एका गांवात एक शेतकरी रहात असे. त्याला मूलबाळ काही नव्हते. जमीन जुमला पण अगदिच बेताचा होता. परंतु दोघे नवरा बायको सुखाने आणि समाधानाने रहात होते. नवरा स्वभावाने फार भोळा होता. पण बायको त्याला संभाळून घेई. कोणी त्याला नांवें ठेवू लागले तर ते तिला आवडत नसे. त्यांच्याकडे एक बैलाची जोडी व दोन गाई होत्या.
शेतकऱ्याची बायको दूध विकून थोडे पैसे मिळवी. तिनेशे दोनशे रुपये आपल्या गरिबीत हि यांचविले होते. उतार वय होऊ लागले तसे तिला सर्व कामाचा उरक होईना. म्हणून ती एक दिवस नवऱ्याला म्हणाली,
”एक गाय विकून टाकूया आपण. एका गाईचे दुभते आपल्याला पुरे होईल. येतील ते पैसे अडीअडचणीला उपयोगी पडतील." शेतकऱ्याला बायकोचा सल्ला पसंत पडला.
तो एका गाईला घेऊन आठवाव्याच्या बाजाराला गेला. त्याने गाय विकण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. परंतु कोणी गाय विकत घ्यायला तयार झाला नाही. शेवटी निराश होऊन तो घरी परत निघाला. वाटेत एका झाडाखाली त्याला एक मनुष्य भेटला. त्याला आपला घोडा विकावयाचा होता. शेतकऱ्याने आपली गाय देऊन तो घोडा घेतला. घोड्याला घेऊन तो पुढे निघाला. वाटेत त्याला एक धनगर भेटला. त्याच्या जवळ एक बकरी होती. शेतकन्याने त्याला तो घोडा दिला आणि त्याची बकरी घेतली. आणखी पुढे गेला, तेव्हां त्याला आणखी एक मनुष्य भेटला. त्याच्याजवळ एक बदक होतें. एक बदक पाळावें असें शेतकऱ्याच्या मनांत पुष्कळ दिवसांपासून होते. त्याने तें बदक घेऊन बकरी देऊन टाकली. आणखी थोडे पुढे गेल्यावर त्याला एक मनुष्य कोबडा घेऊन येत असलेला दिसला. शेतकऱ्याने तें बदक दिले आणि त्याबद्दल कोंबडा मागून घेतला. शेतकरी कोंबडा घेऊन घरी येत असतो त्याला गांवांतलाच एक ओळखीचा मनुष्य भेटला.
त्याने विचारलें, “कायरे लखू..! गाय विकायला गेला होतास म्हणे..! किती रुपयाला गेली गाय? आणि हें कोबडें केवढयाचें..? शेतकऱ्याने घडलेली गोष्ट सांगितली आणि विचारले,
"काय बरोबर केलें की नाही?"
तो शेतकरी म्हणाला, "तूं बरोबर केलेंस की चूक हे मी नाही सांगत, ते तू बायकोला जाऊन विचार, म्हणजे कळेल."
"माझी बायको माझ्या म्हणण्याबाहेर नाही. मी जे केले ते अगदी बरोबर केलें असेच ती म्हणेल. पहा पाहिजे तर येऊन." शेतकरी म्हणाला.
त्याचा मित्र शेतकरी म्हणाला, "लाव तर पैज. तुझी बायको रागावली नाही तर शंभर मी दयायचे. रागावली तर तूं दयायचे. बोल, आहे कबूल..?"
शेतकरी म्हणाला, "हो कबूल. पण उगाच तूं आमच्यामध्ये पडून शंभर रुपये घालवून बसणार आहेस झालेंतर."
“उगाच गप्पा मारूं नकोस. शंभर रुपयांची पैज ठरली. शंभर रुपये जाणार म्हणून आता उडवाउडवी करूं नकोस.” शेतकऱ्याचा मित्र विठू म्हणाला.
"बरें तर, चल माझ्या घरी. मी आंत जातो. तू ओसरीत असून ऐक आमचे नवरा बायकोचे बोलणे." लखू म्हणाला.
दोघे लखूच्या घरी गेले. विठूला बाहेर ओसरीत बसायला सांगून लखू घरांत गेला.
बायकोने विचारलें, " आलांत गाय विकून? काय किंमत मिळाली...?"
लखू म्हणाला, "कोणी आपली गाय घ्यायला तयारच नव्हता. म्हणून गाय देऊन एक घोडा घेतला."
“मग त्यात काय वाईट झालें...! एक टांगा ठेवून घेऊ. भाड्याचे पैसे मिळतील आणि शिवाय कोठे जायचे झाले तर जाता येईल," लखूची बायको म्हणाली.
“पण मी एक घोडा आणला नाही. घोडा देऊन एक बकरी घेतली..!” लखू म्हणाला.
"ते हि बरोबर झाले. घोड्याचा खर्च कोणी करावा? बकरी काय फुकटाचे चरून येईल, आहे कोठे बकरी ? पाहू तर...!" शेतकऱ्याची बायको म्हणाली.
“पण जरा ऐकशील तरी. मी बकरी आणली नाही. ती देऊन हे कोंबडे घेऊन आलो आहे.” शेतकरी म्हणाला.
"देव पावला...! त्या बकरीच्या पाठीमागे मला सारे गांव फिरावे लागले असते. हा कोंबडा आला हे काय वाईट झालें, कोंबडा आरवला की मला उठायला सोय झाली.” बायको म्हणाली.
विठू नवरा बायकोचें तें बोलणे लक्ष देऊन ऐकत होता. त्याने अनुमान केले होते त्याच्या अगदी विरुद्ध लखूची बायको बोलत होती. काय करावें या विचारांत तो होता. इतक्यांत लखून बाहेर येऊन विचारले
"काय विठोबा...! ऐकलेत ना...! आमचे बोलणे, मी पहिल्यंदाच तुला म्हटले होते की आमच्यामध्यें पडू नकोस. पण तू तर पैज मारायला तयार होऊन बसला होतास." विठूनें शंभर रुपये दिले.
बायको नवऱ्याच्या शब्दाबाहेर नसल्यामुळे लखूला दामदुप्पट पैसे मिळाले.