( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

काळ डोहावर सुलूचा कॅमेरा आहे आणि सुलू तिथे नाही  असे सीताबाईंना कळते तर त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला असता. 

संध्याकाळी सात वाजता बाबासाहेबांचा सीताबाईंना फोन आला.सीताबाई पुन्हा पुन्हा फोन करून बाबासाहेब मिटींगमधून मोकळे झाले का असे चौकशी करीत होत्या असे त्यांच्या सेक्रेटरीने सांगितले होते.त्यामुळे त्यांना काळजी वाटत होती.त्यांनी काळजीच्या स्वरात सीताबाईंना,सर्व कांही ठीक आहे ना?  वारंवार फोन कां करीत होतीस? असे विचारले.बाबासाहेबांचा आवाज ऐकून सीताबाईंना त्यांच्या दु:खाचा कढ आवरत नाहीसा झाला.ओक्साबोक्सी रडतच त्यांनी लवकर घरी या असे सांगितले.काय़  झाले तेच बाबासाहेबांना कळेना. बाबासाहेब तातडीने घरी आले.त्यांना पाहताच सीताबाईनी रडत रडतच त्यांना सर्व हकिगत सांगितली. कमलाकडे  जाते असे सांगून सकाळीच सुलू बाहेर पडली.तिने बरोबर मोटार व कॅमेरा घेतला होता.कमलाबरोबर फोटोसेशन करायचे आहे असे तिने सांगितले होते.प्रत्यक्षात ती कमलाकडे गेली नाही.ती कमलाकडे आहे, दुपारी जेवायला तिथे थांबत आहे,संध्याकाळीच घरी परत येईल  असेही तिच्याशी बोलणे झाले.प्रत्यक्षात ती सकाळपासूनच कुठेतरी गेली होती.तिने बाहेरूनच कुठुनतरी फोन केला होता.आता तिचा फोन स्विच ऑफ येत होता.त्या अगोदर रिंग वाजत होती परंतु ती उचलत नव्हती.इत्यादी गोष्टी सांगितल्या.

तू काळजी करू नकोस.आपली सुलू आपल्याला सापडेल.आपण तिला असेल तिथून शोधून काढू .असे बोलून सीताबाईना घेऊन  ते ताबडतोब पोलिस स्टेशनमध्ये गेले.बाबासाहेबांना सर्वच ओळखत होते.येण्याअगोदर त्यांनी फोन केला होताच.पोलीस स्टेशनप्रमुख त्यांची वाटच पाहत होते.बाबासाहेबांनी सर्व हकिगत सांगून सुलू हरवल्याची तक्रार लिहून घ्यायला सांगितली. मधून मधून पोलिसांनी प्रश्न विचारून सीताबाईंकडून सर्व हकिगत काढून घेतली.पोलिसांनी कायद्याप्रमाणे चोवीस तासांअगोदर हरवल्याची तक्रार लिहून घेता येत नाही असे उत्तर दिले.ती कुठेतरी मैत्रिणीकडे गेली असेल चौकशी करा असाही सल्ला दिला.बाबासाहेबांनी गावातील मैत्रिणींकडेच काय परंतु शहरातही फोन केले होते.तिचा कुठेच पत्ता लागत नव्हता.पोलिसांनी आम्ही वैयक्तिक पातळीवर चौकशी करतो शोध घेतो कांही कळले तर तुम्हाला कळवतो असे सांगितले.पोलिसांनी रात्री जीपमधून सर्वत्र फिरून शोध घेतला.ते काळ डोहावर गेले नाहीत.तिथे ते दुसऱ्या दिवशी पोचले.तिथे त्यांना बाबासाहेबांची   मोटार दिसली.पुढे तलावाच्या काठी त्रिकोणी स्टँडवर कॅमेराही दिसला.तलाव शांत होता. सुसर कुठेही दिसत नव्हती.काळ डोहावरुनच त्यांनी बाबासाहेबांना मोटार व कॅमेरा काळडोहावर असल्याचे,मोटारीचा दरवाजा उघडा व किल्ली मोटारीला असल्याचे सांगितले.आम्ही मोटार व कॅमेरा घेऊन पोलिस स्टेशनमध्ये येत आहोत,तुम्ही तिथे या असे  कळविले.पोलीस स्टेशनमध्ये येण्याअगोदरच बाबासाहेब व बाईसाहेब तिथे पोहोचले होते.

व्हिडीओ कॅमेऱ्यातील  चित्रण पाहण्यात आले.चित्रण पुढीलप्रमाणे होते.

सुलू कॅमेर्‍याकडे तोंड करून बोलत होती.तिने हात जोडलेले होते.मला क्षमा करा.मी तुमच्या मताप्रमाणे वागू शकत नाही.माझे प्रेम सफल होत नाही.तुमची माझ्या लग्नाला परवानगी नाही.तुमच्या विरोधात जाऊन, तुमच्या इच्छेविरुध्द,मला लग्न करायचे नाही.श्रद्धेय शिवाय मी जगू शकत नाही. मी माझ्या जीवनाचा शेवट करीत आहे.एवढे बोलून ती तलावाच्या दिशेने चालू लागली होती.तलावाच्या पायऱ्या उतरत तिने पाण्यामध्ये प्रवेश केला.ती दिसेनाशी झाली.पाण्यात प्रचंड खळबळ दिसू लागली.सुसरीने उडी मारल्याचे दिसले.नंतर सर्व शांत झाले होते.सुलूने तलावात उतरून आत्मघात करून घेतला होता.सुसरीने तिचा घास घेतला हे स्पष्टपणे कळत होते.

बाबासाहेबांना दु:खाचा आवेग आवरत नव्हता.ते वाड्यावर कॅमेरा व मोटार घेऊन आले.घरी आल्यावर त्यांनी पुन्हा एकदा ते सर्व चित्रण बारकाईने पाहिले.त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी सीताबाई होत्या.सीताबाई तर हमसून हमसून रडत होत्या.त्यांना दुःखावर दुःखाचे आवेग येत होते.रागाच्या भरात त्या त्यांच्या पतीला बाबासाहेबांना दूषण देत होत्या.तुम्ही तिला लग्नाला नाही म्हटले.त्यामुळे मुलगी मानसिक दृष्ट्या उद्ध्वस्त झाली.तिने जिवाचे वाईट करून घेतले. बाबासाहेबही झालेल्या घटनेने पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते.सुलू असे टोकाचे पाऊल उचलील याची पुसटशी कल्पना जरी त्यांना येती तरी त्यांनी सुलूला लग्नाला परवानगी दिली असती.श्रद्धेयबद्दल ते पोलिसांजवळ कांहीही बोलले नव्हते.शहरात जाऊन श्रद्धेयची भेट घेण्याचे त्यांनी ठरविले होते.आता सर्वच प्रश्न संपला होता.  

जर पोलिसांच्या मनात आले असते तर बाबासाहेबांवर मुलीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा ते दाखल करू शकले असते.परंतु बाबासाहेब फार मोठी असामी होती.त्यांचे हात वरपर्यंत पोहोचले होते.त्यांची वर्तणूकही नेहमी सौजन्यपूर्ण असे.त्यामुळे पोलिसांनी कांहीही अॅक्शन घेतली नव्हती.हरवल्याची तक्रार दाखल केलेली नव्हतीच.पोलिसांनी कांही करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.पाेलिसांच्या फ्रंटवर सर्व शांत होते.परंतु अशा गोष्टी लपून राहत नाहीत.हळूहळू गावात सर्वांना सुलभाने काळ डोहात आत्महत्या केल्याचे कळले.सुसरीने आणखी एक घास घेतला. तिची दहशत आणखीच पसरली.वर्षभरापूर्वी सुसर तिथे आल्याचे माहीत नसताना,गप्पा मारीत काम करणार्‍या  बायकांपैकी एका बाईला सुसरीने ओढून नेले होते.आता हा दुसरा घास होता.या वर्षभराच्या काळात लहान मोठे इतर प्राणी तिने खाल्ले होतेच.वनखात्याने तिला पकडून डोह सुरक्षित करावा यासाठी निवेदन देण्यात आले.लवकरच सुसरीला पकडून नेऊ आणि डोह सुरक्षित करू असे आश्वासन शासनातर्फे देण्यात आले.

बाबासाहेबांना सहा महिन्यांपूर्वीचा प्रसंग आठवत होता. त्यावेळी सुलभा घरी आल्यावर थोडी तणावाखाली दिसत होती.बाबासाहेबांचे सुलभावर प्रचंड   प्रेम होते.तिच्या चेहऱ्यावरील थोडासाही बदल त्यांना जाणवत असे.तिच्या आईचा तर प्रश्नच नव्हता.मुलीला त्या जीव कि प्राण करीत असत.सुलभाने एक दिवस तिच्या आईजवळ तिचे मन प्रथम मोकळे केले.आईने सुलभाला तिच्या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.ती तिच्या विचारांवर ठाम होती.

एके दिवशी तिने बाबांजवळ मला तुमच्याशी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलावयाचे  आहे असे सांगितले.तिने बाबासाहेबांजवळ आपले मन उघड केले. शहरात कॉलेजात शिकत असलेल्या एका मुलावर तिचे प्रेम होते.त्याचे नाव श्रद्धेय पांडे होते.तो उत्तरप्रदेशीय भैय्या होता.त्याच्या तीन पिढय़ा महाराष्ट्रात स्थायिक झाल्या होत्या.त्याचे शिक्षणही मराठीतून झाले होते.तो आता महाराष्ट्रीयन झाला होता.जातीचाही प्रश्न नव्हता.बाबासाहेबांची व त्याची जात एकच होती.तो सुशिक्षित होता.घरचा सधनही होता.कुठेच नाव ठेवायला जागा नव्हती.फक्त तो परप्रांतीय होता.तेवढय़ा कारणासाठी घरातून विरोध होईल अशी सुलभाला तिळमात्र कल्पना नव्हती.बाबांचा होकार निश्चित मिळेल अशी तिची खात्री होती.

तिने हे सर्व सांगितल्यावर बाबासाहेब विचारात पडले.परप्रांतीय मुलाशी आपल्या मुलीचे लग्न व्हावे असे त्यांना वाटत नव्हते.प्रत्येक धर्माचे,प्रत्येक  जातीचे, प्रत्येक घराण्याचे, प्रत्येक प्रदेशाचे, जसे संस्कार असतात त्याचप्रमाणे प्रत्येक प्रांताचेही कांही संस्कार असतात.तरुणपणात, तारुण्याच्या उन्मादात,जरी सर्व कांही योग्य वाटत असले तरी विवाह झाल्यावर लहानसहान गोष्टींमध्ये संस्कार आडवे येतात.संघर्ष सुरू होतो.अशा परप्रांतीय मुलाला घरजावईच काय परंतु जावई सुद्धा   करून घ्यावा असे त्यांना वाटत नव्हते.त्यांनी केवळ विरोधी मत नोंदवले एवढेच नव्हे तर तीव्र विरोध केला.सुलभाने तिचे म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला.एकदा श्रद्धेयला तुम्ही भेटा, त्याच्याशी बोला,नंतर निर्णय घ्या असेही सांगितले.बाबासाहेब कांहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते.

मुलगी तिचा हट्ट, तिचा विचार, सोडून देईल अशी खात्री त्यांना वाटत होती.त्याप्रमाणेच झाले.मी तुमच्या शब्दाबाहेर नाही असे तिने सांगितले.त्यावेळी तिने कोणतेही अकांडतांडव केले नाही.  दु:ख दाखविले नाही.विरोध प्रदर्शित केले नाही.ती सर्वकांही विसरली असे दोघांनाही वाटू लागले होते.त्यानंतर दोन तीनदा ती येऊन गेली होती.प्रत्येक वेळी तिची वागणूक सामान्य,नेहमीप्रमाणे होती.तिच्या मनात असे कांही शिजत असेल असा संशयही आला नव्हता.आणि अकस्मात पोरीने डोहात आत्महत्या केली होती.सुसरीला तिने आपला देह अर्पण केला होता. 

पोरीने तिचे मन मोकळे केले नाही.तिचे दु:ख अंतर्यामी दाबून धरले.तिला आपल्या विरोधात जायचे नव्हते.म्हणून तिने तिची जीवनयात्रा संपविली.आपण पोरीला ओळखू शकलो नाही.आपण तिचे मन समजण्यात कमी पडलो.आपणच तिच्या मृत्यूला कारणीभूत झालो.या विचाराने बाबासाहेब खचून गेले होते.

बहिणीच्या मृत्यूची बातमी कळल्यावर त्यांचा मुलगा घरी आला होता.

त्याने इथेच राहावे यासाठी दोघांनीही आटोकाट प्रयत्न केले.त्याने अमेरिकन मुलीशी लग्न केले होते.

त्याचा तिकडे जम व्यवस्थित बसला होता.तो तिकडे संपन्न अवस्थेत होता.त्याने बाबासाहेबांनाच तिकडे येण्याचा आग्रह केला.

बाबासाहेब अर्थातच तिकडे जाणार नव्हते.आठ दहा दिवस राहून मुलगा परत अमेरिकेला निघून गेला.

बाबासाहेबांना आता कशातच रस वाटत नव्हता.मुलगा परदेशात जाऊन बसला होता.त्याचा परत येण्याचा विचार नव्हता.मुलगी आपला सर्व कारभार संभाळील.आपण तिच्या नवऱ्याला घरजावई करून घेऊ.सर्व कारभार तिच्या व त्याच्या हाती सोपवू .अशा सर्व विचारांवर बोळा फिरला होता.

त्यांच्या मृत्यूनंतर  त्यांनी उभ्या केलेल्या साम्राज्याची वाट लागली असती.दूरच्या नातेवाईकानी मालमत्तेचे लचके तोडले असते.कोर्ट कचेर्‍या झाल्या असत्या. त्यांनी मृत्युपत्र करायचे ठरविले.मालमत्तेचा त्यांनी ट्रस्ट केला.ट्रस्टतर्फे सर्व कारभार सांभाळला जावा अशी व्यवस्था केली. विश्वासातील माणसांची  विश्वस्त निधीवर, नेमणूक केली.येणार्‍या उत्पन्नातील अर्धे उत्पन्न,सीताबाईना द्यावे.उरलेल्या उत्पन्नाचा विनियोग समाजकल्याणासाठी करावा.शिक्षण संस्था,वृद्धाश्रम,समाजोपयोगी कामे,    अमर गावाचा विकास,यासाठी पैसा वापरावा अशी तरतूद केली.

त्यांचा पूर्वीचा जोम उत्साह आता मावळला होता.ते दहा वर्षांनी वृध्द दिसू लागले होते.सीताबाईंचीही स्थिती त्याहून कांही वेगळी नव्हती.त्यांच्या दिवाणखान्यात सुलभाचा मोठा फोटो लावलेला होता.त्याला बकुळीच्या फुलांचा हार घातलेला असे.

बाबासाहेब हॉस्टेलमध्ये   सुलभाच्या राहिलेल्या वस्तू आणण्यासाठी गेले होते.बाकी सर्व वस्तू मिळाल्या परंतु महत्त्वाचे कागदपत्र आधारकार्ड पॅनकार्ड तिची सर्टिफिकेट्स मिळाली नाहीत.त्यावरून सुलभा सर्व महत्त्वाचे कागदपत्र घेऊन परागंदा तर झाली नसेल ना? अशी एक शंका बाबासाहेबांना आली.त्यांची शंका त्यांनी पत्नीजवळ बोलून दाखविली.

*आठ दहा दिवस राहून दोघांचेही सांत्वन करून त्यांचा निरोप घेऊन त्यांचा मुलगा  अमेरिकेला निघून गेला होता.*

*सतत दुःखात व खचलेल्या अवस्थेत असतानाच अशी एक बातमी आली की सुलभा जिवंत असल्याची आशा पल्लवीत झाली.*

*ती आज ना उद्या आपल्याला भेटेल अशी खात्री वाटू लागली.*

(क्रमशः)

२/९/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel