गोष्ट कोकणातील आहे .

सीतारामअप्पांच्या आगरात चोरीसाठी पाऊल टाकण्याची कुणाची हिंमत नव्हती .जबरदस्त महापुरुष त्यांच्या आगराची राखण करीत होता .चोरी करणाऱ्याला हा महापुरुष काही ना काही शिक्षा केल्याशिवाय सोडीत नसे .त्यांचे आगर नदीच्या किनार्‍यापासून सड्यापर्यंत पसरलेले होते .डोंगरावरील सपाट भागाला सडा असे म्हणतात .

सड्यावर खडकाळ जमीन, रेतीची जमीन , मातीची जमीन,सर्व प्रकारची जमीन असते .

या गावाला पूर्व व पश्चिम दोन्ही बाजूंना उंच डोंगर होते .उत्तरेला बऱ्यापैकी उंचवटा(डोंगर) होता.या उत्तरेच्या डोंगरांमधून एक नदी उगम पावत होती.नदी लहानच होती परंतु तिला पाणी बऱ्यापैकी असे .पावसाळ्यात ती केव्हा केव्हा दुथडी भरून वाहत असे .पाऊस संपला की त्यावर निरनिराळया जागी तीन चार धरणे बांधली जात .ही धरणे कच्ची असत .पावसाळ्याच्या सुरुवातीला धरणाच्या भिंतीचा थोडा भाग फोडून पाण्याला वाट करून दिली जाई .पावसाळ्यानंतर तेवढाच भिंतीचा भाग पुन्हा बांधून धरण तयार होत असे.नदीला ठिकठिकाणी झरे होते .उन्हाळ्यातही धरणांमध्ये थोड्याबहुत प्रमाणात पाणी साठत असे .या धरणांमधून डाव्या व उजव्या बाजूला पाट(लहान कालवे ) काढलेले होते.त्यातून दोन्ही बाजूनी धरणातील पाणी वाहत असे. पूर्व व पश्चिम या बाजूच्या डोंगरावर ठिकठिकाणी वस्ती होती .या पाटाच्या पाण्यावर माड पोफळी यांची बने दोन्ही डोंगरावर तरारली होती .

एका पाटावर जेवढी घरे असतील तेवढ्यामध्ये पाटाचे पाणी वाटले जाई.प्रत्येकाच्या पाणी घेण्याच्या वेळा ठरलेल्या असत. या वेळा नियमितपणे चक्राकृती बदलत असत.प्रत्येकाला विशिष्ट कालावधीनंतर निरनिराळ्या वेळी पाणी उपलब्ध होत असे .पहाटे सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री मध्यरात्री इत्यादी .प्रत्येकाच्या ठरलेल्या वेळेमध्ये इतरांनी पाटाच्या पाण्याचा वापर करावयाचा नसे. तसा कुणी वापर करतो असे आढळल्यास त्याला शिक्षा केली जाई .अर्थात ही गोष्ट सर्वांच्या संमतीने ,सर्वांच्या हितासाठी ठरलेली असे .प्रत्येकाच्या आगराला पाणी मिळावे हा त्यामागे हेतू असे .धरण बांधण्यासाठी खर्चही एकत्रित केला जाई .तो सर्वजण वाटून घेत असत .एक प्रकारे सहकारी तत्त्वावरची ही योजना होती .

सीताराम अप्पांच्या आगराची रचना पुढीलप्रमाणे होती.नदीकाठी विस्तृत भागावर माड पोफळी रतांबे यांची झाडे होती .या माड पोफळीच्या बनाच्या डोंगराच्या वरच्या भागातून पाट जात होता.माड व पोफळीना एक दिवसाआड तरी पाणी द्यावे लागे.डोंगराच्या उतारावर सपाट प्रदेश करून पायर्‍या  पायऱ्यांची रचना केलेली होती .माड पोफळी नंतर पाट व पाटानंतर सीतारामअप्पांचे  घर होते. घराशेजारी प्रशस्त गोठा होता . घराच्या वरच्या, सड्यापर्यंतच्या भागाला डाग असे म्हणत. डागेमध्ये हापूस आंब्याची कलमे, रायवळ आंब्याची झाडे,फणस व इतर अनेक प्रकारची झाडे होती.सडय़ावर गवताळ कुरण होते.थोड्या फार फरकाने गावातील सर्व  ब्राह्मणांच्या  घरांची रचना अश्या  प्रकारे होती .

या सर्व भागाला दोन्ही बाजूंना गडगे (दगडाचे कुंपण) घातलेले होते.दोन घरांच्या मालमत्तेच्या मध्ये एक समान गडगा होता.सीतारामअप्पांचा हा  सर्व भाग महापुरुषाच्या अंमलाखाली होता.महापुरुष कोण होता कसा होता याची कुणालाही निश्चित काही  कल्पना नव्हती.परंतु त्याचे अस्तित्व मात्र सर्वांना पदोपदी जाणवत असे .डागेमध्ये एक आंब्याचे झाड होते.त्याचे आंबे कधीही काढले जात नसत.त्या झाडाखाली एक लहानशी शंकराची घुमटी होती.त्या आंब्याच्या झाडाला महापुरुषांचे झाड असे म्हटले जाई .त्याच्या खाली पडलेले आंबे कुणीही खाऊ शकत असे परंतु कुणाचीही त्या झाडावर चढण्याची हिंमत नव्हती .त्या झाडाचे आंबे काढले जात नसत . त्या झाडावर दगड मारण्याचीही कुणाची हिंमत नव्हती. उन्हाळ्याच्या दिवसांनी आंबे, फणस, पिकल्यावर वांदरांची(काळ्या तोंडाची आकाराने मोठी माकडे) टोळी येत असे.वांदर जिकडे तिकडे झाडांवरून उड्या मारीत परंतु त्या झाडावर एकही वांदर चढत नसे.कशी कोण जाणे  महापुरुषाच्या अस्तित्वाची चाहूल त्यांना लागे.त्याचा त्यांना बहुधा  धाक वाटत असे. 

रोज जेवण्या अगोदर महापुरुषाचा नैवेद्य केळीच्या पानावर काढून तो त्या झाडाखाली नेऊन ठेवला जात असे .रोज महापुरुष पाटावर मध्यरात्री स्नान करतो .नंतर तसाच ओलेत्याने दत्तमंदिरात जातो. देवळातील घंटा वाजवून पूजा करतो आणि नंतर अदृश्य होतो अशी आख्यायिका होती.     

महापुरुषांचे दर्शन घरातील सर्वांना  पहिल्यांदा पुढील प्रमाणे झाले. चांदणी रात्र होती. सर्वत्र सामसूम होती. रात्रीचे बारा वाजले होते.घरात कुणीतरी जागे होते .पाण्याच्या पाटाच्या कडेला स्नानासाठी एक पाथर,एक मोठा दगड होता.तिथे कोणीतरी स्नान करीत आहे असे वाटले .कुणीतरी मंत्र म्हणत होते आणि दोणीतील(दगडी चौकोनी रांजण) पाणी तांब्याने आपल्या अंगावर ओतत होते.मध्यरात्री गार पाण्याने कोण स्नान करीत आहे असा प्रश्न बघणाऱ्याला पडला.एक पांढरी शुभ्र धूसर उंच निंच अशी आकृती तेथे दिसत होती. घरातील वृद्ध आजीबाईनी त्याचे उत्तर दिले. ती म्हणाली अग बये हा तर आपला संरक्षक महापुरुष .रोज रात्री बारा वाजता हा येथे मंत्र म्हणत स्नान करतो .नंतर तसाच ओलेता आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या दत्तमंदिरात जातो. पूजा अर्चा करतो देवळातील घंटा वाजवितो आणि नंतर अदृश्य होतो .डागेमध्ये ज्या आंब्याच्या झाडाखाली एक शंकराची घुमटी आहे त्या झाडावर हा राहतो.आपले व आपल्या आगराचे हा संरक्षण करतो.तो दिसत नाही. तो फक्त जाणवतो. आज आपल्याला  दिसला हे आपले भाग्य.म्हणूनच रोज जेवणाच्या अगोदर आपण केळीच्या पानावर नैवेद्य काढतो व तो महापुरुषाच्या झाडाखाली नेऊन ठेवितो. 

स्नान झाल्यावर महापुरुष दत्ताच्या देवळात गेला.घंटा वाजविल्याचा आवाज  सर्वांनी ऐकला.महापुरुषाचे अस्पष्ट दर्शन सर्वांना झाले.आजपर्यंत आपण जे नुसते ऐकत होतो त्याच्या अस्तित्वाची  प्रचिती सर्वांना आली.

कोणत्याही गावात काही अधार्मिक नास्तिक टवाळखोर असतातच . अशा एकाने पैज लावली .मी अप्पांच्या आगरात रात्री जावून तेथून नारळ काढून आणतो.तू जाऊ नकोस तुझ्या जिवाला धोका होईल असे बऱ्याच जणांनी सांगून पाहिले .परंतु हा पठठ्या  म्हणाला ,महापुरुष वगैरे सर्व झूट आहे .आपल्या आगरात चोरी होऊ  नये म्हणून अप्पांनी उठविलेली ती हूल आहे.

रात्री तो अप्पांच्या बागेत शिरला .एका नारळाच्या झाडावर चढून  नारळ तोडून खाली टाकणार एवढ्यात नारळाच्या झाडाखाली एक प्रचंड उंच आकृती दिसली.हां ह़ां म्हणता ती माडाच्या (नारळाच्या) झाडा एवढी उंच झाली .त्या टवाळखोराला नास्तिकाला पकडून त्या आकृतीने हात लांब करून गडग्या बाहेर (कम्पाउंड बाहेर ) ठेवून दिले.भीतीने त्याची दातखिळी बसली.तो बेशुद्ध झाला .पंधरा दिवस तो तापाने आजारी होता . तापामध्ये तो असंबद्ध बडबड करीत होता .खूप वैद्य औषध पाणी अंगारे धुपारे झाले.शेवटी जेव्हा महापुरुषाच्या आंब्याच्या झाडाखाली नैवेद्य ठेवण्यात आला .नारळ वाढविण्यात (फोडण्यात) आला. महापुरुषाची मनोभावे क्षमा मागण्यात आली, त्यावेळीच तो बरा झाला .

माडावरील नारळ पूर्ण जून झाले म्हणजे आपोआप गळून पडतात.अश्या गळून पडलेल्या नारळाला बाहेरील कुणाची  हात लावण्याची हिम्मत नव्हती.कुणी उचलण्याचा प्रयत्न केल्यास त्याला काहीतरी प्रचिती येई.केव्हां त्याला मार पडे, केव्हां त्याला एखादी धूसर आकृती घाबरवीत असे ,तर केव्हां अशी व्यक्ती बेशुद्ध होऊन पडत असे .

अप्पांची कलमांची मोठी बाग होती.इतर आगरातील आंबे चोरीला जात असत.आंबे चोरीला जाऊ नये म्हणून राखणदार ठेवले जात .अप्पांनी कधीही राखणा ठेवला नाही. अप्पांच्या आंब्यांना,आंब्यालाच काय परंतू कोणत्याही वस्तूला हात लावण्याची कुणाची हिंमत नव्हती .घराबाहेर त्यांच्या किमती वस्तूही तशाच पडलेल्या असत .त्याला हात लावण्याची कुणाचीही हिंमत नव्हती .

तरीही दोन चार वर्षांनी एखादा चोरीचा प्रयत्न करीत असे.अश्या चोराला काही ना काही शिक्षा नेहमी होत असे.

कधी त्याच्या कानाखाली जबरदस्त आवाज काढला जात असे . कानातून रक्त वाहून अशी व्यक्ती काही वेळा बेहरी होत असे.त्या कानाने त्याला जन्मभर ऐकू येत नसे.

कधी तो बेशुद्ध अवस्थेत झाडाखाली सापडे. त्यानंतर दोन चार महिने तो आजारी असे .काही वेळा तर खंगून खंगून त्याचा मृत्यू होई.

कधी झाडावर आंबे काढण्यासाठी नारळ, सुपारी, चोरण्यासाठी चढलेल्या व्यक्तीला कुणीतरी झाडावरून ढकलून देत असे .ती व्यक्ती तो चोर कायमचा लंगडा होत असे.

कधी कधी एखाद्या चोराला घाबरवून पळवून लावण्यात येई .

चोराला काही ना काही शिक्षा जरूर होत असे .शिक्षेचे स्वरूप महापुरुषाच्या इच्छेवर अवलंबून राही.

पाटाच्या पाण्याचे निरनिराळ्या वेळेमध्ये वाटप केले जाई हे मी वर म्हटलेच आहे.एकाने अप्पांच्या वेळेमध्ये पाण्याचा झाडांना घालण्यासाठी वापर केला .अप्पांकडे अपेक्षेपेक्षा पाणी कमी येऊ लागले.त्यावरून अप्पांचे व त्याचे भांडण झाले .तो अप्पांना अद्वातद्वा काही तरी बोलला.त्याचवेळी एकदम चमत्कार झाला .त्या भांडणाऱ्या व्यक्तीच्या आगरात पाटाचे पाणी शिरण्याअगोदर जमिनीमध्ये गुप्त झाले.ते पुन्हा अप्पांच्या आगरामध्ये वाहू लागले.पाणी गुप्त कसे होते ते कोणालाही कळेना.त्या भांडणाऱ्या व्यक्तीचे आगर पाण्याविना सुकू लागले .त्याला पिण्यासाठी स्नानासाठी  इत्यादीसाठीही पाणी मिळत नाहीसे झाले .जेव्हा त्या इसमाने अप्पांची परवानगी घेऊन, त्यांच्या आगरात येऊन, महापुरुषाच्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन, त्याची क्षमा मागितली,लोटांगण घातले, नारळ वाढवला, पुन्हा अशी आगळीक करणार नाही अशी शपथ घेतली, तेव्हाच पाण्याचा स्रोत त्याच्या आगरात वाहू लागला. त्यानंतर अशी आगळीक करण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही.    

सीतारामअप्पा बऱ्यापैकी सधन होते.बाहेरून दरोडेखोर आले होते .त्यांना सीताराम अप्पांच्या महापुरुषाची माहिती नव्हती. कोकणातील घरे कांही वेळा दूर दूर असतात.या गावातही ब्राह्मणांची घरे अशीच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लांब लांब अंतरावर होती . सीतारामअप्पांच्या घरावर दरोडा पडला.सीतारामअप्पा सावकारी करीत असत.घरातील सर्व माणसांना जाग आली .दरवाजा फोडण्यात आला. तिजोरीच्या चाव्या मागण्यात आल्या.घरातील स्त्रियांना दागिने काढून देण्यास सांगण्यात आले .जर सांगितल्याप्रमाणे ऐकिले नाही तर ठार मारण्यात येईल अशी धमकी देण्यात आली.घरातील सर्वांची पाचावर धारण बसली .भीतीने बोबडी वळली .महापुरुष हे सर्व काहीही न करता कां पाहात  आहे असा प्रश्न काहींना पडला.तेवढय़ात चमत्कार झाला .एकाही दरोडेखोराला हालचाल करता येईना .त्यांचे जणू काही पुतळे झाले होते.फोन करून पोलिस येईपर्यंत जवळ जवळ तीन चार तास गेले.तोपर्यंत ते दरोडेखोर जणूकाही बांधून ठेवल्यासारखे  एका जागी स्तब्ध होते .पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्यावरच त्याना हालचाल करता येऊ लागली.   

(अश्या  महापुरुषांच्या कथा कोकणात कित्येक गावात ऐकावयाला मिळतात. अनेक वेळा अनेक जणांना त्याची प्रचितीही येते .एखाद्या आगरातील महापुरष जबरदस्त असतो. क्रियाशील असतो.तर काही ठिकाणी महापुरुष मवाळ असतो.जसा निरनिराळया माणसाच्या स्वभावात फरक असतो, त्याप्रमाणेच निरनिराळ्या महापुरुषांच्या स्वभावात फरक असतो.रागीट शांत सत्वशील तामसी असे अनेक प्रकार सांगता येतील.)

(एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यावर त्याचा जीव जर आपल्या कुटुंबामध्ये आगरामध्ये अडकलेला राहात असेल,तर मृत्यूनंतर काही काळ ती व्यक्ती त्या आगरात वास करीत असावी .कमी जास्त काळानंतर ती पुढील गतीला जात असावी .त्या आगरात अशी व्यक्ती, असा आत्मा, वास करीत असताना तो कुटुंबाचे आगराचे रक्षण करीत असावा .  यथावकाश काही काळानंतर तो पुढील गतीला गेला तरीही अख्यायिका मागे उरतातच. असा माझा एक तर्क आहे .)

(आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही, कळत नाही, म्हणून ती गोष्ट अस्तित्वातच नाही असे  ठामपणे म्हणता येणार नाही .अज्ञात अशी अनेक जगे,विश्वे एकाच विश्वात असू शकतात.फिरत असताना परस्परांच्या आसाना छेद होतो, तेव्हा ती दृगोचर होत असली पाहिजेत. काही काळ त्यांचा अनुभव येतो. नंतर अनुभव येण्याचे थांबते.हा काळ काही वर्षे येथपासून काही शतकेही असू शकतो.विश्वाच्या अफाट पसार्‍यात अनंत काळामध्ये शे दोनशे वर्षे म्हणजे काहीच नाही .)

(काही कदाचीत वावड्या अफवा असू शकतील .परंतू पिकल्याशिवाय विकत नाही हेही लक्षात ठेवले पाहिजे .)

*अशी ही सीतारामअप्पांच्या आगरातील महापुरुषाची कथा.*

*कोकणात प्रत्येक आगरामध्ये एखादा महापुरुष सामान्यतः असतोच.त्याच्या काही ना काही अख्यायिका असतातच .*

*तो कमी जास्त क्रियाशील असतो किंवा कधी कधी मुळीच क्रियाशील नसतो.* 

*अश्या  महापुरुषाची एखादी घुमटी, एखादे झाड, असते.* 

*दररोज, दर अमावस्येला, किंवा कधी कधी वर्षातून एकदा, तेथे नारळ दिला जातो.*

*काही ठिकाणी घुमटीची, महापुरुषाची, पूजाअर्चा, नैवेद्य, याही गोष्टी नेमाने केल्या जातात.*     

२/१२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel