काशी जवळ एका गांवांत एक शेतकरी राहात असे. त्याचे नांव जनार्दन. त्याच्या जवळ एक लहानसे घर व अर्धा एकर जमीन होती. त्यांत भाजीपाला लावून जे उत्पन्न निघेल त्याच्यावर तो आपला चरितार्थ चालवीत असे. त्याला सात मुली होत्या. त्या सर्वांचे पालन पोषण तो मोठ्या प्रेमाने करीत असे. मुली मोठ्या होऊ लागल्या तशी त्याला हळू हळू काळजी वाटू लागली की या मुलींच्या लग्नासाठी हुंडा कोठून द्यायचा आणि म्हातारपणी आपल्याला आधार कोणाचा असेल? या चिमण्या काय भुर्रर्र दिशी उडून जातील. मग आपल्याजवळ कोण राहणार? सात मुली आहेत या गोष्टीची त्याला कधी काळजी वाटली नाही. एकदा त्याने आपल्या शेतांत कांदे लावले होते. पीक आल्यावर ते विकण्यासाठी तो काशीस गेला.

तेथे वेशीवरच त्याला त्याचा बालमित्र विश्वनाथ भेटला. दोघांनी परस्परांची विचारपूस केली. विश्वनाथने सांगितले की

“मी व्यापार करीत असून त्यांत मला पुष्कळ पैसा मिळतो. मी एक मोठे घर सुद्धां विकत घेतले आहे.”

जनार्दन म्हणाला, "मी बाबा शेतकरीच आहे. मला सात लेकरें आहेत. तीन मुलगे व चार मुली."

आपल्याला मुलगा नाहीं हे सांगण्यास त्याला जरा संकोच वाटला. हे ऐकतांच

विश्वनाथ म्हणाला, "भाग्यवान आहेस बुवा. मग मला थोडी मदत कर. माझा धाकटा मुलगा नुकताच आजारांतून उठला आहे. त्याच्या बरोबर राहण्यासाठी काही दिवस तुझ्या एका मुलाला पाठव. अरे आपण जसे दोस्त तशी त्यांची दोस्ती होईल."

आता पंचाइत पडली. नाही म्हणावे तरी बरें नाही. तो विचारात पडला.

त्यावर विश्वनाथ म्हणाला, “विचार कसला करतोस पाठवूनच दे."

जनार्दनाला त्याचे म्हणणे कबूल करणे भागच पडले. तो परत निघाला तेव्हा तोच विचार त्याच्या मनांत घोळत होता. मित्राकडे कोणाला व कसे पाठवावें...? आपल्या एखाद्या मुलीला मुलाचा वेष देऊन पाठविल्यास कसे काय होईल...?

शेवटी घरी आल्यावर त्याने आपल्या मुलींना एकेकीला बोलावून विचारले. पण मोठ्या साही मुली आपले केस कापून मुलाचा वेष घेण्यास तयार झाल्या नाहीत.

त्या म्हणाल्या, "मुलीनें केस कापणे हे अशुभ मानतात. आम्ही काहीं तें करणार नाही."

मुलींचे हे म्हणणे खरे होते. म्हणून बाप सुद्धा पुढे काही बोलु शकला नाही. सर्वात धाकटी मुलगी चुणचुणीत होती. ती आपल्या वडिलांना म्हणाली

"बाबा तुम्ही आमच्यासाठी एवढे कष्ट सहन करतां. आमच्या हौशी पुरवितां. त्याच्या बद्दल आम्ही तुम्हाला काय देऊ शकणार...! म्हणून मी तुम्ही सांगाल तें ऐकण्यास तयार आहे."

बापाच्या इच्छेप्रमाणे शशीने आपले केस कापून मुलाचा पोशाख केला. पायांत वाहाणा व हातात काठी घेऊन विश्वनाथच्या घरी गेली. विश्वनाथ मोठा व्यापारी होता. त्याचे घर एका राजवाड्यासारखे होते. शशीला पाहून विश्वनाथाला फार आनंद झाला. त्यानें आपल्या सर्वांत धाकट्या मुलाला बोलावून त्याच्या बरोबर शशीला पाठविलें. सुदर्शन नुकताच आजारांतून उठला असल्याने फार अशक्त झाला होता. शशी त्याची छान सेवा करीत होती. तिच्या प्रेमळ सेवेमुळे सुदर्शन फार लवकर सुधारत चालला.

पाहिल्यापासून त्याला वाटे ही मुलगी आहे. नुसता मुलाचा वेष घेऊन तेथे आली आहे. जसजसा परिचय वाढत गेला तसतसा सुदर्शनचा संदेह दृढ होत चालला आणि हळू हळू शशीविषयी त्याच्या मनात प्रेम वाटू लागले. या नवीन रोगाने त्याची प्रकृति पुन्हां बिघडू लागली. त्याच्या आईने पाहिले की सुदर्शन अशक्त होऊ लागला आहे. तिने त्याला विचारले.

सुदर्शन म्हणाला-" आई ! शशी कोण आहे असें तुला वाटते ? माझें ठाम मत आहे की ती मुलगी आहे आणि मला तिच्याविषयी प्रेम वाटू लागले आहे. पण ती मुलाच्या वेषांत असल्यामुळे माझें प्रेम मी तिच्या पुढे स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाही. यामुळे मला फार वाईट वाटते. तूंच काही तरी ह्यांतून मार्ग काढ."

"एवढेच ना??? अरे त्याला सोपा उपाय आहे. असें कर, उद्या तूं तिला घेऊन शिकारीला जा. तिला नाठाळ घोडा दे. जर खरोखरच ती मुलगी असेल तर ती त्यावर बसू शकणार नाही आणि शिकारीसाठी धनुष्यबाण दे. तो हि ती मुलगी असेल तर नीटपणे धरूं शकणार नाही. त्यांत तिची परीक्षा होईल आणि मग खरी गोष्ट बाहेर पडेल." आईने सांगितले.

सुदर्शन आईच्या सांगण्याप्रमाणे दुसरे दिवशी शशीला घेऊन शिकारीला निघाला. तिच्या हातांत धनुष्यबाण देऊन एक नाठाळ घोडा दिला. शशीने त्याच्यावर एकाद्या कसलेल्या स्वाराप्रमाणे स्वारी केली आणि शिताफीने घोडा दौडविला. शिकारीत सुद्धा तिने आपले कौशल्य दाखविले. सुदर्शन चकित झाला. घरी आल्यावर त्याने आपल्या आईला तिचे कसब सांगितले.

"अरे मग खरोखरच मुलगा असेल शशी. तुला उगीचच भास होत असेल." आई म्हणाली.

"नाही ग आई. ती नक्कीच मुलगी आहे आणि तिचें तें स्वारी आणि शिकारीचे कौशल्य पाहून माझें प्रेम जास्तच दृढ होऊ लागले आहे." सुदर्शन म्हणाला.

"आतां दुसऱ्या पद्धतीने तिची परीक्षा करूंया. उद्यां तिला माझे दागिने दाखविण्यासाठी घेऊन ये. मग पुढे मी पाहीन." आईने सुचविले.

दुसरे दिवशी सुदर्शन शशीला म्हणाला, “चल शशी, आपण दागिन्याची खोली पाहू आणि तिथेच जवळ आवरूं, कालच मला आई म्हणाली होती."

दोघे खोली आवरण्यास गेले. आवरता आवरतां सुदर्शनाने आईची दागिन्यांची पेटी उघडून शशीला दाखविली. ते हिरे, मोती, माणकें पाहून शशी थक्क झाली. ती ते निरखून पाहू लागली. ही संधि पाहून सुदर्शनला त्याच्या आईनें बोलाविले. दागिने तसेच शशीजवळ सोडून तो निघून गेला. शशीनें इकडे तिकडे पाहिले. कोणी नाही असे पाहून ती एक एक दागिना घेऊन निरखून पाही. अंगावर घाली आणि काढून ठेवी. सुदर्शन व त्याची आई हे सर्व पडद्याच्या आडून पाहात होती. मध्येच शशीला काही तरी चाहूल लागल्याचा भास झाला. तिने भराभर घातलेले सर्व दागिने काहून ठेविले. तिला वाटले आपल्याला या लोकांनी पाहिले असावे. म्हणून ती तेथून जी निघाली ती सरळ आपल्या घरी निघून गेली.

सुदर्शन व त्याच्या आईनें खोलीत येऊन पाहिले तर त्यांना तेथें शशी दिसली नाही. त्यांनी तिचा शोध केला. पण ती कोठे दिसली नाही. शेवटी ती घरी गेली असेल असेंच त्यांना वाटले.

"जर तूं जनार्दनरावांच्या घरी गेलास तर तुला शशी तिच्या खऱ्या रूपांत दिसेल. जा, तेथे जाऊन त्यांना सर्व सांग आणि म्हणाव मी तिच्याशी लग्न करावे, म्हणतों. मला वाटते ते काही नाही म्हणणार नाहीत." आईने सांगितले.

सुदर्शन जनार्दनाकडे गेला. त्यावेळी तो आपल्या घराच्या सोप्यावर काय करावें या विचारांत बसला होता.

“तुमचा मुलगा घरांत कोणाला सांगितल्या शिवाय निघून आला आहे. माझें त्याच्याशी थोडें काम आहे म्हणून भेटावयाचें आहे मला त्याला थोडें बोलवा तुम्ही.” सुदर्शन म्हणाला.

"बैस बोलावतो.” असे सांगून जनार्दनराव आंत गेले. पण तोपर्यंत तिनें पुरुष वेष टाकून आपले नेहमीचे कपडे दागिने घातले होते. सुदर्शन आलेला कळताच तिने पुन्हा आपले सर्व दागिनें उतरविले, मुलाचे कपडे चढविले आणि बाहेर आली. तिला पाहून सुदर्शन मोठ्याने हसला. पुढे जाऊन तिचे कान आपल्या हाताने झांकले.

“आतां ठीक झालं. तूं आपली कुडी काढायची विसरलीस  किती लपवशील आपल्याला...? मी केव्हांच ओळखलं होतं. चल आमच्या घरीं. मी तुझ्याशी लग्न करण्याचे ठरवूनच आलो आहे." सुदर्शन म्हणाला.

"तूं आलास पण तुझे वडील कबूल होतील का सगळ्याला..!" जनार्दनने विचारले.

"तुम्हींच चला आणि विचारा माझ्या वडिलांना." सुदर्शन म्हणाला.

सुदर्शन, शशीला व तिच्या वडिलांना घेऊन आपल्या घरी आला. विश्वनाथरावांच्या कानावर सर्व प्रकार गेला होता. तरीपण जनार्दनरावांच्या तोंडून सर्व प्रकार ऐकल्यावर ते म्हणाले.

"तुझी मुलगी माझ्या घरांत आली तर मला आनंदच आहे. पण मी तुला तुझ्या मुलाला पाठव म्हणून सांगितले असतां तूं मुलीला का पाठविलेस?"

जनार्दनराव खजील झाले. मान खाली घालून ते म्हणाले, “मुलगा असता तर पाठविला असता..! काय करणार..! खरी गोष्ट सांगणे मला बरे वाटले नाही. तुला जसे सात मुलगे आहेत तशा मला सात मुली आहेत. ते सांगायची मला तेव्हां लाज वाटली म्हणून खोटें सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पण तो अंगाशीच आला."

जनार्दनरावांच्या पाठीवर थाप मारून विश्वनाथराव म्हणाले, "वा..! फारच छान!!! मग एकच काय तुझ्या साती मुली माझ्या घरी घेऊन येतो."

पुढे थोड्याच दिवसांत विश्वनाथरावांनी आपल्या साती मुलांचा विवाह जनार्दनरावाच्या साती मुलींशी लावून दिला. संपूर्ण समारंभ मोठ्या थाटाने पार पडला. त्या दोघा मित्रांनी आपल्या मुलांना प्रेमाने आशीर्वाद दिला

"नांदा सौख्य भरें."

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel