(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
प्रणयाराधनाच्या काळात दोघेही फक्त सकारात्मक बाजू पाहात होते .नकारात्मक बाजू कुणाच्या लक्षात आली नव्हती.
हा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच जाणार होता .
त्याची परिणती शेवटी काय होणार होती ते नियतीलाच माहीत.
हळूहळू दोघांनाही आपल्या आवडी निवडी बऱ्याच बाबतीत परस्पर विरुद्ध आहेत असे लक्षात येऊ लागले होते .
साधनाला रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय होती तर अानंद लवकर झोपत असे .साधना स्वाभाविक उशिरा उठत असे तर आनंदाला लवकर जाग येई .साधनाने आपल्याला सकाळी चहा करून द्यावा अशी त्याची अपेक्षा असे.त्याचा चहा त्यालाच करून घ्यावा लागत असे.तो आपल्याबरोबर साधनाचाही चहा करीत असे.
लग्न होण्या अगोदर आनंद फॅक्टरीवर नाष्टा व जेवण करीत असे .साधना जेथे पेइंगगेस्ट म्हणून राहत होती तिथे तिचा चहा व नाष्टा होई.तर कंपनीच्या कॅन्टीनमध्ये ती जेवण करीत असे .रात्रीचे जेवण पुन्हा घरीच जिथे ती राहत होती तिथे होत असे .तिला चहा ,जेवण, स्वयंपाक करण्याची सवय नव्हती व आवडही नव्हती .
नेहमी बाहेर खाणे चांगले नाही.लग्न झाल्यावर घरी नाष्टा करावा ,बरोबर डबा घेऊन जावा ,असे स्वाभाविकपणे आनंदला वाटत असे . त्याची ती अपेक्षा पूर्ण होत नव्हती .सकाळी लवकर उठून साधना नाष्टा व जेवण तयार करील अशी त्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ती लोळत पडलेली असे .
आनंदला सकाळी व्यायाम करण्याची सवय होती .घरच्या घरी व्यायाम करावा, सकाळी बाहेर फिरायला जावे असे त्याला वाटे.तर साधना त्यावेळी अंथरुणात लोळत असे .तिला व्यायामाची सवय नव्हती,आवडही नव्हती.
साध्या साध्या गोष्टींवरून दोघांमध्ये वाद सुरू होत असत .सकाळी उठल्यावर आपले पांघरूण घडी करून कपाटात ठेवावे .गादीवर दुसरी चादर टाकावी. रात्री ती चादर काढून नंतर झोपावे अशी आनंदची शिस्त होती. पांघरूण पुन्हा रात्री घ्यायचेच आहे तर घडी कशाला करा.वरती चादर घालून ते पुन्हा काढण्याचे कष्ट कशाला घ्या. आपण तर घरी नसतोच. असे साधनाचे म्हणणे असे .
वॉशिंग मशीन होते .त्यात कपडे टाकून, साबण टाकून, कुणी मशीन सुरू करावे, यावरून भांडणे व वादावादी होत असे .
आनंदची साधनाला मदत करायची तयारी होती .सकाळचा नाष्टा स्वत:च करायला त्याने सुरुवात केली.साधनालाही आपले काही तरी चुकत आहे असे वाटत होते .ती लवकर उठण्याचा प्रयत्न करी .स्वतः नाष्टा बनवण्याचा प्रयत्न करी.तिने केलेल्या नाष्ट्याची आनंद टिंगल टवाळी करीत असे.त्याने आपले कौतुक करावे. निदान नावे तरी ठेवू नये. हळूहळू आपल्याला सर्व काही जमेल.एवढीच तिची माफक अपेक्षा होती .
एकूणच त्याचा स्वभाव टिंगलटवाळी करण्याचा होता .साधना सुरुवातीला त्या गोष्टी हसण्यावारी नेत असे . परंतु रोजच असे बोलणे कोण ऐकून घेईल.
चिडाचीड, वादावादी, भांडाभांडी, फेका फेकी, भांड्यांची आदळआपट, होत असे .खाण्यापेक्षा मचमच फार या म्हणीप्रमाणे कामांपेक्षा वादावादी फार असे होऊ लागले होते.
काही दिवस आनंदाची आईं नाशिकला येऊन राहिली होती .त्यावेळी जेवणखाण व्यवस्थित होत होते.दोघांनीही आपल्या बोलण्याला आवर घातला होता .आपला संसार व्यवस्थित चालला आहे असे दाखवण्याची दोघांचीही धडपड होती .आनंदच्या अाईच्या हाताखाली अनेक पदार्थांच्या पाककृती साधनाने शिकून घेतल्या .
थोडे दिवस राहून आनंदची आई पुण्याला निघून गेली .पुन्हा सर्व भार साधनावर येऊन पडला.नेटवर शोधून, पाककृतीवरील पुस्तके पाहून, ती कौतुकाने काही पदार्थ करू लागली होती . मुद्दाम कष्ट घेऊन केलेल्या पदार्थांचे आनंदने कौतुक करावे असे तिला वाटे.कौतुक करण्याऐवजी, प्रोत्साहन देण्याऐवजी,तो दोष काढीत असे.
काही काही वेळा भांडणाचा इतका कडेलोट होत असे की दोघेही एकमेकांकडे तोंड करून झोपण्याऐवजी एकमेकांकडे पाठ करून झोपत असत.
केव्हा केव्हा दोघांनाही आपण एकमेकांवर इतके आशिक कसे झालो असा प्रश्न पडे.
एकमेकांत असे काय पाहिले की आपण लग्नाला तयार झालो असे काही वेळा त्यांना वाटे.
घटस्फोटाशिवाय आता दुसरा काही मार्ग नाही इतक्या कडेलोटावर दोघेही येऊन पोचले . भांडण झाल्यावर , एकमेकांवर रुसल्यावर, नंतर पुन्हा एकमेकांनी दोघांचीही मनधरणी करण्यात मजा असते.नवरा बायकोचे भांडण रात्रीपर्यंत टिकते. रात्री त्यांचा समझोता होतो. तो झाला पाहिजे .
भांडण स्वयंपाकातील मिठाप्रमाणे पाहिजे. स्वयंपाक अळणीही होता कामा नये त्याचप्रमाणे खारटही होता कामा नये.या गोष्टींचे भान दोघांनाही राहिले नव्हते .
घरच्या वडील मंडळींचा वचक होता .मित्र मैत्रिणींनी आपल्याला दोष दिला असता याचीही त्यांना कुठे तरी भीती वाटत होती .
दोघांनाही काय करावे ते कळत नव्हते .गोष्टी म्हटल्या तर क्षुल्लक होत्या .ज्या गोष्टी एखाद्याला महत्त्वाच्या किंवा क्षुल्लक वाटतील त्या दुसऱ्याला तश्याच वाटतील असे नाही.कशाला किती महत्त्व द्यायचे हेही ज्याचे त्याने ठरवायचे आहे .
दोघांनाही सल्याची गरज होती .दोघांचेही समुपदेशन करण्याची मनोवैज्ञानिक गरज होती . एका समुपदेशकाची त्यांनी या संदर्भात जाहिरात पाहिली .दोघांनीही त्याच्याकडे सल्ल्यासाठी जायचे ठरवले .
लग्नाअगोदर प्रत्येकाच्या आपल्या जोडीदाराबद्दल काही ना काही अपेक्षा असतात .अपेक्षा असणे चूक नाही .परंतु दुसऱ्याच्याही अशाच अपेक्षा असतात.हे लक्षात येणे, आणि हे लक्षात ठेवणे, महत्त्वाचे असते.
प्रत्येक व्यक्ती भिन्न वातावरणात भिन्न संस्कारात वाढलेली असते.
प्रत्येकाने दुसऱ्याच्या अपेक्षांचा ,दुसऱ्याच्या सवयीचा आदर ठेवला पाहिजे .
दुसऱ्याला आपल्याप्रमाणे बनविण्याचा आग्रह सोडून दिला पाहिजे .
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला बरोबर चालायचे आहे याची जाणीव ठेवली पाहिजे .
बरोबर चालायला लागल्यावर पावलेही बरोबर पडू लागतात.
हळूहळू दोघेही एकमेकांत सामावून जातात.
जमेल तोवर गट्टी नाही तर सोडचिठ्ठी असा अत्याधुनिक पाश्चात्य दृष्टिकोन बरोबर नाही .
प्रत्येकाने जमवून घेणे हे महत्त्वाचे आहे .यातील प्रत्येकाने हा शब्द महत्त्वाचा आहे .विभक्त कुटुंबात हे जेवढे खरे आहे तेवढेच एकत्र कुटुंबातही आहे .पती पत्नीने परस्परांशी जसे जमवून घेतले पाहिजे त्याप्रमाणे आई वडील मुलगा सून यांनीही परस्परांशी जमवून घेतले पाहिजे.
प्रत्येकाला जगात वावरताना अॅडजस्टमेंट जुळवून घेणे करावेच लागते.
नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, शिक्षक, सहाध्यायी, सहकारी, वरिष्ठ, कनिष्ठ, शेजारी पाजारी, आयुष्यातील प्रवासात भेटणाऱ्या प्रत्येकाशी,कमी जास्त प्रमाणात जुळवून घ्यावे लागते.
मी म्हणेन तेच खरे, मी म्हणेन तसेच झाले पाहिजे, असा आग्रह सर्वांच्याच दुःखाला कारणीभूत होतो .
विशेषतः जिथे घनिष्ठ संबंध असतात तिथे प्रेम हाच सर्वांत उत्तम उपाय असतो .अर्थात आपली दृष्टी जर प्रेममय असेल तर सर्वांच्याच समस्या आपल्या हृदयाला जाऊन भिडतात . प्रेम असेल तर सर्व गोष्टी शक्य होतात.आपल्याला आपोआप दुसऱ्याच्या भावना कळतात.माझे हक्क तुझे हक्क असा प्रकार राहत नाही .मी व तू दोन्हीही लय पावतात .त्या ठिकाणी फक्त आपण येतो.
मीच सर्व का करायचे? मीच समझोता कां करायचा? मीच समजून कां घ्यायचे? मी एक पाऊल पुढे गेलो, दुसऱ्यानेही तेवढेच पुढे आले पाहिजे, अशी वृत्ती घातक ठरते.
संसार म्हणजे करार ही वाणिज्य वृत्ती योग्य नाही .
प्रेम व समज या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.समज येण्यासाठी, प्रत्येकाचे संस्कार भिन्न असतात,त्यामुळे त्यांची धारणा भिन्न असते, ही गोष्ट लक्षात आली पाहिजे .
संस्कार म्हणजे जन्मापासून योग्य काय, अयोग्य काय, हितकर काय अहितकर काय,याविषयी अनेक दिशानी आपल्यावर झालेले आघात होय.कुटुंबातील निरनिराळ्या व्यक्ती, शेजारी पाजारी,मित्रमैत्रिणी,पुस्तके, शिक्षण, निरनिराळी प्रसार माध्यमे,या मार्फत नकळत हे आघात होत असतात.त्यातून जे कांही आकाराला येते ते मन होय.तीच धारणा.
प्रत्येकाचे बोलणे, प्रत्येकाची हालचाल,म्हणजे या धारणेचा उद्गार असतो .
जात धर्म पंथ राष्ट्र या धारणेला बदलण्याचा, आकार देण्याचा, प्रयत्न करीत असतात.
हे सर्व लक्षात येणे म्हणजेच समज होय .समज आली की आपण दुसऱ्याला आपोआपच समजायला लागतो .त्यातूनच प्रेमाचा उदय होतो .
समज व प्रेम असेल तर जरी भांडणे झाली तरी ती अल्पजीवी असतील.क्षणात समज पुन्हा प्रस्थापित होईल .
अनेक सिटिंग्जमध्ये,अनेक वेळा समुपदेशन करून त्या समुपदेशकाने साधना व आनंदला या सर्व गोष्टी समजून सांगितल्या .
बाकी सर्व तत्त्वज्ञान दोघांना किती समजले ते माहीत नाही .
*परंतू दोघांनी जर बरोबर चालायचे असे ठरविले असेल तर एकमेकांना आपली चाल दुसऱ्यांच्या चालीबरोबर जुळवून घ्यावी लागते.*
* दुसरा माझ्या चालीप्रमाणेच चालला पाहिजे असा आग्रह धरता कामा नये एवढी गोष्ट त्याना नक्की कळली .*
*प्रेम असेल तर सर्व गोष्टी सोप्या होतात हेही लक्षात आले .*
*दोघांमध्ये प्रेम तर होतेच .*
*साथ साथ जन्मभर चालण्याची इच्छा तर होतीच .*
*समज आली .त्यांनी आपली चाल परस्परांशी जुळवून घेतली.*
* आता त्यांच्या संसाररथाची दोन चाके समान आहेत .*
*आता रथ डुगडुगत नाही.*
(समाप्त)
१७/४/२०२०©प्रभाकर पटवर्धन