चीन देशांत झी मिंग ली नावाचा एक गरीब शेतकरी राहात असे, तो समय सूचक आणि चाणाक्ष होता. तो पिढीजात शेतकरी होता. परंतु त्यांची गरीबी कधी दूर झाली नाही. एकदा झी मिंग लीने मनाशी ठरविलें की जमीनदाराला पिकातील एक दाणासुद्धा द्यायचा नाही. म्हणून कापणी होताच त्याने धान्य विकून टाकले. त्याने दोन सुंदर आणि चांगल्या कोंबड्या विकत घेतल्या आणि एका शिकाऱ्याकडून दोन लांडगे विकत घेतले. त्यांतील एक लांडगा तो बांधून बंद करून घरी ठेवीत असे. दुसरा गळ्यांत दोरी बांधून आपल्या बरोबर घेऊन हिंडत असे. एक दिवस जमीनदार धान्य वसूलीसाठी निघाला. शाऊ तो झी मिंग लीला भेटला.
"आपले धान्य तयार आहे. पाहिजे तेव्हां येऊन आपण घेऊन जा." झी मिंग ली म्हणाला.
“ह्या लांडग्याला कशाला बरोबर घेतला आहेस? हा पळून नाही जाणार?" लांडग्याला पाहून जमीनदाराने विचारले.
"जाऊ दे. काय मोठेसें. जरा हिंडून परत येईल." झी मिंग ली म्हणाला.
लांडग्याच्या गळ्यांतील दोरी सोडीत तो म्हणाला, "जा, आणि चांगल्या कोंबड्या पकडून आण."
धन्याची जणु आज्ञाच समजून लांडगा झपाट्याने पळून गेला.
"लांडगा तो. तो काय पुन्हा परत येणार आहे ?” जमीनदाराने आश्चर्याने म्हटले.
"तुम्ही उद्यां आमच्याकडे जेवावयास या. म्हणजे कळेल. मी त्याला कोंबड्या धरून आणावयास सांगितल्या आहेत." झी मिंग ली म्हणाला.
दुसऱ्या दिवशी झी मिंग लीनें त-हेतऱ्हेचे कोंबडीचे पदार्थ तयार करविले. ठरल्याप्रमाणे जमीनदार आला. झी मिंग लीच्या घराजवळ येताच त्याला खमंग वास आला. त्याच्या तोंडाला पाणी सुटले.
“झी मिंग ली ! ज्याने एवढया चांगल्या कोंबड्या पकडून आणल्या त्या लांडग्याला तरी आण पाहूं." जमीनदार म्हणाला.
"जेवण होऊ द्या. मग पाहूं." झी मिंग ली म्हणाला.
दोघे जेवावयास बसले. सर्व पदार्थ फारच रुचकर झाले होते. जेवणे आटोपल्यावर त्याने विचार केला असा लांडगा आपल्याकडे असेल तर काय बहार होईल. झी मिंग ली घरांत बांधून ठेवलेल्या दुसऱ्या लांडग्याला घेऊन आला.
“फार चांगला आहे बोवा हा लांडगा. काय, विकणार काय याला ? पांचशे तोळे चांदी देतो.” जमीनदार म्हणाला.
"असे कसे मागतां सावकार. अहो, हे माझ्या उपजीविकेचे साधन आहे. विकणे म्हणजे उपासमार होणार. माझ्याकडून मिळावयाचे धान्य आणि जे काही असेल तें कर्ज तुम्हीं वसूल करून घ्या पण हा लांडगा मागू नका." झी मिंग लीनें नकारार्थी मान हलवून म्हटले.
"ते सर्व जाऊ दे. ते नको मला. मला हा लांडगाच पाहिजे. हजार तोळे चांदी घेतलीस तरी चालेल" जमीनदार म्हणाला.
"आता मी काय सांगणार? तुम्हांला हा लांडगा हवाच असेल तर मला कमीत कमी दीड हजार तोळे चांदी द्या." झी मिंग लीनें एक दीर्घ श्वास सोडून सांगितले.
त्याच्या मागणीप्रमाणे दीड हजार तोळे चांदी देऊन जमीनदारानें तो लांडगा विकत घेतला.
घरी जाऊन बायकोला म्हणाला, “बघ, मी काय आणले आहे. हा उत्तम उत्तम कोंबड्या चोरुन आणतो."
“माझा नाहीं विश्वास बसत त्याच्यावर!" बायको म्हणाली.
"आत्तां दाखवितों" असें म्हणून जमीनदाराने झी मिंग लीप्रमाणे लांडग्याला चुचकारले, गोंजारले.
तो म्हणाला, “जा, उत्तम उत्तम कोंबड्या घेऊन ये."
म्हणून त्याला सोडून दिले. गळ्यांतील दोरी सुटतांच तो जो धूम पळाला तो पुन्हां येतो आहे कशाला? एक महिना झाला. पण लांडगा आला नाही. तेव्हां त्याला कळले की झी मिंग लीनें आपल्याला फसविलें आहे. त्याचा राग अनावर झाला. झी मिंग लीच्या घरी गेला.
जमीनदार झी मिंग लीला म्हणाला, "मला फसवतोस होय..! काढ माझें सोने चांदी. नाही तर बघ.”
“आता कोठले मी सोने चांदी आणू...! तें तर केव्हांच खर्च झाले," झी मिंग ली म्हणाला.
“अस्सं!” जमीनदाराने आपल्या नोकरांना आज्ञा दिली "याला रात्रभर बाहेर कुडकुडत त्या तेलाच्या घाणीला बांधून ठेवा."
जसजशी रात्र वाढू लागली तस तशी थंडी हि वाढू लागली. अंगांत ऊब येण्यासाठी तो शरिराची हालचाल करूं लागला. रात्रभर त्याने तेलाची घाणी फिरविली, या उद्योगाने त्याच्या अंगांत इतकी ऊब वाढली की त्याच्या शरिरांतून घाम गळू लागला. उजाडल्यावर जमीनदार उठला. त्याला वाटले झी मिंग ली थंडीत कुडकुडून गार पडला असेल. म्हणून त्याने आपल्या नोकरांस पाहून येण्यास सांगितले.
"मेलाय कसला! चांगला धापा टाकतो आहे आणि घामाने त्याचा सदरा अगदी चिंब भिजला आहे.” नोकरांनी मालकाला येऊन सांगितले.
मालकाला वाचलें यात काहीतरी रहस्य असले पाहिजे.
झी मिंग लीला म्हणाला, “अरे इतक्या थंडीत तुला घाम कसा येतो आहे..??"
“एखाद्या निरपराध्याला विनाकारण शिक्षा दिली तर काय होईल..! मी जो लांङगा आपल्याला दिला होता तो खरोखरच कर्तबगार होता. मला वाटते, आपल्या धनीणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नसेल..! त्या रागांत तुम्ही त्याला डवचले असणार..! त्याला तें सारे कळतें. तर मग तो परत कसा येणार?" झी मिंग ली म्हणाला.
"पण मी तुझ्याविषयी विचारीत आहे, तुला आत्तां एवढ्या थंडीत घाम कसा आला..!" जमीनदाराने विचारलें.
"मी अंगांत घातलेला सदरा पहा. नीट निरखून पहा. त्यांत अशी जादू आहे की उन्हाळ्यांत हा अंगांत घातला तर थंड वाटतो आणि हिवाळ्यात घातला तर ऊब वाटते.” झी मिंग लीने सांगितले.
“तर मग मी पांचशे तोळे चांदी देतो." जमीनदार म्हणाला.
"छे! छे!! भलतंच!!! अहो, माझ्या जवळील सर्वच वस्तू काय घेता? आणि हा सदरा तर आमच्या घरांत पिढिजात चालत आला आहे. तो मी कोणाला कधी हि देणार नाही.” झी मिंग लीने मोठ्या निर्धाराने सांगितले.
"बरं बाबा, हजार तोळे घे. पण मला तो पाहिजे." जमीनदाराने हट्ट धरला.
“आपल्याला अगदी हवाच असेल तर कमीत कमी दोन हजार तोळे चांदी तरी दयाच. कारण मला उन्हाळ्यांत हिवाळ्यांत मरावे लागेल." झी मिंग ली म्हणाला.
दोन हजार तोळे चांदी देऊन त्या जमीनदाराने वेडेपणाने झी मिंग ली पासून त्याचा सदरा विकत घेतला. दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून वाळवून त्यानें तो घातला आणि मोठ्या ऐटीत तो आपल्या सासुरवाडी निघाला. थोडेसें अंतर चालुन गेल्यावर त्याला कळून आलेंनी झी मिंग लीने आपणास फसविले आहे. या वेळी त्याला आता सोडतां कामा नये असा निश्चय करून त्याने आपल्या नोकरांना झी मिंग लीला पकडून आणण्यास सांगितलें.
झी मिंग ली येतांच जमीनदाराने त्याला एका पोवंत बंद करून नदीकाठी नेले. तेथे एका चवठ्यावर एक झाड होते. त्याची एक फांदी पाण्यावर गेली होती त्या फांदीच्या टोकाला तें पोतें बांधून आपल्या नोकराला ती फांदी तोडून टाकण्याची त्याने आज्ञा दिली. फांदी चांगली जाड होती.
थोडी तोडून झाल्यावर नोकर म्हणाला, "मालक, अजून पुष्कळ वेळ लागेल ही फांदी तोडावयाला. मी जेवून येतों व मग तोडतों बाकीची फांदी."
"ठीक आहे. मी हि तोपर्यंत जेवून येतो. आता कोठे जाईल हा? असू दे असाच लोंबत." असे म्हणत दोघे हि जेवण्यासाठी निघुन गेले.
ते निघून गेल्यावर झी मिंग ली ओरडूं लागला, “मला उतरवा. मला उतरवा.”
त्याच वेळी जमीनदाराचा सासरा आपल्या लेकीच्या भेटीला चालला होता. तो करुण स्वर ऐकून त्याने विचारलें
"कोण आहे?"
त्या शब्दावरून झी मिंग लीनें जमीनदाराच्या सासऱ्याला ओळखले. त्याला कुबड असल्याचे माहीत होते. म्हणून तो ओरडला, "कोणी अगदी देवाने पाठविल्याप्रमाणे दत्त म्हणून आल्यासारखे वाटते आहे. त्याने मला खाली उतरवावें, माझी पाठ अगदी सरळ झाली आहे."
"आं! तुझें कुबड नाहीसे झाले..? कसे..?" सासऱ्याने विचारले.
“वाटते तुम्हाला माहीत नाही. या पोत्यांत बसलें म्हणजे कुबड नाहीसे होते. मी बाहेर मला आल्यावर तुम्हांला त्याची खात्री पटेल, खरे म्हणजे आमच्या लोकांनी आतापर्यंत यावयास पाहिजे होते. का नाही आले कोण जाणे. हे..! हे पोतें द्यायला एक मिनिट उशीर झाला तरी शंभर तोळे चांदी द्यावी लागते." झी मिंग ली म्हणाला.
"अरे मग मी देतो तुला शंभर तोळे चांदी. मला बसव थोडा वेळ आत. माझ्या पाठीला सुद्धा मोठे कुबड आहे." सासरा म्हणाला.
त्याने झी मिंग लीला उतरविले. येन केन करून झी मिंग ली बाहेर आला. सासऱ्याला आपल्या जागी पोत्यांत बसवून पुन्हां पोतें होते तसे झाडाला टांगून तो आपल्या वाटेने निघून गेला. थोड्या वेळाने जमीनदार आला. नोकराने फांदी तोडली. ती पोत्यासह पाण्यात पडली व वाहून गेली. हुश्श...!!! करून छातीवर हात फिरवीत जमीनदार आपल्या घरी निघून गेला. काही दिवस गेले. एकदा जमीनदार हिंडत हिंडत झी मिंग लीच्या घराच्या बाजूला आला.
तेथे त्याला बसलेला पाहून त्याला फार आश्चर्य वाटले.
“अरे! तूं तर मरून गेला होतास, मग पुन्हा येथे कसा आलास?" त्याने विचारले.
“सत्पुरुषांना असे कधीं मरण येत नाही. पाण्याला माझे पाय लागतांच वरुण देवाने आपल्या दूतांना पाठवून मला बोलावून नेले. माझे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत सत्कार करून त्याने सर्वांना एक मोठी मेजवानी दिली. राहाण्यासाठी त्याने फार आग्रह केला. तेथें अप्सरेशी माझें लग्न लावून दिले. फार मजा आहे तेथे. तेथील लोकांना खाण्या पिण्या शिवाय दुसरें काम नाही आणि तेथे सर्वच अप्सरा आहेत. थोड्याच दिवसांत मला तेथें कंटाळा आला. मी त्याच्या जवळ परत जाण्याची आज्ञा मागितली. परंतु त्याने नाकबूल केलें. मला तेथें स्वस्थ बसून आजाऱ्यासारखे वाटू लागले. म्हणून मी वर येण्याचा फारच आग्रह धरला. तेव्हां कुठे मला त्याने परवानगी दिली.”
तो म्हणाला, “कधी कधी आमची आठवण होऊ दे. येतांना आपल्या मित्रांना सुद्धा बोलावून आणीत जा.”
“मी येतांना माझ्या बायकोला 'चल' म्हटले पण ती आली नाही. 'हा अगदी मूर्खच आहे. याच्या जागी जर मी असतो तर तेथील सर्व अप्सरांशी लग्न केले असते आणि त्या राजाला गचांडी मारून मी राजा झालो असतो.' असा विचार करून तो झी मिंग लीला म्हणाला-"मला घेऊन चल रे एकदा." हो, ना, करतां करतां झी मिंग ली त्याला घेऊन जायला झाला तयार एकदाचा. "पण कोणालाहि सांगू नका. नाहीतर सर्वच लोक माझ्या पाठीस लागतील घेऊन जाण्यासाठी.
“मी उद्या सकाळी दोन होड्या घेऊन येतो. तुम्ही तयार राहा.” झी मिंग ली म्हणाला.
दुसऱ्या दिवशी एक चिनीमातीची आणि एक लाकडी अशा दोन होड्या त्यानें किनाऱ्याशी आणून ठेवल्या. जमीनदार आल्याबरोबर त्याने त्याला चिनीमातीच्या होडीत बसविले व आपण लाकडी होडीत बसला. दोघे वल्हवत वल्हवत खूप दूर गेले. एके ठिकाणी आल्यावर झी मिंग लीने आपल्या होडीवर जोराने वल्हें आपटले आणि जरा वाट पाहिल्यासारखें केलें. “हा आवाज ऐकून जलराजाचे दूत येतात. अजून का आले नाहीत!" तो आपल्याशी पुटपुटला.
त्याचे शब्द ऐकून जमीन्दार म्हणाला, “माझ्या होडीवर वल्हें आपटून पाहा."
झी मिंग लीला तेंच पाहिजे होते. त्याने चिनीमातीच्या होडीवर जोराने वल्हें मारले. त्याबरोबर ती एकदम फुटून गेली आणि तो जमीनदार पाण्यात पडून बुडून गेला. अश्या प्रकारे जमीनदार झी मिंग ली समोर नेहमी मूर्ख ठरत राहिला....!