(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)  .

एका वळणावर चुकीच्या बाजूने ट्रक येत होता.त्याची कमलाकरच्या मोटारीशी टक्कर झाली.

मोटारीने दोन तीन पलटी घेतल्या .पुढचे सविताला काहीच आठवत नव्हते.ती चार दिवसांनी शुद्धीवर आली. तिच्या गुडघ्यातून तीव्र कळ आली.आणि ती पुन्हा बेशुद्ध झाली .ती शुद्धीवर आली तेव्हा तिचे आई वडील चिंताक्रांत चेहऱ्याने जवळ उभे होते.तिने प्रथम कमलाकरची चौकशी केली. तो सहीसलामत बचावला होता .तिने आनंदाचा सुस्कारा सोडला,तो सुस्कारा आतासुद्धा तिला आठवत होता .दोन दिवसांनी ती उठून उभे राहण्याचा प्रयत्न करीत होती. त्यावेळी तिच्या असे लक्षात आले की त्या अपघातात तिचा डावा पाय गुडघ्यातून काढून टाकावा लागला होता .अपघातात पाय इतका चुरला गेला होता की तो काढून टाकण्याशिवाय दुसऱा काहीही मार्ग नव्हता .आपला एक पाय गुडघ्यातून काढून टाकावा लागला हे लक्षात आल्यावर तिला मोठा शॉक बसला होता.ती दोन दिवस हमसून हमसून रडत होती.परिस्थितीचा स्वीकार करायला तिला आठ दिवस लागले . 

ती पूर्ण बरी व्हायला जवळजवळ सहा महिने लागले. जयपूर फूट तयार होऊन आला . तो यशस्वीपणे बसविण्यात आला .जयपूर फूट लाऊन व्यवस्थित चालू लागण्यास तिला चार महिने लागले. ती लंगडत का होईना परंतु काठी शिवाय चालू लागली.वेळप्रसंगी ती काठी घेतल्याशिवाय रस्ताही क्रॉस करू शकत असे .तिच्या पर्समध्ये घडीची काठी नेहमी असे .ती बऱ्याच वेळा काठीचा उपयोग चालण्यासाठी करीत असे .हळूहळू ती स्कूटरही चालवू लागली. ती पूर्णपणे स्वावलंबी झाली .स्वयंपाकघरात ती सफाईने स्वयंपाकही करू लागली.ज्याला माहीत नाही त्याला तिने जयपूर फूट घातला आहे याची शंकाही येत नसे.  

या सर्व कालावधीमध्ये जवळजवळ वर्षभर ती मूकपणे आक्रंदत होती .मूक आक्रंदन दोन कारणांसाठी होते.कमलाकर येत नसल्यामुळे ती आक्रंदत होती.त्या अपघातात तिचा पाय गेला त्याचेही  तिला परम दुःख होत होते. सुरुवाती सुरुवातीला तर तिच्या डोळ्यांना पाण्याची धार लागलेली असे .हळूहळू तिच्या डोळ्यातील पाणी अाटत गेले. सुरुवातीला रात्ररात्र तिने जागून काढली होती .आपल्याला त्या अपघातात मृत्यू का आला नाही असे ती अनेकदा देवाला विचारीत असे .अनेकदा आत्महत्येचे विचार  तिच्या मनात येत असत .या सर्व आघातातून ती हळूहळू सावरत गेली .

या सर्व कठीण प्रवासात कमलाकर खंबीरपणे तिच्या शेजारी उभा राहील,तिला आधार देईल,तिला धीर देईल,तिच्या दु:खात सहभागी होईल,अशी सर्वांचीच इच्छा व कल्पना होती .तिची तर होतीच होती .त्याच्या भेटीसाठी ती आसुसली होती .पहिले काही दिवस ती कमलाकरची चातकाप्रमाणे वाट पाहत असे.हळू हळू तो न येण्याची, तो नसण्याची, तिला सवय झाली.तिलाच काय सर्वांनाच झाली .

तिचा पाय अँप्यूट करण्यात आला हे ऐकल्यापासून कमलाकर तिच्याकडे यायचा बंद झाला होता .त्याची फुलपाखरी वृत्ती होती .सविता धडधाकट होती तेव्हा त्याला तिच्यात रस होता . आता लंगड्या सवितामध्ये त्याला काहीही रस राहिला नव्हता . तो अपघात झाला नसता तर सर्व काही सुरळीत झाले असते . लग्नानंतर अपघात झाला असता तर कमलाकरने काय केले असते ते कमलाकरलाच माहीत.

काही लोक आपल्याला आपले वाटतात .आपण त्यांना जवळचे सुहृद समजतो.  आपल्याशी ते कोणत्याही परिस्थितीत स्नेहाने आपुलकीनं प्रेमाने वागतील असे आपल्याला वाटत असते.परंतु प्रत्यक्षात तसे नसते ."जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे"हेच खरे .सर्व छान असते तोपर्यंत सर्व गोडगोड बोलत असतात.~ संकट प्रसंगी आपला कोण आणि आपला कोण नाही याची पारख होते. ~आपले असे जे वाटतात, आपण ज्यांना मित्र समजतो, ते बऱ्याच वेळा,संकट प्रसंगी आपले नसतात .संकट हा एक प्रकारे कसोटीचा दगड आहे .मैत्रीचे सुवर्ण कोणते व पितळ कोणते ते अशा वेळी स्पष्ट होते.

संकट हा वन्ही आहे.खरी मैत्री त्यांत उजळून निघते.दिखाऊ मैत्री जळून जाते .

सविता आपल्या विचार आवर्तनात पूर्णपणे बुडून गेली होती .दीपस्तंभ किनाऱ्यावर ती असूनही नसल्यासारखी होती .ती जे विसरण्यासाठी येथे आली होती ते तिची पाठ सोडीत नव्हते.

कमलाकरने केलेला हा एक प्रकारे विश्वासघात होता.

विचार करता करता    तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या . या विचारांच्या चक्रव्यूहातून बाहेर कसे पडावे ते तिला समजत नव्हते .माशी जशी कोळ्याच्या जाळ्यात जास्त जास्त गुरफटत जाते त्याप्रमाणे सविता विचारांच्या जाळ्यात  जास्त जास्त गुरफटत जात होती .कदाचित काळच याच्यावर औषध ठरणार होता . झाले ते एका अर्थी चांगले झाले होते. कमलाकरचे पितळ उघडे पडले होते.

तिला तिच्या वडिलांचे लाखमोलाचे बोल आठवत होते.~ज्या नात्यांमुळे , ज्या नातेवाईकांच्या अकल्पनीय विश्वासघातकी वागणुकीमुळे , आपल्या डोळ्यात पाणी येते ;ती नाती, ते नातेवाईक, डोळ्यात पाणी आणण्याच्या लायकीचे नसतात.आणि जी नाती खरी नाती असतात, जे नातेवाईक, खरे नातेवाईक असतात, ते आपल्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देत नाहीत . ~तिला हे बोल पुन्हा पुन्हा  आठवत होते.त्याचा खरा अर्थ तिच्या मनात उतरला .बऱ्याच वेळा आपल्याला शब्द कळतात.अर्थ कळल्यासारखा वाटतो.परंतु आपल्याला अर्थ कळलेला नसतो. फक्त शब्द कळलेले असतात.  अर्थ मनात उतरलेला नसतो.अकस्मात केव्हातरी त्या शब्दांचा, त्या वाक्यांचा, अर्थ हृदयाला जाऊन भिडतो. साक्षात्कार झाल्यासारखा वाटतो .खरी समज येते .

सविताचे आता तसेच झाले होते.बाबांच्या त्या लाखमोलाच्या वाक्यांचा, शब्दांचा अर्थ, अकस्मात तिच्या हृदयात उतरला. तिला मोकळे मोकळे वाटले.अभ्रानी आकाश झाकोळून गेलेले असावे, जिकडे तिकडे दाट अंधार पसरलेला असावा ,आणि अकस्मात अभ्रे दूर व्हावीत .सूर्यप्रकाशाने सृष्टी न्हाऊन निघावी तसे तिचे झाले.

मानेला तिने लहानसा झटका दिला.अकस्मात तिच्या मनातील सर्व विचार लुप्त झाले होते .

तिला आता मोकळे मोकळे वाटत होते .

कमलाकर तिच्या डोक्यातून पूर्णपणे नाहीसा झाला होता . 

* तिचा काळवंडलेला चेहरा अकस्मात अांतील प्रकाशाने उजळून निघाला होता.*

*कंदिलाची कांच स्वच्छ पुसून घ्यावी आणि नंतर त्यातून प्रकाश सर्वत्र पसरावा तसे तिचे झाले होते.*   

तिने पर्समधून घडीची काठी काढली .ती उघडून तिच्या आधारावर ती उभी राहिली .

ती हळूहळू स्कूटर  उभी केलेल्या ठिकाणी चालत गेली .

*तिच्या विचारमग्न चेहऱ्याकडे, आणि आता सूर्यप्रकाशाने उजळलेल्या चेहऱ्याकडे लांबून एक तरुण पाहात होता .*

* तो तिच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन येणार होता .परंतु ते त्याला व तिला माहीत नव्हते .*

स्कूटरवरून ती रिसॉर्टच्या दिशेने निघाली. 

*उद्यापासून ती सर्व भूतकाळ विसरून नव्या आयुष्याला, नव्या उमेदीने सुरुवात करणार होती.*

* उद्या तिच्या आयुष्यात नवीन सूर्योदय होणार होता *

(समाप्त)

२५/४/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel