( हीकथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
.विशाखा सभागृहात बसून सोहळा पाहत होती.विजयचा सन्मान होताना पाहून तिचे हृदय भरून आले होते.त्याने नायकाची भूमिका केलेल्या "आशंका"या हिंदी चित्रपटामध्ये त्याचे काम उत्कृष्ट झाले होते.त्याला उत्तम अभिनयाचे नॉमिनेशन मिळाले होते.त्याला बक्षीस मिळेल असे जरी तिला अंतर्यामी वाटत होते तरी बक्षीस मिळेपर्यंत तिची स्थिती दोलायमान होती.धडधडत्या हृदयाने ती प्रेक्षागृहात बसली होती.त्याचे नाव पुकारले गेले तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नव्हता.
भारतात सर्व चित्रपटगृहात "आशंका" चित्रपट अनेक सप्ताह हाऊसफुल होत होता.चित्रपट परदेशातही प्रदर्शित झाला होता. तिथेही चित्रपट व विजयचे काम सर्वांच्या पसंतीस उतरले होते.विजयचे हे हिंदी चित्रपटातील पहिलेच काम होते.या अगोदर त्याने हौशी मराठी नाट्य रंगभूमी,व्यावसायिक रंगभूमी ,दोन मराठी चित्रपट यात काम केले होते.त्याचे काम सर्वांना पसंत पडले होते.प्रेक्षक, निरीक्षक, टीकाकार, चित्रपट समालोचक ,सर्वांनी त्याचे कौतुक केले होते. प्रेक्षकांना एखादा चित्रपट पसंत पडतो परंतु टीकाकारांना पसंत पडत नाही.सर्वांकडून स्तुती व कौतुक क्वचितच एखाद्याच्या वाट्याला येते.तो सन्मान,ते भाग्य, विजयला मिळाले होते.
त्याचे मराठी चित्रपटातील काम पाहून प्रसिद्ध दिग्दर्शक रंजन अत्यंत प्रभावित झाला होता. त्याने त्याला मुद्दाम फोन करून बोलावले होते. आपल्या सिनेमात काम दिले होते. हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी किती पैसे पाहिजेत असे त्याने विचारले होते.तुमच्या चित्रपटात मी फुकटही काम करायला तयार आहे असे उत्तर विजयने दिले होते. रंजनने मुद्दाम फोन करून विजयला बोलाविले याचे सर्वानाच अप्रूप वाटत होते पहिल्याच चित्रपटात तो एवढा यशस्वी होईल असे कुणालाही वाटले नव्हते.रंजनने त्याला मोबदलाही चांगला दिला होता.
सत्काराला उत्तर देताना त्याने मुद्दाम विशाखाला स्टेजवर बोलवून घेतले होते.तो म्हणाला होता.प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि ती त्याची पत्नी असते असे म्हटले जाते.इतर यशस्वी पुरुषांच्या बाबतीत हे किती खरे आहे ते त्यांनाच माहीत.परंतु माझ्या बाबतीत मात्र ते वचन शंभर टक्के खरे आहे.अभिनयाची लहानपणापासून आवड असूनही,या क्षेत्रात येण्यासाठी अंतःकरण तळमळत असूनही, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मी माझी नोकरी सोडत नव्हतो. नोकरी सोडून या बिनभरवशाच्या व्यवसायात यावे असे मला वाटत नव्हते.अभिनय करण्यासाठी , रंगभूमीवर काम करण्यासाठी,चित्रपटात काम करण्यासाठी,आपल्या अभिनय सामर्थ्याने लोकांची अंतःकरणे प्रफुल्लित करण्यासाठी, माझे हृदय मात्र तडफडत होते.आक्रंदत होते
या काळात विशाखाने माझी तळमळ बरोबर ओळखली.ती नोकरी करीतच होती.तिने मला विश्वास दिला .मी या व्यवसायात यशस्वी होईन अशी मला खात्री दिली.तिने जर मला पाठिंबा दिला नसता,तिने जर मी सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडीत असा मला विश्वास दिला नसता,तर मी या क्षेत्रात आलो नसतो. या सन्मानाची खरी मानकरी माझी पत्नी विशाखा आहे .असे म्हणून त्याने ते मानचिन्ह विशाखाच्या हातात दिले होते.व तिला आलिंगनही दिले होते.प्रेक्षागृह प्रेक्षकांनी वाजविलेल्या टाळय़ांच्या आवाजाने दुमदुमून गेले होते.
कार्यक्रमाचे संचलन करणार्याने माइक तिच्या हातात दिला होता .दोन शब्द बोलण्याची तिला विनंती केली होती.तिला काय बोलावे ते सुचत नव्हते.एवढय़ा मोठय़ा प्रेक्षागृहात प्रेक्षकांसमोर बोलण्याची तिला कधी सवय नव्हती.तरीही सुचले ते चार शब्द धिटाईने न अडखळता ती बोलली होती.ती म्हणाली होती,"मी कितीही पाठींबा दिला तरी विजयच्या अंगात कर्तृत्व नसते,अभिनय सामर्थ्य नसते ,कष्ट करण्याची चिकाटी नसती,अहोरात्र कष्ट करण्याची इच्छा नसती, तर केवळ माझ्या पाठिंब्याचा कांहीच उपयोग झाला नसता. तेव्हा या मानचिन्हाचा खरा मानकरी विजय आहे.अर्धांगिनी म्हणून या विजयच्या सुख दु:खात माझा अर्धा वाटा नेहमीच असतो."असे म्हणून तिने ते मानचिन्ह पुन्हा विजयच्या हातात दिले होते.तिच्या उत्तरावर टाळ्या वाजवून सर्व प्रेक्षकांनी तिचे कौतुक केले होते.
विजय व विशाखा नुकतीच फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा संपल्यावर परत आली होती.विशाखाच्या डोळ्यासमोर अजूनही प्रेक्षागृहातील सर्व दृश्य जसेच्या तसे दिसत होते.घरी आल्यावर विजयने तिचे पुन्हा कौतुक केले होते.
विशाखाच्या डोळ्यांसमोर दोघांच्या लहानपणापासूनचा सर्व चित्रपट सरकत होता.
दोघांचीही शाळेत असल्यापासून ओळख होती.दोघेही एकाच वर्गात शिकत होती.ओळखीचे रूपांतर मैत्रीत कधी झाले ते त्यांचं त्यांनाच कळले नाही.विशाखा विजयहून अभ्यासात हुषार होती .विजय विशाखाच्या टिपण्या (नोटस्)अनेकदा नेत असे.त्याच्या तो सत्यप्रती चित्रप्रती (झेरॉक्स) काढून आणी.त्याने बहुतेक सर्व अभ्यास तिच्या टिपण्य़ांवर (नोट्सवर) केला होता. त्याचा तेव्हापासूनच कल अभिनयाकडे होता.शाळेच्या स्नेहसंमेलनात त्याने अनेकदा अभिनयाची बक्षिसे मिळवली होती.विशाखाने त्याला नेहमी प्रोत्साहन दिले होते.तिने कौतुक केले होते.
शाळेतून महाविद्यालयात आल्यावरही दोघांची विद्याशाखा एकच होती.विशाखाच्या टिपण्यांवर उत्तीर्ण होण्याची परंपरा तिथेही चालू होती.महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात नाटक बसविण्यात व रंगमंचावर सादर करण्यात विजयचा नेहमी पुढाकार असे.तिथेही त्याने अनेक बक्षिसे पटकावली होती.
दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले ते त्यांचे त्यांनाच कळले नाही .सुदैवाने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांना नोकरीही एकाच ठिकाणी मिळाली.एकमेकात नाकारण्यासारखे काहीच नसल्यामुळे घरच्यांच्या संमतीने त्यांचा विवाह झाला.
वैवाहिक जीवन सुरू झाले.दोघेही कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत होती.विजय अधूनमधून उदास होत असे.त्याची उदासी विशाखाच्या लक्षात येत असे.तो उदास कां आहे ते प्रथम तिच्या लक्षात येत नसे.आपल्याशी विवाह केल्यामुळे तो उदास आहे का असा तिला संशयही आला.परंतु थोड्याच काळात तिला त्याच्या उदासपणाचे कारण कळले.अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी, अभिनय करण्यासाठी तो तळमळत आहे हे तिच्या लक्षात आले.तिने त्याला तू नोकरी सोड.तुझ्या आवडत्या अभिनयक्षेत्रात जा.सुरुवातीला जरी तुला पैसा मिळाला नाही तरी तू अत्युच्च शिखरावर जाशील, यशस्वी होशील ,भरपूर पैसाही मिळवशील,असा विश्वास दिला .जरी तुला पैसा मिळाला नाही तरी ज्यामध्ये मन रमते अशा क्षेत्रात तू असशील .आपल्या आवडत्या व्यवसायात असणे हे एक मोठे समाधानाचे साधन आहे.तुझ्या आर्थिक जबाबदाऱ्या,कौटुंबिक जबाबदार्या,केवळ तुझ्या नाहीत, त्या आपल्या आहेत,त्या मी पार पाडीन, असा त्याला विश्वास दिला .त्याला पाठिंबा दिला. त्याला आग्रह केला.त्याच्या धडपडण्याच्या, उमेदवारीच्या काळात,असे अनेक प्रसंग आले की जेव्हा तो नाउमेद झाला होता,डिप्रेशनमध्ये होता,निराशा व औदासिन्याने तो घेरला गेला होता. हे क्षेत्र सोडून पुन्हा नोकरी करण्याचा विचार करीत होता,त्या त्या वेळी तिने त्याला धीर दिला.विश्वास दिला. उमेद दिली. पाठींबा दिला.आशा दिली. औदासिन्य दूर केले आणि त्याचे फळ ती पहात होती.
*एवढा कसला विचार करतेस असे विजयचे शब्द तिच्या कानावर पडले.*
*पुढे तो म्हणाला तू कसला विचार करीत आहेस ते मला कळत आहे.*
*आपला दोघांचा प्रवास तू पुन्हा अनुभवीत आहेस.*
*आपल्या मनातील विचार त्याने बरोबर ओळखलेले पाहून काहीही न बोलता ती त्याच्या कुशीत शिरली.*
१९/११/२०२०©प्रभाकर पटवर्धन