विदर्भ देशाच्या एका राजाला तीन मुले होती. त्याची पहिली राणी वारल्यावर त्याने दुसरें लग्न केलें. सावत्र आईनें मुलाला त्रास देऊ नये म्हणून त्याने आपल्या तिघां मुलांना एका निराळ्या राजवाड्यांत ठेवले. त्या वाड्यांत सर्व सुखसोयी होत्या. काही दिवसांनी दुसऱ्या राणीला मुलगा झाला. तिला वाटू लागले की तिच्या सवतीची मुलें जिवंत असेपर्यंत तिच्या मुलाला राज्य मिळणे शक्य नाही. तिने ही गोष्ट आपल्या एका दासीला सांगितली. ती दासी स्वभावानें मंथरेसारखीच दुष्ट व कुटिल बुद्धीची होती.
दासी म्हणाली, “मी एक उपाय सांगते. तूं तिघांना केव्हा तरी बोलावून सोंगट्या खेळायला सांग. त्यांत जो हारेल त्याने ऋतुपर्ण राजाकडून तीन घोडे आणून द्यावेत. माझ्या जवळ जादूचे फासे आहेत. तुझा मुलगा डाव जिंकणार हे निश्चित. ऋतुपर्ण राजाकडे जाऊन घोडे आणणे म्हणजे मृत्यूच्या मुखांतून परत येणे आहे. कारण राजा मागून देणार नाही आणि घोडे चोरी करून आणण्याचा प्रयत्न केल्यास राजा जिवंत सोडणार नाही.”
राणीला त्या दुष्ट दासीचा सल्ला पसंत पडला. राणीने एका सणाच्या दिवशी तिघां राजकुमारांना जेवायला बोलाविलें. जेवणे उरकल्यावर सर्व सोंगट्या खेळायला बसले. त्यांनी अट कबूल केली होती आणि खेळांत हारले. म्हणून ठरल्याप्रमाणे तिघांना ऋतुपर्ण राजाचे घोडे आणावयास जावे लागले.
तिघे त्याच दिवशी आपापल्या घोड्यांवर बसून ऋतुपर्ण राजाच्या राज्याकडे निघाले. वाटेल त्यांना एक घोडेस्वार भेटला. त्याचे सर्व कपडे काळे होते. त्याने त्यांना विचारलें
"तुम्ही कोण व इकडे कोठे आलात..?? काय काम आहे तुमचें..?”
"आम्ही विदर्भ देशाचे राजकुमार आहोंत आणि ऋतुपर्ण राजाचे विलक्षण घोडे घेऊन जाण्यास आलो आहो." राजकुमार म्हणाले.
"बरे झाले की माझी तुमच्याशी भेट झाली. ते घोडे घेऊन जाण्यासाठी जो कोणी आला तो जिवंत परतला नाही हे तुम्हाला माहीत असेलच. मी या भागांतला एक अट्टल चोर आहे. मला काळा चोर म्हणून लोक ओळखतात. मी सुद्धा ते घोडे चोरण्याचे साहस आजपर्यंत केले नाही. पण मी तुम्हांला माझ्याकडून होईल तितकी मदत करावयास तयार आहे." काळाचोर म्हणाला.
मध्यरात्रीच्या सुमारास काळाचोर गुप्तमार्गाने राजकुमारांना किल्ल्यांत सरळ राजाच्या तबेल्याकडे घेऊन गेला. राजकुमारांनी घोड्याच्या पायांच्या दोऱ्या सोडल्याबरोबर घोडे खिंकाळू लागले. त्यांचे खिंकाळणे ऐकून पाहारेकरी जागे झाले.
त्यांनी राजकुमार व काळ्या चोराला घेरले आणि त्यांच्या मुसक्या बांधून राजासमोर नेऊन हजर केले. आपल्या घोड्यांना चोरुन नेणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी राजाने एक मोठी कढई तयार केली होती. त्या कढईत उकळत्या तेलांत गुन्हेगारांना बुचकळून काढावयाचे ही शिक्षा राजा देत असे. राजाने काळ्या चोराला विचारले
“तुझ्या नादी लागून कशाला या बिचाऱ्यांनी स्वतःवर हे संकट ओढवून घेतलें..?? यांना मी काय शिक्षा देणार आहे, तुला माहीत आहे का...! ती पहा कढई आणि त्यांत तापत असलेले तेल..! सर्वांत धाकट्याचे मरण किती जवळ येऊन ठेपले आहे हे माहीत आहे ना तुला?" राजाने विचारलें.
“महाराज! पण माझें मरण या पेक्षा अधिक जवळ आले असून हि मी त्या संकटांतून सुटलो होतो.” काळा चोर म्हणाला.
"तूं म्हणतोस ते खरें निघालें तर मी याला मुक्त करीन...!" राजा म्हणाला.
काळा चोर, तो मृत्युमुखांतून कसा सुटला याची गोष्ट सांगू लागला,
“मी एका सरदार घराण्यांत जन्मास आलो. परंतु तीन राक्षसिणींनी मिळून माझी सर्व धनदौलत लुबाडून घेतली. म्हणून मला हा चोरीचा धंदा स्वीकारावा लागला. त्या तिघी राजकन्याच होत्या. परंतु शापाने त्यांना राक्षसिणींचे रूप मिळाले होते. त्या तिघी दिवसभर सुंदर राजकन्या दिसत. पण रात्र झाली की राक्षसिणी होत. त्यांनीच माझी सर्व संपत्ती चोरुन नेली आणि मला भिकारी करून सोडले. एके दिवशी मी त्यांना पकडावयाचे ठरवून त्यांच्या पाठीमागून निघालो.”
पुढे तो सांगू लागला, “त्या एका गुहेत शिरल्या. मी देखील त्यांच्या पाठोपाठ आत गेलो. डोंगरापलीकडच्या एका नदीकाठी त्या गुहेचे दुसरें तोंड निघाले. तेथे एका खड्यांत त्या रहात असत. चुलीवर एका मोठ्या मडक्यांत त्यांचा स्वयंपाक सुरू झाला. तिघी चुलीच्या चारी बाजूला बसून गप्पा मारीत होत्या. त्यांच्या गप्पा ऐन रंगांत आल्यावर मी एक मोठी धोंड उचलली आणि मडक्याला मारली. मडके फुटले आणि त्या तिघींचें अंग भाजले. त्यांनी मला पाहिले व धरायला धांवल्या. मी पळालों पण त्यांच्या हातून सुटका मिळणे अशक्य झाल्यावर एका झाडावर चढलो. एका राक्षसिंणीने लगेच दुसरीला दोन्ही हातांनी धरून उचलले, त्या बरोबर तिचे कुऱ्हाडित रुपांतर झाले.”
हे सगळे राजदरबारात मोठ्या तल्लीनतेने ऐकत होते, तेवढ्यात तो पुढे सांगू लागला, “तिसरी एक कुत्रे होऊन खाली पडल्याबरोबर मला फाडून खाण्यासाठी झाडाखाली लपून बसली. पहिल्या राक्षसिणीने कुऱ्हाडीने झाड तोडायला सुरवात केली. तिनं दोन घावात अर्धे अधिक झाड कापले. तिसरा घाव मारण्यासाठी हात उचलल्याबरोबर कोंबडा आरवला. लगेच तिघींना राजकन्येचे रूप मिळाले आणि त्या आपल्या वाड्यात परत गेल्या.”
इतकी गोष्ट सांगून काळ्या चोराने विचारले
“महाराज..! आता आपणच सांगायें की आपण म्हणाला त्यापेक्षां कठीण प्रसंग माझ्यावर ओढवला होता की नाही?”
राजा म्हणाला, “तुझे म्हणणे बरोबर आहे. तर मग मी सर्वात धाकट्या राजकुमाराला आपल्या वचनाप्रमाणे माफ करतो. पण या मधल्याला मी सोडणार नाही. सांग, मुला मरण जवळ आले आहे की नाही?"
काला चोर म्हणाला, “महाराज, माझे मरण त्या पेक्षा जास्त जवळ आले असूनहि मी सुटका मिळविली आहे.”
“मला हे खरें वाटले तर मी या राजकुमाराला हि माफ करीन." राजा म्हणाला.
काळ्या चोराने गोष्ट सांगावयास सुरवात केली.
“मी त्या राक्षसिणींचे मडके फोडून त्यांना एक दिवस उपाशी ठेवले याचा त्यांना राग आला व त्यांनी सूड घेण्यासाठी माझें सर्वस्व लबाडून मला या चोरीच्या धंद्यात ढकलेलें, एके दिवशी रात्री मी एका शेतक-याची म्हैस व गाय चोरी करून घेऊन चाललो होतो. चालुन चालुन अगदी दमून गेलों होतो. थोडासा विसावा घेण्यासाठी एका झुपडाखाली जाऊन बसलो. म्हशीला व गाईला झाडाला बांधून ठेवले. थोड्या वेळाने पाहतों तो आठ दहा वाघ पळत येत असलेले मला दिसले. त्यांना म्हशीचा व गाईचा वास लागला असावा. त्यांना पाहतांच मी झाडावर चढून बसलो. वाघांची मेजवानी सुरू झाली. मी चोरून आणलेला माल अशा त-हेनें फस्त होऊन गेला. मी तोंडातून एक ब्र शब्द देखील काढला नाही.”
पुढे तो सांगू लागला, “सर्व अंग थरथर कापत होते. त्यांना माझा वास देखील आला की काय कोणास ठाऊक त्यांनी वर पाहिले आणि वर चढून येण्याचा विचार करू लागले. त्यांनी झाडाच्या बुंध्याला आपली नखें पुसून साफ केली. त्यांच्या धक्क्यानेच हे भले मोठे झाड हालू लागलें. मला वाटले मी आतां खाली पडणार आणि त्याची मेजवानी होणार. परंतु माझे नशीब दांडगे होते असे म्हणाया हरकत नाही. आठ दहा सिंह त्याच वेळी नेमके कोठून तरी धावत आले.”
“आता मी बसलेलो त्या झाडाखाली वाघांची सिंहाशी झुंज सुरू झाली. एका मागून एक सिंह मरून पडत होते. मी वर बसून ते संहरक दृश्य पहात होतो. आता फक्त एक वाघ आणि एकच सिंह उरले होते व त्यांचे द्वंद्व चालू होते.”
“तेवढ्यात सोसाट्याचा वारा सुरू झाला. मी फांदी घट्ट धरून बसलो होतो. पण झाडच मुळासकट उपटून खाली पडले, मला वाटले, आता ते वाघ सिंह माझ्यावर तुटून पडणार. पण झाडच त्यांच्या अंगावर पडले व ते तेथेच ठार झाले. मी हात जोडून देवाला नमस्कार केला.”
इतकी गोष्ट सांगून काळाचोर म्हणाला.
“आतां म्हाराज तुम्हीच सांगा की मी मरणाच्या अधिक जवळ होतो की हा राजकुमार..??”
“तुझे म्हणणे बरोबर आहे. मी या दुसऱ्या राजकुमाराला हि माफ करतो.”
“आता या मोठ्या राजकुमाराला कात टाकायला सांगतो. मला वाटते मरण इतके जवळ आलेले कोणी पाहिले नसेल व ऐकलें हि नसेल." राजा म्हणाला.
"कां महाराज? मी तर याहून जास्त कठिण प्रसंगांतून आपली सुटका करून बाहेर निघालो आहे..!" काळा चोर म्हणाला.
"तूं म्हणतोस तें खरें निघालें तर मी या राजकुमाराला हि माफ करीन."
राजाने असें म्हटल्याबरोबर काळ्या चोराने गोष्ट सांगायास सुरवात केली.
“अट्टल चोर म्हणून माझी कीर्ति देश देशांतरांत पसरली. पुष्कळ लोक या कलेचा अभ्यास करण्यासाठी माझ्याकडे येऊ लागले. त्यांपैकी एक जण फार हुशार होता. त्याने मला देखील एकदा फसविलें. मी ज्या भागांत चोरी करीत असे त्या भागांत एक राक्षस असे तो घरफोडी व खून हेच धंदे करीत असे. त्याने पुष्कळ सोने व चांदी चोरी करून एका विहिरीत जमा केले होते. खरे पाहता तो त्याच विहिरीत रहात असे. एकदां राक्षस आपल्या घरांत नाही असें पाहून आम्ही त्या विहिरीजवळ गेलो. दोरी आंत सोडून मी आपल्या शिष्याला आंत उतरायला सांगितले. विहिरीत उतरून एका मोठ्या पोत्यांत सोने चांदी भरावयास सांगितले. पण तो म्हणाला
"मी उतरून जाईन पण चढून बाहेर येऊ शकणार नाही. आपणच उतरावें. मी पोते वर ओढून घेऊन पुन्हां दोरी विहिरीत सोडीन मग आपण वर यावे."
मी त्याच्या बोलण्यावर विश्वास केला आणि विहिरीत उतरलो. मी सोने चांदी भरगच्च भरून पोत्याच्या तोंडाला दोरी बांधली. माझ्या शिष्याने पोते वर ओढून घेतले, त्याने पोतें सोडून घेतले. पण दोरी मात्र पुन्हां सोडली नाही. मी विहिरीत ओरडत होतों की,
“दोरी सोड…!” “दोरी सोड...!”
पण तो हसून म्हणाला,
"गुरुवर, आपण मला सर्व विद्या अवगत करून दिल्यांत. परंतु दोरी शिवाय चढून वर कसे यावयाचे हे शिकविले नाहीत. हे आपण आज शिकवावें. विहिरींत उरलेले सोनें सर्व आपले. मी त्याच्यावर अधिकार सांगणार नाही."
“असे सांगून तो निघून गेला. आता काय करावें मला सुचेना. आतां राक्षस येणार व उसासारखा उभा सोलून आपणांस खाणार. मी अगदी घाबरून गेलो. तेवढयात मला एक युक्ति सुचली. विहिरीत एका बाजूला काही मडी पडली होती. राक्षस येण्याची चाहूल लागतांच मी त्या मड्यांत मडयासारखाच पडून राहालों. काळोख पडल्यावर राक्षस आणखी काही मडी घेऊन आला व त्याने इतर मडयावर ती मडी पण टाकली. त्याचे माझ्याकडे लक्ष गेले नाही. त्याने त्यानंतर स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटवली.”
“ती चूल म्हणजे एक मोठी भट्टीच समजा. एक मोठी कढई चुलीवर ठेवली व त्यांत दोन मडकी तेल ओतलं, कढई खाली मोठा जाळ केला. नंतर तो एक टोपलें घेऊन आला व त्यांत दही घेऊन त्या कढईत टाकू लागला. एका खेपेस त्याने मला सुद्धा इतर सगळ्या बरोबर टोपल्यांत टाकले. पण मी सावध होतो व मी टोपल्याच्या कोना घट्ट धरून उभा राहालो, राक्षसाने टोपलें बाजूला फेकून दिले आणि स्वयंपाक तयार झाल्यावर खाऊन पिऊन स्वस्थ घोरत पडला. राक्षसाचे घोरणे माझ्या कानावर पडल्या नंतर मी टोपल्याच्या वाटे बाहेर आलो. राक्षसाने विहिरीत उतरण्यासाठी एका शिडीचा उपयोग केला होता. मी त्याच शिडीवर चढून बाहेर आलो.”
हि हकीकत काळ्या चोराने सांगून राजाला विचारले, “महाराज..! आता आपणच सांगा की राजकुमाराचे मरण माझ्यावर आलेल्या मरणापेक्षा जास्त जवळ येऊन ठेपलें होतें का?"
राजा म्हणाला, "नाही! मी या राजकुमाराला हि माफ करतो. आता हे तिघे राजकुमार मोकळे आहेत. त्यांना वाटेल तिकडे जायला माझी परवानगी आहे. पण मी आतां तुलाच कढईत टाकायला सांगणार आहे. मरण इतके जवळ येऊन ठेपलेलें तुला आठवत नसेल.
"का...! मला आठवते. मी मृत्यूच्या अगदी मुखात पडून सुद्धा जिवंत सुटलो आहे.” काळा चोर म्हणाला.
"हां, कोठे? शक्यच नाही." राजाने म्हटल्यावर,
काळ्या चोराने गोष्ट सांगावयास सुरवात केली.
“एकदा मी कोठे तरी चोरी करायला म्हणून जात होतो. एका घरांत एक बाई तान्या मुलाला मांडीवर घेऊन बसली होती व रडत होती. तिच्या हातांत एक सुरी होती. तें मूल रडत होते. ती बाई सुरी वर करून त्याला मारणार इतक्यांत तें मूल कसें कोणास ठाऊक हसू लागले. त्याचे ते विचित्र हसणे पाहून त्या बाईने सुरी बाजूला टाकली व त्या मुलाकडे कौतुकाने पहात बसली. मला हे सर्व पाहून पार आश्चर्य वाटले, मी तिला विचारले
“बाई, तुम्ही कोण? आणि हा मुलगा कोणाचा? या मुलाला मारायला सुरी उगारलीत काय आणि ती दूर टाकून त्याला कुरवाळू लागलात काय..!”
“बाबा रे, मी एक दुदैवी बाई आहे. मी आपल्या वडिलांबरोबर एका जंगलात गेलें होते. तेथून मला एका राक्षसाने पळवून आणले आणि येथे आणून टाकले. थोड्या वेळाने आणखी दोन राक्षस आले. तेव्हां मला कळलें की तीन राक्षस येथे राहतात. त्यांनी त्यांच्याशी लग्न करून घेण्यासाठी मला फार आग्रह केला. पण मी ऐकलें नाही म्हणून ते मला एखाद्या मोलकरणी सारखी राबवून घेत आहेत. त्यांनी या मुलाला सकाळी कोठून तरी धरून आणले आणि मला म्हणाले,
"याला शिजवून तयार ठेव. मी याला चिरून शिजवून ठेवले नाही तर मला मरावेच लागेल आज."
“तुला भिण्याचे कारण नाही. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मी तिला धीर दिला आणि म्हणालो, या मुलाला मारूं नकोस. मी त्या राक्षसांचा अंत करून तुला आणि या मुलाला वाचवीन."
नंतर मी तिला एक डुक्कर आणून दिले आणि तिने त्या मुलाऐवजी डुक्कर शिजवून ठेवायला सांगितले. त्या मुलाचेच मांस शिजवले आहे, यावर त्यांचा विश्वास बसावा म्हणून मी मुलाच्या अंगातले कपडे व छोटी करंगळी कापून कचऱ्यात टाकायला तिला सांगितलें. मी सांगितल्या प्रमाणे तिने सर्व केल्यानंतर तिघे राक्षस आले. तिघांनी डुकराचे मांस मिटक्या मारुन खाल्ले. परंतु त्यांची भूक भागली नाही. एक राक्षस स्वयंपाक घरांत कांहीं खायला मिळाले तर पहावे म्हणून आला. त्याने मला पाहिले व खांद्यावर टाकून बाहेर निघाला. पण मी मोठ्या शिताफीने त्याला सुरी भोसकून मारले. तो तेथेच गार झाला.”
“तो बराच वेळ बाहेर न आलेला पाहून दुसरा राक्षस स्वयंपाक घरांत आला. त्याने आपल्या एका साथ्याला मरून पडलेले पाहिले व मला धरून खांद्यावर टाकले. मी त्याला सुद्धा सुरी भोसकून ठार केले.”
“दोघे राक्षस परत न आलेले पाहून तिसरा राक्षस आपली गदा घेऊन स्वयंपाक घरांत आला. त्याने मला पाहिले. पण मला घरण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने आपल्या गदेचा प्रहार माझ्यावर केला. पण मी उडी मारून दूर पळून गेलो आणि त्याचा वार चुकविला. त्याची गदा जमिनीवर आदळली आणि जमिनीत जाऊन रुतून बसली.”
“त्याने गदा बाहेर काढण्यासाठी दोही हातांचा जोर लावला. मी ती संधी साधून त्याच्या छातीत सुरी भोसकली व त्याचा शेवट करून टाकला. तिनही राक्षसांचा अशा प्रकारे शेवट झाल्यामुळे माझा जीव तर वाचलाच.”
“ती बाई व मूल पण वाचलें.”
एवढी गोष्ट सांगून काळा चोर म्हणाला, “महाराज आता आपणच सांगा की त्या दिवशी माझा मृत्यू जास्त जवळ येऊन ठेपला होता की आज ?"
राजा म्हणाला, "त्या दिवशीच. त्या दिवशी, ज्या मुलाला वाचविलेंस तोच मी. ही पहा माझी करंगळी अर्धी कापलेली आहे."
इतकें सांगून ऋतुपर्ण राजा उठला आणि काळ्या चोराला छातीशी धरून म्हणाला,
"माझ्या हातून केवढे मोठे पाप घडत होते. मी आपल्या प्राणदात्याचाच बंध करणार होते. देवाने बांचविले म्हणूनच हे पाप माझ्या हातून घडले नाही. माझ्या वडिलांनी तुझा शोध काढण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. तू कोठे?? काय सांपडला नाहीस.”
“देव तारी त्याला कोण मारी हेच खरें...!!”
“नाही तर यांचा जीव कसा वाचला असतां आणि तुझा जीव तरी कसा वांचला असता. बरें तर, आता माझे हे अर्धे राज्य आज पासून तुझे झाले. तू चोरीचा धंदा सोडून दे. या राजकुमरांना मदत करण्यासाठी तूं स्वतचा जीव धोक्यात घातलास. या बद्दल बक्षीस म्हणून मी आपले तीन घोडे त्यांना भेट करतो."
असे सांगून ऋतुपर्ण राजाने सर्वांना निरोप दिला. तिघे मुलगे ऋतुपर्ण राजाचे घोडे घेऊन आलेले पाहून सावत्र आईला आश्चर्यच वाटले. तिला प्रथम खरेंच वाटले नाही. परंतु तिने विचार केला, माझ्या मुलाला राज्य मिळाले नाही तरी हरकत नाही. पण त्याला हे सुंदर घोडे तर मिळाले. असा विचार करून तिने आपल्या मनाचे समाधान करून घेतले.
"माई..! तुझ्या सांगण्याप्रमाणे घोडे आणून दाखविले आहेत. हे बघ घोडे. आता हे राज्य आमचे झाले." असें राजकुमारांनी म्हटल्यावर राणीने राज्य देण्याचे कबूल केले.
राजकुमारांनी घोड्याचे लगाम काढून घेतल्याबरोबर घोडे पळून गेले.
"तुम्ही मला घोडे दिले नाहीत. ही फसवणूक चालावयाची नाही!" सावत्र आई ओरडली.
"घोडे आणण्याची अट डोती. तुला द्यावयाची अट नव्हती. तूं की ते आम्हाला सांगितले नव्हतेस." राजकुमार म्हणाले.
राणी निरुतर झाली. तिच्या दासीने तिची समजूत घालण्याचा पुष्कळ यत्न केला. पण राणी काही समजली नही..!