एका देशांत एक राजकुमार राज्य करीत असे. लहानपणीच त्याचे आईवडील वारले असल्याने त्याच्यावरच राज्याचा सारा भार होता. रोज तो भिकाऱ्यांना अन्नदान करीत असे. सर्व लोक राजाला आशीर्वाद देत. राजकुमार स्मित करून त्यांचे आशीर्वाद ग्रहण करीत असे. त्याचे लग्न झालेले नसल्यामुळे त्याला मागे पुढे काही व्याप नव्हता. त्यामुळे कसलीच चिंता नव्हती. प्रजेलाच आपले कुटुंब समजून तो राहात असे. एकदां एक तरुण मनुष्य राजकुमाराकडे आला.

तरून राजाला म्हणाला, "महाराज, आपण फार दानी आहोत अशी ख्याती ऐकली. म्हणून मी आपणांकडे थोडी मदत मागण्यासाठी आलो आहे. मी एक हतभागी मनुष्य आहे. माझे आईवडील लहानपणीच मला सोडून स्वर्गी निघुन गेले. पुढे मी फार कष्टांत दिवस काढले. तशांतच थोड्या दिवसांपूर्वी मी लग्न केले. पण माझी साडेसाती काहीं संपली नाही. अजून लग्नाला दोन महीने देखील झाले नाहीत तोच माझी बायको वारली. तिच्या क्रिया कर्मासाठी सुद्धा माझ्या जवळ पैसे नाहीत. त्यासाठी मी आपल्या जवळ दहा मोहरा मागण्यास आलो आहे. कृपा करून तेवढी मदत करा. मी आपला आजन्म सेवक राहीन. त्यासाठी मी मोबदला देखील मागणार नाही."

“एवढेचना. मी तुला शंभर मोहोरा देतो. जा, आपल्या बायकोचें क्रियाकर्म उरक आणि गरीबांना दान धर्म देखील कर. तूं परत आल्यावर मी तुला नोकर म्हणून काम देईन आणि पगार पण देईन.” राजकुमार म्हणाला.

दोन दिवस झाल्यावर तो मनुष्य आला व राजाकडे नोकरीला राहिला. काही दिवस गेल्यावर राजकुमार त्याला पगार देऊ लागला.

तो तरुण म्हणाला, “महाराज..! आपल्याकडे मला कशाची उणीव आहे?? कधीं जरूर पडली तर मागेन आपणाजवळ."

त्याने पगार घेतला नाही. राजकुमाराने त्याला पगार घेण्यासाठी विशेष कांही आग्रह केला नाही. दिवसा मागून दिवस चालले होते. होता होता सर्व भार राजकुमाराने त्या नोकरावरच टाकला. त्या नोकराच्या कारकिर्दीला हि कांहीं दिवस गेले. एक दिवस तो नोकर राजकुमाराकडे आला.

तो नोकर म्हणाला, "महाराज...! आपण विनाकारण पाण्यासारखा पैसा खर्च करीत आहांत. खर्च थोडा कमी केल्यास बरें पडेल, असा खर्च केल्यास किती दिवस पुरेल..! नंतर आपला खर्च कसा भागणार..!"

"त्याची कशाला काळजी. मला नाही बायको, नाही मुलं, नाही कसला व्याप आणि समज, झाला सर्व खजीना रिकामा तर काय माझी प्रजा मला मदत करणार नाही?”

पुढे राजकुमार म्हणाला, “अरे, भिक्षुक रोज दान घेतल्यावर मला आशीर्वाद देऊन जातात. त्यांच्या त्या आशिर्वादाचे मोल कांहींच नाही का, माझ्यावर प्रसंग आलाच तर ते धावून येणार नाहीत का? आज मी त्यांना जेवू घातले तर उद्या ते मला घालतीलच ना??."

“असल्या आशीर्वादांवर विश्वास ठेवून कांहीं होते का, महाराज?" नोकर म्हणाला.

दुसऱ्या दिवशी भटांभिक्षुकांची जेवणे चालली असतां राजाने विषय काढला. 

राजा म्हणाला, "आपण दररोज माझ्या विषयीं आदर दाखवून माझ्यासाठी वेळ पडल्यास वाटेल तो त्याग करण्यास तयार असल्याचे सांगतां, यावर आमचा हा नोकर मुळीच विश्वास करीत नाही...! मी त्याला पुष्कळ सांगून पाहिले. मग बोला, हे सर्व खरें की खोटें...?"

त्यातील एक हुशार भटभिक्षुक म्हणाला, “त्याच्या बोलण्यावर किंवा सांगण्यावर आपण काय चालतां विश्वास ठेवता?? तो नोकर एक नंबरचा चोर आहे. तो आपल्याकडे रोज रोज चोरी करतो. त्याच्यावर चांगली नजर ठेवा."

सर्व लोकांनी त्याला दुजोरा दिला. राजकुमाराने आपल्या नोकराला बोलावून चोरीबद्दल विचारले.

तो म्हणाला- "होय महाराज, त्या लोकांचे म्हणणे अगदी खरे आहे. मी आपल्या खजिन्यांतील बरेंच धन चोरले आहे...!”

“पगार न घेण्याचे सोंग दाखवून पाठीमागे पाप कृत्य केलेंस काय..? जा, तुझें काळे तोंड मला यापुढे दाखवू नकोस." राजकुमाराने आज्ञा दिली.

त्यांचा शाब्दिक संघर्ष होताच नोकर राजवाडयातून बाहेर पडला. तो थेट नदी पार करून गेला. तेथे त्याने चोरीच्या द्रव्याने एक मोठा वाडा बांधला. राजकुमाराचा दान धर्म पूर्ववत् चालूच होता. नोकर गेल्यावर सुमारे एक वर्ष गेलें असेल. पुढे राजकुमाराचा सारा खजिना रिकामा झाला. आता त्याच्या जवळ फुटकी कवडी देखील शिल्लक राहिली नाही. त्याने विचार केला, ज्या लोकांना आजपर्यंत आपण खायला घातले ते लोक आपल्याला पोसणार नाहीत असे होणेच शक्य नाही...!

दुसऱ्या दिवशी मंडळी जेवत असतां तो म्हणाला, "मित्र हो! हे माझ्याकडील शेवटचे जेवण. आता माझ्या जवळ एक पैसा हि शिल्लक नाही. आतापर्यंत तुम्ही मला आशीर्वाद दिलेत व वचनें दिलीत आणि खरोखरच उद्यापासून माझा सर्व भार आपणांवर येऊन पडला आहे. तुम्ही आपले वचन पाळाल याची मला पूर्ण खात्री आहे."

हे ऐकतांच सर्व मित्र परस्परांच्या तोंडाकडे पाहू लागले.

शेवटी त्यातला एक मित्र राजाला म्हणाला, “महाराज, आपण दान धर्मातच विना कारण जास्त द्रव्य खर्च केलें आहे. तेव्हा ते दानाचे पुण्यच आपल्या जास्त उपयोगी पडेल, ते भिकारीच आपली जास्त सहायता करूं शकतील."

असें म्हणत जेवण करून ढेकरा देत सर्व मित्र निघून गेले. राजकुमाराकडे त्यांनी वळून सुद्धा पाहिले नाही. नंतर त्याने दान घेणाऱ्या भिकाऱ्यांना विचारले.

त्या म्लेल्या भिकाऱ्यांना राजा म्हणाला, “तुम्ही माझ्यासाठी काय वाटेल ते करण्यास तयार आहात ना?? माझ्या जवळ आतां कांहीं नाही. म्हणून तुम्ही माझा भार आपल्यावर घ्या."

"भटाभिक्षुकांना बोलावून जेवणे दिली तर संपणारच धन, आम्ही बोलून चालुन भिकारी. आमच्याजवळ काय असणार? तें काम मोठे लोक करतील. त्यांच्या जवळ धन असणारच आणि समजा ते जर तुम्हांला पोसू शकले नाहीत तर या आमच्याबरोबर भीक मागायला." भिकारी म्हणाले.

राजकुमार निराश झाला. त्याला वाटले होते, हे मित्र मदत करतील पण सर्वांनी उलट त्यालाच पैसे उधळल्याबद्दल दोष दिला. आतां त्याला त्या नोकराची आठवण झाली. त्याने तेव्हांच सूचना दिली होती आणि आपण या लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला हांकलुन दिले. इतक्यांत जवळच त्याला घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू आला आणि समोर पाहिलें तो तोच नोकर त्याच्या समोर उभा.

नोकर राजकुमाराला म्हणाला, “महाराज मी तेव्हा जे म्हटले होते तसेंच झाले ना..! कोण आले आता आपल्या मदतीला? मला हे भविष्य दिसत होते आणि म्हणूनच मी आपले पुष्कळसें धन चोरून नेले. आपण काळजी करू नका त्या धनानेच मी आपल्यासाठी एक वाडा नदी पलीकडे बांधला आहे. तेथे आपण सुखाने आणि आनंदाने राहा.”

असे सांगून तो नोकर राजाला नव्या महालांत घेऊन गेला व तेथे दोघे सुखाने राहू लागले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel