(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
संध्याकाळ झाली होती .समुद्र किनारा माणसांनी फुलला होता .किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या निरनिराळ्या वयोगटातील माणसांप्रमाणेच विक्रेत्यांचीही गर्दी होती .शहाळी, भेळ, यांचे विक्रेते हातगाडीवर सामान टाकून फिरत होते.इतर विक्रेत्यांच्या गाड्या किंवा दुकाने समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या रस्त्यावर होती .सुटे कागद, पिशव्या टाकण्यासाठी ,जरी समुद्रावर ठिठिकाणी लहान पिंपें ठेवलेली असली तरी काहीच लोक त्यात कचरा टाकत होते.कचरा उचलून पिंपात टाकण्यासाठी काही मुले नगर पालिकेने नेमलेली होती . त्यामुळे समुद्र किनारा स्वच्छ होता .
मी एकटाच समुद्र किनाऱ्यावर वाळूत सायंशोभा पाहात बसलो होतो . सूर्य क्षितिजरेषेपासून सुमारे दोन कासरा वर होता .अजूनही त्याची तीव्रता जाणवत होती .मी थोडा लवकरच किनाऱ्यावर येऊन बसलो होतो .माझे मित्रवर्तुळ आज सिनेमाला जाणार होते.सिनेमा स्टंटपट होता. अशा सिनेमात मला रुची नसल्यामुळे मी गेलो नव्हतो .
उजव्या बाजूने एक मुलगी चालत येत होती .मुलगी सावळी असली तरी सूर्यकिरणांमध्ये ती चांगलीच उजळ वाटत होती.तिचे केस लांबसडक पिंगट व दाट होते.हल्लीच्या अनेक मुलींसारखा तिने बॉबकट केला नव्हता .जिन व टीशर्ट मध्ये ती होती .तिच्या मागून मुलांचा एक गट टवाळी करीत येत होता .तो गट मुलीला ओलांडून पुढे जात असताना त्यातील एकाने त्या मुलीला धक्का मारला.जाता जाता त्याने काहीतरी अश्लील रिमार्क मारला असावा .त्या मुलीने चवताळून त्या मुलावर हल्ला चढवला .त्याचा हात धरून तिने क्षणार्धात त्याला अस्मान दाखविले .वाळूत पडलेल्या त्या मुलाला उठताही येत नव्हते . तिच्या आवेशाने त्या मुलांची भंबेरी उडाली .ती मुलगी कराटेमध्ये प्रवीण असावी.लगेच त्यांच्या बाजूला गर्दी जमली.गर्दीमुळे मला तिथे नक्की काय चालले आहे ते कळेना .
गर्दी पाहून तिथे दोन पोलीस आले .मुले त्यांचे स्पष्टीकरण देत असावीत.मुलगी हातवारे करीत होती .तिचे हातवारे बघून मला संशय आला.मी चटकन उठून तिथे गेलो . एवढी सुंदर,आकर्षक, लढाऊ मुलगी, मुकी व बहिरी होती.ती हातांच्या बोटांच्या सहाय्याने तिची कैफियत मांडीत होती.मुलाने मुद्दाम धक्का मारला.काहीतरी बोलून मुले फिदीफिदी हसली.त्यानी काहीतरी अश्लील रिमार्क मारलेला असावा.त्यामुळे मला चीड आली आणि मी त्या मुलाला अस्मान दाखविले .इत्यादी सांगण्याचा ती प्रयत्न करीत होती. पोलिसांना बोटांची भाषा कळत नव्हती.
मी मुके व बहिरे असलेल्या मुलांच्या शाळेत शिकविण्याचे काम करतो.बोटांच्या हालचालीतून निर्माण होणाऱ्या संवादात मी अर्थातच प्रवीण आहे.पोलिसांना ती काय सांगत आहे ते कळत नव्हते.मुले त्यांची बाजू रंगवून मांडत होते. जसे काही ती मुले साळसूद आहेत, अपराधी नाहीत ,तिला ओलांडून पुढे जात असताना तिला त्यांनी उद्देशून काहीही रिमार्क मारला नव्हता.बोलता बोलता विनोद झाल्यामुळे ते हसत होते. तिने त्यांच्यावर निष्कारण हल्ला केला . असा एकूण त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ होता .पोलिसांना त्या मुलांविरुद्ध काही कार्यवाही करावी की त्यांना सोडून द्यावे ते कळत नव्हते.
मी पुढे जाऊन बोलण्यास सुरुवात केली .मी समोर जवळच बसलो होतो .मी समोर काय चालले होते ते पहात होतो. मुलांचा दोष आहे .त्यातील एकाने या मुलीला मुद्दाम धक्का मारला .ते मी स्वतः पाहिले आहे .त्यावेळी मुले हसत खिदळत होती.निश्चित काहीतरी अश्लील रिमार्क मारला असावा.त्यामुळे या मुलीने त्यांच्यावर हल्ला चढविला.मुली उगीचच्या उगीच कुणावरही हल्ला करणार नाहीत.मुलींची कुणी खोड काढली तरीही त्या बऱ्याच वेळा स्वस्थ राहतात.
मी त्या मुलीला मला बोटांची भाषा कळते असे खुणेनेच सांगितले.माझे तिच्याशी खुणांच्या साह्याने संभाषण सुरू झाले.मी दुभाषाचे काम करू लागलो .ती खुणांच्या सहाय्याने बोलत होती आणि मी ती काय बोलत आहे ते पोलीसाना सांगत होतो. मुलांनी मारलेला रिमार्क तिला अर्थातच ऐकू आला नव्हता.परंतु तिला त्यांचे चेहरे कळत होते. ते काहीतरी असभ्य व अश्लील बोलले असावेत .असे तिचे म्हणणे होते.
तिचे व्यंग लक्षात आल्यावर पोलीसाना ती खरे बोलत आहे असे कुठेतरी जाणवले असावे.मी स्वत: सर्व घटना प्रत्यक्ष बघितली असे सांगत होतो,त्याचाही परिणाम झाला असावा . पोलिसांनी त्या वात्रट मुलांना दम दिला .पुन्हा अशी कुणा मुलीची तक्रार आल्यास चौकीची हवा खावी लागेल म्हणून सांगितले .मुलांना दम देऊन सोडण्यात आले .मी तिला खुणेने मुले ही मुलेच असतात फार गंभीरपणे आपण घेऊ नये .आपल्यालाच त्रास होतो. अर्थात वेळीच धडा शिकविला पाहिजे नाहीतर त्यांची गुंडगिरी वाढत जाते .तुम्ही केले ते छानच केलेस .मुलांना धडा मिळाला.पुढच्या वेळी खोड काढताना ते दहादा विचार करतील .
आम्ही दोघेही खुणांच्या सहाय्याने संवाद साधत होतो.तिची बोटे एखाद्या नर्तकी सारखी नाचत होती.मी ही तितक्याच चपळाईने तिला उत्तर देत होतो.बोलता बोलता आम्ही दोघेही चालत चालत वाळूत येऊन बसलो .आम्हाला खुणांची भाषा करताना पाहून बाकीचे अचंबित होऊन पाहात होते.असाही उत्कृष्ट संवाद साधता येतो याची बर्याच लोकांना कल्पना नव्हती.
थोड्याच वेळात गर्दी पांगली .
तिने माझे आभार मानले.मलाही खुणांची भाषा कशी येते असे विचारले.मुक्या व बहिऱ्या मुलांच्या शाळेत शिकवितो असे सांगितले .त्यावर तिने स्मित केले.तिचे हास्य फार गोड होते.शारीरिक व्यंग असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा बावळटपणा असतो.आपण जगाला पूर्णपणे समजू शकत नाही. आपल्याकडे जग एका वेगळ्याच कारुण्यपूर्ण दृष्टीने पहाते.या सगळ्याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर होत असावा.
विशेषत: बहिरा मुका किंवा अंध व्यक्तींच्या चेहऱ्यावर असे भाव असतात.आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिच्या चेहऱ्यावर असे कोणतेही भाव नव्हते.तिच्याकडे बघितल्यावर ती बहिरी व मुकी आहे असा संशयही येत नव्हता.ती पूर्ण नॉर्मल चारचौघींसारखी वाटत होती .
तिची भाषा समजणारा भेटल्यामुळे तिला आनंद झाला होता .तिचे मित्र मैत्रिणी तिच्या सारखेच बहिरे व मुके होते. मी जेव्हा तिची भाषा बोलू लागलो तेव्हा प्रथम तिला मीही तसाच आहे असे वाटले होते.जेव्हा मी पोलिसांजवळ ती काय सांगत आहे ते सांगू लागलो तेव्हाच तिला मी इतरांसारखाच आहे असे लक्षात आले. ती बहिरी व मुकी आहे असे लक्षात आल्यावर नॉर्मल व्यक्ती तिला टाळत असत असा तिचा अनुभव होता.इथे मी तिच्याशी समपातळीत बरोबरीच्या नात्याने बोलत होतो.तिचे व्यंग माझ्या चेहऱ्यावर कुठेही प्रतिबिंबित होत नव्हते.मी तिच्याकडे दया दृष्टीने पाहात नव्हतो .कोणत्याही प्रकारे तिला सहानुभूती दाखवत नव्हतो. तिच्याशी बोलून मी तिच्यावर काही उपकार करीत आहे असाही माझा भाव नव्हता .याचा तिच्यावर सकारात्मक परिणाम झाला होता.
मी अशी पहिलीच नॉर्मल व्यक्ती बहुधा असेन कि जी तिला न टाळता तिच्याशी तिच्या भाषेत गप्पा मारीत होती . प्रथम तिला जसे मी बहिरा व मुका आहे असे वाटले होते त्याप्रमाणेच नंतर तिला माझ्या घरातील कुणीतरी बहिरे मुके असावे असे वाटले होते .तसे कुणीही नाही असे कळल्यावर तिला आश्चर्य वाटले .
बरेच लोक ती भेटल्यावर तिला सहानभूती दाखवत असत.काहींना तिची दया येते असे .परंतु सहानुभूती दया करुणा इत्यादी काहीही न वाटता न दाखवता सामान्य लोक जसे एकमेकांशी बोलतात त्याप्रमाणे बोलणारा मी बहुधा पहिलाच असावा .
तिचा चेहरा स्मार्ट होता हे मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे.ती सावळी परंतु गहूवर्णाकडे झुकणारी होती हेही मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे.तिच्या गालाला खळी पडत होती. तिची उंची मध्यम होती.ती विशेष ट्रेनिंग घेऊन एका आयटी कंपनीत नोकरी करीत होती.तिचे आई वडील इथेच रहात होते .आई वडील तिचे भाऊ बहिणी सर्व नॉर्मल होते. ही एकटीच बहिरी मुकी होती.ज्या व्यक्तीला काहीतरी व्यंग आहे ते व्यंग बहुधा दुसरीकडे भरून निघते असा सर्वसाधारण अनुभव आहे .कुसुम (तिचे नाव) विलक्षण बुद्धिमान होती. तिचा चेहरा आरसपानी होता .तिच्या मनातील भाव चेहऱ्यावर लगेच प्रतिबिंबित होत असत.ती आत्मसन्मान जपणारी होती.ती दृढ निश्चयी होती . कराटे प्रॅक्टिस व व्यायाम यामुळे ती सुडौल होती .
ही सर्व माहिती हे सर्व निरीक्षण एका भेटीत झाले नाही हे आपण ओळखले असेलच .तिचा मी फोननंबर घेतला होता . माझाही तिला दिला होता .केवळ संदेश पाठवण्यासाठी मोबाइलचा उपयोग होत होता.व्हिडिओ कॉल करून खुणानी बोलणे त्रासदायक होते.संदेश पाठविण्यापेक्षा वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून बोलणे जास्त सोपे व आनंददायक होते .
आमच्या भेटी वारंवार होऊ लागल्या . आम्ही बागेत समुद्रावर अनेकदा भेटलो.तिला सिनेमातील संवाद कळत नसूनही आम्ही बरोबर कांही सिनेमा पाहिले.सिनेमा एन्जॉय करण्यापेक्षा आम्हाला एकमेकांचा सहवास जास्त सुखदायी वाटत होता. मी तिच्या घरी अनेकदा गेलो .तीही माझ्या घरी अनेकदा आली. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो हे आपण ओळखले असेलच.घरच्यानीही ते ओळखले.माझ्या घरातून थोडासा विरोध झाला .मी धडधाकट उमदा थोडाबहुत देखणा अव्यंग असा असताना अश्या मुलीशी लग्न करण्याचे कारणच काय असा घरच्यांचा सवाल होता .
या सगळ्याला प्रेम हे एकच उत्तर होते .नवरा बायकोच्या गाठी वर स्वर्गात मारलेल्या असतात.इथे आपण उगीचच शोध घेत असतो .वेळ आली की ती किंवा तो आपल्या पुढ्यात येऊन उभी रहाते किंवा उभा रहातो.असे वडील मंडळींच्या तोंडून अनेकदा ऐकले होते .त्याची सत्यता आम्हाला पटली.
माझे वडील विनोदाने म्हणत असत त्याप्रमाणे आपली ती भेटली की ती रंभा उर्वशी सुलोचना वाटू लागते .याच्या उलट तो मदन सर्वगुणसंपन्न वाटू लागतो.हेच खरे .शारीरिक सौंदर्य हे ग्राह्यतेचे एकमेव गमक मानणे चूक आहे .मनाचे सौंदर्य सुध्धा कित्येक वेळा प्रेमात पाडते.
माझे काका आणखी एक गमतीशीर वाक्य सांगत असत .कदाचित कांही जण त्याने दुखावले जातील.~सगळ्या मालाला बाजारात उठाव असतो ~कोणताही माल दुकानात तसाच पडून राहत नाही.
विनोदाचा गमतीचा भाग आपण सोडून देऊ .
आम्ही दोघांनीही घरच्यांच्या संमतीने लग्न करण्याचे ठरविले.
*दोन भांडी एकत्र आली की कधी तरी आवाज हा होणारच .*
*भांडण सहजीवनातील खुमारी वाढविते .*
*आमचे भांडण, अबोला, प्रेमसंवाद सर्व अबोल,आवाजाविना असते !!*
*आमच्या घरी केव्हाही या पूर्ण शांतता असते.*
*आमचे मतभेद,आमची भांडणे, म्हणजे बोटांच्या जोरजोरात हालचाली असतात .*
*भांड्यांचे, दरवाजांचे, ट्रॉलीचे ,आवाज करून ते तिला ऐकायला जात नसल्यामुळे ती किंवा मी ती आपटून आपला निषेध प्रगट करीत नाही.*
*अबोला म्हणजे हाताला विश्रांती असते !!*
२२/४/२०२०©प्रभाकर पटवर्धन