झाडेमाडे जणू वाकली. आणि प्रतापही नम्र झाला होता. ‘मी प्रभूचा दास आहे, त्याचा सेवक आहे. प्रभुत्वाची भावना माझ्या मनात कदापी न येवो. नम्रपणे, निरहंकारपणे प्रभूची, जगाची शक्य ती सेवा मला करू दे.’त्याला या विचारात आनंद वाटला; परम समाधान वाटले. आता मनांत भीती नव्हती. संशय नव्हता. आता त्याला अगतिक, निराधार वाटत नव्हते. प्रभू जवळ आहे असे त्याला वाटले.
दिवस गेला. रात्री त्याने फक्त फलाहार केला. थोडे दूध घेतले. पाऊस जरा थांबला होता. आज पाैर्णिमा होती. चंद्र शान्तपणे शोभत होता. आजूबाजूला थोडे थोडे ढग होते. तो त्या ढगांकडे बघत होता. चंद्राला गिळायला ते येत, परंतु चंद्र पुन्हा वर येई. त्याचा आत्मचंद्र वासनाविकारांच्या कचाटयातून असाच धडरडून मुक्त होत होता. तो घरात आला. तो अंथरूणावर पडला. त्याने मच्छरदाणी सोडली नाही. डास चावत होते. ढेकूणही होते. तो मनात म्हणाला, ‘मी असाच पुढे ढेकूणडासांच्या संगतीत राहायला जाईन. नकोत वाडे, बंगले. गरिबाप्रमाणे मी राहीन. मला सारे सहन करायला शिकू दे.’ केव्हा तरी त्याला झोप लागली.
दुसरा दिवस आला. शेतकर्यांचे, श्रमणार्यांचे शहाणे पुढारी आले होते. ते सातजण होते. सारे बसले. चर्चा सुरू झाली.
‘हे बघा, मोठी जमीन एकाच्या मालकीची असणे हे पाप आहे. जमीन विकणे, विकत घेणे- या गोष्टी म्हणजे गुन्हा झाला पाहिजे.’ तो म्हणाला,
‘बरोबर आहे तुमचे म्हणणे.’ एक म्हातारा म्हणाला.
‘माझी जमीन फक्त दोन बिधे आहे. बाकी मी खंडाने घेतो. विकत घ्यावी तर किंमती भरमसाट. आम्हीही आपसांत चढाओढ करून जमीनदारांचे उखळ पांढरे करतो.’
‘बरोबर आहे तुमचे म्हणणे. म्हणूनच मी तुम्हांला ही जमीन देऊन टाकणार आहे. या बाबतीत विचार करायला आपण जमलो आहोत.’ प्रताप म्हणाला.
‘सर्वांनी सारखी वाटून द्या.’ एकाने सुचविले.
‘हेच बरे.’ दुसर्याने पुष्टी दिली.
‘परंतु उद्या एकाला दोन मुलगे नि एकाला चार असले तर, आलीच पंचाईत. पुन्हा आली विषमता. आणि वाटून दिलेली जमीन एखादा पुन्हा विकायचाही. प्रश्न सोपा नाही.’ सरळ नाकाचा एक तरतरीत मनुष्य म्हणाला.
‘खरे आहे यांचे म्हणणे. शेतकरी आळशी होतील. पुन्हा जमिनी श्रीमंतांनाच ते विकतील. येरे माझ्या मागल्या.’
‘जो मशागत करील, स्वत: नांगरील, त्यालाच द्या. जमीन विकायला बंदी घाला.’
‘किंवा सारी सामुदायिक ठेवा. जे नांगरतील, मशागत करतील त्यांना उत्पन्न समान वाटावे.’
‘सर्वांजवळ नांगर हवेत, बैल सारखे हवेत.’
‘आमचे कधीही एकमत होणार नाही. तुम्हीच काय ते ठरवा.’ म्हातारा म्हणाला.
‘प्रश्नच गुंतागुंतीचा आहे. जमीन वाटून देतानाही जमिनीचा मगदूर, तिचा कस, सारे बघायला हवे. नाही तर कोणाला काळीभोर जमीन जायची, तर कोणाला नापीक रेताड जायची.’
‘जमीन देवाची. एका माणसाची नाही.’ प्रताप म्हणाला.
‘बरोबर.’ सारे म्हणाले.
‘सारी जमीन गावाच्या मालकीची करावी. मी तुमचा नामधारी मालक. तुमचा खंड कमी करतो. भरपूर जमीन खंडाने देतो. ज्याला चांगली जमीन येईल त्यान खंड अधिक द्यावा. हे खंडाचे पैसे मी तुमच्या गावच्या कल्याणासाठीच ठेवणार आहे. ते तुमच्याच श्रमाचे पैसे.