Bookstruck

बेपत्ता पाय

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter List

त्याचे दोन्ही पाय कापलेले होते, तो साधारण सात आठ वर्षांचा होता, रंग गोरा दिसत होता पण चेहरा धुळीने माखलेला होता. त्यामुळे काळाच दिसत होता.

लाल दिवा नव्वद सेकंदात हिरवा होणार होता. टिक टिक करून आकडे खाली लोटत होते… नव्वद…एकूणनव्वद.....ऐंशी.

त्या मुलाला पाणी हवे होते. त्याने हातानेच खुणा करत विचारले. रिक्षावाल्याने त्याला त्याची बाटली दिली, त्याने आ करून  घटाघट पाणी प्यायले आणि बाटली परत केली.

रिक्षा चालकाने शर्टाच्या खिशातून दहा रुपयांची नोट काढली आणि त्याला दिली. मीही लगेच खिशातून दहा रुपये काढले कारण मला वाटले होते की तो माझ्याकडेही येईल, पण त्याने माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही आणि तो परत फुटपाथवर चढला...

पण हे प्रकरण इथेच संपले नाही. त्याच्याकडे पाहून मला क्षणभर वाटले की तो एखाद्या शर्यतीत धावत आहे आणि कधी एकदाची फिनिश लाईन येईल याची वाट पाहत तो धावत आहे, जी तो ओढून ताणून ओलांडेल. इतक्यात लाल दिवा हिरवा झाला, त्याने रस्ता ओलांडला आणि तो टुणकन उडी मारून फुटपाथवर चढला.

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला फूट नव्हते तरीही तो फूटपाथवर चढला. यासाठी त्याला जबर शिक्षा व्हायला हवी होती. सरकारने पायाने चालण्यासाठी जी जागा बनवली होती, तिथे तो राखाडी निकर घातलेले आपले कळकट्ट ढुंगण घासत फिरत होता.

त्याच्यासारखे इतरही अनेकजण होते ज्यांना मी आजूबाजूच्या सिग्नलवर भुकेल्या आणि तहानलेल्या अवस्थेत धावताना अनेकदा पाहिले होते. या सगळ्या मुलांचे पाय कुठे गेले असावेत असा प्रश्न मला नेहमी पडत असे.

तसा त्यांच्यापैकी एकही जन्मतः अपंग दिसत नाही. अखेर त्यांचे पाय कोणी बरं चोरले असतील? असे तर नाही ना झाले की कधीतरी रात्री  काही उंदीर आले असावेत ज्यांनी त्यांचे पाय कुरतडून टाकले असतील.

पण त्यांच्या त्या पायांचे उंदीर काय तरी करणार? बरं ते उंदीर पण हे चोरलेले पाय लावून शर्यतीत धावत असतील का?

किंवा त्यांनी ते पाय कुठेतरी लपवून ठेवले असावेत, तेही कुलूप लावून. हा चोरीचा माल कधी पकडला गेला तर? या मुलांचे हस्तगत झालेले पाय पोलिस परत बसवतील का?

या मुलांचे पाय पाहून मला असेही वाटले की कोणीतरी करवतीने ते कापले असावेत... एखाद्या कारखान्यात... पण त्यांचे पाय त्यांच्या शरीरापासून ज्या क्षणी वेगळे झाले असतील, त्या मुलांना तो क्षण आठवत असेल का?

किंवा कदाचित त्याची वेदना इतकी जास्त असेल की त्यांच्या भूतकाळात जे काही त्यांच्यासोबत घडत होते त्याचे दु:ख या वेदना आणि रक्त यांच्यात वाहून गेले असेल आणि त्यांनी स्वप्नात पाहिलेल्या फुटक्या पाटी पेन्सिलचे तुकडे उंदरांनी कुठेतरी कचरा पेटीत फेकून दिले असतील. .

विचारात अस्वस्थ होऊन संध्याकाळी झोपी गेल्यावर मला वाटलं की ही मुलं अजूनही स्वप्न पाहत असतील का? आणि पाहत असतीलही तर ते त्या स्वप्नात धावत असतील की फक्त जमिनीवर सरपटत राहत असतील? मला तर या गोष्टीची राहून राहून खूप काळजी वाटते,

पण तरीही मी माझी स्वप्न पूर्वीप्रमाणेच पाहत राहीन. पण ही कळकट्ट मुलं जी गटारात लोळणारे किडे आहेत, त्यांच्या अस्तित्वामुळे स्वच्छ, टापटीप दिसणारे काळे आणि गुळगुळीत डांबरी रस्ते घाण होत आहेत.

खरंच हि सगळी मुलं नसतील तर हे रस्ते किती स्वच्छ दिसतील...नाही का?'

 

Chapter List