चीनच्या पूर्व भागांत एक सुताचा व्यापारी राहात असे. खूप जोरांत चालत होता. त्याचा व्यापार. आतां तो थोडा वृद्ध झाला होता. त्याला साठ वर्षे पूर्ण झाली होती. मूलबाळहि कोणी नव्हते.

म्हणून तो नेहमी म्हणे, "काय उपयोग माझ्या ह्या पैशांचा? त्याचा उपभोग घ्यायला मला कोण आहे?"

शेजारच्या बायकांनी त्याच्या मनांतील गोष्ट ओळखली. त्यांनी त्याचे लग्न लावून देण्याचे कबूल केले. त्याने सांगितले की मला उच्च कुळांतील मान मर्यादा माहीत असलेली, सुंदरशी मुलगी पाहिजे. एक मुलगी लहानपणापासून मंत्र्याच्या घरी काम करीत होती. दिसावयास ती चांगली होती. आणि मोठ्याच्या घरांत वावरल्याने त्यांच्या पद्धती चालीरिती तिला सर्व माहीत होत्या. त्या मुलीशी त्या व्यापाऱ्याचें लग्न ठरले.

म्हाताऱ्याचे त्या मुलीशी लग्न झाले. ती म्हाताऱ्याच्या घरी राहावयास आली. तिला खरी परिस्थिति समजली. तिला वाईट वाटले. पण काय करते बिचारी...!! काही दिवस गेले. एकदा व्यापारी कामानिमित्त दुकान सोडून कोठेतरी बाहेरगांवीं गेला होता. त्या दिवशी ही मालकीण आपल्या एका दासीला घेऊन फिरावयास निघाली. त्यांचे दुकान जवळच होते. ती दुकानांत गेली. तेथे दोन कारकून काम करीत बसले होते. त्यांतील एक उतार वयाचा होता. तर दुसरा पंचविशीतला होता. त्याचे अजून लग्न वगैरे झालेले नव्हते.

आपल्या मालकिणीला आलेली पाहिल्याबरोबर दोघे हि उठून उभे राहिले. त्यांनी आदराने हात जोडून मान वाकविली.

तिने प्रेमाने त्यांना विचारलें, "दोघे किती दिवसांपासून येथे काम करीत आहात आणि कसे चालू आहे दुकान?"

“आपल्या कृपेनें, सर्व ठीक आहे." दोघे म्हणाले.

मालकिणीला काय वाटले कोण जाणे, ती तशीच घरी परत गेली. काही पैसे आणले आणि दोघांच्या हातांत दिले. थोडा वेळ इकडे तिकडे हिंडून घरी निघून गेली. मालकिणीने दोघांना बक्षीस म्हणून जे पैसे दिले ते देतांना तिने केलेला भेदभाव कोणाच्या लक्षात आला नाही. तिने म्हाताऱ्या कारकुनाला चांदीचे दहा रुपये दिले आणि तरण्या कारकुनाला सोन्याच्या दहा मोहोरा दिल्या. कोणी कोणाला आपल्याला काय दिले हे दाखविले नाही.

दोघे कारकून पाळी पाळीने रात्री दुकानांत निजत असत. एकदा तरून चांगची पाळी होती. तो नेहमी प्रमाणे दुकानांत निजला. थोड्याच वेळांत दार ठोठावल्याचा त्याला आवाज ऐकू आला.

त्याने दाराजवळ जाऊन "कोण आहे ?" म्हणून विचारलें.

"दार उघड." मालकिणीची दासी म्हणाली.

तिचा आवाज ऐकून त्याला आश्चर्य वाटले. त्याने दार उघडून पाहिले तर खरोखरच दासी उभी.

"एवढ्या रात्री काय काम आहे? मला मालकिणीने पाठविले आहे." दासी म्हणाली.

"हं...! ते सकाळी दिलेले बक्षीस परत..." चांगनें विचारले.

“नाही..! नाहीं...!! तसे नाही..! आणखी खूप खूप काही देणार आहेत." असे सांगून तिने आपल्या पाठीवरचे बोचकें खाली ठेवले.

त्यांत कांहीं कपडे होते. ते हातांत घेऊन ती म्हणाली-“हे तुझ्यासाठी व तुझ्या आई साठी आणि आणखी विशेष म्हणजे हे बघ." असे सांगून तिने बरोबर आणलेली दोन शेर वजनाची चांदीची विट त्याला दिली.

मालकिणीच्या या कामाचा त्याला उलगडा होईना. ती रात्र त्याने जागून काढली. सकाळ झाल्यावर नेहमी प्रमाणे दुसरा मुनीम कामावर येताच त्याने दुकान त्याच्या स्वाधीन केले आणि तो तेथून सटकला. चांगने आणलेलें सामान पाहून त्याची आई म्हणाली,

“हे कोठून आणलेस...?" चांगने सर्व हकीकत सांगितली.

ते ऐकून ती म्हणाली, "विचार तरी काय आहे तुझ्या मालकिणीचा? फारशी सोने चांदी देऊ लागली आहे? चांग...! तुझ्याशिवाय या जगांत मला कोणी नाही आणि नको... या पुढे तू त्या घरी जाऊ नकोस."

चांग आज्ञाधारक होता. त्याने अजून पर्यंत कधी हि आपल्या आईचा शब्द मोडला नव्हता. आईच्या सांगण्यावरून त्याने त्या दिवसापासून कामावर जाण्याचे सोडून दिले. तो कां आला नाही हे पाहण्यासाठी मालकानें त्याच्या घरी निरोप पाठविला.

"चांग आजारी आहे. त्याला बरें बाटल्यावर तो कामावर येईल." त्याच्या आईने सांगितले.

काही दिवसांनी मोठा कारकून आला व त्याने विचारले "केव्हांपासून येणार आहे चांग कामावर? मी काम करून अगदी थकून गेलो आहे."

“त्याची तब्येत तर फारच बिघडली आहे." आईने सांगितले.

या नंतर मालकानें मधून मधून चौकशीसाठी नोकरांना पाठविले. प्रत्येक वेळी आई सांगत असे-"चांग अजून बरा झाला नाही. पुढे चांगच्या मालकाने हळू हळू त्याची चौकशी करण्याचे सोडून दिले. एक महिना झाला. चांगच्या जवळची मिळकत संपून गेली. आता फक्त त्याच्या मालकिणीने दिलेली सोने चांदीच शिल्लक राहिली. पण ती विकण्याचे धाडस त्याला होईना.

तो आईला म्हणाला "आई असें किती दिवस निभणार...? नुसते बसून कसे चालेल?"

काही दिवस लोटले. दीपोत्सव सुरूं झाला.

तो आपल्या आईला म्हणाला, "आई, मी दिवे पाहून येतो. राजवाड्या जवळ मोठमोठे दिवे लावले आहेत. फार सुंदर सजवलं आहे तिथे."

“जा. पण संभाळून जा आणि आपल्या मालकाच्या घराच्या बाजूला मुळीच जाऊं नकोस आणि जावे लागलेच तर एकटा जाऊ नकोस." आईनें बजाविलें.

चांग आपल्या एक मित्राबरोबर दिवे पाहण्यास गेला. राजवाड्यासमोर एक गर्दी होती. लोक ओरडाआरडा करूं लागले. धक्काबुक्की करू लागले. कारण आत्तांच तेथे दान धर्म सुरू झाला होता.

"ह्या गर्दीतून पुढे कुठे घुसायचे, चला आपण प्रधानाच्या घराच्या बाजूचे दिवे पाहून येऊ. तेथे सुद्धा छान आरास केली आहे." असे म्हणत ते दोघे मंत्र्याच्या घराच्या बाजूला निघाले.

तेथें हि फार गर्दी होती. गर्दीत त्यांची चुकामूक झाली. तो एकटाच इकडे तिकडे फिरूं लागला. इतक्यांत त्याला आपल्या जुन्या मालकाची आठवण झाली. कारण या दिवशी तो सुद्धा दिवे लावून फटाके उडवीत असे. ते पाहण्यासाठी चांग त्या बाजूला वळला. घरांजवळ जाऊन पाहिले तर त्याची फार निराशा झाली. तेथें फटाके नव्हते. दिवे नव्हते. गर्दी नव्हती, काही नव्हते. घर बन्द होते आणि त्यावर एक नोटिस चिकटवली होती.

चांगनें जवळ जाऊन वाचलें. घरावर जप्ती येऊन मालकास कैद केले आहे. चांग वाचत होता, तोच मागून एक शिपाई आला.

त्याने जोराने चांगाला दरडावून विचारले, “कोण तूं?? आणि येथे कशाला आलास?"

चांगला त्याची भीति वाटली. तो घाबरून पळत सुटला. एका गर्दीतून जात असतांना त्याला कोणी तरी हाक मारली.

एक मनुष्य म्हणाला-"अरे, तुला कोणीतरी बोलावीत आहे."

त्याने वळून पाहिले तर ओळखीचा माणूस वाटला. जवळ गेल्यावर त्याला कळले की तो जुन्या मालकाचा नोकर आहे. चांग त्या नोकराच्या पाठोपाठ निघाला. तो त्याला त्याच्या जुन्या मालकिणीकडे घेऊन गेला.

"आपण इथे कुठे?" चांगने विचारले.

"खोटी नाणी पाडल्याबद्दल त्यांना कैद केलें आहे. आमची सर्व संपत्ति जप्त करून टाकली. मी आतां निराधार, अनाथ झालेली आहे. माझे कोणी हि राहिलेले नाही. ह्यावेळी तूं मला आपल्या घरी घेऊन जाउ शकतोस का???”

"ती काही होणारी गोष्ट नाही. माझ्या आईला तें मुळीच आवडावयाचे नाही." चांग म्हणाला.

“चांग, तुला काय वाटते. मी एकदा तुझ्या घरी आले म्हणजे जाणारच नाहीं की काय??” हा बघ मोत्याचा हार."

असे सांगून तिने एक मोत्याचा सुंदर हार दाखविला. त्यांत एकशे आठ मोती होते. तो हार पाहून चांग चकित झाला.

"तूं जर मला तुझ्या घरी राहू दिलेस तर तुझ्यावर माझा भार पडणार नाही. आपण ह्या हारांतील एक एक मोती रोज विकून आपला खर्च भागवू. मग झाले ना?" मालकीण म्हणाली.

“माझ्या घरी यावयाचेच असेल तर मी अगोदर आईला विचारून घेतो. आईनें कबूल केले तर मी नेईन." चांगने सांगितले.

ती चांगच्या पाठोपाठ त्याच्या घरापर्यंत गेली. चांग आंत गेला तेव्हा ती बाहेर उभी राहिली. चांगनें आपल्या आईला आपल्या मालकिणीची सर्व हकीगत सांगितली.

"बिचारी, कोठे आहे ती..??" आईने विचारले

“बाहेर उभी आहे दारापाशी.” चांग म्हणाला.

“बोलाव आंत तिला." आईने सांगितले.

आंत आल्यावर मालकीण म्हणाली, "मला दुसरा कांहींच आसरा नाही म्हणून मी आले आहे."

"रहा थोडे दिवस. पण आमचे गरिबाचे घर तुमच्या पुरेसें कसे पडेल. ते तुम्हाला आवडणार पण नाही. चौकशी करा आणि तुमचे कोणी नातेवाईक असतील त्यांच्याकडे जा. तो पर्यंत राहा येथे." चांगच्या आईने सुचविले.

मालकीण आपला मोत्याचा हार तिला दाखवून म्हणाली, "ह्यांतील काही मोती विकून तुम्ही आपला सुताचा व्यापार पुन्हा सुरू करा."

चांगने सुताचा व्यापार करण्यास सुरवात केली. हळू हळू त्याच्या मालकाचे सर्व गिन्हाईक त्याला मिळाले. धंदा चांगला चालु लागला. ह्या अवधीत चांगला बळवण्यासाठी ना ना तऱ्हेचे प्रलोभन दाखवलें मालकिणीने. परंतु चांगच्या मनावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तो तिला आई प्रमाणेच मानीत असे.

थोडे दिवस गेले. आतां वसंतोत्सव आला. त्या दिवशी उत्सव पाहून चांग परत घरी येत असतां त्याला आपला मालक भेटला. त्याची परिस्थिति पाहून त्याला वाईट वाटलें.

"हें असें कां झालें ?" चांगनें विचारले.

“काय सांगू??? त्या मुलीशी लग्न करून मी अगदी फसलों आहे. तिने काय केलें माहीत आहे का? मला सांगायला सुद्धा लाज वाटते. तिनें मंत्र्याच्या घरांतून एक मोत्याचा हार चोरून आणला आहे. एक दिवस मंत्र्याचे लोक आले आणि हार कोठे आहे म्हणून विचारू लागले. मला त्या विषयी काहींच माहीत नव्हते. त्यांनी घराची झडती घेतली. पण हार काही मिळाला नाही. त्याच वेळी माझ्या बायकोने आत्महत्या केल्याची बातमी कळली. यावरून मी दोषी नाही हे सिद्ध झाले. परंतु मोत्याचा हार सुद्धा मिळाला नाही. तरी सुद्धा मला त्यांनी कैदेत टाकले." चांगचा मालक म्हणाला.

त्या मालकाचे म्हणणे चांगला विचित्र वाटले. कारण त्याची मालकीण तर त्याच्या घरी आहे आणि मोत्याची माळ सुद्धा तिच्या जवळ आहे. मग हा असे काय म्हणतो. त्याला काही कळेना. तो मालकाला आपल्या घरी घेऊन आला.

“धाकट्या मालकिणीला एकदा बाहेर बोलाविलें आहे म्हणून सांग." चांगाने आपल्या दासीच्या हाती निरोप पाठविला.

दासी आंत गेली व घाबऱ्या घाबऱ्या बाहेर येऊन म्हणाली,

"आतापर्यंत तर येथेच होती. एवढ्यात कुठे गेली कोण जाणे."

मालकाने जे सांगितले ते खरे असले पाहिजे. इतक्या दिवस आपल्या घरी जी होती ती मालकीण नसून तिचे भूत होतें. चांगने ती मोत्याची माळ आपल्या मालकाच्या स्वाधीन केली. त्यातले जे दोन चार मोती त्याने विकले होते ते त्याने पुन्हां विकत घेऊन त्याला दिले.

मालकाने ती माळ व मोती मंत्र्याकडे नेऊन दिले. मंत्र्याने त्याची जप्त केलेली मालमत्ता त्याला परत दिली. चांग फार चांगला मनुष्य होता. तो त्या मालकिणीच्या फंदात फंसला नाही. म्हणूनच लोक त्याची स्तुति करूं लागले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel