( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
आठ दहा दिवस राहून दोघांचेही सांत्वन करून निरोप घेऊन त्यांचा मुलगा अमेरिकेला निघून गेला.
सतत दुःखात व खचलेल्या अवस्थेत असतानाच अशी एक बातमी आली की सुलभा जिवंत असल्याची आशा पल्लवीत झाली.
ती आज ना उद्या आपल्याला भेटेल अशी खात्री वाटू लागली.
७
काळ डोह अत्यंत धोक्याचा झाला आहे.त्याने आतापर्यंत दोन माणसांचा घास घेतला आहे.लहानमोठे कित्येक प्राणी त्याच्या पोटात गेले आहेत.सुसरीला पकडून नेवून डोह सुरक्षित करावा अशा वारंवार होणार्या मागण्यांना जोर चढला होता.निवेदने मोर्चा वगैरे सर्व गोष्टींचा वापर करण्यात आला होता.शेवटी एक दिवशी सर्व तयारीनिशी वनखात्याचा कर्मचारीवर्ग सुसरीला पकडण्यासाठी काळ डोहावर आला.सुसरीला पकडणार असे म्हटल्यावर गावातील कितीतरी मंडळी तो सोहळा पाहण्यासाठी जमली.डोहावर एकच गर्दी झाली होती.गर्दीला सुरक्षित अंतरावर ठेवण्यासाठी पाेलिसांचा ताफा ठेवला होता.
वनखात्याने सुसरीला जवळजवळ तीन तासांच्या खटपटीनंतर पकडले.ट्रकमध्ये बंदोबस्तात ठेवून वनखात्यामार्फत संरक्षित असलेल्या, सुसरीसाठी तयार केलेल्या, तलावाकडे तिला रवाना करण्यात आले. सुसरीला नेणार्या ट्रकला वाटेत अपघात झाला.त्यामध्ये ती सुसर मरण पावली.
८
सुसरीचे शवविच्छेदन करण्यात आले.तिच्या पोटात कांही प्राण्यांची हाडे व माणसाचीही हाडे सापडली.हाडांची डीएनए टेस्ट करण्यात आली.बाबासाहेब देशमानेंचा डीएनए घेण्यात आला होता.एकाही हाडामध्ये बाबासाहेब देशमानेंचा डीएनए सापडला नाही.सुसरीने खाल्ल्यामुळे सुलभा हिचा मृत्यू झाला असे सर्वजण आतापर्यंत समजत होते.तसे चित्रण दिसले होते.ते चित्रण फसवे आहे असा शेवटी निष्कर्ष काढावा लागला.तसे असेल तर सुलभा शेवटी कुठे गेली असा प्रश्न निर्माण झाला.तिची मोटार तिची पर्स तिचा कॅमेरा एवढेच काय पण तिचा फोनही मोटारीत सापडला होता.तिने बहुधा नवीन फोन व नवीन सिमकार्ड घेतले असावे.तिचे आधारकार्ड पॅनकार्ड वगैरे महत्त्वाची कागदपत्रे तिला लागत असल्यामुळे कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये होती.ते कागदपत्र हॉस्टेलमधून गायब झाले होते.
या सगळ्यांतून एकच तर्क निघत होता.नियोजनपूर्वक सुलभा नाहीशी झाली होती.ती उत्कृष्ट फोटोग्राफर होती.तिने कॅमेऱ्याकडे पाहून हात जोडून आत्महत्या करीत आहे वगैरे गोष्टी सांगितल्या.कॅमेऱ्यासमोर ती एका तलावात शिरली.नंतर तोच कॅमेरा काळडोहासमोर ठेवण्यात आला.तलावात कुत्रा शेळी असा एखादा जिवंत प्राणी फेकण्यात आला असावा.सुसरीने त्याला खाण्यासाठी झडप मारताच त्या वेळचे चित्रण करण्यात आले.एकूण चलतचित्र पाहत असताना सुलभा तलावात शिरली सुसरीने तिला पकडले आणि खाल्ले असे चित्र निर्माण होत होते.कॅमेऱ्यातील चित्रण पाहून आतापर्यंत सर्वजण तसेच समजत होते.सर्वांना चकवा देऊन, योजनाबद्धरीत्या फसवून सुलभा नाहीशी झाली होती.असा निष्कर्ष शेवटी काढावा लागत होता.
बाबासाहेबांनी श्रद्धेय पांडेचा तपास करण्याचा प्रयत्न केला.कॉलेजातून त्यांनी त्याचा घरचा पत्ता काढला.कॉलेजमधून घरचा पत्ता सहज मिळत नव्हता.बाबासाहेबांना त्यांचे वजन वापरून तो मिळवावा लागला.श्रद्धेयसुध्धा गायब झालेला होता.त्याच्या घरच्या मंडळींनी तो अकस्मात नाहीसा झाल्याचे सांगितले.त्यांना त्याचा पत्ता माहीत नव्हता.तेही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते असे निदान बाबासाहेबांना सांगण्यात आले.
सुलभाला शोधून काढण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते.समाधान एवढेच होते की ती मेली नव्हती जिवंत होती.बाबासाहेब आपल्या लग्नाला संमती देत नाहीत असे पाहिल्यावर त्यांना दुखवून लग्न करण्यापेक्षा असा मार्ग चोखाळणे तिला जास्त श्रेयस्कर वाटले असावे. परंतु आपल्या मृत्यूमुळे बाबांना व आईला केवढा मोठा धक्का बसेल याची कल्पनाच तिने केली नव्हती. त्यामुळे तिने मैत्रिणींकडे जाण्याचे नाटक केले. दुसर्याच तलावात ती शिरत असल्याचे चित्रण केले.एखादा जिवंत प्राणी काळडोहात फेकून, सुसर ती पकडत असल्याचे चित्रण केले.सुलभालाच पकडले असे दिसत होते.मोटार पर्स कॅमेरा फोन सर्व सोडून ती श्रद्धेय पांडे बरोबर तिच्या प्रियकराबरोबर निघून गेली.आता ती कुठे आहे ते शोधून काढणे दुरापास्त होते.ती भारतात आहे की परदेशात सेटल झाली आहे ते कळायला कांहीच मार्ग नव्हता.
९
बाबासाहेबांनी एखाद्या गुप्तहेर संस्थेची मदत घेण्याचे ठरविले.श्रद्धेय व सुलभा या दोघांचे अनेक कोनातून काढलेले फोटो त्यांच्याजवळ होते.आपल्या फोनवरुन आपण कुठे आहोत ते शोधले जाऊ नये म्हणून सुलभा तिचा मोबाईल येथेच सोडून गेली होती.त्यामधील फोटो तिने डिलीट केले नव्हते.त्यामुळे बाळासाहेबांजवळ तिचे असंख्य फोटो तर होतेच परंतु तो एक त्या दोघांना विरंगुळाही होता.तिच्या कॅमेर्यामधले तिने केलेले चित्रण व फोटो,त्याचप्रमाणे मोबाईलमधील फोटो बाबासाहेब व आईसाहेब प्रोजेक्टरच्या साहाय्याने मोठय़ा स्क्रीनवर पाहत असत.मेलेल्या सुसरीत सुलभाची हाडे न सापडल्यामुळे ती जिवंत असल्याची आशा चांगलीच पल्लवीत झाली होती.
कितीही पैसा खर्च झाला तरी चालेल परंतु वाट्टेल ते करून या दोघांना शोधून काढाच असे त्यांनी त्या एजन्सीच्या प्रमुखाला सांगितले होते.अॅडव्हान्स म्हणून एक भरभक्कम चेक दिला होता.ती एजन्सी स्वतः व त्यांच्या देश परदेशात असलेल्या अनेक कॉन्टॅक्ट्स मार्फत दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होती.निरनिराळ्या गुप्तहेर संस्था परस्परांशी संपर्कात असतात.एकमेकांची कामे करीत असतात. परस्परांना मदत करीत असतात.फेसबुक इन्स्टाग्राम इत्यादी सामाजिक माध्यमांवर त्यांचा फोटो कुठे येतो का हे बारकाईने पाहिले जात होते.गुप्तहेर संस्थेने श्रद्धेयच्या आई वडिलांवरही लक्ष ठेवले होते.त्यांच्यामार्फत दोघे सापडतील अशीही एक आशा होती.
याना पाहिले का?माहिती असल्यास या नंबरवर संपर्क साधावा. या सदराखाली टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात फोटो देण्याचे शक्यतो टाळले जात होते.त्या दोघांना,श्रद्धेय व सुलभाला, सुलू जिवंत आहे हे बाबासाहेबांना व आईला कळले आहे हे कळू न देता अकस्मात त्यांना चकित करण्याची बाबासाहेबांची योजना होती.
एका गुप्तहेर संस्थेला कानपूरमध्ये तशा वर्णनाचा तरुण दिसला.त्याचा पाठलाग करीत ते तो राहत असलेल्या ठिकाणी पोहोचले.येथे कानपूरमध्ये त्याने नोकरी धरली होती.दोघांनीही लग्न केले होते.त्याना एक मुलगाही होता.दोघेही मजेत राहत होती.त्या गुप्तहेर संस्थेने ती बातमी बाबासाहेबांनी नेमलेल्या गुप्तहेर संस्थेला कळविली.पूर्णपणे खात्री करून घेतल्यावर ती बातमी बाबासाहेबांना सांगण्यात आली.बाबासाहेब व आईसाहेब लगेच मुंबईला पोहोचले आणि फ्लाईटने कानपूरला गेले.
१०
श्रद्धेयबरोबर ती योजनापूर्वक पळून आली खरी,परंतु तिला सतत आई बाबांची आठवण येत असे.दोघे काय करीत असतील असा विचार तिच्या मनात नेहमी येत असे.त्यांनी आपण मेल्याचे पाहून किती हाय खाल्ली असेल हाच विचार तिच्या मनात येत असे.आपण उचललेले पाऊल बरोबर होते की नाही असा विचार तिच्या मनात नेहमी येत असे.एकीकडे ती श्रद्धेयबरोबर आनंदात संसार करीत होती खरी परंतु दुसरीकडे आई बाबांच्या केलेल्या फसवणुकीमुळे तिचे मन तिला सतत खात असे.
तिनेही एका गुप्तहेर संस्थेमार्फत आई बाबा कसे आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.दोघेही व्यवस्थित असल्याचा अहवाल त्या संस्थेने दिला होता.त्यामुळे तिचा ताण बराच कमी झाला होता.तरीही त्या दोघांच्या आठवणीने ती अस्वस्थ होत असे.मुलगा झाल्यावर तर तिला आई बाबांच्या आठवणी सतत येत असत. नातू झाला म्हणून दोघेही किती आनंदली असती, त्यांनी त्याचे काय काय लाड केले असते, अशा गोष्टी तिच्या मनात सतत येत असत.सरळ उठावे दोघांनीही अमरगावला जावे आणि आई बाबांच्या पायावर डोके ठेवून त्यांची क्षमा मागावी असे ती अनेकदा श्रद्धेय जवळ बोलून दाखवी.बाबा कसे रिअॅक्ट होतील,त्यांना बघितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असेल त्याचा तिला नक्की अंदाज येत नव्हता.बाबासाहेबांना फसवणुकीचा फार राग होता.आपण त्यांना हातोहात फसविले.ते क्षमा करतील की नाही असे तिला सतत वाटे.त्यामुळे त्यांना भेटण्याची योजना ती सतत पुढे ढकलली असे. आई बाबा आपल्याला क्षमा केल्याशिवाय राहणार नाहीत असे तिचे मन तिला ग्वाही देत असे.अशा दोलायमान स्थितीत राहण्यापेक्षा एकदा सोक्षमोक्ष करुन टाकावा असे तिला वाटे.श्रद्धेयचेही मत तिच्यासारखेच होते.दोघेही अनेकदा अमरगावला जाण्याची योजना आखत.आणि पुढे ढकलीत असत.
११
दरवाजावरची बेल वाजली म्हणून सुलभा दरवाजा उघडण्यासाठी गेली.दरवाजा उघडल्यावर तिला तिचे लाडके आईबाबा दिसले.सुलभा एकदम त्यांच्या गळ्यातच पडली.तिघांच्याही डोळ्यांतून अश्रूंचा पूर चालला होता.हे अश्रू अर्थातच आनंदाचे होते.सुलभाला त्यांच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीला त्यांनी पाहिले त्यांना तीन वर्षे झाली होती.
भावनावेग आवरल्यावर त्यांनी नातवाला आपल्या छातीशी धरले.चिंतामणीला चिंटूला,ही दोघे कोण? ती रडत कां आहेत? त्यांनी आपल्याला छातीशी इतके घट्ट आवळून कां धरले?याचा उलगडा होत नव्हता.ते त्याचे वयही नव्हते.आपल्याला छातीशी घट्ट धरल्यामुळे गुदमरल्यासारखे होत आहे एवढेच त्याला कळत होते.घुसमटल्यामुळे,बाकी सर्वांना रडताना पाहून, तोही रडू लागला होता.
१२
श्रद्धेय कामावर गेला होता.संध्याकाळी तो घरी आला तेव्हा त्याला आई बाबा आल्याचे कळले.त्याने दोघांच्याही पायावर डोके ठेवले.तो त्याचे मस्तक त्यांच्या पायांवरून दूर करायला तयार नव्हता.बाबासाहेब अहो हे काय करता असे पुन्हा पुन्हा म्हणत होते.मला क्षमा केल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही असे तो म्हणाला.त्यांनी क्षमा केली असे पुन्हा पुन्हा सांगितले.
१३
तिघांनाही घेवून बाबा व आई अमर गावाला परत आली.त्यांनी दोघांनाही आता येथेच कायमचे राहा असे सांगितले.मृत्युपत्र पुन्हा बदलून त्यांनी ते लाडक्या मुलीच्या व जावयाच्या नावे केले. बाबासाहेबांचा सर्वदूर पसरलेला कारभार आता सुलू व श्रद्धेय पाहात असतात. आता पाचही जण आनंदात अमरगावाला असतात. अनेकदा
फिरायला काळ डोहावर मोटार घेऊन जातात.त्यांना पूर्वीचा प्रसंग आठवतो.काळडोह आता पूर्ण सुरक्षित झाला आहे.
(समाप्त)
३/९/२०२१©प्रभाकर पटवर्धन