भुते वगैरे तुम्हाला इजा करतात असे एक स्पष्टीकरण आहेच )

त्या जंगलात आम्ही विलक्षण अनुभव घेतला .आम्ही आपल्या बरोबर स्लिपिंग बॅग घेतलेल्या होत्या .रात्री मोठी शेकोटी पेटवून त्या धगधगत्या शेकोटीच्या आसपास आम्ही झोपत असू .रात्री जंगलात विलक्षण थंडी वाजत असे.कुणीही प्राणी जंगलात नसल्यामुळे आम्हाला त्यांच्यापासून भीती अर्थातच नव्हती .

त्या जंगलात आपल्या ओळखीची आंबे फणस जांभूळ पेरू यासारखी झाडे होती तर काही फळझाडे अनोळखी होती. सर्वांची फळे मधुर होती.तीही आम्ही खात होतो.चेकपोस्टवर ज्याप्रमाणे अाम्हाला पाणी पिण्याला हरकत नाही असे सांगितले होते ,त्याचप्रमाणे फळेही खाण्याला हरकत नाही असे सांगण्यात आले होते. आमच्या वर कोणत्या गोष्टींचा परिणाम झाला हे सांगता येणे शक्य नाही .पाणी, हवा ,फळे ,की आणखी काही.आम्ही घड्याळाचे काटे उलटे फिरवीत होतो कि आणखी कुणी फिरवीत होते ते सांगता येणे शक्य नाही .

बरोबर पुरेल इतका पाण्याचा साठा नेणे शक्य आहे .तेथील मधुर फळांची चव न चाखता राहणे शक्य आहे.परंतु हवेचे काय त्या हवेत श्वासोच्छ्वास केल्याशिवाय राहणे अशक्य आहे .आणि जर हवाच भारित असेल तर काळाचे भान हरवणारच.आणि त्या तंद्रीमध्ये मनुष्य कदाचित घड्याळाचे काटे उलटे फिरवत असेल .याशिवाय असे का होते त्याचे स्पष्टीकरण देणे अशक्य आहे . जर तंद्री असेल नशा असेल तर प्रत्येकाची वर्तणूक वेगवेगळी असली पाहिजे.सर्वजण एकाच पद्धतीने काळाचे भान हरवतील, हे कसे काय शक्य आहे .ही गोष्ट आकलनाच्या पलीकडील आहे .

आपल्या मेंदूमध्ये सतत काळाचे भान असते .आपण ज्ञानेंद्रियांनी जे जे काही ग्रहण करतो त्याचे मुद्रण, रेकॉर्डिंग, मेंदूमध्ये  सतत होत असते .जर काही कारणांनी हे मुद्रण थांबले तर काळ थांबतो.ज्यावेळी आपण पुन्हा भानावर येतो तेथून काळ पुढे सुरू होतो.मुद्रण होत नाही असा मधला जो काही काळ जातो तो कांही मिनिटे असेल कांही तास कांही दिवस असेल किंवा काही वर्षेही असेल .

त्या जंगलात काही कारणाने हे  मेंदूतील  मुद्रण मध्येच काही काळ थांबते असे मला वाटते.घड्याळ मोबाइल चुकीची वेळ दाखवीत आहेत असा आपल्याला भ्रम होतो. आपण ती वेळ दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो .परंतु ही आकलनाच्या पलीकडील गोष्ट आहे की एका गटातील  सगळ्या जणांचे वर्तन एकाच प्रकारचे का असते.गटामधील सर्वांच्या हातून काळ एकाच प्रकारे का निसटतो?निरनिराळ्या गटांच्याकडून काळ निरनिराळ्या प्रकारे कां निसटतो ? 

थोडक्यात त्या जंगलात कोणत्याही कारणाने असो परंतु एका गटातील  सर्वांच्या मेंदूवर सारख्याच प्रमाणात अनिष्ट परिणाम होतो असे म्हणावे लागेल .आपण पूर्ण शुद्धीत आहोत असे आपल्याला वाटते परंतु तसे प्रत्यक्षात नसते .

त्या गूढ अजब जंगलाविषयी चर्चा चालूच राहतील .निरनिराळी स्पष्टीकरणे लोक देत राहतील .

काळ स्तब्ध होतो असे म्हणता येणार नाही .ज्याप्रमाणे हृदयाचा ठोका चुकतो तसेच  काळाचा ठेका चुकतो एवढे मात्र खरे!!!

(समाप्त )

१५/७/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel