शरदचा मेसेज वाचून शामलीला अतिशय आनंद झाला .रात्रभर शरद काय उत्तर देईल याबद्दल तिला जी धाकधूक वाटत होती  ती क्षणात मावळली .तिला आपण पिसासारखे हलके होऊन आकाशात तरंगत आहोत असे क्षणभर वाटले .हॉलमध्ये येऊन तिने स्वतःभोवतीच एक हलकीशी गिरकी मारली .ते पाहून तिच्या आईने विचारले की काय ग एवढी एकदम तू आनंदित का झाली ?एकदम एकाएकी असे काय झाले ?आईचे व तिचे संबंध मैत्रिणीसारखे होते.तिने जाऊन आईला हलकेच मिठी मारली आणि सांगितले की आज दुपारी तुला मी सर्व काही सांगते .आईने तिचा एक गालगुच्चा घेतला आणि बरे म्हणून सांगितले . आपली लेक असे काय सांगणार म्हणून तिला उत्सुकता होतीच .

दुपारी जेवण झाल्यावर दोघीही मायलेकी निवांतपणे हॉलमध्ये सोफ्यावर बसल्या.बाबा व शशांक नोकरीवर गेले होते .शामलीने सुरुवातीपासून सुरुवात करून आईला सर्व हकिगत सांगितली .आईने सर्व हकीगत ऐकल्यावर तिचा चेहरा गंभीर झाला .अग तू गंभीर का झालीस असे विचारता ती म्हणाली .ज्याला तू लहानपणापासून भाऊ मानले ज्याला तू भाऊबिजेला ओवाळले त्याच्याशी आता लग्न ही कल्पना जरा चमत्कारिक वाटते.त्यावर शामली म्हणाली अग तो माझा चुलत आते मावस मामे कुठचाही   भाऊ नाही.हल्ली बऱ्याच वेळा अशा भावंडांमध्येही लग्ने होताना आपल्याला दिसतात मग ज्याला आपण भाऊ म्हणून मानले त्याच्याशी लग्न केले तर काय बिघडले.त्याला लहानपणी बहिणीची हौस होती ती त्याने पुरविली एवढेच .बाकी त्याच्यामध्ये काय गैर आहे .त्यावर आई म्हणाली की त्यांच्यात वाईट काहीच नाही. मुलगा चांगलाच आहे.चांगला शिकलेला आहे. चांगली नोकरी आहे . सुस्वभावी आहे.आपल्या ओळखीचा आहे.आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो तुला आवडतो आणि त्याला तू आवडतेस .शिवाय तू माझ्यापासून दूर जाणार नाहीस.नुसते गॅलरीत उभे राहिले तरी आपल्याला एकमेकांचे दर्शन होईल .जावई म्हणून कधी मी त्याच्याकडे पाहाले नाही .एवढे चांगले स्थळ जवळ असूनही आम्ही लांब मुलगा शोधत होतो .मला मान्य आहे .तुझे बाबा व दादा आता काय म्हणतात ते पहावयाचे.

त्यावर शामली म्हणाली की आता मी ही जबाबदारी तुझ्यावर सोपवते मला बाबांना सांगतांना संकोच वाटेल .रात्री जेवायला बसल्यानंतर आईने विषय काढला .शामली काय म्हणते आणि म्हणाली ते न सांगता शामलीसाठी मला एक चांगले स्थळ सुचले आहे अशी प्रस्तावना केली.शरद कसा वाटतो असे पुढे विचारले .त्याचे काय झाले तो तर चांगलाच मुलगा आहे असे दोघेही एकदम म्हणाले.तो नेहमी तर लहानपणापासून येथे येतो .मीही तेच म्हणते शामलीची आई म्हणाली.मुलगा शामलीसाठी कसा वाटतो?म्हणजे !दोघेही एकदम म्हणाले .लहानपणापासून दोघेही एकमेकांना ओळखतात दोघांचेही एकमेकांकडे येणे जाणे आहे मग त्यांचे लग्न लावून दिले तर काय बिघडले . त्यावर शशांक म्हणाला की तो तर तिला  बहीण मानतो .त्यावर शामलीची आई म्हणाली की जर तो तयार असेल तर?विचार केला पाहिजे दोघेही म्हणाले .त्यात विचार काय करायचा?मुलगी आपल्या डोळ्यासमोर राहील. गॅलरीतून हाक मारली की लगेच येईल.अनोळखी मुलगा पाहून काळजी करीत बसण्यापेक्षा हे फार बरे नव्हे काय?दोघांच्याही चेहऱ्यावरून तिचे बोलणे त्याना पटत आहे असे दिसत होते .

शामली काय म्हणते बाबांनी विचारले .मी तिला विचारले ती म्हणाली जर सगळ्यांची हरकत नसेल तर मी तयार आहे . मला शरद आवडतो लहानपणापासूनचा तो माझा मित्र आहे .या सर्व चर्चेच्या वेळी शामली तिथे नव्हती ती मुद्दामच आपल्या बेडरूममध्ये होती.बाबांनी तिला जोरात हाक मारून बोलाविले . ती आपल्याला जसे काही माहितीच नाही असा चेहरा करून आली.शशांकने विचारले आपली आई काय म्हणत आहे ते ऐकलेस का ? त्यावर बाबांनी आम्ही तुझे लग्न शरदशी लावून द्यावे असे म्हणतो त्यावर तुझे काय  म्हणणे आहे ?त्यावर मी नाही जा असे म्हणून ती लांब पळाली .त्यावर दोघेही मनापासून हसले .चला एक बाजू तर क्लिअर झाली मनातल्या मनात म्हणत शामलीच्या आईने सुस्कारा सोडला

( क्रमशः)

प्रभाकर  पटवर्धन 

------------------------
प्रेमाचा साक्षात्कार (भाग)६

शरदच्या फोनची रिंग वाजली. शामलीने आनंदाची बातमी फोनवर सांगितली .मी इकडची बाजू क्लीअर केली तू आता काका काकूंना  विचार असे तिने शरदला सांगितले.त्यावर दोघांचे बराच वेळ बोलणे झाले आणि शेवटी असे ठरले की शामलीच्या वडिलांनी रीतसर शरदच्या वडिलांकडे बोलावे .

दुसऱया दिवशी शामलीचे वडील शरदच्या वडिलांकडे सहज म्हणून गप्पा मारण्यासाठी आले .बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्यांनी मुख्य बोलण्याला सुरुवात केली . दादांना शरदच्या वडिलांना दादा म्हणत ही जरा नवीन बातमी होती.दादा चतुर होते एकदम बायकोला हाक मारण्याऐवजी त्यांनी मला शरदला विचारले पाहिजे त्याचप्रमाणे हिचेही मत घेतले पाहिजे असे म्हणून तूर्त विषय लांबवला. नानानीही फार ताणून न धरता ठीक आहे असे म्हटले.  नाना निघून गेल्यावर दादांच्या बायकोने नाना विशेष काय म्हणत होते असे विचारले .त्यावर दादा काही बोलणार एवढ्यात त्यांच्याकडे कुणी तरी आले आणि तो विषय तूर्त मागे पडला .रात्री दादा सविस्तर बोलत असतानाच त्यांना एकदम घाम येण्याला सुरुवात झाली .त्यांना कसेसेच व्हायला लागले .आणि मग त्यांची तब्येत एवढी बिघडली की त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले .त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आला असे निदान होऊन स्टेंट वगैरे घातल्यानंतर ते घरी आले. या सर्व गडबडीमध्ये एक दोन महिने गेले .नंतर लगेच विषय काढणे योग्य नाही म्हणून आणखी दोन महिने गेले .

इकडे दोघांच्याही जिवाची घालमेल सुरू होती .शरदला आपल्या आईचा शुभ अशुभ शकून अशकुन संकेत पत्रिका इत्यादीवर बराच विश्वास आहे हे माहित होते .दादांना हार्ट अटॅक आला हा शुभ शकुन नाही ही मुलगी चांगल्या पायगुणांची नाही असे शरदच्या आईचे मत होते .ती लहानपणापासून शामलीला ओळखत होती .दोन्हीही कुटुंबांचे एकमेकांकडे येणे जाणे नेहमी असे .जरी भाऊ बहीण असे ते एकमेकांना म्हणत असले तरी कुठे तरी ही जोडी चांगली दिसेल असे नेने काकूना (शरदचे आडनाव नेने होते )नेहमीच वाटत असे.जर दादांना हार्टअटॅक आला नसता तर त्यांनी लवकर संमती दिली असती .अर्थात पत्रिका वगैरे सोपस्कार करावे लागले असते .

असेच दोन चार महिने गेल्यावर नंतर नानांनी पुन्हा दादांजवळ विषय काढला .दादांचा स्वभाव काकूंच्या बरोबर विरुद्ध होता .पत्रिका वगैरेवर  त्यांचा विश्वास नव्हता.विषय निघाल्यावर नेनेकाकूनी साफ नाही म्हणून सांगितले .ती मुलगी चांगली आहे परंतु आपल्याला ती चांगल्या पायगुणाची नाही असे त्यांचे ठाम मत झाले होते. कारण एकच नाना ज्या दिवशी प्रपोजल घेऊन आले त्याच रात्री दादांना हार्ट अटॅक आला .

शामली व शरद दोघांनाही सर्वांच्या सहमतीने लग्न व्हावे असे वाटत होते.कुणाचेही मन दुखवून ही गोष्ट व्हावी असे कुणालाच वाटत नव्हते.शरद व शामली एकमेकांना नेहमीप्रमाणे भेटत होती .सर्वांचेच नेहमीप्रमाणे येणे जाणे चालू होते.हा पेच कसा सोडवावा हे कुणालाच कळत नव्हते .नेनेकाकूंना जास्त समजावयाला गेले तर त्यांचा जास्त विरोध निर्माण होईल अशी सर्वानाच खात्री होती .नेनेकाकूंचा स्वभाव सर्वच ओळखून होते. आता काय करावे असा यक्षप्रश्न नाना व दादा या दोघांपुढे पडला होता .

( क्रमशः)

प्रभाकर  पटवर्धन 

------------------------
प्रेमाचा  साक्षात्कार (भाग)७.

दादा व नाना या दोघांनी एकत्र येऊन एक योजना आखली.शरद व शामली या दोघांची  पत्रिका कुणातरी ज्योतिषाला दाखवावी.आणि त्याला छत्तीस नाही परंतु बत्तीस गुण(कारण छत्तीस गुण जुळू नयेत अशी समज आहे त्यामुळेच छत्तीसचा आकडा अशी म्हण निर्माण झाली आहे) जुळतील अशा प्रकारे पुन्हा बनवायला सांगावी. मग ही जोडगोळी एका प्रसिद्ध ज्योतिषांकडे गेली .काकूंना फसवावे असे कुणालाच वाटत नव्हते .परंतु नाईलाजाने असे करावे लागत आहे अशी समजूत दोघांनीही आपल्या मनाची घातली होती . हे लग्न व्हावे असे मनापासून सर्वांनाच वाटत होते .दोन्ही घराणी नेने व लेले(नानांचे आडनाव लेले होते हे सांगावयाचे राहूनच गेले आहे ) त्यामुळे  नात्याने एकत्र  आली असती .मित्रत्वाच्या नात्याने दोन्ही  घराणी एकत्र होतीच परंतु नात्याने ती एकत्र आली असती.

ज्योतिषी नानांच्या ओळखीचे होते .प्राथमिक गप्पाटप्पा झाल्यावर मुख्य मुद्द्याकडे दोघेही वळले .त्यांनी दोघांच्याही पत्रिका बघण्यासाठी त्यांच्या पुढ्यात ठेवल्या.प्रथम ज्योतिषानी वरवर दोन्ही पत्रिका पाहिल्या .नंतर कॉम्प्युटरवर काही आकडेमोड केली असावी .त्यांचा गंभीर चेहरा पाहून दोघेही मनात चरकले.बहुदा पत्रिका मुळीच जुळत नसावी असा त्यांना संशय आला .अशा परिस्थितीमध्ये पत्रिका बत्तीस गुणांची जुळवणे योग्य नव्हे असे त्यांना वाटू लागले .त्यांचा ज्योतिषावर विश्वास नसला तरीही कुठेतरी थोडा तरी विश्वास होताच .सुमारे अर्धा तास अशा प्रकारे आकडेमोड करण्यात घालविल्यानंतर त्या पत्रिका टीपॉयवर दीक्षितांनी(ज्योतिषी) ठेविल्या .दोघांनीही मुद्दामच पत्रिकेवर नाव टाकले नव्हते .कारण कदाचित नाव पाहून त्यांनी पत्रिका नीट बघून खरे सांगितले नसते .असे त्यांना बहुदा उगीचच वाटत होते .

दीक्षित खो खो हसत म्हणाले अरे दादा नाना तुम्ही वरती नाव टाकले नाही म्हणून मी या पत्रिका कुणाच्या ते ओळखणार नाही असे तुम्हाला कसे वाटले .शामली व शरद यांच्या पत्रिका एकदम जुळत आहेत .दे आर मेड फॉर इच अदर .तुम्ही नाही म्हटले तरीही त्यांचे लग्न हे होणारच .हे ऐकून दोघांनीही निश्वास टाकला .नंतर त्यांनी आपली समस्या दीक्षितांना सांगितली .त्या दिवशी विषय काढायला व मला लहानसा अटॅक यायला एकच गाठ पडली .त्यामुळे आमची ही या लग्नाच्या एकदम विरुद्ध झाली .तिला समजावण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो होतो .जर पत्रिका जुळली नसती तर आम्ही तुम्हाला ती जुळवा अशी विनंती करणार होतो .परंतु तुम्ही गंभीर चेहरा करून आम्हाला गोंधळात टाकले होते.आम्ही उगीचच तणावाखाली  होतो .मी मुद्दामच तुम्हाला चकवण्यासाठी तशी मुद्रा केली होती दीक्षित हसत हसत म्हणाले .

आता सर्वच प्रश्न सुटले होते फक्त काकूना कसे समजवावे एवढाच प्रश्न होता .आणि तोही काही कमी गंभीर नव्हता .दीक्षितांनी त्यावर एक योजना सुचविली .दीक्षितांवर काकूंचा विश्वास होता .तेव्हा" दीक्षित योजना "नक्की सफल होणार अशी दोघांचीही खात्री झाली 

चार आठ दिवस गेल्यावर ठरविल्याप्रमाणे दीक्षित एक दिवस दादांकडे आले.पोहे चहा पाणी वगैरे झाल्यावर सर्वांच्या मनमोकळ्या गप्पा सुरू झाल्या .नेने काकूनी दीक्षितांना आज तुम्ही इकडे कुठे असे विचारले .त्यावर सहज असे दीक्षित म्हणाले .त्यावेळी ठरविल्याप्रमाणे शरद बाहेर गेला होता .काहीतरी देण्याच्या निमित्ताने ठरल्याप्रमाणे  शामली नेनेकाकांकडे आली .ती गेल्यानंतर सहज म्हणून दीक्षितांनी ही कोण मुलगी असे विचारले .त्यावर का म्हणून दादांनी विचारले .त्यावर दीक्षितांनी ही मुलगी ज्या घरात जाईल त्या घराचे मंगल करील अशी टिप्पणी केली.त्यावर काकूंनी असे कशावरून म्हणून विचारले .दीक्षित म्हणाले माझा जसा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे त्याचप्रमाणे हस्त सामुद्रिक व फेसरीडिंगचाही अभ्यास आहे .या मुलीचा चेहरा व पावले पाहून मी छातीठोकपणे असे सांगतो की हिची पावले सोन्याची आहेत.

त्यावर काकू म्हणाल्या एकदा तुम्ही तिची व शरदची पत्रिका पाहा व मगच मला काय ते सांगा . ठीक आहे एक दिवस आम्ही दोघेही पत्रिका घेऊन तुमच्याकडे येऊ .नंतर सटरफटर गप्पा होऊन बैठक संपली .

मुत्सद्देगिरीने नंतर दादांनी तो विषय अज्जिबात घरात काढला नाही .काकू आज ना उद्या ते तो विषय काढतील म्हणून वाट पाहात होत्या .शेवटी काकूनीच तो विषय काढला.दादा म्हणाले मी मुद्दामच विषय काढला नाही .ती मुलगी तुझ्या हिशेबाने कमनशिबी आहे .तेव्हा उगीच त्या विषयात चर्चा करण्यात काय अर्थ आहे .त्यावर काकू म्हणाल्या असे कसे मीही चुकत असेन. जर एवढे मोठे ज्योतिषी शामलीची पावले सोन्याची आहेत असे म्हणत आहेत तर ते चूक कसे असेल .ते नामांकित ज्योतिषी आहेत आपण शामलीची व शरदची पत्रिका घेऊन एक दिवस त्यांच्याकडे जाउया.त्या दिवशी तिच्या व शरदच्या लग्नाचे बोलणे सुरू असताना तुम्हाला अटॅक आला त्यामुळे मी तिला नको म्हणत होते . नाहीतर मलाही ती लहानपणापासून आवडत होती .परंतु दोघे भाऊ बहिण म्हणून वागत असावेत असे लक्षात आल्यावर मी काही बोलले नाही.त्या दिवशी तुम्हाला आलेला अटॅक हा योगायोग असावा .त्याचा शामलीशी काहीही संबंध नसावा.शामली या घरात आली तर शरद खूष होईलच परंतु तुमचेही आयुष्य वाढेल . नंतर दादांनी रीतसर नानांकडे पत्रिका मागण्याचे नाटक केले .मग दोघेही  दिक्षितांकडे गेले.दीक्षितांनी पत्रिका जुळत आहे हे खुद्द सांगितले.

आणि अशाप्रकारे दोघांच्या लग्नातील मोठा अडसर दूर झाला .सर्वांच्या सहमतीने लग्न झाले पाहिजे असा दोघांचाही आग्रह पूर्ण झाला.

समाप्त 

९/१/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel