धर्मलाल व दानवीर नावाचे दोघे मित्र होते. ते दोघे एकाच गांवांत राहात नव्हते. धर्मलाल ज्या गांवांत राहात असे त्या गांवची जमीन फार सुपीक होती. म्हणून तो गांवच्या गांवच जणु काही एक मळा होता. परंतु दानवीराचा गांव खडकाळ व डोंगराळ असल्याने रुक्ष होता. एकदां धर्मलाल दानवीराकडे आला. तो गांव रुक्ष असल्यामुळे अन्न धान्याची फार वाण होती. धर्मलाल आल्यावर दानवीर त्याला घेऊन कंद व काही मुळे आणण्यासाठी डोंगरावर गेला. तेथे खणतां खणतां त्यांना एक सोन्याचा हंडा सांपडला.
"आज दैव जोरांत दिसत आहे. हा हंडा विकून आपण ते पैसे अर्धे अर्धे वाटून घेतले तर आपले दारिद्र कायमचे दूर होईल,” धर्मलाल म्हणाला.
पण दानवीराला तें रुचलें नाही. त्याला वाटले, आपण एकट्यानेच सर्वच्या सर्व घ्यावे. म्हणून
तो धर्मलालला म्हणाला,"हा हंडा काय सोन्याचा असेल? काहीतरी दुसरा धातु मिसळलेला दिसतो आहे ह्याच्यांत."
“पारखून बघू या तरी. आणि समजा, जरी हा सोन्याचा नसला तरी आपल्याला काय त्याचे? कारण आपल्याला हा फुकटांत मिळालेला आहे." धर्मलाल हसून म्हणाला.
नंतर दानवीर हंडा घेऊन धर्मलालसह घरी परतला. दुसरे दिवशी आपल्या गांवीं जातांना
धर्मलालने विचारले, "की केव्हां त्या हंड्याची पारख करवणार आहेस."
“सध्यां असाच राहू दे तो माझ्याकडे. जेव्हां त्याची गरज भासेल तेव्हां पाहूं कसास लावून आणि जर तो खरोखरच सोन्याचा निघाला तर तो विकून तुझा वाटा तुझ्याकडे पोहोंचता करीन. तूं काही काळजी करूं नकोस." दानवीर म्हणाला.
मित्रावर विश्वास ठेवून धर्मलाल आपल्या गांवी गेला. तो जातांच दानवीराने हंड्याचे सोने गाळून सर्व सोने विकून टाकले. आपल्या मित्राला त्या विषयी काही कळविले सुद्धा नाही. धर्मलालने बरेच दिवस वाट पाहिली. पण त्याचा पत्ता नाही. म्हणून तो स्वतः त्याला भेटून येण्यासाठी निघाला. धर्मलाल फार दिवसांनी भेटल्यामुळे इकडच्या तिकडच्या खूप गप्पा झाल्या. परंतु त्या हंड्याविषयी दानवीराने एक शब्दहि काढला नाही. शेवटी धर्मलालनेच विषय काढला.
धर्मलाल म्हणाला, "हो, त्या हंड्याचे काय झालें? कोणच्या धातूचा निघाला तो शेवटी?"
"हो! मी विसरलोच ती गोष्ट. मी तेव्हांच सांगितले नाही त्यांत सोनें नाहीं म्हणून? आगीत घातल्याबरोबर वितळून पाणी पाणी झाले.” दानवीराने सांगितले.
धर्मलालने सर्व ओळखले. कारण जरी व सोने यांतील फरक धर्मलालला माहीत नव्हता असें मुळीच नाही. आणि खरोखरच जर ती जर असती तर निदान ती तरी दानवीराने आणून दाखविली असती. पण त्याने तसे कांहींच केले नाही. पण आपल्याला सर्व काही समजले आहे असें त्याने दानवीराला कळू दिले नाही.
तो म्हणाला, ”असें होय...! जरच का निघाली ती सारी..! मला वाटले सोने असेल म्हणून...!"
त्या दिवशी दानवीराकडचा पाहुणचार घेऊन धर्मलाल आपल्या गावी जाण्यासाठी निघाला. जातांना,
तो म्हणाला, "दानवीरा, आमच्या गांवांत सध्या बागेतील झाडे फळांनी भरलेली आहेत आणि या गांवांत तर सर्व शुष्क आहे. मग आपल्या मुलांना दे की माझ्या बरोबर पाठवून. दोन दिवसांनी परत पाठवेन.
"बरें आहे !" म्हणून दानवीराने आपल्या मुलांना धर्मलाल बरोबर पाठवून दिले. जात असतां बाटेंत त्यांना माकडे दिसली. ती पाहण्यासाठी मुलें थांबली. मुलांना माकडे फार आवडतात म्हणून धर्मलाल माकडांची दोन पिल्ले घरी घेऊन आला. धर्मलालच्या घरी दानवीराची मुलें अगदी आनंदांत होती. ती घरी असली म्हणजे माकडांशी खेळत असत.
धर्मलालने त्या मुलांना माकडांची नावेच ठेवली होती. त्यांच्या नावाने हांक मारली म्हणजे ती असतील तिथून धांवत येत असत. जेव्हां ती मुले बागेत जात तेव्हां झाडावरची फळे खाण्यांत इतकी गर्क होत असत की त्यांना कसलेच भान राहात नसे. बागेतून परत येतांना माकडांच्यासाठी फळे आणायला मात्र ती विसरत नसत. काही दिवस गेले. मुलांना आपल्या घरची मुळीच आठवण झाली नाही. पण दानवीराला आपल्या मुलांना भेटण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने मी अमक्या दिवशी येत आहे असें धर्मलालला कळविलें.
ज्या दिवशी दानवीर येणार होता त्या दिवशी धर्मलालने दानवीराच्या मुलांना सांगितले की तुम्ही बार्गेत जाऊन खेळा. जेवावयास बोलवीपर्यंत तेथेच खेळत राहा. मुलें बागेत खेलण्यासाठी निघून गेली. उन्हें थोडी चढल्यावर दानवीर आला. येतांच परस्परांना हालहवाली विचारून झाल्यावर दानवीर म्हणाला,
"मुलें कोठे आहेत? दिसली नाहीत कोठे आल्यापासून?"
"खेळत असतील कुठे तरी." असे म्हणून धर्मलालने त्यांना त्यांच्या नावाने हाका मारून बोलावले, त्या नांवांनी बोलाविल्यावर येण्याची सवय होती. म्हणून धर्मलालची हांका ऐकतांच दोन्ही माकडे धांवत आली आणि त्यांच्या खांद्यावर चढून बागडू लागली. ती चांगली माणसाळली असल्याने दानवीराच्या अंगावर जाऊन सुद्धा ती खेळू लागली.
"हे रे काय?" दानवीराने विचारले.
"आपली मुले ओळखली नाहीस वाटते तूं?" धर्मलाल म्हणाला.
“मी त्यांना येथे घेउन आलो आणि ती आपली बद्लून अशी झाली. मला सुद्धा त्यांच्या बदलण्याचे कारण समजले नाही."
दानवीराचे डोळे उघडले. धर्मलालच्या अशा वागण्याचे कारण त्याला समजले.
त्याने आपल्या मित्राचा हात धरला व म्हणाला, "होय गड्या! मी मोहानें खोटं बोललो. त्या सोन्याच्या हव्याचे अर्धे पैसे मी तुला देतो. पण माझी बाळे मला परत दे. मी त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे."
"घाबरू नकोस मी हि दोन मुलांचा बाप आहे. मला मुलांच्या मायेची कल्पना आहे. थांब बोलावून आणतो त्यांना." धर्मलालने मुलांना बोलावून आणून बापाच्या स्वाधीन केले.
दानवीर मुलांना घेऊन आपल्या गांवीं आला. त्याने त्या सोन्याच्या हंड्याची अर्धी किंमत आपल्या मित्राला पाठवून दिली.